घरफिचर्सचिंचोटी धबधब्याचा थरारक अनुभव

चिंचोटी धबधब्याचा थरारक अनुभव

Subscribe

चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक अडकल्याचे कळले आणि आम्हाला अगदी तसाच आलेला चिंचोटी धबधब्याचा चित्तथरारक प्रसंग आठवला. त्याचीच ही आठवण.

३० जुलै २०११ ला सकाळी साडेनऊ वाजता आम्ही चिंचोटी धबधब्याला निघालो. उशिरा निघाल्यामुळे वसईला पोहोचायला जवळजवळ साडेअकरा वाजले. आम्ही जिथे उतरलो तिथून धबधब्याचं ठिकाण पायी जवळजवळ तासभर अंतरावर होतं. म्हणजे तिथपर्यंत जाताना ट्रेकिंगचा अनुभव येणार होता. तेथील स्थानिक लोकांकडून धबधब्यापर्यंत जाण्याचा रस्ता विचारून घेतला. आमचा कंपू रमतगमत निघाला. सर्वत्र हिरवळ होती. अशा रम्य वातावरणात चालायला मजा येत होती; परंतु सकाळपासून पाऊसच पडला नसल्यामुळे एक प्रकारचा रखरखीतपणाही जाणवत होता.

वाट दगडधोंड्यातून, ओढ्यातून, शेताच्या बांधावरून अशी जात होती. मध्येच डोंगराचा चढ लागला; परंतु बराच वेळ झाला तरी धबधबा दृष्टीस पडत नव्हता; मग मात्र कळून चुकलं की, आम्ही बहुधा चुकीच्या रस्त्यावर आलो होतो. थोड्याशा उंचावर पोहोचल्यावर समोरच्या डोंगरावरचा धबधबा दृष्टीस पडला; पण तो फारच दूरवर होता. त्याच वेळी कुठून तरी दोघेजण आमच्या बाजूनं डोंगर चढताना दिसले. बहुतेक स्थानिक असावेत. ते धबधब्याच्या बाजूलाच जात असावेत, असा आम्ही अंदाज केला. त्यांच्या मागोमाग निघालो. आता मात्र रस्ता घनदाट झाडीतून जात होता.

- Advertisement -

उंचच उंच झाडांमुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नव्हता; परंतु, सूर्यप्रकाशाच्या उजेडामुळे थोड्या प्रमाणात का होईना आम्हाला रस्ता दिसण्यास उपयोग होत होता. १०-१५ मिनिटं झाली असतील आणि अचानक आमच्या पुढे असलेले ते दोघं जण दिसेनासे झाले. त्यांनी कुठली वाट पकडली ते कळलंच नाही. मी आणि रवी एकदम गोंधळलो. धबधब्याचा आवाज येत होता. जवळच असेल म्हणून, मग आवाजाच्या रोखानं आम्ही निघालो; परंतु अजून पंधरा मिनिटं चाललो, तरीही धबधबा दिसण्याची चिन्हं दिसत नव्हती. आता मात्र कळून चुकलं की, आम्ही भरकटलो होतो. आमच्या मागेमागेच इतर सहा-सात सहकारी होते. उरलेले सर्व सहकारी तर केव्हाच मागे पडले होते. तेवढ्यातच पावसाला सुरुवात झाली. एकाएकी सगळीकडे काळोख दाटून आला. पायवाटेवर पाण्याचा जोर वाढू लागला. ओढ्यातील पाणीही वाढू लागलं. या परिस्थितीत पुढे जाणं धोक्याचं होतं, हे लक्षात आलं. आम्ही तिथेच थोडा वेळ थांबलो. पावसाची मोठी सर थांबून रिमझिम पावसाला सुरुवात झाली; पण संततधार चालू होती. आम्हाला आता परतीचा मार्ग शोधणं क्रमप्राप्त होतं; पण ज्या मार्गानं वर आलो तो मार्गच सापडत नव्हता. शेवटी पाणी ज्या मार्गानं खाली जात होतं, त्याच वाटेनं आम्ही उतरायला सुरुवात केली.

एकमेकांना सांभाळून घेत आम्ही चालू लागलो. थोडं चालल्यानंतर कळलं की पुढे थोडा सरळ उतार होता. मार्ग नव्हता. एका बाजूला काळाकभिन्न असा मोठा दगड होता. एक प्रकारची पहाडी भिंतच जणू. आता मात्र आमचा धीर खचला. मोबाईल तर कधीच संपर्ककक्षेच्या बाहेर गेले होते. त्यामुळे इतरांशी संपर्क तुटला होता. त्यातच घराची ओढ लागली होती. भरपूर चालणं झाल्यामुळे पायही दुखत होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर परतीचा मार्ग शोधू लागलो.. आणि काय आश्चर्य! इतका वेळ जी वाट शोधत होतो ती जवळच होती. ती पाहताच आम्हा सगळ्यांना हायसं वाटलं. त्या वेळेपर्यंत मनात नको नको ते विचार येऊन गेले. चिंचोटी धबधब्याच्या परिसरात अगोदर घडलेल्या, वाचनात आलेल्या दुर्दैवी घटना डोळ्यांसमोर येऊन गेल्या होत्या. आपणही तशा बातम्यात केंद्रस्थानी येणार का, असा भीतिदायक विचारही मनात येऊन गेला होता.

- Advertisement -

थोडा वेळ चालल्यानंतर आम्हाला बाकीची मंडळी दृष्टीस पडली. त्यांनीही आम्हाला पाहताच सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या तेवढ्या वेळात त्यांच्याही काळजाचं पाणी पाणी झालं. आमच्याशी संपर्क होत नसल्यामुळे आम्ही कुठे आहोत, याचा अंदाज त्यांना येत नव्हता. आम्ही बराच वेळ न आल्यामुळे आता परत माघारी कसं जायचं, पुढची पावलं काय उचलायची, याचा गोंधळ उडाला होता. सगळ्यांची भेट झाल्यानंतर मात्र हे सर्व प्रश्न आपसूकच बाद झाले. मग सगळ्यांनीच परतीचा मार्ग पकडला. त्यातच काही जणांनी पावसामुळे ओढ्यात वाढलेल्या पाण्यात मनसोक्त डुंबून धबधब्याच्या दुधाची तहान या ‘पाणीरूपी’ ताकावर भागवली.


-दीपक काशिराम गुंडये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -