घरफिचर्सनातं विश्वासाचं

नातं विश्वासाचं

Subscribe

एखादा माणूस आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि तरीही समोरचा माणूस केवळ त्याचा उपयोग करून घेत आहे हे माहीत असूनही केवळ प्रेमासाठी त्याला अनेक संधी देत असेल तर, तुम्ही सतत त्या माणसाचा विश्वासघात करत आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं. खरं तर अशावेळी असा एक दिवस येतो, जेव्हा समोरचा माणूस संधी देऊन थकतो आणि कायमस्वरुपी तुम्ही त्या माणसाला गमावून बसता.

नातं टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गरज असते ती, विश्वासाची. कोणतंही नातं हे प्रेम आणि विश्वासावरच टिकत असतं. समाजामध्ये अथवा घरामध्येही आपला दर्जा राखून ठेवण्यासाठी प्रत्येक माणूस झटत असतो. बर्‍याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की, एखाद्याबद्दल आपण अथवा आपल्याबद्दल एखाद्याला विश्वास गमवावा लागतो. पण एकदा विश्वास गमावल्यानंतर पुन्हा त्या माणसावर तितकाच विश्वास ठेवणं थोडं कठीण असतं आणि त्यामुळेच नात्यामध्ये दरार यायला सुरुवात होते. एखाद्याच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी विश्वास खूप गरजेचा असतो. पण चुकीच्या गोष्टीनं ती जागा गमावल्यास, आयुष्यात हळहळ व्यक्त करण्याव्यतिरिक्त काहीच उरत नाही. एखाद्याच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी आयुष्यही कमी पडते; पण त्याच उलट ती जागा गमवायला एक क्षणही पुरेसा असतो. खरं तर नात्यामध्ये प्रश्न असतो तो विश्वास, भावना आणि आपुलकीचा.

एखादा माणूस आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि तरीही समोरचा माणूस केवळ त्याचा उपयोग करून घेत आहे हे माहीत असूनही केवळ प्रेमासाठी त्याला अनेक संधी देत असेल तर, तुम्ही सतत त्या माणसाचा विश्वासघात करत आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं. खरं तर अशावेळी असा एक दिवस येतो, जेव्हा समोरचा माणूस संधी देऊन थकतो आणि कायमस्वरुपी तुम्ही त्या माणसाला गमावून बसता.जीवनात नाती अनेक असतात, पण ती जपणारे लोक फारच कमी असतात. काही नाती ही रक्ताची असतात तर काही हृदयानेच जोडली जातात. काही जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच. काही नाती झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोवल्यागत तर काही झाडाच्या फांदीसारखी अलगद तुटणारी. नाती ही अशी सहज रुजली जात नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी आवश्यक असते आणि हे खतपाणी म्हणजेच माणसाचा वेळ, त्याचा एकमेकांवर असलेला विश्वास जपून ठेवणं. विश्वास हा प्रत्येक नात्याचं मूळ आहे. नाते कोणतेही असो, त्यात विश्वास असला तरच ते टिकते. अगदी रक्ताच्या नात्यातही आपुलकी, आत्मीयता जपली जाणे महत्त्वाचे असते.

- Advertisement -

केवळ प्रेमातच नाही, तर पोलीस – नागरिक, बँक – ठेवीदार, डॉक्टर – रुग्ण, प्रशिक्षक – खेळाडू ही आणि अशा प्रकारची सर्व नाती ही एक प्रकरची नातीच असतात, जी केवळ विश्वासावर टिकून असतात. खरे तर दोन देशांमधील संबंधदेखील एकमेकांवरील विश्वासामुळेच योग्य तर्‍हेनं जपून राहतात. त्यामुळं विश्वासाचं नातं हे अतुलनीय असतं.
एखाद्या गोष्टीवरची नि:संशय श्रद्धा म्हणजे विश्वास असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. भविष्यातील कृतीच्या संदर्भात एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीवर ठेवलेल्या श्रद्धेला ‘विश्वास’ असंच म्हणतात आणि सामाजिक जीवनासह वैयक्तिक जीवनातही विश्वासाला महत्त्वाचं स्थान आहे. विश्वास ठेवणार्‍याची आणि तो टिकविणार्‍यांचीही संख्या मोठी असल्याने विश्वासाचं मूल्य हे बळकट होत गेलं आहे. विश्वास ठेवल्याखेरीज आणि तो टिकविल्याखेरीज कोणतेही नातंसुद्धा पुढे जात नाही. प्रश्न आहे तो ज्यांच्यावर आपण विश्वास टाकतो, त्यांनी तो टिकवण्याचा. विश्वास शब्दांतून नव्हे तर कृतीतून कमवावा लागतो. पण कृतीतून प्रत्येकवेळी सिद्ध करूनदेखील दाखवावा लागतो.

तेव्हाच नात्याची पकड मजबूत होत जाते. विश्वासाला तडा जातो तो संशयामुळे. काळजी ते अविश्वास हा प्रवास, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, शंकेमुळे झाला की संशयाने हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. संशयाने झाला असेल तर ती विचारणार्‍याची चूक आणि शंकेने झाला असेल तर निष्कर्ष काढणार्‍याची चूक असं मानावं लागतं. शंकेचे निरसन असं करावं की, पुढे शंका घेण्यासाठी जागाच राहू नये. कारण संशयाला कधीच अंत नसतो आणि हा संशय मुळात सुरु होतो तो पहिल्यांदा झालेल्या विश्वासघातामुळं. विश्वास एकदा निघून गेला की, आयुष्यात संशय जागा घेतो. पण असा संशय आपल्या नात्यात जागा घेऊ नये यासाठी प्रत्येकानं विश्वास जपणं महत्त्वाचं आहे. खोटं बोलत राहिल्यामुळं विश्वासाला तडा जातो. खोटे वागले तर त्याचा धक्का जास्त बसतो. कारण समोरच्या व्यक्तीवर आपण जास्त विश्वास ठेवलेला असतो. त्यामुळे मनात कटुता निर्माण होते. समोरच्या व्यक्तीच्या मनात अनेक टोकाचे विचार येतात. ते सर्व खरं वागून टाळता येतं. योग्य शब्दांत संवाद साधून विश्वास जपणं जास्त महत्त्वाचं आहे. नातं निर्माण होताना, नातं टिकवताना प्रेमात विश्वास आणि संयम या गोष्टींचा मेळ घालणे अतिशय गरजेचं आहे. कोणताही अविचार न करता, शांतपणे, विश्वासाने प्रेमाला सामोरे जाणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विश्वासाचं नातं हे सर्वात नाजूक असतं ज्याला जपण्यासाठी संपूर्ण आयुष्यदेखील कमी पडतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -