युद्ध : सज्जतेच्या दृष्टीने सोपे आणि तितकेच कठीणही…

युद्ध करण्यासाठी जी क्रयशक्ती, सक्षमता लागत असते तीच मुळात पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे युद्ध झाले तर तीन दिवसदेखील पाकिस्तान स्वबळावर टिकू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताच्या बाजूने चाललेला हस्तक्षेप आणि पाकिस्तानची नमती भूमिका लक्षात घेता युद्धाची शक्यता अत्यंत धूसर वाटते. त्यातच पाकची झालेली नाचक्की पाहता कोणताही देश पाकला पाठिंबा द्यायला तयार नाही. दुसरीकडे भारताने जी हिंमत दाखवली ती देशवासीयांसाठी मोठी दिलासादायक म्हणावी लागेल. मात्र, सारासार विचार करता सज्जतेच्या दृष्टीने युद्ध वरवर सोपं वाटत असलं तरीही, तितकंच ते कठीणही आहे, हेदेखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.

Mumbai

काश्मीर खोर्‍यामध्ये सक्रिय असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. ही धक्कादायक घटना 2016 मधील उरी येथील मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचे स्मरण करून गेली. फरक एवढाच की, केवळ चर्चेवर न थांबता भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून अवघ्या भारतीयांच्या मनातील रोष शांत करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, भारतीय हवाई दलाने केलेल्या जिगरबाज कारवाईचा हा परिणाम म्हणावा लागेल. भारताने केलेला हल्ला आणि सज्जता पाहता आपले सैनिक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. आजवर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने, जे शक्य झाले नव्हते ते साध्य होताना दिसते आहे.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानने जी काही भूमिका घेतली ती केवळ ‘फेस सेव्हिंग एक्झरसाईज’ आहे. म्हणजे वरवरचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न. संपूर्ण जगभरात नाचक्की झाल्यानंतर स्वतःची इज्जत वाचविण्यासाठी पाकिस्तानकडून बरीच धडपड झाली. युद्धसाहित्यापासून ते आर्थिक मदतीसाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था एवढी चांगली नाही की तो भारताशी युद्ध करू शकेल. युद्ध झाले तर त्यांचा टिकाव लागणार नाही. कदाचित लढण्याएवढी क्षमताच त्यांच्याकडे नाही. चीन, अमेरिका आणि रशियासारखे जे त्यांचे मित्र आहेत, त्यांनीदेखील पाकिस्तानला मदत करण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे पुरत्या कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानपुढे नांगी टेकवण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. कदाचित म्हणूनच भारताच्या सीमेत घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा हल्ला परतवताना मिग कोसळून त्यांच्या हाती सापडलेल्या अभिनंदनला पाकिस्तानने अवघ्या 60 तासांत सहीसलामत आणि कागदपत्रांचा कुठलाही जास्त बाऊ न करता भारतात पाठवलं.

पाकिस्तानने नमती भूमिका घेण्यामागे भारताने केलेला हल्ला आणि लष्कराला असलेला देशांतर्गत राजकीय खंबीर पाठिंबा हीदेखील महत्त्वपूर्ण कारणं आहेत. थेट पाकिस्तानातील तळ उद्ध्वस्त करण्याचा ठाम निर्णय, जागतिक स्तरावरून भारताच्या कारवाईला मिळालेले बळ या बाबी भारताच्या भविष्यासाठी निश्चितच सकारात्मक म्हणाव्या लागतील. गेल्या पाच वर्षांत लष्करात दाखल होत असलेले आधुनिक तंत्रज्ञान, युद्ध सामुग्री, उपग्रहांची होणारी मदत यामुळे अमेरिका, रशिया अशा विकसित देशांच्या बरोबरीने भारताची वाटचाल सुरू आहे. यापुढेही दहशतवादी तळांवर असेच हल्ले केले जातील, हा इशारा देऊन भारताने पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पुरते पाणीच फेरले आहे.

जागतिक स्तरावरून झालेली कोंडी आणि दुसरीकडे दहशतवाद्यांवरील कारवाईचे संकट यातून बाहेर पडायचे असेल तर पाकिस्तानला ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. अर्थात, पाकिस्तान आश्रीत दहशतवाद्यांची पिलावळ एवढी फोफावलीय की, त्यांना नाही म्हटलं तर तेच त्रासदायक ठरतील, अशी मोठी भीतीही पाकिस्तानला आहे. अशा या तिढ्यातून बाहेर पडताना पाकिस्तानला प्रचंड बिकट परिस्थितीतून जावे लागणार आहे. त्यांच्या याच कोंडीचा सर्वाधिक फायदा भारताला होईल. दहशतवादी तळांवरील हल्ल्याच्या निमित्ताने जगभराला भारताचे सामर्थ्य, क्षमता आणि शैौर्य दिसले हेही काही कमी नाही…!

कारगील युद्धादरम्यान नियोजनाचे यश
कारगील युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर म्हणून या भागात माझी नियुक्ती होती. या ठिकाणी सैनिकांच्या तुकड्या पेरण्याचे काम आणि नियोजनाची जबाबदारी पेलणं हे खरंतर आव्हानात्मक काम होतं. मात्र, टोकाची देशभक्ती, मानसिक आणि शारीरिक स्तरावर प्रचंड मोठी तयारी, स्थानिक परिस्थिती आणि विजयाचं ध्येय यामुळे ही कामगिरी यशस्वी होऊ शकली. 1999 मध्ये भारत-पाकिस्तान यांत हे युद्ध झाले होते. पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी काबिज केल्याचे लक्षात आल्यानंतर या घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी जी कारवाई झाली ती म्हणजे कारगीलचे युद्ध होते. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश आलं.

– विंग कमांडर अनिल सिंघा (निवृत्त), संचालक, भोसला करिअर अकॅडमी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here