घरफिचर्सकापडी पिशव्यांची यशोगाथा!

कापडी पिशव्यांची यशोगाथा!

Subscribe

‘एका गटारात प्लास्टिक पिशव्यांमुळे अडकलेले कुत्र्याचे पिल्लू हे आमच्या टाकाऊपासून टिकाऊ या मोहिमेसाठी प्रेरणा देणारे ठरले. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे गटारात अडकलेल्या पिल्लाचा आम्हाला जीव वाचवता आला खरे, पण प्लास्टिकला पर्याय देण्याची नवीन उमेद आमच्यासाठी मिळाली. पर्यावरणासाठीची चळवळ म्हणूनच आम्ही कापडी पिशव्या शिवण्यासाठीची मोहीम हाती घेतली. त्यामधूनच कापडी पिशव्या शिवण्याची सुरूवात आम्ही केली.’ पालघर, वाडा तालुक्यातील महिला बचत गटाच्या प्रमुख प्रणिता अधिकारी यांनी सांगितलेली ही त्यांच्या बचतगटाची यशोगाथा.

आपण समाजासाठी काही तरी चांगलं करत असतो त्याचीच परतफेड ही वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने होत असते. आपला समाज, आपला गाव, महिला अशा विविध गटांसाठी काम करण्यासाठीच्या संधीचे सोने केले आहे पालघर, वाडा तालुक्यातील महिला बचत गटाच्या प्रमुख प्रणिता अधिकारी यांनी. आपलं महानगर आणि माय महानगरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘गाथा यशस्विनींची, महिला बचतगटांची’ या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आले होते. आपल्या चमकदार कामगिरीने महिलांपुढे एक आदर्श घालून देणार्‍या प्रणिता अधिकारी यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेला आतापर्यंतचा एक प्रवास …. पर्यावरणासाठी योगदानाची मोहीम मनाशी बाळगून त्यांनी गरजू महिलांच्या हाताला आता रोजगार देण्याचीही किमया केली आहे. कापडी पिशव्यांच्या माध्यमातून त्यांंनी या महिलांना नवी दिशा दाखवली आहे.

एक काळ असा होता जेव्हा प्रणिता अधिकारी या आपल्या मुलीच्या अंधत्वामुळे खूपच खचून गेल्या होत्या. पण आपल्या मुलीसाठी आपणच सर्वस्व आहोत हे लक्षात घेऊन त्यांनी हार मानली नाही. आज त्या आपल्या मुलीसाठी प्रकाश आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत, पण त्याहून मोठी कामगिरी म्हणजे ठाण्यातील वाड्यामध्ये अनेकांसाठी त्या उदरनिर्वाहाचा आधार मिळवून देण्यात यशस्वी ठरल्या आहेत. अवघ्या दहा महिलांपासून तयार झालेल्या बचतगटापासून आज २०० महिला बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत.

- Advertisement -

माझ्या पोटी अंध मुली जन्माला आल्या असे आमच्या आदिवासी समाजात मला हिणवल गेले. आपल्याच पोटी अशा अंध मुली का जन्माला आल्या? असे मनोमनी टोचत होते. त्यातूनच खचून जाऊन मलाही एकेकाळी नैराश्य आले. पण माझी सासू मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. प्रत्येकाच्या जीवनात अशा गोष्टी येतात, प्रत्येकाच्या नशीबाला चांगलीच फुल येतात असे नाही, असे सासूने मला समजावले. देवाने ही तुझी परीक्षा घेतली आहे, पण यामधूनच तुला सिद्ध व्हायचंय असा धीर सासूने दिला. माझ्या सासूला मुलगी नव्हती, पण अगदी मुलीसारखे वागवते. मला माझ्या मनासारखे काम करण्यासाठी तिने नेहमीच प्रोत्साहन दिले. सासूला शिक्षण घेऊन शिक्षिका व्हायच होतं, पण तिचे स्वप्न अपूर्ण राहिले. पण माझ्यातली चुणूक पाहून तिने मी पुढाकार घेण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला, त्यामुळेच आज मला समाजासाठी योगदान देणे शक्य झाले आहे.

आमच्या गावात जलस्वराज्य प्रकल्पाच्या निमित्ताने अण्णा हजारे यांच्या गावच्या दौर्‍याबाबत मला महिला ग्रामसेवकाकडून सांगण्यात आले, त्या दिवसानंतर आमच्या आदिवासी महिलांच्या विचारशैलीत मोठा बदल झाला आहे. आपल्या गावाचा, समाजाचा आणि महिलांचाही विकास करण्यासाठी या दौर्‍यातून मोठी प्रेरणा मिळाली. पुरूष प्रधान संस्कृतीचा गावात पगडा असल्याने माझ्या दौर्‍यासाठी सुरूवातीला विरोध झाला होता. पण त्यावेळीही सासूंनी माझ्या दौर्‍यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने मला राळेगणसिद्धीत झालेले काम पाहण्याची संधी मिळाली. माझ्या कुतुहलापोटी विचारण्यात आलेल्या प्रश्नांनी अण्णांनी माझ्यातली चमक पाहून मला शाबासकी दिली होती. तुझ्या मार्गात अडथळे येतील पण त्यावर मात करून नक्कीच काही तरी साध्य कर, असा अण्णांनी दिलेला आधार मला आजही आठवतो. या दौर्‍यानंतरच आम्ही समविचाराच्या अकरा महिलांनी एकत्र येऊन बचत गटाची सुरूवात केली, ती २० रूपयांच्या बचतीने. बँकांमध्ये खाते उघडण्यापासून ते व्यवहार करण्यापर्यंत आम्ही अनेक गोष्टी समजून घेतल्या. त्यामुळेच आमच्यापैकी ८ जणांना छोट्या स्वरूपाचे का होईना, पण ८० हजार रूपयांचे कर्ज घेणे सुरूवातीच्या काळात शक्य झाले. आम्ही बँकेतून कर्ज घेण्याची चर्चा यानिमित्ताने गावात सुरू झाली. पण दरम्यानच्या काळात एकदाही पैसे थकवल्याचा किंवा बुडवल्याचा ठपका बचत गटावर लागणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे इतक्या वर्षात बँकेकडून बचत गटाकडे बोट दाखवण्यात आल्याचा प्रसंग एकदाही उद्भवला नाही.

- Advertisement -

गावातले बरेचसे लोक महिला बचत गट येण्याआधी सावकाराकडे दागिने घेऊन शहरात जायचे. पण आज बचतगट हा अडीअडचणीला एक मोठा आधार झाला आहे. ज्यांना कुणाला गरज आहे त्यांना आमच्या बचत गटाकडून मदत करण्यात येईल अशीही भूमिका मांडून आम्ही अनेक महिलांना मदत केली. गावचा पैसा हा गावातच रहायला हवा हा त्यामागचा दृष्टीकोन होता. बचत गटातल्या कामातला पुढाकार म्हणून आम्हाला महालक्ष्मी सरसला आमची उत्पादने घेऊन जाण्याची संधी मिळाली. आम्ही आमच्याकडचे तांदुळासारखे धान्य, कडधान्य घेऊन गेलो. काही प्रदर्शनात आमच्याकडील सेंद्रीय मातीही आम्ही ग्राहकांना विकली, तीदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली हे विशेष. तर काही प्रदर्शनात आम्ही नेलेली उत्पादने ही अवघ्या काही दिवसांच्या कालावधीतच संपली असाही अनुभव आम्हाला आला. पण हे सगळं करत असताना आमच्या पिशव्यांच्या कामाला सुरूवात झाली. आमच्याकडे सहा महिलांनी टेलरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे आम्ही प्रदर्शनातही पिशव्या घेऊन जायला सुरूवात केली. मुंबईकर घरातून पिशव्या घेऊन बाहेर पडत नाहीत, त्यामुळे ही पिशव्यांची गरज पूर्ण करायची या उद्देशाने आम्ही प्रदर्शनात पिशव्या नेण्यासाठी सुरूवात केली.

एका गटारात प्लास्टिक पिशव्यांमुळे अडकलेले कुत्र्याचे पिल्लू हे आमच्या टाकाऊपासून टिकाऊ या मोहिमेसाठी प्रेरणा देणारे ठरले. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे गटारात अडकलेल्या पिल्लाचा आम्हाला जीव वाचवता आला खरे, पण प्लास्टिकला पर्याय देण्याची नवीन उमेद आमच्यासाठी मिळाली. पर्यावरणासाठीची चळवळ म्हणूनच आम्ही कापडी पिशव्या शिवण्यासाठीची मोहीम हाती घेतली. त्यामधूनच कापडी पिशव्या शिवण्याची सुरूवात आम्ही केली. सुरूवातीला गावच्या बाजारपेठेत कापडी पिशव्या विकण्याची सुरूवात केली. कापडी पिशव्या स्वीकारण्यासाठी दुकानदारांकडून अनास्था दिसली. कारण आमच्या कापडी पिशव्यांच्या किमतीच्या तुलनेत प्लॉस्टिकच्या शेकडो पिशव्या त्यांना मिळत होत्या. आपला पिशव्यांचा धंदा बंद करूयात असाही विचार एकदा मनात घर करून गेला. इतकी मेहनत करूनही पिशव्यांचा वापर होईना, त्यामुळे हताश झाल्यासारखे वाटले. शंकराच्या मंदिर परिसरात, यात्रेच्या ठिकाणीही पिशव्या विकल्या. पण कापडी पिशव्यांच्या कामाला किती यश मिळेल याबाबत शंकाच होती. राज्य सरकारकडून जेव्हा प्लास्टिक बंदीची घोषणा झाली, तेव्हा मात्र आमचा निर्णय योग्य होता, असे लक्षात येऊन हुरूप आला. आपल्या बचत गटांना राज्य सरकारच्या घोषणेमुळे काम येणार आहे हे मी आत्मविश्वासाने महिलांना सांगू शकले. आपले काम योग्य दिशेने सुरू आहे, आपण चांगला विचार करून एकजुटीने केलेले काम कधीही वाया जाणार नाही हा आमचा निर्णय योग्य ठरतोय हा आत्मविश्वास मिळू लागला. आमची टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना आम्ही चांगल्या उद्देशाने करतो आहोत, असे आम्ही ठिकठिकाणी सांगत होतो. त्यामधूनच आमच्या पिशव्यांच्या कामाची दखलही काही जणांनी घेतली. एक ना एक दिवस मेहनत कामी येईल या आत्मविश्वास आम्हाला होता.

मुंबईतील महालक्ष्मी सरसमध्ये आमच्या पिशव्यांचे काम पाहूनच आम्हाला पहिल्यांदा ३५०० पिशव्यांची ऑर्डर दिली. ही ऑर्डर आम्हाला शहरातही देता आली असती, पण गरजू खेड्यातील महिलांना हे काम मिळावे हा आमचा उद्देश होता असे त्यांनी सांगितले. ही ऑर्डर देण्याआधी त्या व्यक्तीने आमच्या कामाचा व्हिडिओ तयार करून वर्षभरापूर्वी नेला होता. गरज लागली तर आम्ही नक्कीच संपर्क करू असे ते सांगून गेले. वर्षभर ती व्यक्ती आमच्या संपर्कात होती. बरोबर एक वर्षानंतर ती व्यक्ती आमच्याकडे मुंबईपासून भेटायला आली. आम्हाला ३५०० पिशव्या द्यायच्या आहेत असे सांगून त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली होती. तुम्ही महिला खूप कष्ट घेऊन एका चांगल्या उद्देशाने हे काम करता हेच आम्हाला भावले आहे. त्यामुळेच आता या पिशव्या ‘लालबागच्या राजा’ला जाणार असे आम्हाला त्यांनी सांगितले. लालबागच्या राजाच्या दरबारात या पिशव्या जाणार हे कळाल्यावरच आम्हाला एक पैसाही फायदा नाही झाला तरीही चालेल, पण लालबागच्या राजाला या पिशव्या आम्ही २० रूपयांऐवजी १५ रूपयांमध्येच देणार असा आम्ही निर्णय घेतला. लालबागचा राजा आम्ही कधी पाहिला नव्हता, फक्त टेलिव्हिजनवर आणि वृत्तपत्रातूनच आम्ही गणपती पाहिला होता. आमच्या पिशवीच्या निमित्ताने लालबागच्या राजाला आमच्या महिलांनी तयार केलेली पिशवी जात असेल तर आम्हाला समाधान आहे. सातत्याने त्यानंतर आमच्या महिलांना रोजगार दिला. कधी पाच हजार पिशव्या तर कधी आठ हजार पिशव्यांची ऑर्डर त्यांनी आम्हाला दिली. एकदा त्यांनी स्वतः घरी भेट देऊन पिशव्यांसाठी कपडा पुरवण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर मांडला. कपडा शोधण्यासाठी होणारी वणवण कमी व्हावी याच उद्देशाने त्यांनी हा प्रस्ताव दिला.

मुलुंडच्या उत्कर्ष स्टार मंडळाकडून आम्हाला पिशव्या तयार करण्यासाठी कपडा मिळू लागला. लालबागच्या राजाच्या पाठोपाठच आम्हाला मुंबईतील ग्लोबल शाळेतूनही कामाची ऑर्डर मिळाली. या शाळेनेही आमचे काम पाहूनच ३००० कापडी पिशव्यांची ऑर्डर आम्हाला दिली. आता मुंबईतील एका मंडळाने आमच्या तालुक्यात कापडी पिशव्या तयार करण्यासाठी शिलाई मशीन्स दिल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाकडूनही आम्हाला पिशव्यांचे काम मिळाले. आदिवासी महिलांना मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची मागणी आम्ही उत्कर्ष स्टार मंडळाला केली होती. त्यांनी महिलांसाठी मशीन्स देतानात जागाही उपलब्ध करून दिली. आता दोन महिन्यातल्या एका बॅचला तीस मुली टेलरींगचे प्रशिक्षण घेतात. आतापर्यंत वर्षभरात ३०० मुली, महिला, विधवा महिला, निराधार महिलांनी याठिकाणी प्रशिक्षण घेतले आहे. या पिशव्यांच्या निमित्ताने अनेक महिलांना रोजगार मिळाला याचे आम्हाला समाधान आहे. तसेच पर्यावरणासाठी एक योगदान देण्यासाठी आमची मोहीम मदतीची ठरत आहे, यामुळे आम्हाला आमच्या मोहिमेला यश मिळाल्यासारखे वाटते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -