घरफिचर्सट्रम्प, स्वार्थ आणि निःस्वार्थ!

ट्रम्प, स्वार्थ आणि निःस्वार्थ!

Subscribe

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याचा भारताला किती फायदा आणि अमेरिकेला किती फायदा या गणितांवरील चर्चेने चांगलीच उचल घेतली आहे. अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे जगाच्या आर्थिक महासत्तेचे प्रमुख आहेत. जरी ते त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमेरिकास्थित लाखो भारतीय मतदारांना भुलवण्यासाठी त्यांच्या मायदेशी आले असले तरी याचा त्यांना किती फायदा होईल, हे काळच ठरवेल. विशेषत: थेट गुजरातमध्ये येऊन अमेरिकेत वास्तव्याला असलेल्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची खेळी अफलातूनच मानली पाहिजे. ट्रम्प यांच्या या दौर्‍याकडे स्वार्थी नजरेने पाहिलं जात असलं तरी तितकाच स्वार्थ हेतू भारताकडून उचलला जाईल, हे उघड सत्य लपवण्यात अर्थ नाही. यामुळेच ट्रम्प यांच्या दौर्‍याचे दोन दिवस हे दोन्ही देशांच्या एकूणच व्यवस्थेचा मानबिंदू ठरवणारे असतील, हे उघड आहे. ट्रम्प यांच्या आगमनासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तिथे लाखो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा छोटेखानी भाषणातून विविध विषयांना स्पर्श केला. शिरस्त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. त्यांना मेहनती, परिश्रम करणारे असे संबोधले. मात्र यात भारताच्या ७० वर्षांच्या प्रगतीचाही आलेख ऐकवला. जे निमित्त घेत सत्ताधार्‍यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच मोदींच्या समोर ७० वर्षांचा लेखाजोखा मांडून ट्रम्प यांनी मोदींनाही चकित करून टाकलं. त्यांनी दहशतवाद आणि भारतीय सुरक्षा या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर महत्वपूर्ण भाष्य केलं. आमच्या नागरिकांवर संकट बनलेल्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असं सुचकपणे त्यांनी बजावलं. प्रत्येक देशाला आपल्या सीमांचं रक्षण करण्याचा अधिकार आहे, असं सांगत त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट केली. अमेरिका आणि भारत दहशतवाद आणि दहशतवादी विचारांशी लढत आहे. ट्रम्प प्रशासन पाकिस्तानबरोबर सबुरीने वागत असताना पाकिस्तानी सीमेतील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावीच लागेल, असं सांगत त्यांनी दहशतवादाला पाकिस्तानच कारण असल्याचं अधोरेखित करून टाकलं. आमचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहेत पण त्याच पाकिस्तानला त्याच प्रकारे हाताळेल, असं स्पष्ट केलं. सर्वार्थाने शांतता ही संपूर्ण दक्षिण आशियासाठी अत्यंत गरजेची बाब असल्याचं सांगत त्यांनी भारताकडे या शांततेचं नेतृत्व देऊन टाकलं. ट्रम्प यांचा हा अप्रत्यक्ष पाकिस्तानला थेट संदेश असल्याचं मानलं जातं. जे अवघ्या भारतीयांना अपेक्षित होते. अमेरिकेच्या विमानं, रॉकेट, जहाजं आणि खतरनाक शस्त्रात्रांच्या निर्मितीला दिल्या जाणार्‍या महत्वाकडेही त्यांनी लक्ष वेधलं. भारताबरोबर डिफेन्स पार्टनरची भूमिका घेण्यासंबंधी वाच्यता करत त्यांनी लष्कर स्वत:च्या सज्जतेसाठीची तयारी अधोरेखित केली आहे. या माहिना अखेरीस अमेरिका तालिबानबरोबरच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे. हा करार म्हणजे भारताच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. या करारामुळे निपचित पडलेले तालिबानी पुन्हा एकदा डोकं वर काढतील. वाजपेयी सरकारच्या काळात तालिबान्यांची दादागिरी कमालीची वाढली होती. कंदहार विमानतळावर तालिबान्यांची सुटका करण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांना करावी लागलेली शिष्टाई आजही देशवासी विसरलेले नाहीत. अशा तालिबान्यांबरोबर करार करून अमेरिका एकार्थी भारताला अडचणीत तर आणण्याचा प्रयत्न करत नाही? दिल्लीत संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यामागचा सूत्रधार असलेल्या मसूद अझहर याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नाला तेव्हा खिळ बसली होती. एकीकडे पाकिस्तानमधील दहशतीला ठोकरून काढण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे तालिबान्यांना रान मोकळं करून द्यायचं, हा अमेरिकेचा खेळ भारताच्या दहशतवादी कारवायांविरोधाला खिळ बसवणारा आहे, हे उघड सत्य नाकारता येणार नाही. अमेरिकन राजकारणात आपलं महत्व टिकून राहावं, यासाठी ट्रम्प सातत्याने अमेरिकेत वसती करून असलेल्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करत आले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने असा प्रयत्न त्यांच्यासाठी फलदायी ठरू शकतो. राष्ट्राध्यक्षांच्या या दौर्‍याने अमेरिकेची आर्थिक सुबत्ता वाढणार आहे किंवा तो देश सुजलाम होणार आहे, असं अजिबात नाही. भारतावरच्या प्रेमाच्या चार गोष्टी अमेरिकेत वास्तवाला असलेल्या भारतीयांना आपलांसं करायला पुरेशा आहेत, हे ट्रम्प जाणून आहेत. अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ तून स्वत:चं महत्व वाढवण्याच्या प्रयत्नाचाच भाग म्हणजे ट्रम्प यांचा भारत दौरा म्हणता येईल. भारतीय वंशाच्या २४ लाख नागरिकांकडून मिळणारी मतं हे निर्णायक असू शकतात, हे ट्रम्प यांना ठावूक आहे. याचा फायदा या दौर्‍याच्या माध्यमातून साधता येईल काय असा प्रयत्न यानिमित्ताने सुरू आहे. भारत ही जगातल्या विकसनशील राष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. या बाजारपेठेचा आपल्याला उपयोग होणार नसल्यास भारताबरोबरच जवळकीचा उपयोग निरर्थक आहे, हे ही ट्रम्प समजून आहेत. यामुळेच अमेरिकेतील वस्तूंंवरील अधिकच्या कराची आकारणी ट्रम्प यांना दूर करून हवी आहे. हा मुद्दा गेल्या वर्षभर ट्रम्प यांचं प्रशासन रेटून आहे. व्यापारात वृध्दी करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून कर कमी करण्याकडे अमेरिकेचा कल आजचा नाही. तो निकालात निघाला तरच भारतात व्यापार संधी आहे, हे लक्षात घेऊनच अमेरिका भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत अ्रसावा. २००८पासून अमेरिकेकडून भारतात ६६ अब्ज डॉलरचा व्यापार केला जातो. गेल्या दोन वर्षात यात १४२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. भारतातील सकल उत्पादन हे सुमारे ८ टक्के इतकं असताना या व्यापारात फारशी अडचण आली नाही. आज भारताचं सकल उत्पादन सातत्याने घसरत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या करआकारणीने कंबरडं मोडणं स्वाभाविक आहे. हे टाळण्यासाठी ट्रम्प प्रयत्न करतील, हे उघड आहे. दोन देशांमधील संबंधांमध्ये बाधा आणणार्‍या या घटनांचा विशेष उल्लेख ट्रम्प यांच्या भारत भेटीत केला जातो आहे. अमेरिकेचे परंपरागत विरोधक असलेल्या चीन आणि रशियाच्या वन बेल्ट वन रोड योजना आणि रशियाच्या बेग्झीट, ५ जी सारख्या तंत्रज्ञानावरून युरोपीय राष्ट्रांमध्ये वातावरण धुमसते आहे. अशावेळी भारतासारख्या अखंडप्राय देशाशी संरक्षणादी करार करत आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्या या एकूण दौर्‍यात आहे, हे उघड आहे. या स्वार्थी हेतूला भारत कुठल्या व्याख्येत मोजतेय यावर दौर्‍याचं महत्व अवलंबून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -