खेकड्यांची बिळे आणि भ्रष्टाचारी मेंदूची भोके!

लोक मेले काय आणि जगले काय, काय फरक पडतो... उद्ध्वस्त धर्मशाळा होऊन मग्न तळ्याकाठी युगांत लोटल्यासारखे बसलेल्या प्रमुखांना खूश केले म्हणजे झाले. माणसे ही मरण्यासाठी असतात. मालाडची भिंत पडली, येथे शिवसेनेचे राज्य आहे आणि चिपळूणला धरण फुटले तिकडेही शिवसेनेचेच राज्य आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो माणसे मेली पाहिजेत. कारण या राज्यात खेकडे धरणाला बिळे पाडतात आणि भ्रष्टाचारी मेंदूला भोके पडतात...

Mumbai

कोकणातील चिपळूणचे तिवरे धरण फुटले. मातीचे हे अवघ्या 10 वर्षांपूर्वी बांधून झालेले 12 कोटींचे धरण फुटल्याने 20 ग्रामस्थांचा हकनाक बळी गेला आणि 4 अजून बेपत्ता आहेत. हे धरण बांधणारे आणि आधी जलसंधारण विभागात कारकून असणारे, मग शिवसेनेचे आमदार झालेल्या सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने हे धरण बांधले होते. आता ते त्यांनी बांधून पूर्ण केले, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असे सांगत शिवसेनेचेच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी त्यांना लगेच क्लीन चिट दिली आणि या पापाचे खापर कोणाकडेच न्याय मागू न शकणार्‍या कोकणातील खेकड्यांवर फोडले… म्हणे कोकणात खेकडे माजलेत आणि ते माणसांना चावत नाही तर अख्खी भली मोठी धरणे भोके पाडून फोडून टाकतात… मी बोललो ना ग्रामस्थांशी, मी बोललो ना अधिकार्‍यांशी. त्यांनी मला हेच सांगितले.

कोकणात राजकीय नेते नाही, खेकडे माजलेत. गरीब बिचार्‍या चव्हाण यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. बरोबर आहे तुमचे तानाजीराव… तुम्ही आताच जलसंधारण खाते हाती घेतल्याने तुम्हाला खेकडे आणि मानवी चुका हे लगेच लक्षात येणार नाहीत. किंवा आल्या तरी तुम्हाला मातोश्रीला जबाब द्यायचा आहे. लोक मेले काय आणि जगले काय, काय फरक पडतो… उद्ध्वस्त धर्मशाळा होऊन मग्न तळ्याकाठी युगांत लोटल्यासारखे बसलेल्या प्रमुखांना खूश केले म्हणजे झाले. माणसे ही मरण्यासाठी असतात. मालाडची भिंत पडली, येथे शिवसेनेचे राज्य आहे आणि चिपळूणला धरण फुटले तिकडेही शिवसेनेचेच राज्य आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो माणसे मेली पाहिजेत. कारण या राज्यात खेकडे धरणाला बिळे पाडतात आणि भ्रष्टाचारी मेंदूला भोके पडतात…

तिवरे धरण फुटल्यानंतर मी लगेच माजी मंत्री भास्करराव जाधव यांना फोन केला. हे धरण मंजूर केले तेव्हा ते चिपळूणचे आमदार होते आणि शिवसेनेत होते. १९९५ ला युतीचे शिवसेना आणि भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर ९७ मध्ये या मातीच्या धरणाला मंजुरी मिळाली. त्यावेळी धरणाची किंमत होती 2 कोटी. बांधून दहा वर्षांपूर्वी पूर्ण झाले तेव्हा ती 12 कोटींवर गेली. खूप मोठा खर्च नव्हता, साधे मातीचे धरण होते ते. पण तरीही १२ कोटी लागले आणि ते पूर्ण व्हायला 12 वर्षे लागली. या धरणाचे काम सदानंद चव्हाणांच्या खेमराज कंपनीने मिळवले. जलसंधारण खात्यात असल्याने कामे कशी मिळतात, टेंडर कसे पास होतात, टक्केवारी कशी दिली जाते आणि शिपायापासून ते अधिकार्‍यांपर्यंत पैसे कसे खाल्ले जातात याचा चव्हाण यांचा अभ्यास नीट झाला होता. त्यामुळे बाहेरच्या कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यापेक्षा आपणच आपली कंपनी उघडावी आणि कंत्राटे मिळवावी, असा साधाभोळा विचार चव्हाण यांनी केला.

आपण सरकारी नोकर असल्याने भावाला घेऊन खेमराज कंपनी उघडली आणि आधी छोटी मोठी रस्त्याची कामे घ्यायला सुरुवात केली. आणि भास्कर जाधव आणि शिवसेनेच्या कृपेने त्यांना तिवरे धरणाची लॉटरी लागली. त्याआधी त्यांनी कधी धरण बांधले होते, त्यांचा अनुभव काय असले फालतू प्रश्न त्यांना त्यावेळी कोणी विचारले नव्हते. शिवाय धरण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोणते साहित्य वापरले, पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी झाली होती का, असे तुम्हाला आम्हाला पडलेल्या शंकाही त्यांना कोणी विचारल्या नाहीत. आणि त्यांनीही टक्केेवारी भागवून हात मोकळे केले… आता 10 वर्षांपूर्वी धरण बांधून झाल्यानंतर चव्हाण यांची काहीच जबाबदारी उरत नाही, असा त्यांनी आणि तानाजीरावांनी लोकांचा समज करून दिला. गेले दहा वर्षे या धरणात खेकडे बिळे पडून ते फोडत असतील तर चव्हाण तरी बिचारे काय करणार? त्यांनी माती, पिलर, छिद्रे नीट बांधली होती… खेकडे नालायक निघाले.

आधीच ते कोकणातील खेकडे. त्यांना सरळ चालायचे माहीत नाही, त्यात ते एकमेकांचा पाय ओढत पुढे जाणार. चांगले काही घडवणार नाहीत, त्यांना चांगले काही बघवणार नाही… आणि नांगी अशी काही मारणार की बसा बोंबलत. चव्हाण यांनी काम जागतिक दर्जाचे केले होते. तानाजीराव यांच्याकडे नोबेल पुरस्कार द्यावा असे काम झाल्याचे प्रमाणपत्र आहे. चव्हाण नाहीत, खेकडे भ्रष्टाचारी निघाले. त्यांनी 10 वर्षांत धरणाला भोके पाडून पाडून ते फोडले आणि माणसे मेली… माणसे मेली पाहिजेत. खेकड्यांनीच बिळे पाडलीत आणि भ्रष्टाचारी मेंदूची भोके झालीत… येथे आसवांचा प्रश्न येत नाही. कारण डोळ्यांच्या काचा आणि मेंदूच्या खाचा झाल्यात… खेकड्यांनी धरण फोडल्याने गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा एक गहन प्रश्नही तानाजीराव यांना पडला आहे. शिक्षण सम्राट असलेल्या तानाजीराव यांना असा क्षुल्लक प्रश्न पडावा, याचे आश्चर्य वाटते.

ते घडवत असलेल्या उच्च विद्याविभूषित विद्यार्थ्यांनाही हा साधा प्रश्न पडला नसता. त्यांनी सदोष मनुष्य हत्येच्या कलमाखाली सदानंद चव्हाण यांना आरोपी न करता खेकड्यांच्या नांग्या आवळाव्यात आणि त्यांना जेलमध्ये टाकावे. खूपच माजलेत हे नांगीधारी खेकडे! धरणातले मासे, किडे, मुंग्या खातात तर खातात वर मातीही खातात. तिवरे धरण बांधणार्‍या खेमराज कंपनीने हे धरण टक्केवारी देऊन आणि वर आपला फायदा काढून उरलेल्या पैशात हे गळके धरण बांधले असले तरी त्यांचा हा दोष नाही. तो खेकड्यांचाच दोष आहे. त्यांना आत टाकाच. यासाठी तानाजीराव तुम्हाला कायदेतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली तरी चालेल… हा प्रश्न एकदाचा निकाली निघाला पाहिजे. माजलेल्या खेकड्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे!

झगामगा आणि मला बघा…असे महान मंत्री म्हणजे जलसंपदा, उच्च वैद्यकीय शिक्षण अशी महत्त्वाची खाती सांभाळणारे गिरीश महाजन. ते लगेच तिवरे धरण घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी काय झाले, कोणाचा दोष अशी फार डोक्याला शॉट न देता चौकशी करत थेट मेलेल्या माणसांच्या शिल्लक राहिलेल्या माणसांना पक्की घरे आणि प्रत्येकी 5 लाखांची मदत देऊन विषय संपवला. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने सारा महाराष्ट्र पालथा घालायचा असल्याने धरण फुटले, या क्षुल्लक बाबीकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही.

आता फक्त तीन महिने विधानसभा निवडणुकीला उरले आहेत. कदाचित भाजपला केंद्रप्रमाणे महाराष्ट्रातही बहुमताची लॉटरी लागली तर महाजन मुख्यमंत्री होऊ शकतात आणि फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले जाईल. राजकारणात काहीही होऊ शकते, त्यामुळे महाजन कायम फिट आणि सतत हिट राहण्याचा प्रभावी अभिनय करतात. त्यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यात किती सिंचन वाढवले आणि भविष्यासाठी काय पावले उचलली, यावर कोणी प्रश्न विचारू नयेत. त्यांना राज्यात अनेक प्रश्नांची उत्तरे चुटकीसरशी सोडवायची आहेत. मध्यस्थ्या करायच्या आहेत, संप आणि आंदोलने मागे घ्यायला सांगायची आहेत, शिष्टमंडळाला भेटी द्यायच्या आहेत. आणि बरेच काही. लोकांचे प्रश्न संपणार नाहीत. धरणे फुटत राहतील आणि माणसे मरत राहतील, त्यात काय एवढे? मदतीचा चेक दिला की तोंड बंद! कसली चौकशी आणि कसले काय? माणसे मेलीच पाहिजेत.

कारण तिवरे धरण गळते आहे, हे ग्रामस्थ सातत्याने ओरडत होते. पण महाजन यांच्या खात्याने आणि भाजप सरकारने कान बंद करून घेतले होते आणि शिवसेना त्यांच्या मागे फरफटत चालली आहे. लोक काय कायम ओरडत असतात… कोकणात भाजप वाढत नाही आणि आपण कामे करून फुकटात शिवसेनेला कशाला मोठी करायची, यामुळे तिवरे धरण नीट गळू दिले. भोके पडलेली दिसत होती, भगदाडे होईपर्यंत ते तसेच राहू दिले. कोकण जलसंधारण आणि महाजन यांच्या सिंचन विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून टक्केवारीची गणिते जुळवत होते आणि तिवरे धरणात खेकडे धरण फोडत होते. माणसे मेलीच पाहिजेत..

बाई मी धरण, धरण, धरण बांधिते माझं मरण, मरण, मरण कांडीते,
न बाई मी धरण…
झुंजमुंजु ग झालं पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा ग, कोंडा ग कोंडा मी रांधिते,
न बाई मी धरण…
दिस कासर्‍याला आला जीव मागे घोटाळला, तान्हं लेकरू, माझं लेकरू, पाटीखाली मी डालते,
न बाई मी धरण…
काय सांगू उन्हाच्या झळा, घावाखाली फुटे शिळा, कढ दाटे, कढ दाटे, पायी पाला मी बांधिते,
न बाई मी धरण…
पेरापेरात साखर, त्यांचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळीते,
न बाई मी धरण…
येल मांडवाला चढे, माझ्या घामाचे ग आळे, माझ्या अंगणी, माझ्या अंगणी,
पांचोळा ग पडे,
न बाई मी धरण…

दया पवार यांची ही कविता धरण, ग्रामीण जीवन, पाणी, बाईमाणूस, तिची कथा आणि व्यथा, अशा भवतालचा वेध घेत आपल्याला सुन्न करते. तिवरे धरण फुटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पाण्यासाठी वणवण फिरणारी या आया, बहिणी डोळ्यासमोर तरारून आल्या. तिवरे धरण बांधताना याच आयाबायांच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून केला होता. १५ गावच्या या बाया पिण्याला पाणी मिळाले, शेतीला पाणी आले म्हणून खूश होत्या. पण, हे धरण बांधताना त्या मरणही कांडत होत्या. धरण फुटल्यानंतर त्यांचा आक्रोश धो धो कोसळणार्‍या पावसात आता कोणाला ऐकू येणार नाही… पुढे तो पावसाच्या पाण्याबरोबर वाशिष्टी नदीतून वाहून अरबी समुद्राला मिळेल. कधीच ऐकू न येण्यासाठी! बाई मी धरण धरण बांधिते… मरण मरण कांडीते….