घरफिचर्स...तेव्हाची ती उपेक्षित गाणी!

…तेव्हाची ती उपेक्षित गाणी!

Subscribe

‘हम तेरे बिना जी ना सकेंगे सनम.’ चित्रपट ‘ठाकूर जर्नेलसिंग’. गायिका आशा भोसले आणि संगीतकार गणेश. हे गाणं गाजलं नाही, वाजलं नाही असं म्हणता येणार नाही. पण फक्त दर्दी लोकांच्या लक्षात राहिलं. दर्दी लोकांचा परीघ भेदून ते पुढे गेलं नाही. त्यामुळे नंतरच्या पिढीपर्यंत म्हणावं असं पोहोचलंच नाही.

हल्ली आयुष्यात येतो असा एखादा चुकार क्षण, ज्या क्षणी आपल्या उमेदीच्या काळातलं एखादं दुर्लक्षित गाणं किंवा खरंतर उपेक्षित गाणंही आपल्याला अत्यंत मौल्यवान वाटू लागतं. परवा असाच एक चुकार क्षण आला आणि सर्फिंग करता करता कुठल्याशा चॅनेलवर असंच एक साफ उपेक्षित, साफ दुर्लक्षित गाणं लागलं. गाण्याचे शब्द होते ‘मन मेरा तुझ को मांगे, दूर दूर तू भागे.’ चित्रपट ‘पारस.’ संगीतकार कल्याणजी-आनंदजी. गायिका सुमन कल्याणपूर आणि साल 1971. गाणं तसं आज कुणाला ओझरतं आठवत असेल किंवा आठवतही नसेल. खात्री देता येत नाही. पण गाण्यासाठी जीव टाकणार्‍या एखाद्याला ते गाणं नक्की आठवेल…आणि आठवल्यावर त्याच्या मनावर नक्की मोरपीस फिरेल. कारण गाण्याची सुरावट खरंच कानामनात गोडवा पसरणारी…आणि सुमन कल्याणपुरांनी गाणं गाताना गाण्यातून व्यक्त केलेले भाव, सादर केलेला अभिनय तर खरोखरच लाजवाब!…सुमनताईंच्या आवाजातलं ते मार्दव, ती नजाकत तर खरोखरच गाण्याच्या प्रेमात पाडणारी. गाण्यात तशी फार वाद्यं वाजलेली नाहीत. त्यामुळे ऑकेस्ट्रेशनची भव्यता (आजच्या भाषेत सांगायचं तर ग्रँजर) नाही की फाफटपसारा नाही. त्या तुलनेत गाणं थोडं फिकं फिकं वाटतं खरं, पण गाण्याच्या मूळ सुरावटीतच इतका गोडवा आहे की गाणं त्या मोजक्या वाद्यांसोबतही ऐकत राहावंसं वाटतं. पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं.

- Advertisement -

ते गाणं तसं नशीब घेऊन जन्माला आलं नाही म्हणून फारसं गाजलं नाही…आणि फारसं गाजलं नाही म्हणून फार कुठे वाजलं नाही. पण पारखी नजरा असतात तशा पारखी कानांमध्ये हे गाणं तसं दडून राहिलं आहे, म्हणूनच परवा कुठल्याशा चॅनेलवर ते लागल्यावर आधी यूट्युबवर ते शोधलं आणि (सहसा आपण डोळ्यांचं म्हणतो, पण इथे) कानाचं पारणं फिटेपर्यंत ऐकलं. तसं हे गाणं आलं तेव्हा बरीच थिल्लर आणि टुकार गाणी आजुबाजूला जन्माला आली आणि आपापल्या वकुबाप्रमाणे आपापली एक्स्पायरी डेट जवळ येईपर्यंत वाजत राहिली. काही काळाने आपला अवतार संपवून अस्तंगत झाली. पुढे नंतरच्या काळात ‘डॉन’मधलं ‘खय के पान बनौरस वाला’ हे गाणं जेव्हा चाल लावून तयार झालं तेव्हा खुद्द गायक किशोरकुमारना ते फारसं पसंत पडलं नव्हतं. हे गाणं लोकांच्या पचनी पडणार नाही असं त्यांचं मत होतं. पण प्रत्यक्षात घडलं मात्र वेगळंच. ह्या गाण्याच्या हातावरच्या रेषा मोठ्या होत्या. गाणं प्रचंड हीट झालं. त्या एका काळात हे गाणं वाजल्याशिवाय सभासमारंभ साजरे होत नसत. गाण्याच्या बाबतीत होतं असं कधी कधी. सुमन कल्याणपुरांनी नजाकतीने गायलेलं ‘मन मेरा तुझ को मांगे’ काळाच्या उदरात गायब होतं आणि ‘खय के पान बनौरस वाला’सारखं रासवट आणि धिटांग गाणं वाजत राहतं.

असंच एक गाणं आहे ‘हम तेरे बिना जी ना सकेंगे सनम.’ चित्रपट ‘ठाकूर जर्नेलसिंग’. गायिका आशा भोसले आणि संगीतकार गणेश. हे गाणं गाजलं नाही, वाजलं नाही असं म्हणता येणार नाही. पण फक्त दर्दी लोकांच्या लक्षात राहिलं. दर्दी लोकांचा परीघ भेदून ते पुढे गेलं नाही. त्यामुळे नंतरच्या पिढीपर्यंत म्हणावं असं पोहोचलंच नाही. पण गाणं कधीही ऐका. गाणं कधीही मंत्रमुग्ध करतं. ऐकणार्‍याची कळी कधीही खुलवते. अगदी नव्या काळातल्या मंडळींनाही पसंत पडायला हरकत नाही इतकं ते आशा भोसलेंनी आपल्या खुबीने पेश केलं आहे. ‘हम तेरे बिना जी ना सकेंगे सनम’ ह्या मुखड्यातल्या पहिल्या ओळीच्या पुढची ओळ आहे ‘दिल की ये आवाज है.’ ह्या ओळीत दुसर्‍यांदा ‘आवाज’ हा शब्द उच्चारताना आशाताईंनी त्यांच्या स्वरात जी कलात्मक कारागिरी केली आहे त्याला तर खरोखरच तोड नाही. हे गाणं तसं उपेक्षित, दुर्लक्षितच राहिलं; पण आज जेव्हा कधी हे गाणं कानावर पडतं तेव्हा ऐकणार्‍याचं लक्ष वेधल्याशिवाय रहात नाही. ह्या गाण्याचं नशीबही तसं फुटकंच राहिलं.

- Advertisement -

‘दिल की बाते, दिल ही जाने’ हे ‘रूप तेरा मस्ताना’ ह्या सिनेमातलं गाणं. लक्ष्मीकांत-प्यारेलालजींच्या संगीताने नटलेलं आणि किशोरकुमार-लता मंगेशकरांच्या आवाजातलं. त्यावेळी ह्या गाण्याची म्हणावी इतकी दखल घेतली गेली नाही. पण आज जेव्हा कधी चुकूनमाकून कुठून तरी हे गाणं ऐकू येतं तेव्हा किशोरकुमारनी सुरुवातीलाच जो वेगळाच खर्ज लावला आहे तिथूनच हे गाणं अंगावर शहारा आणायला सुरुवात करतं. गीतकार असद भोपालींनी ह्या गाण्यात एक ओळ लिहिली आहे ‘तू ऐसे करे तो गीत बन के तेरे होठों को चुम लू. त्या ओतप्रोत रोमान्सने सळसळणार्‍या गाण्यात किशोरकुमार ती ओळ ज्या अंदाजात गाऊन गेले आहेत त्यातली गंमत ते गाणं बारकाईने ऐकणार्‍यालाच कळू शकेल! आजच्या बदलत्या काळातल्या रोमान्सच्या चौकटीतही हे गाणं अगदी फिट बसणारं आहे. हल्ली रोमँटिक गाण्यांचे कसले कसले भलभलते व्हिडिओ अल्मब्स येतात त्याला मुंहतोड जबाब देणारं हे त्या काळातलं जीतेंद्र-मुमताजवर चित्रित झालेलं गाणं आहे. पण ह्या गाण्याकडे त्या काळात म्हणावं इतकं लक्ष गेलं नाही हे आवर्जून सांगावं लागेल.

संगीतकार कल्याणजी एकदा म्हणाले होते, ‘आपण संगीतकार म्हणून संपूर्ण कौशल्य पणाला लावून एखादं गाणं करतो, ते गाणं आम्हाला इतकं मोहून टाकतं की वाटतं की लोक ते गाणं नक्की डोक्यावर घेणार; पण तेच गाणं लोकांनी इतकं नाकारलेलं असतं की पुढे लोक त्या गाण्याची जान-पेहचानसुध्दा डोक्यात ठेवत नाहीत. पण त्याच गाण्याची आठवण ठेवणारा एखादा रसिक कधीतरी इतक्या लोकांमधून भेटतो तेव्हा समाधान वाटतं. ते गाणं जरी लोकप्रिय झालं नाही तरी इतक्या कोटी लोकांमधून एका तरी कानसेनाने त्या गाण्याला न्याय दिला ही आपल्यासाठी मोठी पोचपावती वाटते.’

त्या एका काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही एखादं गाणं जेव्हा लोकांच्या दृष्टीआड व्हायचं तेव्हा संगीतकार, गायकांच्या जिव्हारी लागायचं, कारण तो काळ रिहर्सल्सचा होता. वीस ते तीस दिवस त्या गाण्यावर कलाकार मंडळी मेहनत घ्यायची. एकेका गाण्याचा दिवसांतून आठ-आठ, दहा-दहा वेळा गायक-वादक मिळून सराव केला जायचा. दर दिवशी गाण्यावर साधकबाधक चर्चा केली जायची, गाण्याचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जायचा, गाण्याला वेगवेगळे पैलू पाडले जायचे आणि सरतेशेवटी कोणत्याही प्रकारचा रिटेक होणार नाही अशा दक्षतेने गाणं गायलं जायचं. आपलं गाणं सर्वांगाने परिपूर्ण होईल ह्याचा ध्यास घेतला जायचा…पण अशा वेळी जेव्हा त्या गाण्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हायचं तेव्हा त्या कलाकारांच्या मनाला चटका लागायचा. तेव्हा गाण्याचं रेकॉर्डिंग हे आजच्यासारखं इन्स्टन्ट नसायचं. आज गाणं गाजलं काय आणि पडलं काय, कुणाला काय पडलेली नसते. अशा वेळी आज त्या उपेक्षित गाण्यांबद्दल मनात खरंच सहानुभूती दाटून येते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -