लॉकडाऊनचं कटू सत्य

भारतासह, आखाती देश, युरोपियन देशात कामगार, मजूर स्थलांतरितांच्या अनेक करूण कहाण्या सध्या करोनाग्रस्त देशात घडत आहेत. यामुळे आपल्याच देशात अघटित घडत असल्याचा विचार करणे योग्य नाही. कारण करोनामुळे मृत्यूचे संकट तर लॉकडाऊनमुळे कठिण झालेलं जिणं या दुहेरी खाईत आज जगातील प्रत्येक व्यक्ती उभी आहे. फरक फक्त एवढाच की ती खाई कशी पार करायची हे ज्याने त्याने स्वत:च ठरवायचे आहे.

Mumbai

डिसेंबर महिन्यात चीनमधून जगभरात पसरलेला करोना व्हायरस जानेवारीत भारतात पोहचला. सुरुवातीला साधारण वाटणार्‍या या सर्दी, खोकल्याच्या व्हायरसने दोन महिन्यातच आपला विळखा घट्ट केला आणि त्याच्या धास्तीने कधी नाही तो देश २५ मार्चला लॉकडाऊन करण्यात आला. अशा प्रकारच्या व्हायरसचा प्रादुर्भाव, त्यानंतर वाढणारी रुग्णसंख्या आणि तातडीने घेण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय हे सगळंच भारतीयांसाठी नवीनच होतं. यामुळे सुरुवातीला कोणीही लॉकडाऊनला फार गांभीर्याने घेतले नाही. काही दिवसांनी लॉकडाऊन मागे घेतला जाईल, अशी आशा देशवासियांना व नोकरीकामानिमित्त परराज्यात राहणार्‍या परप्रांतीयांना होती.

पण जसजसा करोनाचा संसर्ग वाढू लागला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली तसतसा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार हे जवळपास निश्चित झालं आणि हातावर पोट असणार्‍या गरिबांच्या काळजाचा ठोका चुकला. कंपन्या, बाजार, दुकानं, कारखाने सगळंच बंद. यामुळे कामधंदा पुन्हा सुरू होणार की नाही याची शाश्वती नाही. जे काही किडूकमिडूक जमवलं होतं तेही संपलं होतं. राज्य सरकारकडून जे काही खायला मिळत होतं त्याने पोट भरत तर नव्हतंच फक्त आतडी सुकत नव्हती. परिणामी पोराबाळांना घेऊन मजूरवर्ग शेकडो किलोमीटर वाट तुडवत गावाकडे निघाला आणि जगाच्या नजरा भारताच्या लॉकडाऊनकडे वळल्या.

शेकडो किलोमीटर पायी चालत जाणार्‍या, तहान भुकेने कासावीस झालेल्या मजुरांचे त्यांच्या बायकापोरांचे रडताणाचे, बायकांच्या रस्त्यात होणार्‍या बाळंतपणाचे, रस्त्यात तडफडून मरणार्‍या व तर कधी गाडीखाली आल्याने जीव गमवावा लागणार्‍या मजुरांचे, त्यांच्यावर करण्यात आलेल्या जंतुनाशक फवारणीचे विदारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अख्ख्या जगाने भारत सरकारवर संताप व्यक्त केला. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना व पूर्वनियोजन न करता लॉकडाऊन कसा काय केला गेला यावर आंतरराष्ट्रीय मीडियावर चर्चा रंगल्या. सरकारच्या तडकाफडकी निर्णयामुळे भारतात सर्वात मोठा मार्च सुरू झाल्याचे वृत्त जगभरात पसरले. कारण त्यांचा लॉकडाऊन आपल्यापेक्षा वेगळा होता.

तिथला लॉकडाऊन हा करोनाच्या संसर्गापेक्षा लोकसंख्या व आर्थिक फटका या निकषांवर नियोजन करून आखण्यात आला होता. यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत जगात सर्वात मोठा लॉकडाऊन हा भारतात करण्यात आल्याची नोंद करण्यात आली. मजुरांचे होणारे हाल बघून काही आंतरराष्ट्रीय मीडियाने भारतात गरीब माणसाला शत्रूप्रमाणे वागणूक मिळत असल्याच्या बातम्या रंगवल्या. ज्यामुळे स्वत:च्या देशातील करोनाच्या प्रादुर्भावापेक्षा भारतातील मजुरांच्या हलाखीच्या बातम्या व व्हिडिओ जास्त टीआरपी व व्ह्यूज मिळवून देणारे ठरले. यात प्रामुख्याने सगळ्यांनी धारावी, मुंबईतील रेल्वे स्टेशनबाहेर जमलेली मजुरांची गर्दी व पायी चालत जाणार्‍या मजुरांना जास्त हायलाईट करण्यात आले. त्यामुळे भारत हा गरिबांचा, रंजल्या गांजल्याचा देश असल्याचे जुने गाणे पुन्हा एकदा गाण्यात आल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर भारत सरकारने मानवता दाखवत या मजुरांसाठी काही नियम व अटी घालून श्रमिक ट्रेन व बसेसही सुरू केल्या आहेत. आता तर अभिनेता सोनू सूदसारखे अनेक सहृदयी लोक समोर येऊन या मजुरांची घराची वाट सोपी करून देत आहेत.

तर दुसरीकडे आखाती, युरोप आणि इतर देशांमध्ये स्थलांतरितांचे हाल मात्र वेगळेच आहेत. त्या त्या सरकारने देशातील स्थलांतरितांसाठी कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यातही आखाती देशांमध्ये बांधकाम व इतर कामांसाठी आलेल्या व अडकलेल्या स्थलांतरितांसाठी मोठाले कॅम्प उभारण्यात आले आहेत. पण या कॅम्प परिसरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. येथे अडकलेल्या मजुरांच्या टेस्ट होतातच असेही नाही. त्यांना मास्क व सॅनिटायझर्स जरी देण्यात आले असले तरी सोशल डिस्टन्सिंग येथे नावालाही नाही. यामुळे या कॅम्पमध्ये संसर्गाची शक्यता असल्याची भीती मजूर व्यक्त करत आहेत. अनेक जणांना कामाचे पैसेही मिळालेले नाहीत. यामुळे आज उद्या जरी मायदेशात जाण्यास मिळाले तरी विमानाच्या तिकीटासाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न या मजुरांना पडला आहे. दरम्यान, या मजुरांना त्यांच्या देशात जाता यावे यासाठी तेथील स्वयंसेवी संस्थाही काम करत आहेत.

युरोपातही अशीच परिस्थिती आहे. स्थलांतरितांसाठी कॅम्प जरी उभारण्यात आले असले तरी त्यांच्या टेस्ट करण्यात येत नाहीयेत. त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे; पण हे जे काही चाललं आहे ते कॅम्पमध्येच घडत असल्याने आतील बातम्या बाहेर येण्याचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे अनेक देश सगळं काही आलबेल असल्याचे भासवत असले तरी त्यावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. त्यातच सध्या सगळं जगच करोनाशी लढत असल्याने दुसर्‍या देशातील लोकांचे हाल दाखवत आपल्या देशात तुम्ही किती सुरक्षित आहात हे दाखवण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यात भारतातील मजुरांच्या करूण कहाण्या दाखवत पाकिस्तानसारखा देशही तेथील नागरिकांना तुम्ही किती सुदैवी आहात की पाकमध्ये जन्माला आलात असे भुलवत असेल तर नवल वाटण्याचे कारण नाही.

तर अमेरिकेसारख्या जगातील महासत्ता राष्ट्र असलेल्या देशातही अनेक स्थलांतरित आहेत. करोना, लॉकडाऊनमुळे त्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तेथेही लोक रस्त्यावर उतरले आहेत. आता तर वंशभेदाचा असूरही त्यात सामील झाला आहे. ज्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये लपण्यास भाग पाडलं आहे. यामुळे करोना बरोबर वंशभेदाचाही सामना अमेरिकन सरकारला करावा लागणार आहे. तर दुसरीकडे शेतीकामासाठी मेक्सिकन नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर येतात. पण करोनामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यांची उपासमार होत आहे. त्यांनाही आपआपल्या घराची ओढ लागली आहे. पण त्यांची आवश्यक कागदपत्रेच कंत्राटदार देत नसल्याने तेही अमेरिकेत अडकले आहेत. रोज ते सरकारी कार्यालयांपुढे जाऊन मोर्चे आंदोलन करत आहेत. पण त्यांचा आवाज कोणापर्यंतही पोहचत नाहीय. अशा अनेक करूण कहाण्या सध्या करोनाग्रस्त देशात घडत आहेत. यामुळे आपल्याच देशात अघटित घडत असल्याचा विचार करणे योग्य नाही. कारण करोनामुळे मृत्यूचे संकट तर लॉकडाऊनमुळे कठिण झालेलं जिणं या दुहेरी खाईत आज जगातील प्रत्येक व्यक्ती उभी आहे. फरक फक्त एवढाच की ती खाई कशी पार करायची हे ज्याने त्याने स्वत:च ठरवायचे आहे.