घरफिचर्सगावं पाणीदार करण्यासाठी...

गावं पाणीदार करण्यासाठी…

Subscribe

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा कृतीशील सामाजिक कार्याद्वारे गावांना पाणीदार बनवण्याचे कार्य सोशल नेटवर्कींग फोरमतर्फे सुरू आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोरमची मंडळी एकत्र आली आहेत. त्यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील, प्राध्यापक आणि अन्य व्यवसायातील लोकांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या काळात बहुतांश गावांतील विहिरी कोरड्या पडतात. अशा वेळी पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू होते. ती कायमस्वरुपी थांबवण्यासाठी फोरमच्यावतीने जवळपासच्या गावात पाण्याचा स्त्रोत शोधला जातो आणि विविध देणगीदारांच्या मदतीने पाईप्स आणि तत्सम बाबींची खरेदी करून पाणी गावापर्यंत पोहोचवे जाते. ग्रामविकासाच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सामाजिक जाण असलेल्या व्यक्तींच्या सहकार्यातून खेड्या-पाड्यांचा विकास साधण्याचे त्यांचे हे काम अविरत सुरू आहे. या उन्हाळ्यात सोशल नेटवर्कींग फोरमने सहा गावे टँकरमुक्त केली आहेत. संस्थेने राज्यभरातील एकूण १८ गावे पाणीदार केली आहेत.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भाग दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळला गेलाय. गेल्यावर्षीपेक्षा यंदा दुष्काळाची दाहकता अधिक आहे. त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये अबालवृद्धांचे कमालीचे हात होत आहेत. जलयुक्त शिवारासारख्या सरकारी योजनांना अपेक्षित यश मिळत नसल्याने ग्रामीण भागातील उरली-सुरली आशाही मावळली आहे. आपल्या नशिबी कायमस्वरुपी पाणी भरणेच आहे, अशा मानसिकतेत आता ही मंडळी जगत आहेत. दुसरीकडे दुष्काळामुळे गावेच्या गावे रिती होत आहेत. अन्न-पाण्याच्या शोधात शहरात स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत सोशल नेटवर्कींग फोरमचे काम वाळवंटातही हिरवळ पसरवल्याची अनुभूती देते. आज समाजमाध्यमांकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. ही माध्यमे मैत्रीच्या भावना जोपासण्यापेक्षा द्वेष पसरवण्याचे काम करतात की काय? संवादापेक्षा विसंवादाच्या साधन बनतात की काय, अशी शंका घेण्याइतपत त्यांचा नकारात्मक वापर होतो. मात्र, अशा काळात याच माध्यमांद्वारे हजारो तरुणांना एकत्र करून ही शक्ती ग्रामविकासासाठी वापरली जाऊ शकते, ही खरेतर अविश्वसनीय बाब. नाशिकच्या प्रमोद गायकवाड यांनी २०१० मध्ये फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून सोशल नेटवर्कींग फॉर सोशल कॉज हे अभियान सुरू करून समाजमाध्यमांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलवून टाकला आहे. याअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरम ही संस्था स्थापन करून सोशल मीडियावरील तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरित करायला सुरुवात केली.

- Advertisement -

समाजातील वंचित बांधवांना कपडे आणि शैक्षणिक साहित्याची भेट देत दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला आणि संस्था स्थापनेनंतरच्या पहिल्या दिवाळीत गोडवा तीन पाड्यांपर्यंत जाऊन ठेपला. यानंतर फेसबुकवर अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडून त्यात सहभागाचे आवाहन केले गेले आणि तरुणांचा सहभाग वाढू लागला. सामाजिक जबाबदारीची जाणीव असूनही केवळ योग्य व्यासपीठ नसल्याने थांबलेल्या तरुणाईचाही गायकवाड यांच्या कार्याला मोठा हातभार लागला. अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी गायकवाड रोज सोशल मीडियावरील तरुणांना प्रेरीत करत गेले. त्यातून शेकडो सोशल नेटवर्कर्स या चळवळीकडे आकर्षित झाले. विशेष म्हणजे केवळ स्थानिक अथवा देशांतर्गत नव्हे तर परदेशातील अनिवासी भारतीयांनीही मदतीसाठी हात पुढे केले. या सोशल एकजुटीमुळे अभियानाच्या स्थापनेपासून आजवर कित्येक गावांची तहान भागवली गेली. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात या अभियानाद्वारे हजारो वंचितांच्या जीवनात प्रकाश पडला असला तरी खेड्यांना पाण्यासाठी समृद्ध करणे हे फोरमचे काम लक्षवेधी म्हणावे लागेल. २०१५ मध्ये राज्याच्या अनेक भागांत मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी वणवण सुरू झाली.

अशा परिस्थितीत फोरमने बीड जिल्ह्यातील राज पिंपरी हे गाव आणि एरंडवणच्या हरीण अभयारण्यातील पाणी प्रश्नासाठी काम केले. २०१६ मध्येही दुष्काळी सदृश परिस्थिती कायम राहिली. आदिवासी गावांना मोठा फटका बसला. गावोगावी हंडे घेऊन महिलांची रानोमाळ वणवण सुरू होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कामाचा अनुभव असणार्‍या प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, जीवन सोनवणे, जिऑलॉजिस्ट डॉ. जयदीप निकम, रामदास शिंदे, अ‍ॅड. गुलाब आहेर, अशा तज्ज्ञांची टीम तयार झाली. या टीमने काही गावांची पाहणी केली. गावांच्या समस्या, उपलब्ध साधन सामुग्री याची माहिती संकलित करत गावकर्‍यांच्या सहकार्याने समस्यांवर मात कशी करायची, याचा आराखडा तयार केला. नेटिझन्सला याची माहिती दिली. अनेक सहृदयी व्यक्ती या कामासाठी पुढे आल्या आणि केवळ दोन वर्षात ११ गावांना फोरमने टँकरमुक्त करत आदिवासी बांधवांच्या दारात पाणी पोहोचवले. आजवर अनेक गाव-खेड्यांना फोरमने जलाभियानांतर्गत स्वयंपूर्ण केले. उर्वरित शक्य तितक्या गावांसाठी जमेल तसे आणि निधीच्या उपलब्धतेनुसार काम सुरू आहे. पेठ तालुक्यातील टेकडीवर वसलेले गढईपाडा हे गाव. या ठिकाणी १० हजार लिटर पाण्याचा स्टोरेज टँक फोरमच्या माध्यमातून बसवला गेला. तोरणगाव येथे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होत होता. तिथे फोरमने जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली. त्यामुळे गावांना एक रुपया भरून २० लिटर स्वच्छ पाणी मिळायला लागले. पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त कोळुष्टी गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी थेट अमेरिकेहून मदत आली. तेथे स्थायिक झालेले उद्योजक वसंत राठी यांनी ही मदत दिली. वाळीपाडा या अतिशय दुर्गम भागातील गावाच्या पाणीप्रश्नाविषयी फोरमने समाजमाध्यमांवर माहिती दिली. गावापासून एक किलोमीटरवरील नदीतून रोज महिलांना आणि मुलांना डोक्यावरून पाणी आणावे लागत होते. नदीकडे जाणारी पायवाटही पावसाळ्यात बुजली की मग पाण्यावाचून जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत होता. अशा परिस्थितीत समाजमाध्यमांवरील माहिती वाचून गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक भार उचलण्याची जबाबदारी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये सैन्याधिकार्‍यांनी घेतली. त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीतून लवकरच वाळीपाडा गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होण्याचा आनंद अनुभवायला मिळणार आहे.

- Advertisement -

एका बाजूला सीमेवर देशाचे सरंक्षण करून आपली जबादारी निभावत असताना दुसर्‍या बाजूला देशातील आपल्या वंचित बांधवांच्या दारात पाणी पोहोचवण्यासाठी स्वतःच्या पगारातून हातभार लावणार्‍या सैन्याधिकारी आणि अन्य मित्रांना सॅल्यूट ! याशिवाय सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ या दुष्काळी गावाला आता टँकरमुक्त करण्याचेही आव्हान या संस्थेने स्वीकारले आहे. त्यानुसार येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कासटबारी धरणाच्या काठावर विहीर खोदून पाणी गावात आणले जाणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणच्या रमेश धूम या शेतकर्‍याने एकही पैसा न घेता आपली जागा विहिरीसाठी दिली. या उन्हाळ्यात फोरमकडून टँकरमुक्त होत असलेले हे सहावे आणि आजवरचे अठरावे गाव ठरणार आहे. दुष्काळाच्या दाहकतेत फोरमने हाती घेतलेले काम सुखावणारे असेच आहे. प्रमोद गायकवाड यांनी सुरू केलेल्या या चळवळरूपी रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. वाढत्या लोकसहभागामुळे अभियान म्हणून सुरू झालेली ही चळवळ सशक्त आणि समृद्ध भारतासाठी प्रत्येकासाठी दिशादायी ठरावी!

गावं पाणीदार करण्यासाठी…
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -