काळ कोरोनाचा आहे, कंगनाचा नाही !

उठसुठ चिथावणीखोर ट्विट करून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या कंगनाला किती महत्व द्यायचं याचा विचार सरकारने आता करायला हवा. महिलांचा सन्मान राखणारे, त्यांच्या मतांचा आदर करणारे राज्य असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या पहाडी पोरीच्या नादी लागून घालवता कामा नये. कोणाच्या बोलण्याला किती महत्व द्यावे व कोणाला शिंगावर घ्यावे आणि कोणाला टाचेखाली चिरडावे एवढी समज तर नक्कीच आहे महाराष्ट्राला. ती पत कोणाच्याही चिथावणीखोर ट्विट किंवा वक्तव्याने घालवू नये. नळावरचे भांडण करणार्‍या महिलेच्या तोंडी राजाने लागावे असे दृश्य सध्या आहे. ते टाळायला हवे. कारण काळ कोरोनाचा आहे, कंगनाचा नाही.

Kangana Ranaut

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. यात आता सीबीआय, ईडी, एनसीबीची एन्ट्री झाल्याने तपासानेही वेग घेतला आहे. या प्रकरणाचा ड्रग्जशीही संबंध असल्याने सुशांतची प्रेयसी रियाला अटक झाली आहे. याप्रकरणावरून महाराष्ट्र व बिहारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान कंगना राणावत रुपी वाचाळ नटीने यात एन्ट्री केली.

सुरूवातीला सुशांतच्या मृत्यूला बॉलीवूडमधील नेपोटीझम कारणीभूत असल्याचा आरोप तिने केले. पण त्यानंतर तिने जे काही वादग्रस्त ट्विट करत राज्य सरकारला व मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले व त्यावर बड्या नेत्यांनी ज्या अनावश्यक प्रतिक्रिया देत तिला मोठं केलं. तिच्या कार्यालयावर बुलडोझर घातला. त्याने महाराष्ट्राचे राजकारण पुरते ढवळून निघाले आहे.

या पार्श्वभूमीवर ज्या तोर्‍यात कंगनाने सुरक्षा कवचात मुंबईत एन्ट्री केली ती पाहता येत्या काळात ही ‘क्विन’ बॉलीवूडमध्ये जरी फार दिसली नाही तरी राजकीय पटलावर मात्र धूमाकूळ घालण्याचीच शक्यता अधिक आहे. पण कुठे किती बोलावं व कुठे थांबावं याचं भान कंगणाने बाळगायला हवं. कारण तोंडात येईल ते बोलणे व प्रत्यक्षात बुद्धिजीवी असणं यात जमीनअस्मानचा फरक आहे. पिक्चरमध्ये पाठांतर करुन डायलॉग बोलणं आणि समोरच्यांची आपल्या सारासार विचारांनी बोलती बंद करणं येर्‍या गबाळ्याचं काम नाही… हे तिने वेळीच ओळखावं.

सुशांतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप त्यावेळी अनेकांनी केला.

तो डिप्रेशनमध्ये होता त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा जबाब रियाने व त्याच्याजवळील लोकांनी मुंबई पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली.

याच दरम्यान, कंगनाने सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला. बॉलीवूडमधील नेपोटीझमने त्याचा जीव घेतला असेही ती म्हणत होती. आपल्यालाही या नेपोटीझमचा कसा अनुभव आला याबद्दलही ती बोलत होती. यादरम्यान, बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांना तिने लक्ष्य केलं. बॉलीवूडमधील ज्या मोठ्या व्यक्तींविरोधात बोलण्याची हिंमत कोणातही नाही, त्यांची नावे घेत कंगणाने खळबळ उडवून दिली.

कंगणाचे हे धडाडी व व्हिसलब्लोअर रुप बघून सुशांतला कंगनाच न्याय मिळवून देणार असा विश्वास सुशांतच्या व तिच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला.

तिचा चाहतावर्ग वाढला. लोकं तिचं कौतुक करू लागले. यामुळे कंगणाला अधिकच चेव आला. ती कधी ट्विट तर कधी व्हिडीओच्या माध्यमातून सुशांत प्रकरणावर मते व्यक्त करू लागली.

पण त्यानंतर मात्र कंगनाने याप्रकरणात केवळ ठराविकच लोकांची चौकशी केली जात आहे. करण जौहर व इतरांची नाही, कारण त्यांचे एका राजकीय नेत्याबरोबर मैत्रीचे संबंध आहेत.

असा आरोप करत खळबळ उडवली. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांना टार्गेट केलं. मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर बोलण्याची मजल गाठत कंगना बाप काढण्यापर्यंत पोहचली.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच तिने आव्हान दिले आहे. त्यात पालिकेने तिच्या कार्यालयातील बेकायदेशीर कामावर बुलडोझर चालवून तिला अधिकच मोठं बनवलं.

मुंबईकरांनी जरी तिला विरोध दर्शवला असला तरी उत्तरेकडील राज्यांनी व हिंदी भाषिकांनी मात्र तिला डोक्यावर घेतलं आहे. कमळाची साथ तर तिला लाभलीच आहे. पण या घटनांमुळे सुशांतला न्याय मिळवून देण्याचा दावा करणारी कंगना बॉलीवूडमधील दबंगांशी पंगा घेण्याची हिंमत असल्याचे दाखवत आहे. कंगनाने मिळालेल्या प्रसिद्धीचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहे. असे चित्र निर्माण करून महाराष्ट्राला बदनाम केले जात असून कंगनाला मात्र लढाऊ स्त्री म्हणून मोठे केले जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीपासून हिमाचल व इतर राज्यांमध्ये कंगनाबद्दल सहानुभूतीची लाट उसळली आहे. तर महाराष्ट्र सरकारबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरलेल्या कंगनाने जनमत आताच मिळवले आहे. यामुळे भाजप एखाद्या पदावर कंगनाची वर्णी तर लावेलच, शिवाय तिच्या आततायी, उतावीळ आणि तोंडफाटक्या स्वभावाचा फायदा पक्षवाढीसाठी नक्कीच करेल यात शंका नाहीये. आधीच सुशांत आत्महत्याप्रकरणावरून महाराष्ट्र व बिहार आमने सामने आल्याचे चित्र आहे. सीबीआयने सुशांतप्रकरण हाती घेतल्याने बिहार व सुशांतचे चाहते शांत आहेत. पण ते शांत झालेले असले तरी कंगना वादामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र रडारवर आला आहे.

महाराष्ट्रातील एका पक्षावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दोन पक्षांचा टेकू घेऊन उभे राहिलेल्या या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला कंगना फुल टू नडली आहे.

पण उठसुठ चिथावणीखोर ट्विट करून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या कंगनाला किती महत्व द्यायचं याचा विचार सरकारने आता करायला हवा.

महिलांचा सन्मान राखणारे, त्यांच्या मतांचा आदर करणारे राज्य असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या पहाडी पोरीच्या नादी लागून घालवता कामा नये.

कोणाच्या बोलण्याला किती महत्व द्यावे व कोणाला शिंगावर घ्यावे आणि कोणाला टाचेखाली चिरडावे एवढी समज तर नक्कीच आहे महाराष्ट्राला. ती पत कोणाच्याही चिथावणीखोर ट्विट किंवा वक्तव्याने घालवू नये. नळावरचे भांडण करणार्‍या महिलेच्या तोंडी राजाने लागावे असे दृश्य आहे सध्या.

ते टाळायला हवे. वाचाळवीरांच्या जाळ्यात अडकून महाराष्ट्राची अस्मिता कमी करू नये. कारण आपण कोणाशी वाद घालतोय हेदेखील फार महत्वाचे असते.

समोरील व्यक्ती जर परिपक्व असेल तर थोडक्यात बोललेले पण तिला कळते. पण जो कळूनही न कळल्याचा आव आणतो त्यामागे लागणे म्हणजे स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेणे आहे.

आणि सध्या ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. वाद हा नेहमी दोन समान बु्द्धिजीवांमध्ये रंगतो. यामुळे सध्या सुरू असलेली नळावरची टिवटिव बंद झालेलीच बरी.

यामुळे बुलडोझरपेक्षा साडीचोळी देऊन समोरच्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव करून देणेच योग्य आहे. कारण काळ कोरोनाचा आहे, कंगणाचा नाही. कोरोना घालवणे अधिक आवश्यक आहे.

कारण चमकेगिरी करत राजकारणात अशा अनेक तोंडाळ सेलिब्रिटीज आल्या. त्यांना मिळालेल्या जनमताचा फायदा घेत राजकीय पक्ष वाढीस लागलेले आपण बघतच आलो आहोत. पण राजकीय कळपात आल्यानंतर त्यांची टिव टिव नंतर कशी शांत होते हेदेखील कंगणाने वेळीच ओळखत कुठे व काय बोलावं आणि किती बोलावं, याचा विचार करायला हवा.

सुशांतला न्याय देण्यासाठी निघालेली कंगणा आज राजकीय संधीचं सोनं करू पाहत आहे. काँग्रेसचा वारसा असलेल्या कंगणाने वर्षभरापूर्वी आपण गायीचे मांस खातो असे ट्विट केले होते. त्यावेळी कंगनाला हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपने निशाण्यावर घेतले होते. त्याच कगंणाला पाठीशी घालण्यासाठी आज भाजप सक्रीय झाला आहे. यात भाजप कंगणाच्या प्रेमात पडला असे नसून तिच्या पाठीमागून केवळ महाराष्ट्रात सत्तेचे कार्ड खेळत आहे. हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाविकास आघाडी करत हिसकावल्याने भाजपचा तिळपापड झालेला आहे. हूक ऑर क्रूक पद्धतीने या सरकारला पाडण्याचे सर्व प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. यात आता कंगणा आली आहे. पण या राजकारणात सुशांत विषय मागे पडला नाही म्हणजे झाले.