घरफिचर्सदिनविशेष: स्मृती दिलदार तरुण नेत्याच्या!

दिनविशेष: स्मृती दिलदार तरुण नेत्याच्या!

Subscribe

योगायोग कसा दुर्देवी असतो. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ मध्ये राजीव गांधी यांची एका आत्मघातकी पथकाकडून अमानुष हत्या करण्यात आली. त्यामुळे आजचा दिवस दहशतवाद विरोधीदिन म्हणून संपूर्ण देशभर पाळला जातो. २१ मे १९९१ रोजी १० व्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ राजीव गांधी हे तामिळनाडूत गेले होते. चेन्नईच्या पश्चिमेस असलेल्या श्रीपेरुंबदुर येथे एका सभेला राजीव गांधी संबोधित करणार होते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी राजीव गाधींच्या गळ्यात पुष्पमाला घालून त्यांचे स्वागत करत होती. लोकांशी बांधिलकी असलेले राजीव गांधी एसपीजीची सुरक्षा तोडून थेट लोकांमध्ये गेले. याच संधीचा फायदा घेत एलटीटीई या दहशतवादी संघटनेकडून मानवी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या बॉम्बस्फोटात माजी पंतप्रधान राजीव गांधींसह २५ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या भयानक दुर्घटनेमुळे राजीव गांधींच्या रूपातील देशाने एक तरुण, दिलदार, बुद्धिमान, कर्तृत्ववान, धाडसी व भारताला २१ व्याा शतकात बलशाली बनविण्याचे स्वप्न पाहणार्‍या कुशल नेत्याला आपण गमावले.

२० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईत राजीव गांधी यांचा जन्म झाला. वर्ष १९८० मध्ये एका विमान अपघातात संजय गांधींच्या मृत्यूनंतर आई इंदिरा गांधींच्या इच्छेखातर राजीव गांधी राजकारणात सक्रिय झाले. १९८४ मध्ये राजीव यांच्या मातोश्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्या निवासी सुरक्षा रक्षकाने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी राजीव गांधींवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. एवढी मोठी जबाबदारी स्वीकारल्या क्षणापासून राजीव गांधींनी केवळ देशाच्या विकासाची स्वप्ने पहिली. भारताचे भवितव्य हे तांत्रिक प्रगतीवर, अधिक उत्पादकतेवर आणि वेगवान विकासावर अवलंबून असल्याचे राजीव जाणून होते. त्यांनी त्या मार्गाने जाण्याचा ध्यास घेतला. देशाला स्वयंपूर्ण, समृध्द, आत्मनिर्भर आणि आधुनिक राष्ट्र बनविण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, एका माथेफिरू दहशतवादी हल्ल्याने आपल्या देशाची अपरिमित हानी झाली.

- Advertisement -

आज संपूर्ण जगासमोर दहशतवादाचे समूळ उच्चाटनाचे आव्हान उभे ठाकले आहे. जगातील विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा सर्वच राष्ट्रांना दहशतवादाच्या छायेखाली वावरावे लागत आहे. कोणतीही दहशतवादी संघटना समाजातील निर्दोष व निष्पाप लोकांचा बळी घेऊन आपली दहशत निर्माण करत असते. गेली दोन दशके भारत दहशतवादाचा सामना करत आहे. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशात आयबी, रॉ, एन एस जी, मार्कोस, डी आय ए, गरुड तसेच महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक सदैव देशाच्या सुरक्षेवर नजर ठेवून असतात. मात्र, तरीही काही ठरावीक काळाने दहशतवादी हल्ले होतच आहेत. आजही देशातील प्रमुख शहरांसह काश्मीर, ईशान्य भारत दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरत आहे. अल कायदा, लष्कर – ए – तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे समूळ उच्चाटन होणे हे जागतिक शांती आणि जगाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर महासत्ता बनण्यासाठी काही विकसित राष्ट्रे दहशतवादाला छुपा पाठिंबा देत असताना भारताने मात्र यापासून अलिप्त राहून शांततामय असहकार पुकारत जगाला शांततेचा मार्ग सुचवला. यामध्ये भारतातील सत्याग्रह, शांततेचा मार्ग स्वीकारलेले महात्मा गांधीजी, गौतम बुद्ध, महावीर या महात्म्यांनी जगाला दाखवलेल्या शांततेच्या मार्गाचा पुरस्कार मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, दलाई लामा यांसारख्या अनेकांनी केला. मात्र, अहिंसक मार्गाने लढण्याची शक्ती जगाला देणार्‍या भारतातच आज सर्वसामान्य लोकांना दहशतवादाच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. हा विरोधाभासच म्हणावा लागेल.

जगातील, देशातील दहशतवादी उद्रेकांना काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. नाहीतर हा दहशतवादाचा भस्मासूर किती जणांना गिळंकृत करेल हे सांगता येत नाही. राजीव गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दहशतवादविरोधी दिन पाळला जात असताना आज याच राजीव गांधींना दुषणं देण्याचा कृतघ्नपणा काही मंडळींनी सुरू केला आहे. प्रत्येक घटनेत राजकारण आणण्याच्या वृत्तीने दहशतवाद रोखण्याऐवजी त्याला नको त्या शब्दात मोजण्याचा आचरटपणा काही शक्तींकडून होतो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -