घरफिचर्सजगण्यातून जाणारा मुक्तीचा मार्ग

जगण्यातून जाणारा मुक्तीचा मार्ग

Subscribe

कशाला लष्कराच्या भाकर्‍या भाजताय ? अजून भरपूर आयुष्य बघायचंय तुम्हाला. कशाला वेळ फुकट घालवताय ? सुरुवातीला शेजार्‍यांपासून अगदी घरापर्यंत हाच सूर होता.(म्हणजे अजूनही कधी कधी असतोच) पण पोरांनी ठरवलेलं काही भव्य दिव्य अस काही जमलं नाही तरी आतापर्यंत ज्या काही सामाजिक कमतरता आपल्या आजुबाजूला दिसतायंत किंवा या आधी दिसत होत्या, त्या दूर करण्यात खारीचा वाटा उचलायचा. खरं तर अनेक गोष्टींच्या कमतरता असतात आपल्या आजूबाजूला. पण त्या दिसण्यासाठी जाणीव लागते. या जाणीवांतूनच जगात नव्या गोष्टी जन्म घेतात. जागतिक स्तरावर होणार्‍या मोठ्या क्रांतीपासून अगदी व्यक्तीच्या मनात झालेला बदल हा याच जाणिवांचा एक भाग असतो. अशा छोट्याशा जाणिवेतून बांधिलकी फाऊंडेशनया सामाजिक संस्थेची आम्ही सुरुवात केली.(मुहूर्तमेढ रोवली वगैरे शब्दप्रयोग वापरणार नाही, कारण यासाठी विशिष्ट असा दिवस ठरवला नव्हता.)

एखादा पक्ष, मंडळ किंवा सामाजिक संस्था जेव्हा स्थापन होते तेव्हा त्यामागे चळवळ असते किंवा काही समविचार असतात. आमच्या मनातही अशीच काहीसी चळवळ चालू होतीच. सांताक्रूझ या मुंबई उपनगराचा भाग असलेल्या शहरात राहणार्‍या 20 ते 30 या वयोगटातील आम्ही मुलांनी या संस्थेची सुरुवात केली. खरं तर संस्थेची नोंदणी होण्यापूर्वी आम्ही दिवाळी आणि नववर्षाला काही सामाजिक उपक्रम करायचो. पण त्यावेळी पैशांची बरीच चणचण भासायची. खिशातील पैसे काढून आम्ही अशी कामे करायचो. कालांतराने अशा सामाजिक उपक्रम एखाद्या नोंदणीकृत संस्थेमार्फत केले गेले तर मदतीचा ओघसुद्धा वाढेल,असे आम्हाला समजले आणि संस्थेची रितसर नोंदणी आम्ही केली. एखादे सामाजिक कार्य ठराविक काळातच करणार्‍या आमच्यावर आता वर्षभर काम करण्याची जबाबदारी होती. निरनिराळ्या योजना आखून वर्षभर उपक्रम राबवायचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते.

सुरुवातीला डोनेशनसाठी भरपूर ठिकाणी फिरायचो. काही ठिकाणी अनुभव चांगले यायचे तर काहीजण कुरकुर करायचे. आपल्या देशाला सामाजाच्या सेवेचा मोठा वारसा लाभला आहे, परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर हा वारसा कुठेतरी लोप होत चालला आहे की काय? असे कधी कधी वाटते. सुरुवातीच्या काळात काम कुठे करायचे, हे निश्चित करणे गरजेचे होते. शहरात राहून छोटे-मोठे इव्हेंट करून इतर सामाजिक संस्थांसारखा गाडा हाकलणे तेव्हा कोणालाही मान्य नव्हते. त्यामुळे ज्या ग्रामीण भागाशी शहरात राहणार्‍या प्रत्येकाची नाळ जोडली गेली आहे. त्या ग्रामीण भागात जाऊन काहीतरी शाश्वत असे काम करण्याची आमची इच्छा होती. एकंदरित खर्चाचा आढावा आणि कामाच्या वेळेची सांगड घालून मुंबईच्या आसपासच्या गावांना आपले कार्यक्षेत्र बनवण्याचे आम्ही ठरवले. त्यानंतर मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातील साखरे गावात आम्ही काम करायचे ठरवले.

- Advertisement -

संस्था म्हणून समाजोपयोगी कामाची सुरुवात असल्यामुळे सर्वजण जोशात कामाला लागले. गावच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर तेथील आदीवासी पाड्यांवरील काहींना अंग झाकण्यासाठीही पुरेसे चांगले कपडे नसल्याचे आम्ही जाणले आणि गावच्या सरपंचाला संपर्क करून तेथील ती गरज पूर्ण करण्याचे ठरवले. मुंबईतील नातेवाईक,ओळखीची माणसं आणि सोशल मीडियाद्वारे संपर्कात आलेल्या सर्वांना आम्ही कपडे देण्याचे आवाहन केले. समाजात दात्यांची कमी नसते याचा अनुभव त्यावेळी आम्हाला आला. भरपूर जणांनी अगदी स्वत:कडील नवे कपडेदेखील दिले.

महिन्याभरात आमच्याकडे संपूर्ण गावाला पुरतील इतके निरनिराळ्या वयोगटाचे कपडे जमा झाले. त्यात काही जणांनी अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या बालकांचे देखील कपडे दिले होते. आमच्या संस्थेसाठी ही मोठी आधाराची बाब होती. जमा झालेले सर्व कपडे घेऊन आम्ही साखरे गाव गाठले. साधारण 100 लोकवस्तीचा आदीवासी पाडा होता तो. ठरल्याप्रमाणे सर्व व्यवस्था करून आम्ही तेथे कपड्यांचे वाटप केले.कपडे घेण्यासाठी भली मोठी झुंबड उडाली होती.

- Advertisement -

नवे कपडे घेण्यासाठी त्यांनी केलेली धावपळ बरीच काही सांगून गेली आणि आम्हाला नवी दिशा देऊन गेली.कपडे किंवा अन्न या तात्पुरत्या वापराच्या वस्तू कधीतरी संपतील आणि पुन्हा त्याची गरज त्यांना भासेल तेव्हा? आपण किती वेळा ते देण्यासाठी पुरे पडू? याची जाणीव तेव्हा आम्हाला झाली. ज्या शिक्षणाच्या कमतरतेमुळे त्यांच्या आयुष्यात अशा समस्या निर्माण झाल्या आहेत त्यादिशेने काम करण्याचे आम्ही निश्चित केले.

त्यानंतर आजुबाजूच्या गावातील मुले वसतीगृहात राहून ज्या ठिकाणी आपले शालेय शिक्षण पूर्ण करतात. त्या आंबिस्ते गावातील शाळेत काम करण्याचे आम्ही ठरवले. संस्थेची सुरुवातच असल्याने जे काही शिकत होतो ते अनुभवातूनच. मदत करताना येणार्‍या बर्‍यावाईट अनुभवांना गाठीशी बांधुन मार्गक्रमण करायचे ठरवले.वर्षभराच्या काळात आंबिस्तेतील शाळेत मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल, असे उद्दिष्ट ठेवले होते. पण सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग कसे आणणार? एवढे काम करायचे म्हणजे निदान लाखभर रूपये तरी हातात असले पाहिजेत.आमची मुलांची 20 ते 25 जणांची टीम त्यात काहीजण कॉलेजला जाणारे तर काही जण नोकरी करणारे. त्यामुळे सर्व सांभाळून वर्षभरात लागणारी रक्कम जमा करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. त्यात डोनेशन देणार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे आपणाच काही तरी हातपाय मारून पैसे मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे त्यावेळी असणारा रक्षाबंधनाचा सण आमच्यासाठी सुवर्णसंधी होती.

कुर्ल्यातील बाजारातून राख्या आणून त्या विकायला आम्ही सुरूवात केली. सोशल मीडियावर याची जाहिरात पण केली. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. काही हजारांच्या राख्या आम्ही विकल्या. कोणासमोर केवळ समाजोपयोगी काम करतोय म्हणून हात पसरण्यापेक्षा मुंबईची लोकल, रस्ते आम्ही पालथे घातले आणि राख्या विकल्या. अशा अनुभवांचा वैयक्तिक आयुष्यातही फायदा होतो. हे आम्हाला जाणवलं. त्यानंतर काही दात्यांनी सढळ हस्ताने केलेली मदत आणि आम्ही केलेल्या थोड्याफार प्रयत्नांतून मुलांना शालोपयोगी वस्तू पुरवण्याइतपत रक्कम आमच्याकडे जमा झाली. त्या पैशांतून आम्ही त्यांना आवश्यक त्या वस्तू पुरवल्या. त्यानंतर मुलांना दैनंदिन आयुष्यात लागणार्‍या वस्तू देखील पुरवण्याचा प्रयत्न केला. सध्या आम्ही ज्या मिशनवर आहोत ते म्हणजे मी मिशन लायब्ररी. त्याला आम्ही मिशन लायब्ररी यासाठीच म्हणू की मुंबईतील कुठे एखादे ग्रंथालय, शाळा,महाविद्यालये किंवा एखादा व्यक्ती पुस्तक दान करू इच्छित असेल तर आम्ही तेथे पोहचतो. त्यांच्याकडून आवश्यक ती पुस्तके घेतो. यात मुख्यत्वे मराठी पुस्तकांना आम्ही प्राधान्य देतो. समाजातूनही पुस्तके देण्यासाठी काही संस्था,महाविद्यालये किंवा एखादी व्यक्ती देखील पुढे येते.

आतापर्यंत जवळपास 4000 पुस्तकांचा खजिना आमच्याकडे आहे.त्यापैकी जवळपास 1000 पुस्तकांचे वाचनालय आम्ही आंबिस्ते गावातील शाळेत सुरू केले आहे. त्यामध्ये इंग्रजी विकिपीडिया,निरनिराळ्या देशांची प्रवासवर्णने, अगदी आध्यात्मिक निरनिराळ्या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत इटलीची विकिपीडिया असलेलं पुस्तक पोहचवण्यात आम्ही यशस्वी झालो तेव्हा काहीतरी चांगलं करतोय असं वाटलं. त्यानंतर अजुनही आमच्याकडे आमच्या शाळेतपण वाचनालय उभारण्यासाठी मदत करा,अशी मागणी वाडा तालुक्यातील इतर शाळांमधूनही करण्यात येऊ लागली. त्यामुळे आमचे हे मिशन लायब्ररी तीव्र करण्याची गरज होती. आता त्याच मिशनवर संस्था सध्या काम करत आहे. मुंबईसारख्या शहरांत अनेक ठिकाणी वाचनालये आहेत. पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पुस्तकांची ती मुबलकता ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. वाचनालय उभारण्याचे हे मिशन ग्रामीण भागातील लोकजीवनाला संपूर्ण जगाला जोडेल,हीच आशा ठेऊन हा प्रपंच चालू आहे.

एकंदरित समाजसेवा हा आवडीचा किंवा निवडीचा विषय होऊ शकत नाही. आपण जेवढ्या काळापुरते या या जमिनीवर आहोत, निदान तेवढ्या काळासाठी तरी आपल्या आजुबाजूच्या समाजात होणार्‍या चांगल्या बदलांचा भाग होणे,या साठीच ती एक तळमळ असते. पैसे,वेळ, स्वत:चे वैयक्तिक आयुष्य या सर्वांचा समतोल साधताना आपल्या हातून काहीतरी चांगलं करण्याचा तो एक प्रयत्न असतो.

आतापर्यंत आलेल्या अनुभवांतून समाजसेवा या विषयाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. ज्यांना जसा अनुभव आला आहे,ते त्या पद्धतीने व्यक्त होतात.ज्यांना स्वत:च्या समस्यांमुळे काही करता आले नाही ते आता मदत करण्याची इच्छा व्यक्त करतात तर काहीजण आपल्याला आताच समस्या आहेत, त्यामुळे चार हात लांब राहणे पसंत करतात. डोनेशन मागण्यासाठी गेल्यावर तशाप्रकारचे अनेक अनुभव आले.समस्या,अडचणी या कधीही न संपणार्‍या असताना त्यामुळे आयुष्याच्या शेवटी (हा शेवट काही नेमका ठरलेला नसतो) आपण समाजातील चांगल्या बदलाचा एक भाग होतो हे समाधान आतापर्यंत आपण निस्पृहपणे केलेली समाजसेवाच देऊ शकते.

अनेक ठिकाणी समाजसेवेच्या नावाखाली मिळविण्यात येणार्‍या लाभांसाठी याप्रकारची गैरकृत्ये केली जातात. तरीपण जे चांगल्या उद्देशाने काही चांगलं काम करतायेत त्यांच्याकडे ते चांगले काम करत आहेत, याची शिदोरी असते. गेल्या वर्षभराच्या सामाजिक कामाच्या अनुभवातून स्वत:च्या इतर गोष्टी सांभाळत संस्थेचे सदस्य झटून काम करतायेत. काही चुका होतायेत पण त्या सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न देखील होतो आहे.शेवटी रोजच्या जीवनातून थोडा वेळ इतरांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यावर जे सुख मिळतं निर्विवाद अवर्णनीय असंच असतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -