घरफिचर्सट्रम्प आणि दुतोंडी चेहरा!

ट्रम्प आणि दुतोंडी चेहरा!

Subscribe

चीनच्या वुहान शहरातून जगभरातील इतर देशांमध्ये पसरलेला जीवघेणा करोना विषाणूचा कहर पहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात साडे १३ लाखांहून अधिक करोनाबाधित असून आतापर्यंत करोना विषाणूमुळे ७५ हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वाधिक करोनाबाधित अमेरिकेत असून त्याची संख्या १ लाखाचे घर पार करून गेली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात प्रगत देश समजल्या जाणार्‍या या देशात आतापर्यंत ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या सर्जन जनरलनी करोनाच्या महामारीला दुसर्‍या महायुद्धात झालेल्या पर्ल हार्बरच्या हल्ल्याप्रमाणे सांगितले आहे. या आठवड्यात अमेरिकेत करोनामुळे मृतांची संख्या वाढू शकते. अशातच देशात दुसर्‍या पर्ल हार्बर हल्ल्यासाठी तयार राहा, अमेरिकेनंतर स्पेन, इटली आणि जर्मनीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. चीन मात्र आपला मृतांचा आकडा लपवत असल्याचा संशय आहे. मोठ्या संख्येने तेथे माणसे मरण पावली असण्याची शक्यता आहे.

मात्र चिनी कम्युनिस्ट पोलादी राजवटीमुळे तेथे कोणत्या बातम्या बंद कुलुपाआड लपवायच्या आणि कोणत्या बाहेर सोडायच्या, हे त्यांची हुकूमशाही राजवट ठरवत असते. त्यामुळे ते सध्या आम्ही करोनावर विजय मिळवल्याच्या बाता मारत असले तरी चीनच्या आत काय गडबड सुरू आहे, हे सांगता येत नाही. अमेरिकेची सद्दी संपवून जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणार्‍या चीन पुढे जगात एक नंबर होवो न होवो पण, करोनाच्या निमित्ताने जगात दहशत पसरवण्यात मात्र ते एक नंबर झाले आहेत. चीन ड्रॅगन अमेरिकवर हसत असताना त्याचा खंबीरपणे मुकाबला करण्याऐवजी अमेरिका दिवसेंदिवस हताश झालेली दिसत आहे. याला कारणीभूत आहेत ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांचे गेल्या काही दिवसांतील निर्णय आणि वक्तव्ये पाहता त्यांचा दुतोंडी चेहरा जगासमोर उघड झाला आहे.

- Advertisement -

करोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट भारताला धमकी दिली आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. हे काय प्रत्युत्तर असू शकते हे आताच सांगता येत नाही; पण आर्थिक आणि संरक्षण अशा आघाड्यांवर अमेरिका भारताची नाकेबंदी करू शकतो.

करोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे याआधी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली होती. यावर मोदी यांनी तुमच्या विनंतीचा मान राखून औषधे पाठवण्याचा प्रयत्न करू, असे सांगूनही अमेरिका आता दादागिरीची भाषा करत आहे. ट्रम्प यांचा दुतोंडी चेहरा बघायचा असेल तर ते व्हाइट हाऊसमध्ये मीडियाशी बोलताना काय म्हणालेत त्यावर नजर टाकू म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही ट्रम्प यांची दादागिरी आहे की हताशपणा. ‘भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या औषधाच्या ऑर्डरवरील बंदी भारत उठवेल अशी आम्हाला खात्री आहे. मला कल्पना आहे की भारताने हे औषध इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. आमच्यात चांगला संवाद झाला; पण, हे होऊन दोन एक दिवस झाले नाहीत तोवर ट्रम्प यांनी घुमजाव केले

- Advertisement -

‘रविवारी सकाळी मोदी आणि आमच्यात बातचीत झाली होती. तुम्ही आम्हाला औषध दिले तर निश्चितच या निर्णयाचं कौतुक करू. मात्र हे औषध अमेरिकेला देण्यासाठी परवानगी दिली नाही तर त्याला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आणि असे का होऊ नये?’ हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे मलेरियाच्या उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. करोनाची लागण झालेल्या रुग्णांवरही हे औषध फायदेशीर ठरत आहे. करोना विषाणू जगभरात वेगाने पसरत असून अमेरिकेसह इटली, स्पेनसारख्या विकसित देशांनीही या व्हायरस समोर हात टेकले असताना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध परिणामकारक ठरत आहे. भारत जगात हे औषध निर्माण करणारा पहिल्या क्रमांकाचा देश असल्याने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे लागणे स्वाभाविक आहे; पण अमेरिका सोडता इतर कुठल्या देशांनी दादागिरीची भाषा वापरलेली नाही.

भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मलेरियामुळे मृत्यू होतात, त्यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. आता हे औषध करोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. परंतु कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे या औषधाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जागतिक लॉकडाऊनमुळे भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी यासाठी आवश्यक कच्चा माल एअरलिफ्ट करून मागवण्याची विनंती सरकारकडे केली आहे. अशा परिस्थितीत भारत आधी आपल्या घरची चूल पेटवेल की अमेरिकेची याचा सारासार विचार ट्रम्प यांना करता येत नसेल तर तो दोष भारताचा नाही. आज चीन नंतर सर्वाधिक १३० कोटी लोकसंख्येचा देश भारत असून जगाप्रमाणे भारतावरही करोनाचे गहरे संकट आहे. करोना रुग्णांची संख्या ४ हजारचा आकडा पार करत असून १०९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्र तसेच विविध राज्यांनी करोना विरोधातील लढाई तेज केल्याने आज भीषण परिस्थिती आलेली नाही. यामुळे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनसारख्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे असताना ट्रम्प भारताला दादागिरी करून दाखवत असतील तर करोनाच्या तोंडावर त्यांचा सुटलेला तोल पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे, हेच खरे!

अमेरिकेच्या इतिहासात ९/११ आणि पर्ल हार्बरचा हल्ला या दोन भीषण घटना होत्या. तसेच काहीसे आता घडत आहे. करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्या पाहता या दोन घटना पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ९/११ च्या हल्ल्यात २००१ मध्ये २९७७ लोक मारले गेले होते. तर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला त्यात दुसर्‍या महायुद्धावेळी २४०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. करोनाने १० हजार अमेरिकन लोकांचा बळी घेतला असतानाही ट्रम्प बळींची संख्या आता स्थिरावत चालली असल्याचा दावा करत आहे. याचा अर्थ त्यांना आपल्या देशातील भयाण परिस्थितीची जाणीव नाही किंवा ते त्यापासून पळवाट काढत आहेत, हा सुद्धा ट्रम्प यांचा एक दुतोंडी चेहरा म्हणावा लागेल. जसे की ते भारत दौर्‍यावर आले असताना त्यांनी भारताची वारेमाप स्तुती केली.

मैत्रीच्या आणाभाका घेतल्या. भारत-अमेरिका भाई भाई… असे त्यांचे गाणे गाऊनही झाले. पण, या भेटीला काही महिने होत नाही तर मैत्री सोडून त्यांची भारताला धमकी देण्याची भाषा सुरू झाली. एकूणच त्यांचा स्वतःवरील आणि अमेरिकेवरील तोल गेल्याचे दिसत आहे. अन्यथा व्हाईट हाऊसचे करोना दलाने १ ते २ लाख लोक मरतील, अशी शक्यता वर्तवली असताना ट्रम्प महाशय आबादी आबाद सांगत फिरत बसले नसते. अमेरिकेतील एकूण ३३ कोटी लोकसंख्येपैकी आज ९५ टक्के नागरिक सध्या घरात आहेत. असे असूनही करोनाचा अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत वास्तवाला सामोरे जाण्याऐवजी ट्रम्प वास्तवापासून पळ काढत आहे. हा प्रकार म्हणजे देश उद्ध्वस्त धर्मशाळा होत असताना राजाने युगांत लोटल्यासारखे मग्न तळ्याकाठी बसण्यासारखे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -