घरफिचर्सतंबाखू, मावा, पाणीपुरी तोंडाच्या कॅन्सरचे सोबती

तंबाखू, मावा, पाणीपुरी तोंडाच्या कॅन्सरचे सोबती

Subscribe

मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये तंबाखू सेवन, मशेरीचा वापर, मावा, पानपराग, मद्यपान व धूम्रपान यासारखी व्यसने प्रमुख कारणे आढळून येतात. इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संशोधनातील निरीक्षणांनुसार पावभाजी, पाणीपुरी, हिरव्या मिरचीचा ठेचा असे अतिशय तिखट – जळजळीत पदार्थ वारंवार व अधिक प्रमाणात सेवन करणे कॅॅन्सरला कारणीभूत ठरतात.

आजच्या ‘आरोग्यम् धनसंपदा’ या सदराच्या लेखात आपण मुख व गलभागाच्या कॅन्सरविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
मुख व गलभागातील कॅन्सरमध्ये प्राधान्याने जीभ, कपोल – गाल, ओठ, मुख अध: भाग, वरची टाळू, हिरड्या, जीभेचे मूळ, गिलायू व त्या आसमंतातील भाग, घशाच्या भित्ती, अधोहन्वास्थि या अवयवांतील कॅन्सरचा समावेश होतो. यापैकी जीभेच्या कॅन्सरचे व त्याखालोखाल कपोल-गालांचा अंतर्भाग याच्या कॅन्सरचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.

- Advertisement -

मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये तंबाखूसेवन, मशेरीचा वापर, मावा, पानपराग, मद्यपान व धूम्रपान यासारखी व्यसने ही प्रमुख कारणे आढळून येतात. इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संशोधनातील निरीक्षणांनुसार पावभाजी, पाणीपुरी, हिरव्या मिरचीचा ठेचा असे अतिशय तिखट – जळजळीत पदार्थ वारंवार व अधिक प्रमाणात सेवन, ब्रेड-टोस्ट-बिस्किटे असे आंबवलेले व कोरडे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन, खारवलेले मासे, व्हिनेगार – टोमॅटो सॉससारखे अतिशय आंबट पदार्थ अधिक प्रमाणात व नियमित सेवन करणे ही संभाव्य कारणेही अनेक मुख व गलभागाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांत आढळून आली. याशिवाय दातांच्या टोकदार कडा किंवा कृत्रिम दात यामुळे तोंडात होणार्‍या जखमा दीर्घकाळ दुर्लक्षित करणे, रासायनिक पदार्थांशी सतत संपर्क, अशी कारणेही अनेक रुग्णांत आढळली.

तोंडात वेदनारहीत पांढरा चट्टा दिसणे, जिभेला, गालाला, हिरड्यांना किंवा ताळूला खूप दिवस भरुन न येणारी जखम-गाठ निर्माण होणे, तोंडातून रक्तस्त्राव होणे, वारंवार तोंड येणे, बोलण्यास-तोंड उघडण्यास व अन्न गिळण्यास त्रास होणे, दात हलणे, कृत्रिम दात लावण्यास त्रास होणे, आवाज बसणे, मानेच्या ठिकाणी गाठ जाणवणे, घसा दुखणे, घसा लाल होणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे अशी लक्षणे अधिक काळपर्यंत सामान्य चिकित्सेने बरी न झाल्यास कॅन्सर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बायॉप्सी, सी.टी स्कॅन, एम्.आर. आय. या तपासण्यांद्वारे मुख व गलभागाच्या कॅन्सरचे निदान निश्चित करता येते.

- Advertisement -

मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रात शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी, केमोथेरॅपी या चिकित्सापद्धती उपलब्ध असून यापैकी सर्वच स्टेजमधील कॅन्सरमध्ये रेडिओथेरॅपी ही महत्वपूर्ण चिकित्सा आहे. केमोथेरॅपीपेक्षा रेडिओथेरॅपीचे दुष्परिणाम कमी असले तरी मुखाच्या कॅन्सरमध्ये मुखाच्या अंत:भागातील नाजूक त्वचेचा रेडिओथेरॅपीमुळे क्षोभ होत असल्याने तोंडात व्रण निर्माण होणे, तोंड येणे अशी लक्षणे निर्माण होतात व त्यामुळे बर्‍याचदा घट्ट पदार्थच नव्हे तर पाणीही गिळण्यास रुग्णास त्रास होऊ लागतो. यामुळे अन्नसेवनावर मर्यादा येते.

शरीराचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. अशक्तपणा, वजन कमी होणे, शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे व पर्यायाने ताप, सर्दी, खोकला यासारख्या अनेक विषाणू संसर्गजन्य आजारांस रुग्णांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या काळात रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा व पोषक द्रवाहाराचे सेवन महत्वपूर्ण ठरते.

 

– वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -