Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर फिचर्स युद्ध नको बुद्ध हवा!

युद्ध नको बुद्ध हवा!

Mumbai
indian troops crossed border twice and attacks on chinese soldiers says china foreign minister
India and China

भारत आणि चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आशिया खंडात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या काळात आधीच सर्वत्र मंदीचे वातावरण असताना हे युद्ध कोणालाच नको आहे. जगण्याच्या भयाण वास्तवाने भोवताल अस्थिर झाला असताना तो शांततेच्या मार्गाने गेला तरच माणसांची जगण्याची लढाई सोपी होणार आहे. पण, युद्धखोर लोकांना अशांत प्रदेशात युद्ध पेटवून आपण किती शक्तिमान आहोत, हे दाखवण्याचा अट्टाहास असतो. या अट्टाहासापोटी माणसे मेली तरी त्यांना त्याची काही पर्वा नसते. म्हणूनच माणूस माणसांसाठी राज्य करतो तेव्हा त्याने प्रथम माणसांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांनाच आज युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला तो सुद्धा भारताच्या पावनभूमीतून आणि म्हणूनच आपले पहिले कर्तव्य आहे की युद्धाआधी मोदी सरकारने शांतीच्या मार्गावरून गेले पाहिजे. आज आपल्यासमोर फक्त चीन हा एकमेव शत्रू नाही तर पाकिस्तान आणि नेपाळही आपला शत्रू बनले आहेत. मुख्य म्हणजे आज मोदी सरकार चीनला जोरदार टक्कर देण्याची शंख वाजवून गर्जना करत असला तरी वास्तव हे आहे की या बालढ्य शत्रूचा वाटतो तेवढा मुकाबला सोपा नाही. युद्ध झाले तर त्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागेल.

विशेष म्हणजे भारत आणि चीन दरम्यान सलोख्याचे वातावरण तयार होत असताना अमेरिका उगाचच भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनला लक्ष्य करू पाहत आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने आज अमेरिका भारताचा जिवलग मित्र होऊ पाहत असला तरी कोरोनच्या तोंडावर अमेरिका आणि युरोप भारताच्या माध्यमातून आपले उट्टे फेडण्याचा प्रयत्न करत आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर अमेरिकेचे सक्षम सैन्य भारताच्या बाजूने उतरेल, असे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चीनची आक्रमक भूमिका अमेरिका अजिबात सहन करणार नाही. त्यासाठीच अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात आपल्या नौदलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसमधल्या एका अधिकार्‍याने दिली आहे. तसेच, आमचं सैन्य कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार आहे, असं देखील या अधिकार्‍याने स्पष्ट केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढू लागल्यापासून अमेरिकेने सातत्याने चीनच्या विरोधी भूमिका घेतली आहे. त्यासोबतच आमच्या मित्र राष्ट्रांचा देखील आम्हालाच पाठिंबा असून त्यांच्यावर देखील चीनकडून दबाव टाकला जात आहे, असे देखील अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्र धोरणांचा विचार करता चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढू लागणे हे धूर्त राजकारणाचा एक भाग समजला जात आहे. मात्र, तरीही या सगळ्यांचा विचार करता भारताने सावध पावले उचलायला हवीत. दोनच दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून दोन्ही देशांमधला तणाव निवळण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा केली. त्याचा परिणाम म्हणून गलवान प्रांतातून चीनने सैन्य माघारी घ्यायला देखील सुरुवात केल्यानंतर हा तणाव कमी व्हायला देखील सुरुवात झाली. हे पाऊल चांगले असून यावेळी भारताने सावध भूमिका घ्यायला हवी.

प्रतिस्पर्धी देश कितीही शस्त्रसज्ज व सामर्थ्यवान असला, तरी युद्धात दुबळ्या शत्रूचा पराभव करताना त्याचीही हानी झाल्यावाचून राहत नाही. तशात भारत आणि चीन हे तर लोकसंख्येने बरोबरीत असलेले शेजारी देश. चीनच्या तोडीची नसला, तरी भारतही पुरेसा शस्त्रसज्ज आहे. त्यामुळे युद्ध पेटलेच, तर ते भारत किंवा चीनपैकी कोणाच्याही फायद्याचे नसेल. भारत-चीन एकमेकांशी भिडल्यास आशियातील पावणेतीन अब्ज लोकसंख्येवर युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट निर्माण होऊन त्याची जगाला झळ बसेल. कोरोनामुळे सध्या घरात दबा धरून बसलेले; पण चीनची मस्ती जिरवण्याचे आभासी स्वप्नरंजन करणारेही त्यापासून सुरक्षित राहणार नाहीत. कोरोनासंकट झेलण्यात महाशक्ती अमेरिकेसह युरोपही व्यग्र असताना चीनने भारताला कचाट्यात पकडण्याचा डाव साधला. भारत-चीन तणाव चिघळून त्याची युद्धात परिणती झाली, तर दोन्ही देशांना रोखण्यासाठी अमेरिका किंवा युरोपीय देशांना मध्यस्थी करणेही अवघड होईल. घोषणा करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात तसे कोणी वागेल याची काहीच खात्री देता येत नाही. अमेरिकेला आव्हान देणार्‍या चीनचे लष्करी सामर्थ्य लक्षात घेता भारताला युद्धाचा जुगार परवडणार नाही.

घातकी चीनसोबत नवे सौहार्दपर्व सुरू करणार्‍या मोदी सरकारला परराष्ट्र धोरणातील नाजूक संतुलन शाबूत राखता आले नाही आणि यामुळेच चीनला फुत्कारण्याची संधी मिळाली. अमेरिका आणि जपानला भारत अवास्तव महत्त्व का देतो, यावरून चिनी नेते नेहेमीच अस्वस्थ, असमाधानी आणि आक्रमक असतात. मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीमुळे आता अमेरिका आणि भारत एक आहेत, असा चीनचा पक्का समज झाला आहे. चीनला सर्वांविषयीच अविश्वास असतो. तशात भारत शेजारी. लोकसंख्येत तुल्यबळ. शिवाय १९६२ च्या युद्धाचा इतिहास असल्याने भविष्यात युरोप-अमेरिका भारताला पुढे करून आपल्याशी युद्ध करेल, हा संशय चीनच्या मनात आहे. या शंकेला बळ मिळू नये, याचा प्रयत्न भारताला करणे भाग आहे. भारताने कुटील चीनच्या महत्त्वाकांक्षा समजून घेण्याची आवश्यकता आहे.

चीन आता स्वतःला अमेरिकेप्रमाणे महाशक्ती मानतो आणि अमेरिकेप्रमाणेच कोणत्याही ज्वलंत आंतरराष्ट्रीय मुद्यावर मनमानी करतो. अशा स्थितीत अमेरिका आणि चीन यांच्यात भारताने सतत संतुलन ठेवणे आवश्यक आहे. भारत चीनचा शत्रू नाही, हा विश्वास चीनच्या संशयी मनात रुजविणे अवघड असले, तरी आवश्यक आहे. भारत व चीन एकमेकांशी लढले, तर पाश्चात्य देशांना ते हवेच आहे. त्यांना भारत किंवा चीनचा आर्थिक उत्कर्ष सहन होत नाही. चीन आर्थिक महाशक्ती झाला, हे वास्तव पचवणे पाश्चात्य देशांना अवघड झाले आहे. त्यामुळे कसेही करून चीनला पंक्चर करणे, हे अमेरिका व युरोपचे लक्ष्य आहे. भारताच्या हातून ड्रॅगनला मारण्याचे अशक्यप्राय ईप्सित विनासायास साध्य झाले, तर बरेच, असा युरोप व अमेरिकेचा व्यावहारिक हिशेब आहे.

मोदी यांनी ट्रम्प यांच्यासोबत दाखवलेल्या अति जवळकीमुळे चीन अस्वस्थ झाला असेल, तर चीन आणि रशियाच्या शंकाकुशंका त्वरित दूर करण्याचे काम भारताने करायला हवे होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सक्षम मुत्सद्दी आणि चीनतज्ज्ञ आहेत. जयशंकर परराष्ट्रमंत्री असताना चीनचे हावभाव समजण्यात भारताला अपयश का आले, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. भारत व चीन एकमेकांशी लढू इच्छित नसतानाही कुठे तरी विसंवाद होऊन आजची युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. ट्रम्प यांच्या भारतभेटीनंतर जयशंकर यांना चीन व रशियाचा दौरा करून किंवा मुत्सद्देगिरीच्या इतर मार्गांनी या देशांच्या धारणेतील भ्रम दूर करता आला असता. दुदैवाने, तसे झाले नाही. अमेरिका आणि विशेषतः ट्रम्प यांच्याशी मोदी यांचे संबंध खूपच घट्ट असल्याच्या जाणिवेतून चीनच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात भारत-अमेरिका संबंध तेवढे गहिरे नसतीलही; पण हा आभास ड्रॅगन चवताळण्यासाठी पुरेसा ठरला. शेजारी देशांशी भारताचे गंभीर मतभेद असल्याचा संदेश आज जगात गेला आहे. त्यावर, युद्धखोरीने नव्हे तर मुत्सद्देगिरीचे संतुलन साधून भारताला मार्ग काढावा लागणार आहे.