घरफिचर्ससामना संपलेला नाही...

सामना संपलेला नाही…

Subscribe

डॉ. मोहन आगाशे यांनी चित्रपटात साकारलेल्या मारुती कांबळेचं काय झालं... या प्रश्नाचं उत्तर पन्नास वर्षेे झाली तरी दलित, स्त्रीवादी, शोषित, पीडितांची चळवळ आजही शोधतच आहे. या प्रश्नाचं खरंखुरं उत्तर अजूनही चळवळीला सापडलेलं नाही. विजय तेंडुलकर, जब्बार पटेल आणि रामदास फुटाणे यांनी तिघांनी हा प्रश्न सामना चित्रपटाच्या पडद्यावरून 1974 साली विचारला होता. माणसाच्या राजकीय अधिकारांच्या गळचेपीपुरता मर्यादित न राहाता ‘सामना’ माणसाच्या मनातील नैतिक अनैतिकतेचे सातत्याने सुरू असलेले द्वंद्व समोर आणतो. निळू फुले आणि डॉ. लागू यांनी हे द्वंद्व परिणामकारपणे साकारले.

निर्माते रामदास फुटाणे यांनी दीड लाख रुपये बजेट ठरवलेला ‘सामना’ प्रत्यक्षात अडीच लाखांपर्यंत गेला. अनंत अडचणींचा सामना करत सामना पूर्ण झाल्यावर हा चित्रपट मराठी पडद्यावर मैलाचा दगड ठरला होता. निर्माते फुटाणे यांना ज्वलंत सामाजिक विषयावर चित्रपट करण्याची इच्छा होती. ती त्यांनी दादा कोंडकेंकडे बोलून दाखवली. दादांनी त्यांची निर्माते माधव गारगोटे यांच्याशी भेट करून दिली. तिथंच एक तडाखेबंद संवाद आणि कथा, पटकथा असलेला मराठी चित्रपट करण्याचं पक्क झालं, पण लिहणार कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यावर तेंडुलकरांना विचारूयात असं ठरलं.

विजय तेंडुलकरांचं घाशीराम…मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालत होतं. पहिलाच चित्रपट असल्याने व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही आघाड्या संभाळाव्या लागणार होत्या. तेंडुलकरांकडे विचारणा झाल्यावर त्यांनी सिनेमा आणि नाटकाच्या आशय विषय, सादरीकरणात फरक असल्याचं सांगून चित्रपट लेखन मला जमेल का, असं म्हणून सुरुवातीला नकार दिला. मात्र तुम्हीच लिहा…विषय ठरवा असं फुटाणे यांनी कळवलं. फुटाणेंचं चित्रपटासाठीचं कर्ज फिटून जेमतेम पैसे मिळतील असा सिनेमा हवा, विषय राजकारण आणि सामाजिक वास्तव असा होता. तेंडुलकरांकडून कथानकावर जरी काम सुरू झालं असलं तरी कलावंत ठरत नव्हते. सहकारसम्राट  राजकारणी आणि सामान्य माणूस यांच्यातील संघर्षाचे कथानक तेंडुलकरांनी लिहायला घेतलं. कोल्हापूर, सोलापुरातील काही सहकार क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेण्यासाठी फुटाणे आणि तेंडुलकर या ठिकाणी गेले. येताना एसटीच्या प्रवासात आपण कथानकाला सुरुवात करू असं तेंडुलकरांनी फुटाणेंना सांगितलं.

- Advertisement -

तेंडुलकरांनी सामनाचं कथनक लिहायला घेतलं, पण त्याचं नाव सुरुवातीला मात्र सावलीला तू भिऊ नकोस…असं होतं. हे नाव एखाद्या नाटकासारखं वाटतं असं म्हणून फुटाणेंनी कथानकाचं सामना असं नव्याने नामकरण केलं. सामनाचं दिग्दर्शन करण्यासाठी हिंदीतले गोविंद निहलानींच नाव तेंडुलकरांनी सुचवलं होतं. फुटाणे यांनी जब्बार पटेलांच नाव सांगितलं आणि म्हणाले, तुमचं घाशीराम…जब्बारच करतोय ना, तुमची भाषा त्याला सांगली समजते, त्यालाच घेऊन सामनासाठी…पण अडचण अशी होती की, जब्बार पटेलांनी नाटकं जरी केली असली तरी सिनेमा केलेला नव्हता, अखेर जब्बार पटेलांची तयारी झाल्यावर सामानाचं दिग्दर्शन तेच करतील हे ठरलं.

चित्रपटात लावणीवजा गाणी होतीच. आरती प्रभूंची कविता मुंबईतल्या एका वर्तमानपत्रात छापून आली होती. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे….यातील शब्दांमध्ये बदल करत त्याचं गाणं बनवलं गेलं. तर एका गाण्यासाठी लता मंगेशकरांना विचारणा झाल्यावर निर्माते रामदास फुटाणेंचं टेन्शन वाढलं होतं. आधीच कर्जातून काढलेल्या चित्रपटात गाण्यासाठी लता मंगेशकरांचं मानधन आपल्याला परवडेल का, अशी शंका त्यांनी जब्बार पटेलांकडे व्यक्त केली. त्यावर सख्या रे घायाळ मी हरीणी….हे जगदीश खेबूडकरांचं गाणं आधी रवींद्र साठेंनी गायलं होतं. ते  ऐकल्यावर या गाण्यासाठी मानधनाची कुठलीही अट लता मंगेशकरांनी ठेवली नाही. सामनामध्ये झोंबू नका अंगाला ही लावणी होती, ती स्वतः दिग्दर्शक जब्बार पटेलांनी लिहिली होती. तर या टोपीखाली दडलंय काय…हे गाणं श्रीराम लागूंनीच गायल्याने त्यासाठी वेगळ्या गायकासाठीच्या मानधनाचा प्रश्न मिटला होता.

- Advertisement -

दोन माणसांमधील जुगलबंदी असं वरकरणी चित्रपटाचं कथानक होतं. मात्र त्याला अनेक सामाजिक कंगोरे होते. सहकार, साखर सम्राट असलेला बेरकी हिंदूराव धोंडे-पाटील साकारण्यासाठी निळू फुले हे नाव ठरलं तर त्याच्या विरोधात पडद्यावर उभा राहाणारा तत्वनिष्ठ, भणंग मास्तर डॉ. श्रीराम लागू साकारणार होते. ही दोन्ही नावं रंगभूमी आणि मराठी हिंदी पडद्यावर त्याकाळी गाजत होती. चित्रपटात जरी राजकारणी हिंदूराव आणि मास्तर ही परस्पर विरोधातील भिन्न टोकं असली तरी त्यात एक सारखेपणा होता. निळूभाऊंनी साकारलेल्या हिंदुरावच्या मनातील चांगल्या आणि वाईट माणसातील हे नैतिक आणि अनैतिक असं परस्पस्परविरोधातील द्वंद हे पडद्यावर एका अर्थाने साकारलं होतं.

शेक्सपियरच्या कथानकातील तीन डब्ल्यू अर्थात वुमन, वेल्थ, वाईन हे तीन घटक माणसाच्या अधःपतनास कारण ठरल्याचं जवळपास सर्वच साहित्य  आणि नाट्यक्षेत्राने जवळपास मान्य केल्यासारखं होतं. त्यांच्या साहित्य आणि कलाकृतीत त्याचं प्रतिबिंब होतंच…सामानाने मात्र या घटकांची तृष्णा माणसाला माणूसपणापासून दूर नेते त्यावर नियंत्रण मिळवल्यास माणूस हिंसेपासून अलिप्त राहू शकतो, असं ठरवलं. माणूस जात्याच हिंसक असतो…समाज, कायदा आणि संस्कृती, कुटुंबव्यवस्था त्याच्या हिंस्त्रपणाला नियंत्रित करत असल्याचं तेंडुलकरांना नंतरच्या काळात वाटत असावं, सामनाची बांधणी, आखणी आणि सादरीकरण मात्र त्याहून वेगळं होतं. तेंडुलकरांच्या या विचारमंथनाची बीजे सामनामध्ये रुजवल्याचे स्पष्ट होतं.

माणसाचं वर्तन वागणं हे राजकीयच असतं, राजकारण हे माणसाला व्यापून असतं, राजकारणाचा हेतू सत्ताच असल्याने ही सत्ता मिळवण्यासाठी माणूस अनेकांची फसवणूक करतो, अगदी स्वतःचीही, माणूस या सत्तेपाई त्याच्या आड येणार्‍यांना संपवतोच त्याआधी तो स्वतःला माणूस म्हणून संपलेला असतो. हे संपणं धोकादायक असतं, माणसांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी काही कारण, समर्थन हवं असतं, त्यामुळे या गुन्ह्याच्या आरोपातून त्याला सुटका हवी असते, त्यासाठी तो स्वतःचं लंगडं समर्थन करणारं स्वतःचं असं तत्वज्ञान बनवतो, त्याबाहेरच्या जगाशी फटकून वागतो, त्याला स्वतःचा भेसूर चेहरा पाहायची इच्छा नसते, यातून तो स्वतःला फसवत जातो हे करताना इतरांनाही आपल्यासारखं अधःपतीत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

हिंदुराव धोंडे-पाटील हा असाच साखर सम्राट ज्याने गावात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी कित्येक खून केलेत, काही माणसांना बेपत्ताही केलंय, बाई ही त्याच्यासाठी शरीराची गरज भागवणारी विषयवस्तू आहे. ती त्याची गरज आहेच, हे वर्तन अनैतिक असल्याचं त्याला वाटत नाही, त्यात त्याला पुरुषार्थच वाटतो.. हिंदुरावचं हे वागणं सखाराम बाईंडरमधल्या सखारामच्या जवळ जाणारं  आहे. दोन्हीकडे तेंडुलकरच लेखक असल्याने व्यक्तीरेखेत हे साम्य असावं. तर मास्तरांची डॉ लागूंनी केलेली व्यक्तीरेखा ही हिंदुरावच्या मनातलीच नैतिकतेची खरी जाणीव आहे. माणसाचं मन त्याला फसवू शकत नाही. मनात खरं खोटं, चूक बरोबर, नैतिक अनैतिक सगळं स्पष्ट असतं, तिथं कुठलाही फसवा दिलासा कामाचा नसतो, निळू फुलेंनी हिंदुराव साकारताना ही घुसमट, मानसिक द्वंद्व उत्तमपणे साकारले आहे.

तर डॉ. लागूंचा भणंग मास्तर, लाज लज्जा, इभ्रत, जगण्याची उमेद, मरणाची भीती,  उद्याची चिंता, माणूसपणाच्या चाकोरीतून कधीचाचा पसार झालेला आहे. त्यासाठी त्याचा भूतकाळ कारण असू शकतो, पण तो सामनाच्या पडद्यावर सुस्पष्टपणे येत नाही, केवळ फ्लॅशबॅकमध्ये काही प्रसंगातून येतो. उन्मत्त राजकारण्याच्या वाड्याला एक भणंग मास्तर नैतिकतेच्या बळावर केवळ अहिंसा आणि सत्याच्या आग्रहाने कसा सुरूंग लावतो, हे सामनाच्या कथानकातून उलगडत जातं.

सामनाची निवड पहिल्यांदा बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमधून भारताकडून झाली. या निवड समितीवर हिंदी अभिनेत्री नर्गिस होती. तिने सामना पाहिल्यावर डॉ. लागू, निळू फुले, जब्बार पटेल आणि तेंडुलकरांचीही भेट घेतली. बर्लिनमध्ये चित्रपट न्यायचा म्हणजे आणखी पैसे हवेत, आधीच चित्रपटाचं कर्ज फुटाणेंवर होतं. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मधुकर चौधरी यांची भेट घेऊन सिनेमाच्या रिळांच्या बर्लिनवारीचा खर्च 60 हजारांहून 27 हजारांवर आणला गेला. त्यासाठीही फुटाणेंना पुन्हा कर्ज घ्यावं लागलंच. निर्मात्याची चित्रपटाची इच्छा चित्रपटाच्या होणार्‍या कौतुकामुळे फिल्म फेस्टीव्हलमध्ये जायचंच, असं सामनाने ठरवलं होतंच. नर्गिस आणि सुनील दत्त या दाम्पत्याने केलेलं सहकार्य मोलाचं होतं. बर्लिनवारी झाली खरी पण चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही, मात्र चर्चा आणि कौतुक झालं.

सामन्यातील शाब्दीक जुगलबंदी रटाळ झाल्याने प्रेक्षक सिनेमाहॉलमध्ये झोपतात, अशी तक्रार सामना रिलिज झाल्यावर करण्यात आली. पहिले दोन तीन आठवडे थिएटरमध्ये कुणीही फिरकलं नाही. परंतु तिसर्‍या चौथ्या आठवड्यात मात्र सामनाने हाऊसफुल्लचा बोर्ड पुढचे अठ्ठावीस दिवस कायम ठेवला तो दादरच्या प्लाझामध्ये…प्लाझामध्ये मिळालेलं यश पाहून इतर सिने थिएटरमध्येही सामनाची रिळं मागवली गेली आणि हा सामना महाराष्ट्रात धुमाकूळ घालू लागला. विविध संस्थांकडून जवळपास 25 पुरस्कार सामनाला मिळाले. सामना चित्रपटाचे संदर्भ, राजकारण, सामाजिक स्थिती, त्यातील स्त्रीवाद असे अनेक समाजवास्तवाचे कंगोरे आजही तेवढेच जिवंत आहेत. लालन सारंग, स्मिता पाटील ही दोन आणि याशिवाय आणखी इतर अनेक महत्वाचे कलावंत पडद्यावर होते.  चार ते पाच दशके होऊनही भौतिक संदर्भ बदलले सामाजिक संदर्भांचा विचार करता व्यवस्था आणि सामान्य माणसाची घुसमट यातील हा सामना अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -