घरफिचर्सएटीएम कार्डचा वापर करा

एटीएम कार्डचा वापर करा

Subscribe

सतर्क आणि सावध रहा

हल्ली आपण खिशात-वॉलेटमध्ये जास्त रोख रक्कम घेऊन फिरत नाही. कारण काय? तर आपल्याला नाक्या-नाक्यावर एटीएम स्थानके आपल्या सेवेसाठी रात्रंदिन कार्यरत असतात. ‘तहान लागल्यावर विहीर खणली’ जाते की नाही माहीत नाही, पण पैसे नसताना चटकन पैसे काढणे हे सवयीचे झालेले आहे. पण हे जसे सोयीचे, तसेच जोखमीचे आहे. त्यामुळे सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षात आपल्याकडे झपाट्याने रुळलेल्या ‘कार्ड संस्कृती’ने लोकांना ‘जिथे सोय उपलब्ध-तिथे पैसे काढू’ अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. प्रत्यक्ष बँकेच्या आवारात जाऊन काऊंटरवर उभे राहून थेट पैसे काढण्याची सवय केव्हाच इतिहासजमा झालेली आहे. संगणकीकरण आणि अत्याधुनिक बँक सेवा देणार्‍या बँकांनी अशा सोयी-सुविधा देऊ केल्या आणि अशी व्यवस्था निर्माण केली की, तुम्ही-आम्ही बँकेकडे प्रत्यक्षात जाऊच नये. सर्वच तुम्हाला फोन, मोबाईलद्वारे मिळू शकेल. परिणामी आपण अधिककाळ आणि जास्त प्रमाणात एटीएमवर अवलंबून राहिलेलो आहोत, पण हे व्यवहार पूर्वीइतके सेफ म्हणजेच निर्धोक राहिलेले नाहीत. म्हणूनच आपण प्रत्येकवेळी खबरदारीपूर्वक व्यवहार केले पाहिजेत. म्हणजे नेमके काय केले पाहिजे, ते पाहणार आहोत.

- Advertisement -

पार्श्वभूमी : आजची स्थिती-आजच्या घडीला आपण जितके मोबाईल आणि इंटरनेटवर अवलंबून आहोत, तितकेच आपण पैसे काढण्याच्याबाबतीत ‘एटीएम कार्ड’ म्हणजेच जागोजागी उभे असलेले एटीएम-बुथवर अवलंबून आहोत. हल्ली आपण खिशात-वॉलेटमध्ये जास्त रोख रक्कम घेऊन फिरत नाही. कारण काय? तर आपल्याला नाक्या-नाक्यावर असे एटीएम स्थानके आपल्या सेवेसाठी रात्रंदिन कार्यरत असतात. ‘तहान लागल्यावर विहीर खणली’ जाते की नाही माहीत नाही, पण पैसे नसताना चटकन पैसे काढणे हे सवयीचे झालेले आहे, पण हे जसे सोयीचे, तसेच जोखमीचे झालेले आहे.

एटीएम व्यवहारातील ‘जोखीम’ आणि धोके-आपल्याला वाटते की, एटीएमवर पैसे काढणे सोपे आहे. रात्री-बेरात्री-पहाटे इंद्रायणी ट्रेन किंवा इंटर-सिटी पकडण्याआधी (किंवा विमान गाठण्याआधी) जाता-जाता चटदिशी चार-सहा हजार काढले की कटकट नाही, पण जे ठरवले जाते, ते तसेच होणे, हे हल्लीच्या काळात तितके सोपे आणि सहज राहिलेले नाही.

- Advertisement -

उदाहरणार्थ– १) संकेतला सकाळची फ्लाईट पकडून औरंगाबादला जायचे असते. घराच्या नाक्यावर तर अमुक बँकेचे एटीएम-बुथ असते. पूर्वीही त्याने अनेकदा तिथूनच पैसे काढलेले असतात. सकाळी सकाळी संकेत जातो तर तिथे असलेला सिक्युरिटी सांगतो की, मशीन बंद है. आता आली ना पंचाईत. वेळ कमी आणि दुसरे एटीएम शोधणे आणि विमान पकडणे. ह्यात पैसे काढणे स्कीप करावे लागते, पण खिशात अगदीच पैसे नसतील तर एखाद्याचे ऐनवेळी काय होत असेल ?
२) वैशाली नेहमीच येता-जाता दिसेल तिथे पैसे काढत असते. मार्केटात अशाच एका बुथवर गेली असताना कार्ड टाकून पैसे काढणार इतक्यात एक छान कपड्यातला इसम येतो आणि सांगतो की, हे मशीन खराब झाले आहे, प्लीज शेजारचे मशीन वापरा. ती अशा अनपेक्षित सौजन्याने प्रभावित होते आणि लागलीच शेजारच्या मशीनकडे जाते आणि आपले पैसे काढून निघून जाते. कारण तिला शॉपिंगची घाई असते ना. दरम्यान, शेजारी उभा असलेला इसम काही भोळाभाबडा नसतो, तो वैशालीचा नंबर वापरून आधीच्या-म्हणजेच खराब मशीनमध्ये अर्धवट केलेला व्यवहार पूर्ण करतो आणि पैसे काढून मोकळा होतो.

वरील दोन्ही उदाहरणे आपल्याला खूप काही शिकवून जातात, पण आपण दुसर्‍यास ठेच तरी सहसा शिकायला मागत नाही.

आपणा सर्वांच्यासाठी काही टिप्स जरुरीच्या आहेत, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करुया –
१) ऐनवेळी किंवा घाईघाईत पैसे काढणे शक्यतो टाळा.
अपवाद-घरातील एखाद्याला इमर्जन्सी म्हणून हॉस्पिटलात नेले असेल तेव्हा पैसे लागतील म्हणून आकस्मिकपणे काढणे हे मस्ट असते, पण अशावेळीदेखील हलगर्जीपणा न करणे आणि दुसर्‍याच्या हाती आपला पिन-नंबर न देणे याचे भान निश्चितच ठेवायला हवे कारण अनेकदा अशाच अगतिक परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातो.
२) एखाद्या ठिकाणचे मशीन बिघडलेले असेल तर मुळातच तिथे पैसे काढण्याचा प्रयत्न करू नका. अर्धवट प्रयत्न केलात आणि तो समजा फसला तर आपला व्यवहार पूर्णतः रद्द होईल हे नीट बघा आणि मगच त्या बुथवरून बाहेर पडा.
३) पासवर्ड हा कधीच -कोणालाही सांगू नका. व्यवहारात मैत्री आणि नातलग यांच्यात पासवर्ड आणू नका.
४) पासवर्ड हा सतत बदलत राहू नका, कारण आधीचा कोणता? ताजा कोणता? अशी आपलीच गफलत होण्याची शक्यता असते.
५) पासवर्ड हा शक्यतो आपली जन्मतारीख, टोपणनाव, बायको किंवा प्रेयसीचे नाव, मुलांची नावे यावरून ठेवू नका. कारण अशी नावे परिचित चोर लगेच ओळखू शकतात.
६) पिन नंबर, सिव्हीव्ही नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, अगदीच वाटले विसरायला होईल, तर आपल्या पर्सनल डायरीत लिहून ठेवा. मात्र, कधीही आपल्या मोबाईलमध्ये ठेवू नका. काही मंडळी सोयीचे व्हावे म्हणून कार्डच्या मागे किंवा कार्डसोबतच एका कागदावर लिहून ठेवतात असे करणे म्हणजे आपणच आपली ‘हिट विकेट’ करणे, तेव्हा सांभाळून रहा.
७) अजून एक महत्त्वाची खबरदारी घेणे मस्ट आहे- जेव्हा बुथमध्ये अनेक जण असतात, तेव्हा आपला पिन नंबर इतरांना कळू नये, उजव्या हाताने नंबर टाकत असताना कोणाला दिसू नये म्हणून डाव्या हाताने आडोसा करावा. असे करताना कोणी तुम्हाला बावळट-गावंढळ म्हटले तरी काहीच प्रतिक्रिया देऊ नका.
८) आपले काम झाल्यावर कार्ड घेणे, पैसे मोजून घेणे झाल्यावर मशीनवर कॅन्सल बटन दाबा.
९) आपण जेव्हा नेहमीच्या किंवा अगदी नेहमीच्या बूथमध्ये शिरता, तेव्हा तिथे झालेले काही बदल तुमच्या लक्षात आले तर लागलीच तिथे असेल्या सुरक्षा-कर्मचार्‍याला सांगा.
उदाहरणार्थ-अ) तिथे कोणी अनाहूत व्यक्ती मशीनशी चाळा करत असेल
ब) लाईट्स अपुरे असतील
क) कार्ड टाकण्याची जागा नेहमीसारखी दिसत नसेल, एखादा भाग पुढे आला असेल किंवा चेपला गेलेला दिसल्यास निदर्शनास आणून द्या.
ड) सीसीटीव्ही यंत्रणा काम करत असेल तरीही सांगा
१०) काही मोक्याच्या जागा आणि तिथे असलेले एटीएमचे बुथ्स-
उदाहरणार्थ – बाजारात, मॉलमध्ये, मल्टीप्लेक्सजवळ, गर्दीच्या ठिकाणी, स्टेशनपाशी.
११) हॉटेल किंवा बारमध्ये सावधानता बाळगा-तिथे असलेल्या तरुण स्टाफला जाळ्यात ओढले जाते आणि कार्ड-होल्डर्सचा डेटा, महत्त्वाची माहिती चोरण्यासाठी काही रुपयांचे आमिष दाखवले जाते. पॉकेट स्किमरसारखे यंत्र हाताशी देऊन आपण केलेल्या व्यवहारादरम्यान ठळक माहिती -पिन नंबर कॉपी केला जातो आणि त्यानंतर आपले अतोनात नुकसान होऊ शकते. (खरे म्हणजे आपल्या सिरीयल-सिनेमात अशी काही दृश्य दाखवली, तर एक चांगला दृश्य-परिणाम प्रेक्षकांच्या मनावर ठसेल आणि जे काम लेक्चर- बोधपटाने होणार नाही ते या करमणुकीद्वारे सहजगत्या साधले जाईल, पण इतके सामाजिक भान किंवा बांधिलकी असायला हवी.)

बारमध्ये मदिरापान जास्त झाल्यावर आणि दोस्तांच्या मस्तीत एखादा तिथल्याच पेपर-न्यापकीनवर ऐटीत आपला पिन नंबर शेअर करतो आणि अवघ्या काही तासातच त्याच्या कार्डावरून हजारो रुपये उडवल्याची बातमी येते. त्याबरोबर केलेली पार्टी, मज्जा आणि दारूची नशा खाडकन उतरते.

आपण आपले सामान्यज्ञान ताजे ठेवण्यासाठी काही तांत्रिक शब्द-भामट्यांच्या काही क्लृप्ती माहीत करून घेऊ म्हणजे फसवणूक टाळता येईल आणि इतरांना सावध करता येईल.

१) स्किमर मशीन – आपल्या मोबाईलचा डेटा त्यावर उमटतो आणि चालाख चोर त्याचा प्रिंट काढतात आणि आपल्या कामाला लागतात. त्यांची कामगिरी फत्ते झाल्यावर आपण लुबाडले गेलो याची आपल्याला जाणीव होते, पण तोवर खूपच उशीर झालेला असतो.
२) क्लोनिंग-एटीएम मशीनच्या कि-बोर्डमध्ये एखादा छुपा कॅमेरा लपवला जातो आणि कार्डधारकाने टाकलेल्या कार्डची ‘कॉपी’ केली जाते.
३) डेटा हॅक करणे – डेटा चोरणे -अनधिकृतपणे पळवणे हेदेखील प्रकार वारंवार घडतात, अर्थात याकामी संबंधित कर्मचारी, त्यांचे हस्तक किंवा तिथे काम करणार्‍या माणसांशी केलेले संगनमत अनेकांच्या खात्यातील पैसे लुबाडण्यास कामी येऊ शकते. (अलीकडे काही बँकाबाबत असेच प्रकार घडले)

आपल्याला कार्ड किंवा एटीएम जितके सोयीचे आहेत, तितके सांभाळून व्यवहार करणे आवश्यक आहे. धोका कुठे नसतो? म्हणून कोणी कार्ड वापरणे सोडेल का? तेव्हा आपले व्यवहार डेबिट-क्रेडीट कार्ड किंवा मोबाईल-इंटरनेटवरून जरूर करुया पण चूक-गफलत आणि ढिसाळपणा अजिबात नको. कारण आंतरराष्ट्रीय टोळ्या या उच्चशिक्षित आणि तंत्रज्ञान अवगत असलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि बँकांच्या संगणक -सायबर सुरक्षेला खिंडार पाडून तुमच्या-आमच्या संपत्तीची दिवसाढवळ्या लूट करतात. आपण सदैव जागरूक राहू, म्हणजे अशा सायबर दरोड्यांपासून दूर राहता येईल. परीक्षा संपलेल्या आहेत, सुट्टीचा सिझन सुरू झालेला आहे, मज्जा करायची आहे, तर ‘कार्ड सलामत तर धम्माल बेसुमार’ हे मात्र कदापि विसरू नका. एन्जॉय हॉलिडे.

-राजीव जोशी -बँकिंग आणि अर्थ-अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -