ये जो पब्लिक है…

आजच्या दशकात एकीकडे शाहरुख, आमीर, सलमान हे सुपरस्टार्स व्यावसायिक सिनेमांचे शिलेदार आहेत. तर दुसरीकडे इरफान खान, नवाजुद्दीनसारखी मंडळी कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यातील खान मंडळींचा काळ इतिहासजमा झाला आहेच. प्रेक्षकांची अभिरुची पुन्हा वेगाने बदलत चालल्याची ही चिन्हे आहेत. सत्तर आणि ऐशीच्या दशकात जे झालं ती वावटळ होती. आताचं हे तुफान आहे. थोडक्यात काय तर , ये जो पब्लिक हैं, ये सब जानती हैं.

Mumbai
Gully Boy Movie
गली बॉय

समांतर किंवा कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक असा फरक आज राहिलेला नाही. ऐशी आणि नव्वदच्या दशकातही अशीच परिस्थिती होती. केवळ कलात्मक चित्रपट आणि निव्वळ व्यावसायिक असा भेद कमी करणारे सिनेमे या दशकातही आले होतेच. त्यामुळे केवळ गल्लाभरू व्यावसायिक सिनेमांची गरज वाटणार्‍या गटाला हा शह होता. मात्र या अशा चित्रपटांची सुरुवात त्याआधीच जवळपास ३० दशके आधीच झाली होती. फ्रान्झ ऑस्टीन यांचा अछूत कन्या १९३६ मध्ये रिलिज झाला होताच. त्यानंतर बंदीनी, सुजाता, बंदीनी या स्त्रीवादी सिनेमांनी त्या काळात हिंदी पडद्यावर प्रेक्षकांची निव्वळ व्यावसायिक चित्रपटांची अभिरुची बदण्यात मोठा हातभार लावला. बिमल रॉय, ऋषीकेश मुखर्जींसारख्या संवेदनशील आणि सिनेमाच्या व्यावसायिक जगात सामाजिक जाणीवा जिवंत ठेवणार्‍या दिग्दर्शकांमुळे हे सिनेमे दर्जेदार झाले.

राज कपूरच्या ‘जागते रहो’पर्यंतही सामाजिक विषयाला कलात्मक पद्धतीने पडद्यावर सादर करण्यात आलं. दो बीघा जमीन (१९५३), बूट पॉलिश (१९५४), जागृती (१९५६), दोस्ती (१९६४) पासून सौदागर (१९७३) असे पठडीबाहेरचे अनेक प्रयत्न झाले. सामान्य माणसातील कष्टकरी, कामगार, अपंग, शेतकर्‍यांचे प्रश्न यातून मांडण्यात आले. व्यावसायिक आणि कलात्मक असा फरक नाकारण्याच्या या प्रयत्नातूनच केवळ कलाकार आणि सुपरस्टार असा फरकही नाहीसा करणारे हे सिनेमे होते. बलराज साहनी हे त्या काळात अशा वैशिष्टपूर्ण बंडखोर चित्रपटांचे नायक होते. तर दुसरीकडे दिलीप कुमार हे व्यावसायिक सिनेमांचे नायक होते. मात्र, त्या काळातील दिलीप कुमारांच्या चित्रपटांवरही सामाजिक जाणिवेचा गडद ठसा होताच. नया दौर, यहुदी ही काही त्यातली उदाहरणं.

चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांच्या तालमीत तयार झालेल्या शांतारामबापूंनी चित्र, शिल्प, नृत्य कला अभिरुचींनाच चित्रपटाचा विषय बनवून पडद्यावर आणलं. दो आँखे बाराह हाथ, झनक झनक पायल बाजे, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, गीत गाया पत्थरोंने या कलाकृतींनी चित्रपट इतर कला यातील सीमारेषा धूसर करून टाकली. महाराष्ट्र फिल्म कंपनी, प्रभात आणि राजकमल कलामंदिर अशा चित्रसंस्थांचा हा सुवर्णकाळ होता. कलात्मक सिनेमे म्हणजे वास्तववादी चित्रपट असा ठसा त्यावेळी चित्रपटांवर बसलेला नव्हता. हा ठसा खर्‍या अर्थाने नव्हताच. मात्र निव्वळ व्यावसायिक सिनेमे बनवणार्‍यांकडे कलात्मक सिनेदृष्टीचा अभाव असल्याने त्यांनी वास्तववादी चित्रपटांना कलात्मक म्हणून हिणवणे सुरू केले. यातूनच समांतर चित्रपटसृष्टीची बिजे रोवली गेली.

फ्रान्झ ऑस्टीन, बिमल रॉय, मृणाल सेन यांची परंपरेला वास्तववादाची गडद किनार देऊन श्याम बेनेगल (आक्रोश, मंडी, भूमिका, कलियुग) अरुणा राजे (रिहाई), कुंदन शहा (जाने भी दो यारो),तपन सिन्हा (एक डॉक्टर की मौत), सईद अख्तर मिर्झा (सलीम लंगडे पे मत रो), गोविंद निहलानी (अर्धसत्य), अगदी अलिकडचा मकबूल ( विशाल भारद्वाज) अशा प्रवाहाबाहेर विचार करणार्‍या दिग्दर्शकांनी पुढे नेले. मात्र या काळातही समांतर किंवा कलात्मक आणि व्यावसायिक सिनेमा हा फरक पूर्णपणे पुसला गेला नव्हता. ऐशीच्या दशकात पोटाचा चिमटा काढून एन. चंद्रा यांनी ‘अंकुश’ बनवून ही पुन्हा सुरुवात केली. मुंबईतील गँगवॉरच्या विषयाला गुन्हेगारीला कारण ठरलेली परिस्थितीजन्य बेरोजगारीचा हा संवेदनशील विषय यात कलात्मक पद्धतीने हाताळण्यात आला.

हे दशक हिंदी पडद्यासाठीही काहीसे निराशाजनकच होते. एकीकडे मिथुन, चंकी पांडे गोविंदा अशा निव्वळ व्यावसायिक नायकांचा उदय झाला होता. तर दुसरीकडे नसिरुद्धीन शहा, पंकज कपूर, ओम पुरी, नाना पाटेकर, एनएसडी आणि एफटीआयमधली काही मंडळी सामान्यांच्या सिनेमांचे नेतृत्व करत होते. बासू चटर्जींचा एक रुका हुवा फैसला (१९८६) हा त्याचाच परिणाम होता. हिंदी पडदा कलाकारांनी ताब्यात घ्यावा की, सुपरस्टार्सनी हा त्यातील वादाचा विषय होता, हा वाद आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहील.

आजच्या दशकात एकीकडे शहारुख, आमीर, सलमान हे सुपरस्टार्स व्यावसायिक सिनेमांचे शिलेदार आहेत. तर दुसरीकडे इरफान खान, नवाजुद्दीनसारखी मंडळी कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यातील खान मंडळींचा काळ इतिहासजमा झाला आहेच. प्रेक्षकांची अभिरुची पुन्हा वेगाने बदलत चालल्याची ही चिन्हे आहेत. सत्तर आणि ऐशीच्या दशकात जे झालं ती वावटळ होती. आताचं हे तुफान आहे. नेटफ्लिक्ससारख्या इंटरनेट चित्रपट सिरिजनी या भोवर्‍यात भर घातली आहे. पडद्यावर आपल्याच दिसण्याची, लकबीची सवय लावणार्‍या सुपरस्टार्सचे दिवस कधीचेच इतिहासजमा झालेत. त्यामुळेच शाहरुख खानच्या झिरोला प्रेक्षकांनी नकार दिला. आमीरच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानने प्रेक्षक पुरेसे ठकले नाहीत त्यांनी, तर सलमानच्या ‘भारत’ला तिकिटबारीवर कशीतरी सरासरी गाठता आली. हिंदी पडद्यावरचा या खानांच्या साम्राज्याला बसलेला हा तडाखा लक्षात घेऊनच चौथ्या सैफ अली खानने नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्सला जवळ केलं. मात्र तिथंही नवाजुद्दीनचा गायतोंडे लक्षात राहिला. अलिकडच्या बत्ती गूल मीटर चालू, आर्टिकल १५, स्त्री, बधाई हो, मुल्क, बदला, गली बॉय या पठडीबाहेरील चित्रपटांना प्रेक्षकांनी स्वीकारलं तर तद्दन व्यावासायिक हेतूने बनवलेल्या चित्रपटांना नाकारलं.

मिरा नायरच्या सलाम बॉम्बे (१९८८) मधून नानाने आपली दखल घ्यायला लावली होती. पण याच सिनेमात पोस्ट ऑफिससमोर बसून लोकांची पत्र लिहून टाईप करून देणारा पडद्यावरील काही मिनिटांचा इरफान खान पुढे स्टार खान मंडळींच्या स्टारपदाला कलाकार म्हणून आव्हान देईल, असा विचार त्यावेळी कोणीही केला नसेल. तसंच नवाजुद्दीचंही. आमिरच्या सरफरोशमध्ये पोलीस कोठडीत मार खाणारा हा तरुणही खान साम्राज्याला अजूनही तडाखे देत आहे. हे शक्य झालं ते प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीमुळेच. प्रेक्षकांची अभिरुची बदलण्याचे प्रयत्न काल झाले, आज होताहेत, उद्याही कायम राहतील.

पण आज इंटरनेट माध्यमांमुळे हा वेग नियंत्रणाबाहेर वाढू पाहतोय. मोठा पडदा, छोटा पडदा त्यानंतर हात पडदा (मोबाईल) असा हा स्वागतार्ह बदल आहे. या बदलासोबत प्रेक्षकांची अभिरुचीही वेगाने बदलत आहे. नाविन्याची नवलाई नऊ दिवस अशी ही स्थिती नाही. ये जो पब्लिक है..ये सब जानती है…या बदलाचा ठसा इतक्या लवकरच पुसला जाणारा नाही.