घरफिचर्सगेणूअप्पाचं फाटलेलं आभाळ

गेणूअप्पाचं फाटलेलं आभाळ

Subscribe

खाल्लाकडच्या नदीला पूर आल्यासारखा आवाज येत व्हता. अधुन-मधुन झाडं मोडून पडल्याचा आवाज. मध्येच विज कडकडून आरोळी मारुन जायची. पावसांची थेंब त्या विजेच्या उजेडात सोन्याच्या थेंबासारखी दिसत असायची. असला प्रकार गेणूच्या आयुष्यात दुसऱ्यांदा घडत व्हता. त्याची बायकु सगुणाही अशाच पावसात दोजीवाची असतांना देवाच्या घरी गेली व्हती.

गेना आप्पा, थरथरत्या हातानं कोपीतल्या वाश्याला बांधलेल्या मळकट चिरगुटाला हातानं चाचपीत गपकन खाली बसला. दिसभर राब-राब राबल्यामुळं आता त्याच्या पोटात आग लागली व्हती. काहीतरी पोटात ढकलावं अन चव्हाळ्यावर देह टाकून द्यावा अशा बेतात त्यो होता. पण पालकुरात काहीही न सापडल्यानं त्यो तसाच चव्हाळ्यावर खाली चितागिती बसला. आभाळ गच्च भरुन आलं व्हतं. जरा टायमात पाऊस येईल असा त्याचा अंदाज व्हता. रातकिड्यांचा अवाजही येत नव्हता. कोपीला अडवलेल्या वाऱ्यामुळं ’सुम्म्म्म्म’ आवाज येत व्हता. जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाच्या ढगळ्या हालत त्यांचाही एक वेगळाच अद्भूत आवाज येत व्हता. वारा सुटल्यानं आन आभाळात काळ्याकुट्ट ढगानं गर्दी केल्यामुळं पाऊस येणार हे नक्की होत. जव्हा जव्हा पाऊस यायचा तव्हा तव्हा गेना आप्पाला सगुणीची आठवण यायची. गेना जव्हा चितागती बसायचा तव्हा त्याला सगुणी आठवायची. त्या दोघामध्यी काय बोलणं होत असत. काय मैत पण, पुन्हा गेना चांगलीच उभारी घ्यायचा. यावेळलाही तसंच काही तरी असल. तसं या साली सुगीही म्हणावं तशी आली नव्हती.

एकुलता एक पोरगा गण्या. तरुण वयात गेना अप्पाची सगुणी गेली, सध्या घरात हे दोघेच एकमेकाला व्हते. गण्या चार-पाच वर्षांचा असन तव्हा. सगुनी गेली तव्हा, पाचसहा महिने दोन जीवाची होती. पण अचानक काहीही न सांगता कशी निघून गेली कळलं सुध्दा नाही. गेना अप्पाच्या डोक्यात सगुणीचा इच्चार असायचा, दोन साल झाली असतील, गण्याच्या लग्नामध्यी गेना अप्पाला लै भरुन आलं व्हतं. धोतराच्या घोळानं ते डोळ्यातलं पाणी अलगद पुसलं व्हतं. गण्याचं लग्न झाल्यानं आता आपल्याला चांगले दिवस पहायला मिळतील असं त्याला अधुन-मधुन वाटू लागलं व्हतं. पण तसं काही झालं नाही. त्याची सुन हौसा लै केकसा निघाली. तिला नाकावरची माशी सहन व्हायची नाही. सकाळ-संध्याकाळच्या दोन भाकरी थापल्या की, अशी खोट्यावाणी करायची. बारीक सारीक गोष्टीवरुन घालूनपाडून बोलायची.

- Advertisement -

पोराच्या संसारामध्यी ढबळाढबळ नकु म्हणून गेना अप्पा रानातल्या कोपीवर रहायला आला व्हता. सकाळ-संध्याकाळ शेजारच्या कामावर असलेला गडी गावातून भाकरी घेऊन येत असायचे. त्यांच्या बरुबरीनं गेना अप्पाच्या भाकरीबी माणूसकीच्या नात्यानं त्याच्या घरुन घेऊन येत असत. आज पावसाचा आकार असल्यानं गावातून भाकरी घेऊन कुणी येईल असं वाटत नव्हतं. थोड्याच टायमात पावसाची रिपरिप सुरु झाली. धो-धो कोसळणाऱ्या पावसामध्ये कोपीचा निभाव लागणं शक्य नव्हतं. यासाली कोपी शेकारलीबी नव्हती. उभी असलेली इकुन तिकुन थोडं बहुत आलेलं धान पावसानं वाहून जाईल अशा बेताचा पाऊस पडत व्हता. सगळ्या कोपीत पाणी घुसलं व्हतं. तशातच म्हातारपण. अंगावर गोधडी घेऊन कुडकुड करीत त्यो बसला व्हता. कोपीमध्यी पावसाचं पाणी घुसल्यानं दोन पायावर बसून, त्यो पाऊस उघडण्याची वाट बघत व्हता. पांघरायचं गोधडं, डोक्याचं उपरणही वल्लचिंब झालं व्हतं. कोपीमधी सगळं पाणीच पाणी झाल्यानं झोपण्याचं सोडा, बसण्याचाही वांदा झाला व्हता. पोटात कावळ्यांनी वरडून वरडून कोलाहल केला होता.

तेवढ्यात शेजारच्या शेतात सालानी असलेला बंड्या भिजत भिजत गावातून आला. त्यांनी त्याच्या मालकाच्या बैलांना वैरण काडी केली. गाईच्या पुढची वैगणी सांबरीसुंबरी केली. आण एक हाक घातली अय्य…… गेनु आप्पा आहयेत का?’ इकडं गेनुनं कसंबसं त्यांना त्याच्या आवाजाला है है असं उत्तर दिलं. मग बंड्या तिथं आला. त्यानं अप्पासाठी चिरगुटात भाकरी अन् त्यावर पिठलं आणलं व्हतं. गरम गरम भाकरी अन् पिठलं गेणू अप्पाला लै आवडायचं; पण आज त्या भाकरी व पिठलं दोन्ही पावसाच्या पाण्यानं भिजल्या. त्यानं पावसाच्या पाण्यानं भिजलेल्या भाकरीही पिठल्यात कालवून घशाखाली उतरविल्या. पाऊस चालूच होता. बंड्या आल्यानं गेणू अप्पाला कुणीना कुणी सोबती आला व्हता. आत्ता रात्रभर अशीच ताटकळत काढावी लागणार हे निश्चित व्हत. खल्लाकडच्या नदीला पूर आल्यासारखा आवाज येत व्हता. अधुन-मधुन झाडं मोडून पडल्याचा आवाज. मध्येच वीज कडकडून आरोळी मारुन जायची. पावसाची थेंबं त्या विजेच्या उजेडात सोन्याच्या थेंबासारखी दिसत असायची.

- Advertisement -

असला प्रकार गेनुच्या आयुष्यात दुसऱ्यांदा घडत व्हता. त्याची बायकू सगुणाही अशाच पावसात दोजीवाची असताना देवाघरी गेली व्हती. त्यानंतर नेमकी हीच वेळ गेनु अप्पावर. त्या वेळच्या पावसानं सगुनीला नेलं व्हता आत्ता गेनुही त्याच वाटानं जायाला तयार झाला व्हता. अस्मानी आलेल्या संकटांची जनावरांना चाहुल लागतीय असं गावातली बुजुर्ग मंडळी नेहमी म्हणीत असायची. कोठ्यातल्या जणावरांनीही त्यांची दावे तानायला-वरडायला सुरुवात केलती. हे गेनु बंड्याला सांगत व्हता. बंड्या नव्या रक्ताचा माणूस, त्याचा गेनुवर काहीही विश्वास बसला नाही. तरीही त्याची पाचावर धारण बसली व्हती. त्यानं आत्ता पुढं काय करायचं हे अप्पाला विचारलं. त्यांनी जागरुक रहायला सांगितलं.

‘आमचं काय आम्ही पिकलं पानं कव्हाबी गळून पडणार’ असं सांगून मरणाला तयार असल्याचं भाकीत केलं, बंड्याला तुझ्यामाघ दोन लेकरं हैत याची जाणीव करुन दिली. इकडं पुराचं पाणी नदीतून वारवार आन् वावरातून बैलाच्या कोठ्यापस्तोर आलं व्हतं. बैलांची चलबिचल चालू व्हती. बैलांना बंड्यानं दोरकंडातून मुक्त केलं. लिंबाच्या झाडाजवळ बसला. इकडं कोपीत पाणी घुसलेल्या गेनुअप्पानं बंड्याच्या मदतीनं कोपीत वैरणीच्या पेंड्या हातरुन त्यावर देह टाकला. थंडी एवढी होती, त्यात सगळं पावसानी भिजवलेलं.. त्यामध्ये गेनु जो झोपला तो कायमचाच…


– अशोक अबुज तिगावकर
(लेखक ग्रामीण जीवनाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -