घरफिचर्सअभिनयातील मास्‍तरची एक्‍झिट!

अभिनयातील मास्‍तरची एक्‍झिट!

Subscribe

१९७२ साली व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. मात्र त्यापूर्वी रंगभूमीवर केलेल्या कामाचा अनुभव आणि मुळातच नसानसात भिनलेला नैसर्गिक अभिनय यामुळे ‘पिंजरा’मधील श्रीधर पंत गुरुजीच्या भूमिकेत डॉ. लागू चपखल बसले. कमी पण मोजक्या शब्दात बोलण्याची त्यांची वृत्ती, शब्दांपेक्षा देहबोली आणि चेहर्‍यावरील हावभावातून व्यक्त होण्याची कला, फक्त नजरेतून समोरच्यावर ठेवता येणारी जरब आणि कोणत्याही व्यक्तिरेखेत स्वतःला सहज सामावून घेता येण्याची त्यांची शैली हे क्वचितच एखाद्या नटाला जमते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना ते जमले होते, किंबहुना त्यांच्या ते अंगवळणीच पडले होते. त्यामुळेच त्यांचा चित्रपटातील अभिनय हा तितकाच सहज आणि नैसर्गिक वाटतो. डॉ. लागू यांनी रंगभूमी गाजवल्यानंतर वयाच्या ४५ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. साधारण २० हून अधिक मराठी तर १०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. रंगभूमीवरील ‘नटसम्राटा’च्या सिनेसृष्टीतील प्रवासाचा आलेखदेखील इतकाच प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे.

शांताराम बापू यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटात एका आदर्श मास्तराच्या आयुष्याचा तमाशा कलावंतीणीमुळे होणारा प्रवास डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे रेखाटला होता. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘झाकोळ’, ‘मुक्ता’, ‘ध्यासपर्व’, ‘सुगंधी कट्टा’, ‘मसाला’, ‘शासन’ सारख्या अनेक चित्रपटातून काम करत मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रात डॉ. लागू यांनी दबदबा निर्माण केला. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘सिंहासन’ (१९८०), ‘सामना’ (१९७४) आणि ‘मुक्ता’ (१९९५) या तिनही चित्रपटांमधील डॉ. लागू यांच्या भूमिका अतिशय वेगळ्या होत्या. तर ‘झाकोळ’ (१९८०) या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे डॉ. लागू यांनी स्वतःच केले होते. मराठीमध्ये त्यांनी निवडकच चित्रपट केले असले तरीही त्यांची प्रत्येक व्यक्तिरेखा ही लक्षात राहण्यासारखी आहे. डॉ. लागू हे अतिशय गंभीर आणि संयमी भूमिका साकारणारे कलाकार होते, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी डॉ. लागू यांचा १९८३ साली आलेला ‘गुपचूप गुपचूप’ हा चित्रपट पहावा. त्यांनी साकारलेली सर साहेब ही कडक आणि शिस्तप्रिय बापाची भूमिका हळूच विनोदाकडे झुकलेली प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्यामुळे डॉ. लागूंनी किती वैविध्यपूर्ण भूमिका त्यांच्या सिनेकारकिर्दीत साकारल्या आहेत, याचाही प्रत्यय प्रेक्षकांना येतो.

- Advertisement -

मराठीसोबतच डॉ. लागू यांनी हिंदी सिनेसृष्टीतही त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. अगदी अभिनेते नसिरुद्दीन शहांपासून अनेक अभिनेत्यांवर त्यांच्या अभिनयाचा प्रभाव पडला. एकीकडे हिंदी सिनेमांमध्ये गरीब घरातील किंवा नोकरांची भूमिका मराठी कलाकारांना मिळत असताना डॉ. श्रीराम लागू यांनी श्रीमंत उद्योगपती, पोलीस इन्स्पेक्टर, वकील, विचारवंत अशा दर्जेदारच भूमिका साकारल्या. त्यांचे व्यक्तिमत्वही तितकेच भारदस्त आणि देखणे होते. त्यांच्या वाट्याला हिंदी चित्रपटामधील भूमिकादेखील साजेश्याच आल्या. डॉ. लागू यांच्या ‘अनकही’, ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’, ‘इक दिन अचानक’, ‘कामचोर’, ‘घरोंदा’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’, ‘सरगम’, ‘सौतन’ आदी हिंदी सिनेमातील भूमिका गाजल्या. १९७७ साली आलेल्या ‘घरोंदा’ या चित्रपटासाठी त्यांना मुख्य सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळामुळे डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्यातील कलाकार कायम सक्रिय होता. कित्येक कलाकारांचे ते प्रेरणास्थान होते. गेल्या वर्षी ज्येष्ठ कलाकार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये अभिनेता सुमित राघवन यांनी डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात केवळ डॉ. लागू यांची मोजकीच झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली असली तरीही डॉ. घाणेकरांचा रंगभूमीवरील तगडा स्पर्धक परंतु शांत, संयमी स्वभावातून व्यक्त होण्याची त्यांची शैली आजच्या पिढीला पाहायला मिळाली. अखेर ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली….’, अभिनयातील मास्तर, गुरुजी, इन्स्टिट्यूट ही सर्वच बिरुदं ज्यांना साजेशी आहेत, त्या डॉ. लागूंची आयुष्यातून एक्झिट झाली.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -