घरफिचर्सट्रेनमधल्या 'टाळी'ची गोष्ट 

ट्रेनमधल्या ‘टाळी’ची गोष्ट 

Subscribe

दोन आठवड्यापूर्वी मुंबईच्या लोकांमध्ये एका तृतीयपंथीयाला झालेल्या जबर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. तृतीयपंथी समाज, ट्रेनमध्ये आणि समाजात असलेला त्याचा वावर, त्यातून उद्भवणाऱ्या नकोशा गोष्टी हे सगळं पुन्हा ऐरणीवर आलं. त्यानिमित्ताने ‘लोकल आणि तृतीयपंथी’ या परस्परसंबंधाचा घेतलेला हा लहानसा शोध…

कृष्णा सोनारवाडकर 

- Advertisement -

([email protected])

मी रोज ऑफिससाठी घरातून बाहेर पडतो. तसा ट्रेनचा प्रवास हा ठरलेलाच असतो. रोजची लोकल नवाकोरा अनुभव देणारी असते. बराच वेळ उभं राहत एखादी सीट रिकामी झाली, की गरजेपुरती हवा देणाऱ्या पंख्याखाली विसावतो तोच कुठल्यातरी स्टेशनवर टाळी वाजवत एक दोन पात्र ट्रेनमध्ये चढतात. त्यांना पाहिल्यानंतर लगेचच बहुतेकांचे चेहरे पडतात. काहींच्या नजरेत एक हेटाळणीखोर तरंग येतो. मी विचार करतो, ‘हिजडे’ म्हणून हिणवण्यापलिकडे आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी कधी काय केलंय? त्यांना नोकरी-व्यवसायाच्या संधी नाकारल्या जातात आणि पोटासाठी म्हणून मग नाईलाजाने भीक मागावी लागते. त्यांना काम मिळालच तरी हपापलेल्या  वासनांचे बळी पडल्याशिवाय ते राहत नाहीत हे वास्तव आहे.
गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या  या धावपळीच्या मुंबईत अनेक रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढून हात पसरणारे तृतीयपंथी आपल्याला दररोज दिसतात. साधारण एक वर्ष झालं असेल मुंबईत येऊन मला. सुरुवातीला मी बावरायचो पण आता मला त्यांची सवय झालीय. रोजच्या लोकलप्रवासात मी यांचं निरखत गेलो. आता त्यांच्याकडे मी संवेदनशीलपणे पाहू शकतो. या तृतीयपंथी मैत्रिणी सुरुवातीला जवळ येऊन हात पसरतात. मागून लगेच मिळत नसेल तर खांद्याला हात लावत समोरच्या माणसाला पैसे देण्यासाठी जाग करून बघतात आणि तरीदेखील जर कोणतीच प्रतिक्रिया येत नसेल तर मात्र पुढच्या व्यक्तीकडे जाणं त्यांना भाग असत. पण ते ज्यावेळी लोकलमध्ये पैसे मागण्यासाठी हात पसरत असतात तेंव्हा देणाऱ्या सगळ्यच नजरा  काही सहानुभूतीच्या नसतात हे तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल.
काही दिवसांपूर्वी प्रवासादरम्यान एक गोष्ट लक्षात आली. एक मैत्रीण  नेहमीप्रमाणे  लोकलमध्ये महिला आणि पुरुषांकडे पैसे मागत होती.काहीजण पैसे काढून देतही होते पण काहीजण असेही होते की नुसते डोळे वटारून त्याला पुढे जाण्यासाठी सांगत होते. शिवाय काहीजणांच्या वखवखलेल्या नजरा त्याच्या शरीरावर रुतलेल्या होत्या. दोन स्टेशन्स गेली असतील तशी एकजण उतरण्याच्या  तयारीत दरवाजाकडे निघाली. अचानक माझ्या मनात एक उर्मी आली, म्हणलं, रोज आपण यांचं जगणं, वागणं पाहतोय खरे पण यांना समजून घायला हवं, थोडा संवाद करायला हवा. मग मीसुद्धा तिच्यापाठोपाठ त्याच स्टेशनवर उतरलो. तिला जरा बिचकतच हाक मारली. तशी ती मागे वळत म्हणाली, “बोल क्या हुआ?” मी विचारलं ‘तुला मराठी येते का?’ ती ‘हो’ म्हणाली तसं मी पुढचे प्रश्न सुरू केले. ‘तू ट्रेनमध्ये कधीपासून भीक मागतोस?’ हे काम करताना लाचारी वाटत असेल ना? माणसांच्या वागण्याचा रागही येत असेल? माझी सरबत्ती ऐकून घेतल्यावर जरा ‘पॉज’घेत ती बोलू लागली. “साधारण चार- एक  वर्षांपूर्वी मी मुंबईत आले. मुंबई माझ्यासाठी नवीन होती. माझ्या शरीरात झालेले बदल आणि हे जगणं पूर्णपणे नवखं होत. पण दुसरं काही काम करूही शकत नव्हते. सुरुवातीला किन्नर लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला पण जड जात होत म्हणून ते लोकलमध्ये ज्या-ज्या वेळी मागायला जात त्यावेळी मी त्यांच्यासोबत फिरू लागले. ते कसे मागतात, लोकांशी कसे वागतात, ते अनुभवत गेले आणि हळूहळू माझ्यात हिम्मत आली. मनाला पटत नसतानाही मजबुरीपोटी लोकांसमोर हात पसरायला लागले.कधीकधी हातात पैसे पडत होते तर कधी रिकाम्या हातापोटीच राहावं लागतं होत. दुसरा कोणता पर्याय सुद्धा न्हवता मग रोज लोकलच्या गर्दीत मन मारून घुसू लागले. हळू आवाजात,आणि नम्रतेने पैसे विचारल्यावर लोक जवळ उभसुद्धा करून घेत नाहीत म्हणून थोड्या चढ्या आवाजात बोलू लागले. आकर्षक दिसण्यासाठी लिपस्टिक आणि तोंडभरून पावडर. कपडे घालायची पद्धतसुद्धा बदलावी लागली. पण आता सवय झालीय. या रोजच्या प्रवासात बरेच लोक प्रामाणिक आणि समजूतदार मनाने पैसे देतात. पण वाईट लोक असतातच. मग आम्हाला काळ-वेळेनुसार स्वभाव बदलावा लागतो. कधीतरी कोणीतरी तुझ्यासारखं जिव्हाळ्यानं भेटतं, विचारपूस करतं, की कुठली आहेस, कधीपासून हे काम करतेस… नशिबाला आलेलं जगण कोणी काढून कसं घेणार? ते तर मलाच भोगावं लागणार आहे.” तिचं वाक्य न वाक्य आतून हलवून टाकणारं होतं. साधारण तीन वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झालेल्या या ‘परी’ला हे जगणं अंगवळणी पडलंय. अशा भरपूर पऱ्या आहेत ज्या पोट भरण्यासाठी बरेवाईट सगळे अनुभव रिचवत, सुखदुःखं भोगत मुंबईच्या लोकलमध्ये फिरताना दिसतील. पण मुंबईच्या लोकलमध्ये भीक मागता मागता आलेल्या काही दाहक क्षणांची आठवणसुद्धा परी सांगत होती. “कधीकधी आमचं असं चढ्या आवाजात लोकांकडे पैसे मागणं कित्येकजणांना आवडत नाही ते म्हणून आम्हाला फटकारतात. शिवीगाळ-मारहाण करतात. याच लोकांमध्ये कितीतरी वासनांध चेहरेसुद्धा लपलेले आहेत. तेआमचा लैंगिक छळ करतात. असे अनुभव माझ्या अनेक मैत्रिणींकडे आहेत.’
हे सगळं ऐकल्यानंतर धक्का बसतो. पण या चित्राची एक दुसरी बाजूही आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मुंबई ही मायानगरी आहे इथे पोट भरणं मुश्किल नाही पण काम करून पैसे मिळवायला बरीच मेहनत करावी लागते म्हणून फक्त ‘क्रॉस ड्रेसिंग’करून स्वत:ला तृतीयपंथी भासवत लोकलमध्ये आयती भीक मागणाऱ्या बोगस व्यक्तीही कमी नाहीत.
दुसरी तृतीयपंथी मैत्रीण म्हणते, ‘बऱ्याच वेळा आमच्या लोकांचा प्रवाशांना त्रास होतो त्यामुळे ‘तुम्ही ट्रेनमध्ये पुन्हा मागायचे नाही’ हे कारण पुढे करत  पोलीस आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. आम्ही मागू नये म्हणून कित्येक वेळा शिवीगाळ केली जाते,धक्काबुक्की सुद्धा होते. पोलिसही अनेकदा आमचा गैरफायदा घेतात. पण आमच्याकडे मागण्याशिवाय  दुसरा पर्याय अजूनतरी नाही. त्यामुळे सगळं सहन करत आम्ही पुन्हा लोकलची पायरी चढतोच. पण कित्येकदा प्रवाशांना त्रास होऊ नये आणि प्रवासादरम्यान गोंधळ होऊ नये म्हणून तैनात केलेले पोलीससुद्धा अकारण आमच्याशी निर्दयपणे वागतात.

- Advertisement -

रेल्वे पोलिसांचं म्हणणं काय?

मुंबई रेल्वेतले पोलीस राजेंद्र शिंगाडे यांच्या म्हणण्यानुसार, “मुंबई ची लोकल ही लाईफ-लाईन समजली जाते. दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. त्यांना कोणता त्रास होऊ नये म्हणून आम्ही ड्युटी करतो. लोकलमध्ये तृतीयपंथी ज्यावेळी भीक मागायला चढतात तेव्हा कित्येक लोकांना ते आवडत नाही. दोन्ही बाजूंकडून चुका होतातच. या लोकांकडे पाहण्याचा या निबर समाजाचा दृष्टिकोन बर्याच अंशी अज्ञानावर आधारलेला आहे. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जात नाही. मग प्रवासी कित्येक वेळा तक्रारी करू लागतात आणि म्हणून आम्हाला त्यांच्यावर  कारवाई करावी लागते. दुसरे एक पोलीस नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, “भीक मागून पैसे कमावण्याचा प्रश्न नाही, ते लोक बिनधास्त मागू शकतात पण त्यांच्या वागण्याबोलण्याने कितीतरी प्रवाशांना त्रास होत असतो. तो होऊ नये याची आम्ही वारंवार खबरदारी घेतो. मुद्दाम मुजोरी  करून पैसे मागणारे काही तृतीयपंथीसुद्धा लोकलमध्ये धुमाकूळ घालत असतात. काही अपवाद असतीलही पण त्यांच्या वागण्याच्या प्रवाशांना त्रास होत असेल तर त्यावर आम्हाला कारवाई करावी लागते. कित्येकदा त्यांना मागू नका असे सांगून लोकलमधून बाजूला करावे लागते.”

महिलांचे अनुभव काय आहेत?

सुमित्रा लटके सांगतात, “मुंबईत जवळपास सगळ्याच रेल्वे स्टेशन्सवर एक- दोन तरी तृतीयपंथी लोकलमध्ये भीक मागताना दिसतात. ते बऱ्याच वेळा पुरुषांच्या डब्याबरोबरच महिलांच्या विशेष डब्यातसुद्धा भीक मागायला चढतात. त्यांच्या भाषेचा आणि वागण्याचा बऱ्याच वेळा त्रास होतो. पण त्यांचंदेखील हातावरच पोट आहे. ज्यावेळी मागतील त्यावेळी खातील. या विचाराने आम्हीपण दुर्लक्ष करतो. प्रशासनाने यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात पण त्यांचे बळ कमी पडते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -