घरफिचर्सदोन डोळे शेजारी...

दोन डोळे शेजारी…

Subscribe

प्रशांत आणि सुशीला दोघे लहानपणापासून एकमेकांच्या बाजूबाजूलाच राहत असत. ते दोघे एकामेकांच्या सहवासात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मनातील एकमेकांविषयीचे आकर्षण आणि प्रेमही वाढत होते. ती दोघे वयात आले. त्यांना एकमेकांचे जीवनसाथी व्हायचे असते. पण घरातून विरोध होतो. दोघांची लग्ने अन्यत्र होतात. सुशीला नवर्‍याचा मृत्यू झाल्यामुळे माहेरी येते. प्रशांत आणि सुशीला आयुष्यभर बाजूबाजूला असतात, पण त्यांची अवस्था दोन डोळे शेजारी, पण भेट नाही संसारी, अशी होते.

काही माणसांना एकमेकांबद्दल अपार प्रेम असते. आपण एकमेकांची व्हावे, एकमेकांसोबत आयुष्यभर राहावे असे त्यांना वाटत असते. त्यासाठी ते खूप प्रयत्नही करत असतात. पण त्यांची इच्छा कितीही असली तरी परिस्थिती त्यांना साथ देत नाही. परिस्थितीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरतात. त्या दोन जीवांच्या नशीब केवळ हतबलता येते. त्यांचे आयुष्य दोन समांतर रेषांसारखे वर्षानुवर्षे पुढे सरकत राहते. एकमेकांना ते पाहत राहतात. आशाआकांशाचे तरंग त्यांच्या मनात उमटत राहतात. बंधने तोडून टाकून एक होण्याची ऊर्जी उसळून येते, पण परिस्थितीने त्यांना असे काही जखडून ठेवलेले असते की, कितीही जोर लावला आणि उड्डान घेण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा धाडकन जमिनीवर आदळायला होते.

आशाआकांशांची पुन्हा पुन्हा होणारी धूळधाण त्यांना पाहत रहावी लागते. अपेक्षाभंगाची आणि निराशेची धूळ उडून त्यांच्या डोळ्यात जात राहते. त्यामुळे डोळ्यांतून अश्रूधारा वाहत राहतात. पण त्याही तात्काळ लपवाव्या लागतात. कारण कुणी पाहिले तर लोकांची मनाला बोचणारी चर्चा सुरू होईल याची चिंता असते. समोरासमोरील दोन कोठड्यांमध्ये बंद असलेल्या कैद्यांसारखी या दोन जीवांची स्थिती असते. ते एकमेकाला पाहू शकतात, पण एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

- Advertisement -

ते दोघे एकमेकांच्या सहवासात असले तरी ते एकमेकांचे होऊ शकत नाहीत. ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. असे होण्यामागे विविध कारणे असतात. काही वेळा ती सामाजिक स्तराची, काही वेळा आर्थिक परिस्थितीची, तर काही वेळा वयाच्या अंतराची, तर काही वेळा नेमके कारण काय तेच त्यांना कळेनासे होते. मग सगळ्या गोष्टी नशिबाच्या विहिरीत ढकलून देण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. ही एक फार विचित्र स्थिती असते. कारण आपण एकत्र असूनही एकमेकांचे होऊ शकत नाही, ही सल त्या दोन जीवांना सारखी सलत राहते. ती सल घेऊन त्यांना आयुष्य जगावे लागते. त्या दु:खाच्या बाणाने त्या दोघांची हृदये छेदली जातात. पण ती जोडली जात नाहीत. त्या दोन हृदयांना एकमेकांविषयी प्रेम असले तरी त्यांना एकमेकांचे होता येत नाही. त्यामुळे अशा विचित्र परिस्थितीत अडकलेल्यांसाठी मराठीत ‘दोन डोळे शेजारी, पण भेट नाही संसारी’, अशी म्हण आहे. म्हणजे माणसाचे डोळे हे जिवंत असेपर्यंत एकमेकांच्या शेजारी असतात, पण त्यांची भेट कधीही होऊ शकत नाही. त्या डोळ्यांतून वाहणारे अश्रूच फक्त एकमेकांमध्ये मिसळू शकतात. पण दोन डोळे कधीही एकमेकांत मिसळू शकत नाहीत. निसर्गाने त्यांना एकमेकांच्या जवळ ठेवलेले असते. पण ते एकमेकांना कधी भेटणार नाहीत, अशीच जणूकाही शिक्षा दिलेली असते.

प्रशांत आणि सुशीला यांची अशीच कहाणी. शाळेत असल्यापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यांना त्यापासूनच एकमेकांबद्दल नैसर्गिक आकर्षण होते. त्यांची घरेही बिल्डिंगमध्ये बाजूबाजूलाच होती. लहानपणापासून ते एकत्र खेळत होते. एकमेकांच्या सहवासातच ते मोठे झाले. त्यांच्या वयाने वाढण्यासोबतच एकमेकांबद्दल यांच्या मनातील प्रेमही वाढत होते. पुढे शाळा झाली. दोघेही कॉलेजमध्ये जाऊ लागली. कॉलेजचे शिक्षणही पूर्ण झाले. दोघेही वयात आलेले होते. दोघेही पुढे नोकरी करू लागले. या सगळ्या वाटचालीत प्रशांत आणि सुशीला आपल्या पुढील जीवनाची स्वप्ने पाहू लागली होती. त्यांचे ‘छुपके छुपके’ सुरू होते. काही वेळा ते बाहेरही एकमेकांना भेटत असत. पण त्यांच्या त्या मनोमीलनाला फारसे कुणी गांभीर्याने घेत नसे. कारण सगळ्यांना वाटत असे की, हे एकमेकांच्या बाजूला राहतात. लहानपणापासून एकत्र वाढले. त्यामुळे एकमेकांशी बोलत असतील. ते एकमेकांच्या प्रेमात पडले असतील असा कुणी विचार करत नसे. पण प्रशांत आणि सुशीला मात्र एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांना लग्न करून आयुष्यभर एकत्र रहायचे असते.

- Advertisement -

प्रशांत आणि सुशीला वयात आलेली असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नासाठी वधू आणि वर संशोधनाला सुरूवात केली. प्रशांतने आपल्या आईवडिलांना आपले सुशीलावर प्रेम आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. सुशीलानेही तसाच प्रयत्न केला. पण दोघांच्याही घरच्यांनी त्याला विरोध केला. तो विरोध करताना त्यांनी वेगवेगळी कारणे दिली. त्यांनी प्रशांत आणि सुशीलाच्या मनाचा विचार केला नाही. दोघांची लग्ने झाले. सुशीला नवर्‍याच्या घरी गेली. प्रशांतनेही आईवडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न केले. काळ पुढे सरकत होता. प्रशांत कसे तरी आपले जीवन ढकलत होता. सुशीला कधी तरी माहेरी यायची, पण बायकोला काय वाटेल, या भीतीने प्रशांत सुशीलाकडे कधी पाहतही नसे. सुशीलाचीही तिच अवस्था झालेली असे. पुढे काही वर्षे गेली. प्रशांतला दोन मुले झाली. तो संसारगाडा ओढत होता. सुशीला अधूनमधून माहेरी यायची, पण एक दिवस ती कायमचीच माहेरी निघून आली. कारण एका अपघातात तिच्या नवर्‍याचा मृत्यू होतो. सासरची माणसे तिला घालून पाडून बोलू लागली. तिला तुच्छ वागणूक देऊ लागली. ते तिच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली. त्यामुळे ती माहेरी आली. प्रशांत आणि सुशीला पुन्हा बाजूबाजूला आले. पण जवळ असूनही खूप दूर. एकमेकांकडे पाहण्याची कधी वेळ येते तेव्हा दोघांचेही डोळे भरून येतात, पण डोळ्यातील पाणी खाली पडणार नाही याची काळजी घेत ते पुढचे जीवन ढकलत आहेत.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -