घरफिचर्सहा सलीम संपलेला नाही...

हा सलीम संपलेला नाही…

Subscribe

‘सलीम लंगडे पे मत रो’ मधल्या माणसांचं जगणं माणसासारखं नसतं. ही सगळीच माणसं आतून तुटलेली, विस्कटलेली, भणंग अशी असतात. इथल्या नळीदार पत्र्याच्या घरात येणारे कवडसेही उदासीची ‘शमा’ फेकतात. अल्पसंख्याक समुदायातील गुन्हेगारी, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, धर्मांधता, कट्टरवाद अशा प्रश्नांना ‘सलीम लंगडे पे मत रो’ थेट हात घालतो.

बडी शहर के एक गली में बसा हुवा है…म्हणत १९८६ मध्ये दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सईद अख्तर मिर्झांचं ‘नुक्कड’ दाखल झालं. या सीरियलमधून अवतार गिल, दिलीप धवन, समीर कक्कर, सुरेश चटवाल, हैदर अली, जावेद खान, रमा विज अशा अनेक रंगभूमीवर रमणार्‍या कलाकारांना या छोट्या पडद्यावर मोठी ओळख मिळाली. आजही त्यांना नुक्कडमधल्या भूमिकांच्या नावानंच ओळखलं जातं. यात तीन मराठी नावंही होती. अजय वढावकर (हवालदार गणपत) आणि सुरेश भागवत (घनशु भिकारी), दगडू जमादार (दगडू सफाईवाला) ही ती नावं…या सर्वच नवख्या नावांमध्ये पवन मल्होत्रा हे एक नावही आपली ओळख बनवण्यासाठी धडपडत होतं. हा तोच पवन, अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’तला टायगर मेमन, त्याआधी दूरदर्शनवर पवननं छोट्या पडद्यावर बर्‍यापैकी बस्तान बसवलं होतं.

गुल गुलशन गुलफाम, शहारुखच्या सर्कसमध्येही तो होता. देशपांडेंचा मकरंद, गोवारीकरांचा आशुतोष आणि पवन अशा या तरुणांची ही भट्टी छोट्या पडद्यावर ऐंशीच्या दशकात खास जमली होती. ‘नुक्कड’च्या टायटल साँगआधी सेक्सोफोनचा जोरदार बिगुल वाजायचा, हा बिगुल हुंकार होता, तळागाळातल्या माणसांनी व्यवस्थेविरोधात केलेल्या बंडाचा, मनात दबलेल्या याच हुंकाराला ‘सलीम’चं नाव देऊन १९८९ मध्ये सईद मिर्झांनी ‘सलीम लंगडे पे मत रो’ बनवला.

- Advertisement -

वांद्य्राच्या बेहराम पाड्यासारख्या कोंदटलेल्या वस्तीत राहणार्‍या सलीमला या ‘अंधियारी गलिआें’तून प्रकाशाकडे येण्याची तीव्र ओढ आहे. इथं माणसांना त्यांच्या विशेषणांनी ओळखलं जातं. या मजूर, कामगारांच्या वस्तीतल्या अंधारगल्ल्यांत खोर्‍यानं ओढता येतील इतके सलीम पडलेले आहेत. बोले तो …सलीम चरसी, सलीम काण्या…सलीम हटेली…त्यातलाच एक सलीम लंगडा. लंगडी सामाजिक व्यवस्था सलीमच्या इथल्या घुसमटीवर रडत नाही. कुणाला काहीच फरक पडत नसतो, सलीमच्या असण्या किंवा नसण्यानं. त्यामुळेच रस्त्यावरच्या लफड्यात सलीम मेल्यावर त्यानं कुणाला काहीच फरक पडत नसतो. सलीमच्या अशा भेसूर जगण्या-मरण्याला लक्षात ठेवण्याची गरज आजूबाजूच्या जगण्यात गुंतलेल्या भवतालाला नसते.

मग कुणाच्याही खिजगणतीत नसलेला असा सलीम मेल्यावर त्याच्या मरणावर आसवं का ढाळावीत? त्यामुळेच ‘सलीम लंगडे पे मत रो’, असं सईद मिर्झा कथानकातून सुचवतो.

- Advertisement -

जीन्सच्या खिशात बटन चाकू बाळगणार्‍या सलीमसारख्या माणसांना गर्लफ्रेंड किंवा प्रेयसी नसते तर ‘आयटम’ असते. चित्रपटांत हा रोल मुमताज नावाच्या निलिमा अझीमने केलेला असतो. ऐशीचं दशक रस्त्यावर रक्त सांडणार्‍या बटन चाकूचंच होतं. अंकुश, एक रुका हुवा फैसला, तेजाबपासून ते रामूच्या शिवापर्यंत या बटनचाकूनं खूप रक्त पडद्यावर सांडलं.

कोंडवाडा, खुराड्यांसारखी घरं असलेल्या झोपडपट्टीत राहणारा याच काळातला हा एक सलीम बादशा असतो. सलीमचा बाप बंद पडलेल्या कपडा मिलमधला विक्रम गोखलेंनी साकारलेला बेरोजगार कामगार असतो. घरात निशिगंधा वाड ही लग्नाला आलेली ‘अनिस’ नावाची साधीसरळ बहीण असते. तर सलीमची खंबीर आई अमिना ही सुरेखा सिकरी असते. हे कुटुंब चौकोनी असतं, पण मुंबईतल्या कुठल्याशा मोहल्ल्यात झालेल्या एका लफड्यात सलीमच्या भावाला गुंड टोळ्यांनी ‘खल्लास’ केलेला असतो. मग हे कुटुंब त्रिकोणी उरतं. सलीमचा भाऊ जावेद या जहन्नुमवजा मोहल्ल्यात राहूनही नेटाने शिकलेला ‘शरीफ आदमी’ असतो. कामगार आणि सामान्यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात लढणारा असतो.

सलीम याच दुनियेच्या खुल्या शाळेत शिकून लहानाचा मोठा होतो. टवाळक्या आणि भुरट्या चोर्‍यामार्‍या करणारे पिरा (मकरंद देशपांडे) आणि अब्दुल (आशुतोष गोवारीकर) त्याचे साथीदार असतात. दुकानं फोडणं, अंधारात रेल्वे पुलावर, रस्त्यात चाकू दाखवून लुटमारी करणं, हे त्यांचे रोजचेच धंदे, त्यानंतर कुठूनतरी या वस्तीत आसर्‍याला आलेल्या भणंग, गणंग चरसी टॉम ऑल्टरचं जीवनविषयी तत्वज्ञान गांजा ओढत ऐकत बसणं हा या टोळीचा दिनक्रम. गांज्याच्या नशेत असलेल्या टॉमला सार्‍या दुनियेची माहिती असते. तो दुसर्‍या महायुद्धातल्या अणुबॉम्बची गोष्ट सांगतो. एका बॉम्बमुळे लाखो माणसं कशी एका फटक्यात धूर होतात, हे त्याला समजलेलं नसतं. माणसांची किंमत माणूस म्हणून आपल्याला अजून समजलेलीच नाही, ती समजून घ्यायला हवी, असं त्याच्या गांजा ओढलेल्या तत्वज्ञानाचं सार असतं. त्यामुळेच जगाशी फटकून वागत तो आपल्याच नशेत मस्त असतो. असं सगळं सुरू असताना ऐंशीच्या दशकातली भिवंडीची दंगल भडकते.

माणसं माणसांना कापत सुटतात. अशा वेळी सलीमही त्याच्या टोळीसोबत आपल्या मोहल्ल्यात ‘वो लोक राडा करेंगे तो…तय्यार’ असतो. सलीमचा मित्र अस्लम कुठल्याशा उर्दू पेपरात महिना सहाशे रुपये कमावणारा अती सामान्य प्रूफ रिडर असतो. त्याला सत्तेचं राजकारण, देशाची फाळणी, हिंदू मुसलमान दंगे याबाबत बरंच काही माहिती असतं. इस्लाम मुलींच्या शिक्षण आणि सुधारणेच्या विरोधात नसल्याचं तो जेव्हा मोहल्ल्यात ठामपणे सांगतो, तेव्हा धर्माच्या ठेकेदारांकडून त्याला धमकावलं जातं. सलीम त्यातून त्याला वाचवतो. इथून अंधारगल्लीतल्या सलीमला अस्लम प्रकाशाचा मार्ग दाखवतो. सलीमलाही प्रकाशात येण्याची आता तीव्र इच्छा होते. ‘आपुन रौशनी में आना चाहता…अस्लम भाई’ असं तो ‘इज्जत की जिंदगी’ जिनार्‍या अस्लमला म्हणतो. इथं जगण्याविषयी सलीम प्रचंड सकारात्मक होतो. निराशेचे मळभ दूर होते, बहीण अनिसचं लग्न ठरतं, वरात येणार असतानाच त्याच रात्री सलीमला रस्त्यावर एका टोळीकडून चाकूनं भोसकलं जातं.

‘सलीम लंगडे पे मत रो’ मधल्या माणसांचं जगणं माणसासारखं नसतं. ही सगळीच माणसं आतून तुटलेली, विस्कटलेली, भणंग अशी असतात. इथल्या नळीदार पत्र्याच्या घरात येणारे कवडसेही उदासीची ‘शमा’ फेकतात. अल्पसंख्याक समुदायातील गुन्हेगारी, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, धर्मांधता, कट्टरवाद अशा प्रश्नांना ‘सलीम लंगडे पे मत रो’ थेट हात घालतो.

मुंबईतील गल्लीतल्या गटार मेनहोलमध्ये पडलेली बॉडी उचलण्यासाठी पालिकेची आलेली गाडी, मटका चालवणार्‍या गुंड विलासवर फायरिंग करणारी कारमधली माणसं, मुमताजच्या कोठीवर ‘धंद्याची’ बात करणारा माणूस अशी अनेकविध रंगढंगातली माणसं पडदाभर पहायला मिळतात. माणसासारखं चांगलं जगणंही न पूर्ण होणारं स्वप्न असू शकतं? हे वास्तव मनाचा पडदा फाडून टाकतं. ही परिस्थिती आजही पुरेशी बदललेली नाही. मोहल्ल्यातल्या माणसांचं तुटलेपण अजूनही तस्संच आहे. आहे रे आणि नाही रे गटातली दरीही कायम आहे. मॉब लिचिंग किंवा दंगलीची भीती आणि धार्मिक उन्मादाचं राजकारण आजही तसंच आहे. अल्पसंख्याक समुदायांचे सामाजिक प्रश्नही तसेच आहेत. मग नेमकं बदललं काय? असा प्रश्न ऐंशीच्या दशकातला सलीम आजही विचारू शकतो. धर्म, कट्टरतावादापलिकडेही समाजाच्या सकारात्मक बदलासाठी तयार असलेल्या अल्पसंख्याक समुदायातील तरुणांची अवहेलना, वेदना, घुसमट सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला ‘सलीम लंगडे पे मत रो’ नेमकेपणाने आजही मांडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -