घरफिचर्सबेरडवाडीतल्या जनावरांमधील सहिष्णुता !

बेरडवाडीतल्या जनावरांमधील सहिष्णुता !

Subscribe

बेरडवाडीचा अण्णा पाटील आणि त्याच्या करामतींबद्दल आपण मागच्या तीन भागांत वाचत आला आहात, पण आज मात्र आम्ही तेथील जनावरंही कशी हुशार आहेत, त्याबद्दलची गोष्ट सांगणार आहोत. आज विविध समाजांमध्ये जी तेढ निर्माण होत आहे किंवा धूर्त राजकारण्यांकडून मुद्दामहून निर्माण केली जात आहे, ती टाळावी कशी आणि एकोप्याने राहावे कसे? हे बेरडवाडीच्या पाळीव प्राण्यांकडून शिकण्यासारखे आहे.

ही गोष्ट आहे बेरडवाडीतल्या एका शेतकर्‍याची. त्याच्या राहत्या घराजवळच गुरांचा गोठा होता. गोठ्यात हौसा नावाची म्हैस, गौरा नावाची गाय आणि करडा नावाची शेळी आपापल्या परिवारासह सुखेनैव नांदत असत. कुठेही चरायला, फिरायला जायचे झाले की ते सोबतच जात असत. त्यांच्या मैत्रीत गाय, म्हैस, शेळी असा जातीभेद नसे.

- Advertisement -

पण अलीकडे मात्र या तिघींच्याही परिवारात एक प्रकारची तेढ निर्माण झाली होती. एकमेकांना मिळणारा हिरवा चारा, चंदी यांच्या वाटपातून त्यांच्यात मतभेद उद्भवले होते. गौरा गाईचे म्हणणे असे होते की, हौसा म्हशीला डुंबण्यासाठी अतिरिक्त पाणी देऊन आपला मालक ‘स्पेशल ट्रिटमेंट देतो’. याउलट हौसाला वाटायचे की गाईंना पूज्य मानण्याच्या धार्मिक पद्धतीमुळे मनुष्यप्राणी या गौरापुढे नाक घासतो, तिला खास दिवशी पुरणपोळी वगैरे दिली जाते. याशिवाय तिला मारहाण करणे वगैरे पाप समजतात आणि असे जर कोणी केले तर त्याविरुदध वेगवेगळ्या मानवी संघटना आवाज उठवतात. शासनानेही गाईच्या जातीला विशेष सवलती दिल्या आहेत. काही राज्यात तर गोवंश हत्याबंदीसारखे कायदेही करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही गाय जास्तच भाव मारते.

या दोघींप्रमाणेच शेळीचेही काही मुद्दे होते. तिच्या लहान आकारामुळे तिला कमी लेखले जाते अशी तिची तक्रार होती. शिवाय गाई, म्हशीच्या दुधाचे सध्या बर्‍यापैकी ‘ब्रँडीग’ होते, त्यामुळे शेळीच्या दुधाला कुणी विचारत नाही. मग आपला मालकही आपल्याला गौरा-हौसा प्रमाणे खायला घालत नाही. म्हणून आपल्याला गावाजवळच्या टेकड्यांवर, माळरानावर चार्‍यासाठी भटकावे लागते, असा तिचा समज झाला होता. याउलट हौसा आणि गौरा या दोघींचेही करडाबद्दल तसेच विरोधी मत होते. त्यांना वाटे की करडा आकाराने लहान असल्याने तिच्यावर शेतीकामाची काहीच जबाबदारी नसते. त्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी मस्त दौरे वगैरे करायला मिळतात. आपल्याला मात्र गोठ्यात किंवा शेतातच रहावे लागते. मालकही तिला फिरण्यासाठी प्रोत्साहन देतो.

- Advertisement -

…तर असे हे मतभेद वाढत जाऊन विकोपाला पोहचले. त्यामुळे तिघींचाही स्वभाव आकडू बनला. तसेच ‘इगो प्रॉब्लेम’ का काय म्हणतात, त्याचीही लागण त्यांना व्हायला लागली होती. त्यांच्यातला संवादच हरवला होता. शेवटी या सर्वांचा परिणाम व्हायचा तोच झाला. तिघींचीही कार्यक्षमता कमी झाली. गौरा-हौसा पूर्वीसारख्या दूध देईनाशा झाल्या, तर दूरवर खाणे शोधायचा कंटाळा केल्याने करडाच्या तब्येतीवर परिणाम होऊन ती बारीक दिसायला लागली. ही सर्व गोष्ट चाणाक्ष शेतकर्‍याच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. त्याने आपल्या गोठ्यामधली परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आपल्या अमित नावाच्या मुलावर सोपवली.

अमित हुशार मुलगा होता. शेतीची त्याला आवड होती. शहरात राहून त्याने ‘कार्पोरेट शेती’ सारख्या विषयांचा अभ्यास केला होता, त्याच्या जोडीला मनुष्यबळ विकास (एच. आर.) विषयातील प्रशिक्षणही त्याने घेतले होते. मनुष्यांप्रमाणेच प्राण्यांचेही एक मानसशास्त्र असते हेही त्याला माहीत होते. त्यामुळे गोठ्यातील प्राण्यांच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून त्याठिकाणी ‘एच. आर. (मनुष्यबळ विकास)’ च्या काही कल्पना राबविल्या तर त्यांच्या उत्पादन क्षमतेवर निश्चित चांगला परिणाम होईल, असा त्याने निष्कर्ष काढला. म्हणून मग ‘एच. आर.’च्या धर्तीवर प्राण्यांसाठी ‘ए.आर.’ अर्थातच ‘अ‍ॅनिमल रिसोर्स’ सारखी गोष्ट असते का? याचा त्याने शोध सुरू केला.

कोणत्याही नवीन गोष्टी केवळ पुण्यातच केल्या जातात असे तो ऐकून होता. म्हणून त्याने पुण्यातील मित्रांकडे चौकशी केली, तर त्याला चक्क अशी संस्था कार्यरत असल्याचे समजले. इतकेच नाही तर प्राण्यांचा विकास करण्यासाठी ही संस्था सर्वेक्षण वगैरे करून देते आणि आवश्यकता असल्यास आपल्याकडील काही प्रशिक्षित प्राणी संबंधित गोठ्यात ‘ए. आर.’ म्हणूनही पाठवते, असेही त्याला समजले. अमितला यामुळे फारच आनंद झाला. त्या संस्थेशी संपर्क साधून आपल्या गोठ्यातील जनावरांची परिस्थिती सांगितली. संस्थेने त्याला सर्वेक्षण करावे लागेल असे सांगितले. अमित त्यासाठी तयार झाला.

लवकरच पुण्याहून गावाकडे असलेल्या हौसा-गौरा-करडा यांच्या सर्वेक्षणासाठी ‘ए. आर( अर्थातच अ‍ॅनिमल रिसोर्स) चे पथक दाखल झाले. सर्वेक्षणाअंती त्यांनी असा निष्कर्ष काढला की, ‘या सर्व जनावरांमध्ये ‘कम्युनिकेशन गॅप’ आहे, तो घालविण्यासाठी आमच्या संस्थेतून नुकतेच ‘ए.आर.’ चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एका अरबी घोड्याला प्रशिक्षक म्हणून नेमावे लागेल. हा घोडा पूर्णपणे प्रशिक्षित आहे. त्याला प्राण्यांमधील संवादशास्त्राची चांगली जाण आहे. त्यामुळे तो तुमच्याकडील जनावरांची मानसिकता समजावून घेऊन त्यांची उत्पादनक्षमता निश्चितच वाढवू शकेल.’ त्यानुसार मग त्या ‘ए.आर.’ झालेल्या घोड्याला शेतकर्‍याच्या गोठ्यात काही दिवस ठेवण्यात आले. थोड्याच दिवसात त्याचे चांगले परिणाम दिसून आले. गोठ्यातील जनावरे काही प्रश्न, मतभेद असतील तर त्या ‘ए.आर’वाल्या घोड्याला सांगत आणि तोही आपले ज्ञान वापरून त्या समस्या सोडवी.

लवकरच गौरा, करडा आणि हौसा यांच्यात अपेक्षेप्रमाणे ‘गुड कम्युनिकेशन’ निर्माण झाले. परिणामी त्यांची ‘प्रॉडक्टिव्हिटी’ सुधारली. हौसा-गौराला तर सर्वाधिक दुग्धोत्पादनाचे पुरस्कारही मिळाले. शेतकरीही खुश झाला. ‘ए.आर.’वाल्या घोड्याला आता परतावे लागणार होते. तो जाताना गोठ्यातील सर्व प्राणी त्याच्याभोवती जमा झाले आणि ‘आम्हाला काही तरी दोन चांगले युक्तीचे शब्द सांग’ असा त्यांनी आग्रह धरला. मग त्याने या सर्वांना ‘विन-विन सिच्युएशन’ ( अर्थातच जिंका जिंका परिस्थिती) बद्दल सांगून माणसाच्या नादी लागून जात भेद, धर्म भेद न पाळता एकत्र काम केले, तर कसा फायदा होतो ते सांगितले. सर्वांना ते पटले. मग त्यांनीही यापुढे गुण्या गोविंदाने नांदायचे ठरवले.

ते असेच आनंदाने जगत असताना मे महिना उजाडला. दिवस आंब्याचे होते. गोठ्याशेजारच्या आंब्याच्या आढीतून आंब्यांचा मस्तपैकी घमघमाट सुटला होता. या सर्वांनाच आंबे खावे असे वाटत होते, पण हे शेतकर्‍याला सांगायचे कसे? मग त्यांना युक्ती सुचली. गौरा- हौसा- करडा यांनी जातीय सहिष्णुतेचा अर्थातच ‘विन विन सिच्युएशनचा’ प्रयोग करण्याचे ठरवले. हौसाने मोठ्याने ‘आम्म्या? आम्म्म्याऽऽऽ? असा आवाज काढून शेतकर्‍याच्या अमित नावाच्या मुलाला बोलावले. तो आल्यावर करडा शेळी मोठ्याने ‘मे, मेऽऽऽ मेऽऽऽ( अर्थात मे महिना या अर्थाने) ओरडली.

करडा अशी म्हणाल्याबरोबर गौराने ठेवणीला ‘हंबाऽऽऽ, हंबाऽऽऽ, …बाऽऽऽआंबाऽऽऽऽ (म्हणजे आंबे हवेत)’ असे ओरडायला सुरुवात केली. शेतकर्‍याच्या चाणाक्ष मुलाला ते लगेच समजले आणि त्याने खुश होऊ त्या तिघींना आंबे आणून दिले. मनसोक्त आंबे खाल्ल्यावर ‘विन विन सिच्युएशन’ च्या फायद्यांवर त्यांच्या गप्पा रंगल्या. बेरडवाडीतील माणसेही जात-धर्म वगैरे भेद न करता अशीच वागली तर? असा एक सहिष्णू विचारही त्यांच्या मनात येऊन गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -