घरफिचर्सदेशसेवेसारखाच रक्तदानाचा वसा जोपासणारा जवान

देशसेवेसारखाच रक्तदानाचा वसा जोपासणारा जवान

Subscribe

कृष्णा सोनारवाडकर

रक्तदान म्हणजे बहुमूल्य दान. पण आजही रक्तदान म्हटले की लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होतात पण आपल्या आयुष्यातली काही वर्षे देशसेवसाठी घालवणारे महेश नरवडे याला अपवाद आहेत. देशाची सेवा करता करता त्यांनी रक्तदानाचा वसाच जणू हाती घेतला आहे. सेवेत असताना त्यांनी तब्बल 50 वेळा रक्तदान केले आहे. पण निवृत्तीनंतर त्यांनी हे रक्तदानाचे अविरत चालणारे काम थांबवले नाही. समाज आपल्यासाठी आणि आपण समाजासाठी आहोत या भावनेतून ते आजही रक्तदान करतात.

- Advertisement -

महेश नरवडे नववीत असताना कारगिल युद्ध चालू होते. त्यावेळी या युद्धात अनेक जवान शहीद झाले. तर काही जवानांनी रक्त वेळेत न मिळाल्यामुळे जीव गमावला. हे सगळे पाहून ते नेहमीच अस्वस्थ होत होते. मोठे झाल्यावर आपण लष्करात भरती होऊन देशसेवा आणि रक्तदानाच्या माध्यमातून सुद्धा समाजसेवा करू शकतो हा ध्यास त्यांनी घेतला. म्हणूनच ते लष्करात भरती झाले.

चेंबूरच्या प्रमोद विद्यामंदिरात महेश नरवडे याचे शिक्षण झाले असून रक्तदानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचे काम ते करत आहेत. रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होते, अशा गैरसमजांना नष्ट करण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. आचार्य कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या एका शिबिरात त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रक्तदान केले आणि त्यानंतर रक्तदानाच्या वेगळ्या वाटेवरचा त्यांचा प्रवास सुरू झाला. देशसेवा करताना अनेक जवान स्वतःचे रक्त सांडून मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत राहतात पण मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्तदान करून तसेच देशातल्या अनेक ठिकाणी महेश नरवडे यांनी रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

- Advertisement -

पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, जम्मू, उत्तरप्रदेश या ठिकाणी सेवेत रुजू असताना त्यांनी अनेक वेळा गरजूंना रक्तदान केले. पंजाबमधील पटियाला मध्ये सेवेत असताना इंक्युबेटरमध्ये असणाèया दोन दिवसांच्या बाळाचा जीव वाचवल्याची आठवणही ते अभिमानाने सांगतात. त्यावेळी जिल्ह्यात बी निगेटिव्ह गटाचे रक्त मिळत नव्हते त्यामुळे तेथील रुग्णालयाने लष्करी जवानांकडून मदत मागितली तेव्हा त्यांनी रक्तदान करून त्या बाळाचा जीव वाचवला.

बी निगेटीव्ह रक्तगट असणारे महेश यांनी अकरावीत असताना वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान केले आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात रक्तदान म्हणजे एक मिशन आहे असं वाटू लागले. देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी हे योगदान आजपर्यंत सुरूच ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ठाण्यातील ’रक्तानंद’ या संस्थेने त्यांना ’रक्तकर्ण’ हा पुरस्कार दिला आहे.

रक्तदान केल्याने कित्येकांचे जीव आपण वाचवू शकतो हे योगदान बहुमूल्य आहे. हा वसा न सोडता मला जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत चालू ठेवेन आणि समाजातील रक्तदानासंदर्भात असणाऱ्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करत राहीन. तरुण मुलांनी वर्षातून एकदा तरी आपल्या वाढदिवसाला रक्तदान करावे असे मला वाटते.
– महेश नरवडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -