घरफिचर्सअकल्पित जन्म गाण्यांचा!

अकल्पित जन्म गाण्यांचा!

Subscribe

संगितकार सचिन देव बर्मनदांच्या आयुष्यातला तो फारच पडता काळ होता. बर्‍याच मोठ्या आजारांतून ते उठले होते. संगितातला कलाकार म्हणून खरंतर तो त्यांचा बहराचा काळ होता. पण आजाराने त्या संपूर्ण काळात त्यांच्यातल्या कलाकाराला नाऊमेद, नामोहरम करून टाकलं होतं. हार्मोनियमला स्पर्श करायचंही त्राण त्यांच्यात नव्हतं. बरं, बाहेरचं जग हे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारं होतं. त्यामुळे सचिनदांसाठी थांबायला कुणीही तयार नव्हतं. अगदी त्यांचे नेहमीचे सखेसोबतीही त्यांच्यासाठी थांबायला तयार नव्हते. गुरूदत्त त्यांच्या इतका जवळचा. तो नव्या सिनेमाची तयारी करत होता. ’बहारे फिर भी आयेगी’ हे त्या सिनेमाचं नाव ठरवून तो मोकळासुध्दा झाला होता. पण सचिनदांसाठी थांबायला तो तयार नव्हता. त्याने सरळ सचिनदांच्या नावापुढे फुली मारली होती.

प्रमोद चक्रवर्तींनी ’लव्ह इन टोकियो’चं काम सचिनदांऐवजी शंकर-जयकिशनना दिलं होतं. सिप्पींच्या ’गुमनाम’चंही काम त्यांच्या हातून गेलं होतं, पण एकटा देव आनंद मात्र सचिनदांसाठी थांबला. तुम्ही बरे झालात की मगच ’गाईड’च्या कामाला लागुया, असं तो सचिनदांना म्हणाला..आणि देव आनंद खरोखरच सचिनदा आजारातून पूर्ण बरे होईपर्यंत थांबला.

गीतकार शैलेंद्र आणि सचिनदांनी जेव्हा ’गाईड’ची गाणी करण्याचं काम हाती घेतलं तेव्हा सचिनदा सहज म्हणाले, ‘बघ, शेवटी देव आनंदच माझ्यासाठी थांबला आणि त्याने मला सिनेमा दिला. नाहीतर माझ्या पडत्या काळात माझ्यासाठी थांबायला कुणीही तयार नव्हतं. या काळात मला काही करण्याची इच्छा होत नव्हती, कशाचा उत्साह नव्हता!‘…सचिनदांच्या या म्हणण्यावर शैलेंद्रनी दिलेलं उत्तर वेगळंच होतं. शैलेंद्र म्हणाले, ‘दादा, जगणं असंच असतं, जगता येत नाही म्हणून आपण मरणाचा विचार करायचा आणि मरता येत नाही म्हणून आपण जगण्याची काळजी घ्यायची…आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा है‘…सचिनदांना शैलेंद्रचे हेच शब्द प्रभावित करून गेले आणि ह्याच शब्दांचं गाणं झालं ते ‘कांटों से खींच के ये आंचल‘ असा सुंदर मुखडा लेवून आलं. पुढे ह्याच ’गाईड’ने सचिनदेव बर्मन हे नाव हिंदी सिनेमाच्या दुनियेत पुन्हा शानोशौकत से उभं केलं.

- Advertisement -

हा सगळा किस्सा सांगायचं कारण, काही गाणी अशी बोलता बोलता अकल्पितपणे जन्माला येतात. त्यांची जन्मवेळ ठरलेली नसते, ती जन्माला येतील की नाही, हे माहीत नसतं, पण तरीही त्यांचा एखाद्या गोरज मुहूर्तावर अचानक जन्म होतो.

असंच एकदा कवी ग.दि. माडगुळकरांना एका गृहस्थांनी एकदा प्रश्न केला, ‘अण्णा, तुम्ही इतके शब्दप्रभू, शब्दसिध्द, शब्दसंपन्न कवी, तुम्ही इतकी गाणी लिहिलीत, पण तुमच्या इतक्या सगळ्या गाण्यांत ’ळ’ ह्या एका अक्षराची वाण का? का नाही दिसत तुमच्या ह्या सगळ्या गीतकवितांमध्ये ’ळ’ हे अक्षर?‘..बरं, आपली ही कैफियत मांडताना त्या गृहस्थांनी ग.दि.माडगुळकरांना त्यांच्याच अनेक गाण्यांची उदाहरणं दिली, त्यामुळे ग.दि.माडगुळकर खरंच पेचात पडले. पण पुढच्याच क्षणी सावरले आणि त्या गृहस्थांना म्हणाले, ‘असं असेल तर मी सांगतो ते शब्द टिपून घ्या‘…आणि तिथल्या तिथे माडगुळकरांनी शब्द सांगितले ते असे- ‘घननिळा, लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा!‘…त्या गृहस्थांनी माडगुळकरांकडे एक ’ळ’ मागितला होता. माडगुळकरांनी त्यांना तीन ’ळ’ दिले होते. पुढे त्या गाण्यांचे अंतरे लिहिताना तर माडगुळकरांनी इतकी कमाल केली की ’ळ’ ह्या अक्षराची बरसातच केली.

- Advertisement -

सांगायचा मुद्दा हा की गाणं कधी कधी कसं जन्माला येईल हे सांगता येत नाही. कवी सौमित्र म्हणजे आपले अभिनेता किशोर कदमनी लिहिलेल्या एका गाण्याची गंमतही अशीच आहे. त्यांना तातडीने एक गाणं लिहून द्यायचं होतं. गाण काही त्यांच्या डोक्यात घोळत नव्हतं, शब्द सुचता सुचत नव्हते. त्या दिवशी त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग आटपून रात्री खूपच उशीरा म्हणजे जवळ जवळ पहाटे पहाटे घरी परतत होते. त्यांचं घर होतं वर्सोव्याला समुद्रकिनारी. परतता परतता आभाळात पहाटेचे जे रंग दिसू लागले ते पहाता पहाता कवी सौमित्रंच्या मनात जी ओळ तरळली ती अशी- ‘पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे!‘ ह्या अगदी तरल शब्दांतलं गाणं पुढे सुरेश वाडकरांनी तितक्याच नजाकतीत गायलं.

‘सजन रे झुठ मत बोलो‘ ह्या मुकेशने गायलेल्या गाण्यातल्या एका अंतर्‍यात तर बालपण, तारूण्य आणि म्हातारपण ह्या माणसाच्या आयुष्यातल्या तीन अवस्था कवी शैलेंद्र असेच बोलता बोलता लिहून गेलेत. ‘लडकपन खेल में खोया, जवानी निंद भर सोया, बुढापा देख कर रोया‘ ह्या तीन ओळी शैलेंद्रंनी माणसाच्याल आयुष्याचं वर्णन करता करता तिथल्या तिथे लिहिल्या. शैलेंद्र म्हणाले, ‘लहानपणाचं आणि खेळण्याचं नातं असतं ते लहानपण हातातलं खेळणं हरवावं तसं हरवतं…आणि ज्या जवानीत काही करगुजरण्याची तमन्ना असते ती जवानी माणूस झोपा काढण्यात घालवतो…आणि आयुष्याच्या पश्चात्तापदग्ध संध्याकाळी म्हातारपण आलं म्हणून रडत बसतो.‘ कवी शैलेंद्रंनी ह्या तीन ओळी सहज बोलता बोलता अचानक लिहिल्या आणि त्या गाण्यात इतक्या चपखल बसल्या की गाण्याचा आशय विस्तारून गेल्या. कधी कधी गाणी कोणत्या क्षणी कोणता अर्थ घेऊन कशी जन्माला येतील हे सांगता येत नाही ते असं. त्या अर्थानेही आपल्याला जे न देखे रवी, ते देखे कवी असं नक्कीच म्हणता येईल, नाही का!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -