घरफिचर्सपाऊस आला गं... आला गं

पाऊस आला गं… आला गं

Subscribe

पहिल्या पावसाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जणू चांदण्याने भरलेले आभाळ खाली उतरल्याचा भास होतो. आपण जणू या चांदण्याच अंगावर झेलत आहोत की काय, असा भास होतो. पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची ती अजब किमया डोळे सताड उघडे ठेवून बघत रहावी... इतके दिवस निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते. त्या ढगांची गर्दी बघत राहावी...ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज तेव्हा टाळमृदुंगाशी स्पर्धा करतो की काय, असा भास व्हावा... सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा, एवढा नादमय असतो.

पहिल्या पावसाची गोष्टच काही न्यारी! पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसू लागल्या की, येणार्‍या मृगाची चाहूल लागते. पहिल्या पावसाची आतुरता ही केवळ शेतकर्‍याच्या आतुरतेचा भाग नाही तर सृष्टीतील सर्वच घटक या सृजनसोहळ्याची वाट बघत असतात. पावसाची आणि आपली गट्टी येरे येरे पावसा तुला देतो पैसा या गीताच्या बडबडण्यापासून सुरू होते. त्या बोबड्या बोलांना पाऊस म्हणजे नक्की काय हे कळत नसतं, पण त्याच्या बरसण्याची वाट तेव्हा बघायची सवय लागली ती आजच्या मितीपर्यंत…

लहानपणी एखाद्या सोनसकाळी उठलं की, समोरच्या फणसाच्या झाडाच्या पानांतून टपटप पाणी गळायला लागायचं. समोरची चिंच टवटवीत दिसायची. खळ्याच्या पेळा ओल्याचिंब झालेल्या असायच्या. समोरचा गडगा ओला झालेला असायचा. पाणंदीतल्या वाटा लालमाती वाहून मत्त झाल्या असायच्या तेव्हा मनातल्या मनात खूणगाठ बांधली जायची की, रात्रीच्या त्या तप्त झालेल्या वातावरणात हा गुलाम गुपचूप येऊन गेला… लहानपणीचा पहिला पाऊस हा असा होता …त्याचा आणि माझा असा एक गुप्त ठराव झाला होता… तो कधी येऊन गेला न कळण्याएवढा मी लहान होतो तरी त्याचे आणि माझे नाते खरंतर तेवढ्या जिव्हाळ्याचे होते.

- Advertisement -

पहिला पाऊस येणार याच्या काही सांकेतिक खुणा होत्या, का माहीत नाही पण दरवर्षी त्या खुणा तशाच दिसायच्या. समोरच्या चिंचेवर उन्हाळ्यात कावळा येऊन बसायचा. तो कावळा दिसेनासा झाला की, आजी म्हणायची की, आता येतलो हा पावस येतलो… त्या पहिल्या पावसाची आतुरता ती काय वर्णावी. त्या पहिल्या पावसाची आतुरता कुणाकुणाला असते? बहुतेक या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला ही आतुरता असतेच.. अंगावर घामोळी घेऊन गावभर फिरणार्‍या आमच्यासारख्या पोरांना तर खळ्यात काळ्या मुंग्या दिसू लागल्या की, आनंदाचे उधाण यायचे… आमच्यासाठी ती पहिला पाऊस पडण्याची किंवा पाऊस जवळ येण्याची खूण असायची… अशाच कुठल्या रोहिणी नक्षत्रात पावसाची वाट पहात कुडाळच्या वीणागेस्ट हाऊसच्या गल्ल्यावर बसून आरती प्रभूंनी,

येरे घना येरे घना
न्हाऊ घाल माझ्या मना …. अशी कविता लिहिली असावी.

- Advertisement -

एखादा शेतकरी संध्याकाळी गुरांना गवत घालताना वाड्याच्या बाहेर येऊन कपाळावर आडवा हात धरून आकाशाकडे एखादा काळा ढग दृष्टीस पडतो का ते बघायचा आणि ….आजून खय काय ना बा… कदी येतलो बगुया… म्हणून कपाळावरचा हात खाली घ्यायचा… वडाच्या झाडाखाली बसून गजालीना उत आला असताना कोणतरी बाबी पेडणेकर यायचा आणि ….काय रे केडल्यात पावस इलो काय रे ….? अशी चौकशी करायचा. त्याला नक्की काय म्हणायचे हे कोणाला कळायचे नाही, मग कोणी विचारलं की, नक्की काय म्हणणे आहे ….तर बाबी म्हणायचा …अरे केडल्यात पावस पडलो की, आमच्यारी आठ दिवसात येतलो …. तेव्हा कळायचे की, त्याच्या म्हणण्यातील केडला म्हणजे माकड नसून केडला म्हणजे केरळ आहे… अशा गमतीजमती वडाच्या पारावर चालू असताना अचानक सगळ्यांची पळापळ होते.
खळ्यात बघितलेल्या काळ्या मुंग्या अजून मोठ्याप्रमाणात जवळ येतात. चिंचेवरच्या कावळ्यांचे दर्शन होत नाही. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते. पूर्वेकडून गार वार्‍याची झुळूक येते… चरायला गेलेल्या गायी शेपट्या वर करत वाड्याकडे येतात. झाडं डोलायला लागतात. गायरीत टाकलेल्या शेणाला विशेष वास यायला लागतो. कुणग्यात पसरलेल्या जाळाला फक्कड सुगंध येऊ लागतो. वारा एवढ्या जोरात वाहू लागतो की, कुणग्यातली माती वर उडत राहते. आकाशात काळे ढग आणि त्याबरोबर विजांचा कडकडाट सुरू होतो…त्यातली एखादी वीज कुठल्यातरी झाडावर कोसळावी आणि इतके दिवस वाट पाहिलेल्या पावसाला सुरुवात व्हावी… त्याच्या त्या पर्जन्यधारा शिडकावा करू लागतात. त्या शिडकाव्याबरोबर वर आलेला मातीचा तो मृदगंध नाकात भरून रहातो.

हा असा पाऊस सुरू झाला की, समोर निसर्गकवी नलेश पाटील दिसायला लागतात… अंगात सदरा, हातात कवितेचा कागद, मनगटात मोठं कडं धारण केलेले नलेश पाटील समोर बसून…
पाऊस आला ग आला ग
ऋतू हिरवा मोर झाला ग … ही कविता म्हणत आहेत असा भास होतो… अशाच कुठल्या पहिल्या पावसाच्या ओढीने सावंतवाडीच्या मोतीतलावाकाठी बसून कविवर्य डॉ. वसंत सावंत म्हणून गेले असतील,

असा मत्त पाऊस यावा मृगाचा
उरीचे उन्हाळेच जावे लया
अशी वीज हाडातून कोसळावी
झळांतून जन्मास यावे पुन्हा….

दिशापुत्र मी पावसाचा सखा या
भ्रमंतीस आकाश वाटे उणे
इथे या भूमीचा मला शाप आहे
चुडेदान देऊन जावे पुढे…

पहिल्या पावसाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जणू चांदण्याने भरलेले आभाळ खाली उतरल्याचा भास होतो. आपण जणू या चांदण्याच अंगावर झेलत आहोत की काय, असा भास होतो. पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची ती अजब किमया डोळे सताड उघडे ठेवून बघत रहावी… इतके दिवस निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते. त्या ढगांची गर्दी बघत राहावी… ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज तेव्हा टाळ-मृदुंगाशी स्पर्धा करतो की काय, असा भास व्हावा… सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा एवढा नादमय असतो. तुकारामांच्या भैरवीतली तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हा संदर्भ मातीला या काळात तंतोतंत लागू पडतो.

जेव्हा पावसाचे ते अगणित थेंब मातीत मिसळतात तेव्हा माती गर्भवती राहून तिच्या कुशीतून बीजाला कोंब फुटतो. पहिला पाऊस पडला की, वातावरणात विलक्षण गारवा येतो. या मृगाच्या पावसाचे आणि सृजनाचे एक विलक्षण नाते आहे. वळवाचा पाऊस आणि मृगाच्या पावसात तसा जमीन आसमानाचा फरक … वळवाचा पाऊस एकदा लागून गेला की, तो नुकसानच करून जातो. पण मृगाचा पाऊस असा नाही. तो आला की, सगळ्यांना सुखावून जातो. झाडावेलींना, गुराढोरांना तो वेड लावतो.

वयाच्या विशीपर्यंत बहुतेक पहिला पाऊस मी माझ्या गावच्या-आयनलाच्या खळ्यात बसून बघितला. त्या वर्षी गरम फार होत होतं म्हणून खळ्यात बसलो होतो. खळ्यात पेळेवर काळ्या मुंग्यांची रांग दिसू लागली. आकाशात नेहमीचे पक्षी इकडे तिकडे फिरू लागले. त्यांचा चिवचिवाट सांगून जात होता की, पाऊस आता नक्की जवळ आला आहे. समोरच्या चिंचेवर नेहमी बसणारा कावळा त्या फांद्यात लपला गेला. चिर्‍याच्या भिंतीवर भुंगे फडफडताना दिसू लागले. त्या भुंग्यांनी सकाळपासून भू भू असा विशिष्ट आवाज करून भूनभून लावली होती.

दुपार कलंडून गेली… मी घरातून देवळात जायला निघालो … उन्हाळ्याच्या दिवसात मधल्या वाटेने मी देवळात पोचलो. देवाचं दर्शन घेतलं. देवळाच्या कठड्यावर दोन चार गाववाले बसले होते. त्यांच्याशी पावसाच्या गप्पा मारून झाल्या. सगळ्यांच्या चेहर्‍याकडे बघितलं की, एक गोष्ट नक्की कळते की, हे सगळे जण पावसाची वाट बघत आहेत, चातक पक्ष्याने बघावी तशी ! या सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मी तासभर बसलो आणि पुन्हा निघणार इतक्यात मघाशी जाणवणारा उन्हाळा एकाएकी कुठे तरी गडप झाला, नदीच्या दिशेकडून थंड हवेच्या लहरी त्या स्निग्ध वातावरणात पसरल्या. धुळीचे लोळ इकडून तिकडे वहात गेले.

वातावरणात कमालीचा गारवा आला, थंड वार्‍याच्या झुळुका पसरू लागल्या. त्या थंड वार्‍याच्या झुळुका म्हणजे आनंदलहरी जणू ! कुठल्या तरी अनाम तेजोमय लहरी, प्रत्यक्ष जीवाशिवाशी सौख्य साधणार्‍या. अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. मी विचार केला, इतक्यात थोडाच हा पाऊस कोसळणार आहे. त्याला खाली बरसायला निदान तास दोन तास तर नक्की लागतील, तोपर्यंत मी नक्की घरी पोचेन. मी पाच पावलं देवळातून पुढे गेलो तर ढगांचा गडगडाट सुरू झाला. ढगांचा गडगडाट आणि त्यानंतर विजांचा लखलखाट! मला पुढे पाऊल टाकू की, नको या संभ्रमात सोडणारा तो क्षण. तरी विचार केला कोसळला तर थोडाच आपल्याला भिजवेल?

त्या लखलखाटात मी पाउल पुढे टाकले. देवळाकडून रस्त्यावर आलो आणि सृष्टीने आपला चमत्कार दाखवायला सुरुवात केली. त्या लखलखणार्‍या वातवरणात मृगाच्या धारा आता चक्क कोसळू लागल्या. माझ्या हातात छत्री नव्हती की, डोकं झाकायला एखादा प्लास्टिकचा कागद. त्या मृगधारा अंगावर घेत मी तसाच रस्त्यावरून निघालो. त्या गडगडाटी वातावरणात मला पावसाचा अंदाज आला नाही. तळकोकणात पहिला पाऊस पडतो तो असा ढोलताशे घेऊनच येतो. मी सहज वर बघितले तर पावसाचा वेग कळला. त्या पावसात झाडं तीर्थस्थान करू लागली होती. झाडांच्या पानामधून गळणारे पाणी रस्त्यावर निथळू लागले. आकाशातून पडलेले ते तीर्थ मातीत मिसळून तो मृदगंध आता नाकात दरवळू लागला. त्या मृदगंधाची तुलना जगातल्या कोणत्याच अत्तराशी होऊ शकत नाही. हा मृदगंध कुठेच बंदिस्त करता येत नाही. त्याचा संबंध थेट मानवी हृदयाशी.

मी त्या मृदगंधाने धुंद होऊन गेलो. तसा भिजत पुढे निघालो तर रस्ता पूर्ण स्वच्छ झाला होता. पहिल्या पावसाच्या त्या सुवासिक लहरी जशा अंगावर पडू लागल्या तशा गेले दोन महिने चाललेली अंगाची काहिली थांबली. अंगावरचा रोम नी रोम पहिल्या पावसात भिजला …धुंद झाला. हा पाऊस असा अंगात मुरु लागला की, पुन्हा शरीर आणि मन दोन्ही उल्हासित होतात. पहिला पाऊस पहिला मनात बरसतो आणि मग शरीरावर बरसतो. बाकी कोणी काही हवामानाचे अंदाज सांगू देत, पण सकाळी मुंग्यांनी आणि घरात उडणार्‍या भुंग्यांनी पावसाचे वर्तमान सकाळीच कळवले होते. त्या धुँवाधार पावसात मी नदीच्या काठी आलो तर गेले दोन महिने सुस्त पहुडलेली नदी वहाती झाली होती.

मी पहिल्या पावसाचा असा आनंद पहिल्यांदा घेत होतो. नदीच्या काठावरून आत बघताना त्यावर तयार झालेल्या पर्जन्य लहरी तयार होताना निसर्गाने काय गंमत आपल्यासाठी तयार केली आहे याचा अंदाज घेत होतो. इतकी वर्षे गुरे पाण्याला घेऊन येताना ही नदी अशी कधीच वाटली नाही, पण आज त्या नदीच्या वाहण्याचा रुबाब काही और होता. पहिल्या पावसाच्या शुभंकर सरी या नदीच्या पात्रात मिसळून नदीला जणू नवसंजीवनी मिळाली होती. त्या नदीच्या निसरड्या काठावरून वर कुणग्यात आलो तेव्हा समोरचे ते विहंगम दृश्य बघून माझे पाय तिथेच खिळून राहिले.

झाडांना जेवढा उल्हास चढला होता, त्यापेक्षा जास्त उल्हास गुरांना चढला होता, झाडाच्या खाली कुणाची गुरंढोर पाऊस चुकवून थांबली होती. त्या पहिल्या पावसाचा आनंद घेत गायींची उनाड वासरे इकडे तिकडे शेपट्या वर करून भिजत होती. त्यांच्या पाठीवर पावसाचे ते अगणित थेंब पडले होते. पहिल्या पावसाच्या त्या आनंदात समोरचा डोंगर उल्हासित होऊन स्वतःच्या धुंदीत आपल्या शिरावर अनेक हिरवाई घेऊन खुशीत येऊन डोलत होता. त्या पाणंदीतल्या पाणयाळलेल्या वाटेने जाताना लालमातीने जड झालेला पाय पुढे टाकता येत नव्हता. एवढा पावसाने मातीचा ठाव घेतला होता. त्या धुंद वातावरणात पाणंदीतून जाताना अंगावर झाडांच्या पानातून पडणारे पावसाचे अस्ताव्यस्त पडणारे ओघळ घेताना मन केवढं उल्हासित झालं होतं म्हणून सांगू… तसेच पावसाचे ते ओघळ अंगावर घेत मी घरी पोचलो तेव्हा पहिल्या पावसाने अंग पूर्ण भिजले होते.

मी खळ्यात पोचलो तेव्हा घरातली सगळी लहान मुलं पावसाच्या पाण्यात खेळत होती. समोरच्या पाटातून पाणी वहायला लागले होते. इतके दिवस हा पाट कोरा ठणठणीत होता. पहिला पाऊस पडला म्हणजे आता चढणीच्या माशांना जोर येणार ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली होती. हा पावसाळा नवीन चैतन्य घेऊन येतो. मनाला जगायला नवीन उभारी देतो. त्या थंड झालेल्या वातावरणात मी खळ्यात उभा राहिलो. सृष्टीची ती हिरवी गौळण मला आज किती वेगळी…विहंगम …अविचल…अनिकेत दिसत होती. आकाशात काळा रंग, जमिनीवर लाल, हिरवा रंग यांच्या मिश्रणातून तयार झालेली वेगळीच रंगसंगती आज अनुभवायला मिळत होती.

आज घरात अंधाराचे साम्राज्य होते. पहिल्या पावसाचे आणि विजेचा छत्तीसचा आकडा असावा. पहिला पाऊस आला रे आला की, घरातली वीज गेली म्हणून समजा. त्या अंधारातच मग माळ्यावर ठेवलेले कंदील खाली काढले जायचे. पाटल्यादारी ठेवलेल्या गोणीतून पोसाभरून कोंडा वळईत घेऊन यायचे. त्या कोंड्याने कंदिलाची काच पुसली जायची. कंदील पेटवून तो खुंटीवर टांगला गेला की, त्या कंदिलावर पिंगानी झडप मारायची. त्या कंदिलाच्या एवढ्याशा प्रकाशात वळई उजळून निघायची. घरात त्याचवेळेला शेंगा भाजल्याचा वास यायचा आणि जिभेच्या सार्‍या रसना त्या वासाकडे केंद्रित व्हायच्या. बाहेरच्या पावसाचा आवाज, त्यात कंदिलाची भगभग…मातीचा तो दरवळ …आणि त्यात शेंगा भाजल्याचा वास किती तो निर्मळ क्षण ! आयुष्यातले हे छोटे छोटे आनंदाचे जगण्याचे क्षण पहिला पाऊस मिळवून देतो.

बुळबुळीत झालेल्या खळ्यात रात्री माशांना जायचे बेत रंगत होते…घरात आज भजी केलीच पाहिजे असा फतवा काढला होता. गावच्या त्या पहिल्या पावसाच्या आठवणी मनावर आजही कोरलेल्या आहेत. त्या पावसाच्या त्या तुषार आणि मत्त लहरी अंगावर घेत असताना अनेक पावसाळ्यांचा हिशोब मांडता येऊ शकतो. गावच्या पावसाच्या जेवढ्या आठवणी मनावर गडद झाल्या आहेत, तेवढाच शहरातला हा पहिला पाऊस जवळचा वाटतो.

गेली कित्येक वर्षे बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालामुळे पहिल्या पावसाच्या आधीच मी मुंबईला येतो. मुंबईतल्या या गर्दीत या पावसाचे महत्व कमी होत नाही. असंख्य लोकांच्या या भाऊगर्दीत पाऊस तसाच पडतो. निसर्ग दोन्ही करांनी कवेत घ्यायचा प्रयत्न करतो. शहरी सभ्यता म्हणा किंवा गरज म्हणा, प्रत्येकजण त्या पहिल्या पावसाचा आनंद आपल्या पद्धतीने साजरा करतो. शहरातले बदलते ऋतू या पावसाच्या आगमनाची तेवढीच आतुरतेने वाट बघतात.

शहरातल्या पहिल्या पावसात रस्त्यावर खूप ट्रॅफिक जॅम होते. रेल्वेचे टाईमटेबल कोलमडते. पहिल्या पावसाच्या आनंदाचा नाही म्हणायला विचका होतो, असं असलं तरी त्याचा आनंद कमी होत नाही. शहरीकरणाच्या त्या अनंत कल्पनेत पहिल्या पावसाला एक आगळे स्थान आहे. पहिला पाऊस पडला की, ट्रेन पकडून सरळ चर्चगेट गाठावं. चालत जाऊन समुद्र गाठावा. त्याच्या उधाणलेल्या लाटा बघत तिथल्या मक्याच्या कणीसवाल्याला तिखट मीठ लावून कणीस भाजायला सांगून तिथल्या दगडावर बसून चिंब पावसात खावं. अगदीच नाही तर समोरच्या भजीवाल्याला गरम गरम भजी आणि चहा करायला सांगायचे. या रिमझिमणार्‍या सरी अंगावर घेण्यात किती मजा असते. प्रत्येकाच्या मनात एक पाऊस थैमान घालत असतो. त्या पावसाच्या रुपाला एकच नाव येत ते म्हणजे-चैतन्य. या चैतन्यातून एक नवीन सजीव सृष्टी जन्माला येत असते. त्या सृष्टीमागे विधात्याने केलेली एक रम्यरचना बघताना मानवी जीवनाच्या कृतार्थतेची पावती मिळते.

या जन्माला येणार्‍या सजीव सृष्टीत शेतकर्‍याने या पहिल्या पावसावर भरवसा ठेऊन केलेली जमिनीची मशागत, त्या जमिनीत रुतवलेला नांगराचा फाळ हे नातं कोण कसं उलगडेल? या प्रश्नांची उत्तरे कोणाला विचारावीत. माणसाचे आणि निसर्गाचे हे नाते अनादिकालापासूनचे. त्यापासून माणूस हा या पहिल्या पावसाचे स्वागत करत आला आहे. त्या पहिल्या पावसाच्या या नात्यात कुठली लोककथा कशी जन्मली हादेखील एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. पहिला पाऊस हा सृजनसृष्टीचा निर्माता! दूर कुठेतरी झाडीत बसलेला पावश्या म्हणत असलेले पेर्ते व्हा, पेर्ते व्हा हे गाणे या सृजनाच्या केंद्रबिंदूशी निगडित आहे.

पावसाच्या या आगमनाला ज्ञानेश्वरांनी सुकुलीन का म्हटले असावे, हे न सुटणारे कोडे. पहिला पाऊस हा सृष्टीला काय देऊन जात असावा. त्याच्या रंग, रुप, गंध, स्पर्श रसाचे कवींनी आपल्या शब्दात वर्णन केले आहे. त्यात तारुण्याचा उन्माद आहे. अध्यात्माचा गंध आहे. त्यात सामाजिकतेचे रूपक आहे. म्हणून सावंतवाडीचे आमचे कविमित्र दादा मडकईकर सहजपणे लिहून जातात…

तू पावस मी पावस पावस भरान इलो
सुक्या मनार…पानार…पानार…पावस पडान गेलो !

पावस तुझ्या डोळ्यात, पावस तुझ्या केसात
हळदीच्या अंगार पावस पडान गेलो
आबोलेचो वळेसार पावस भिजवन गेलो…

हीच पहिल्या पावसाची गंमत आहे. पहिल्या पावसात मी कुठेही असो… आयनलाच्या माझ्या गावात किंवा नवी मुंबईतल्या माझ्या शहरी घरात ….त्याचा आनंद कमी होत नाही…. तर दिसामासांनी तो वाढतच गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -