महादेवाक बाप्पांची काळजी…

Mumbai
पानी कम चाय

नारायण…नारायण…आसमंतातून तो मंजूळ ध्वनी कानावर आला, तसे महादेव आणि माता पार्वती कैलास पर्वतावरून अवकाशात पाहू लागले आणि क्षणार्धात मुनी नारद प्रकटले.
महादेव – नारद मुनी आज कसं काय इथली वाट चुकलात? यावे आपलं स्वागत आहे.
नारद- संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असताना म्हटलं आपलीही भेट घ्यावी…
महादेव- नारदा वसुंधरेचे काय हालहवाल आहेत, आमचा बालगणेश तिथं सुखरूप आहे ना?
नारद- होय, महादेवा, चिंता नसावी, बालगणेशाचं वसुंधरावासियांनी यंदाही अगदी मनपूर्वक आदरतिथ्य केलं आहे. यंदा वसुंधरेवरील महाराष्ट्र नगरीत आलेल्या पुरानंतरही पृथ्वीवासियांनी बालगणेशाचे स्वागत करताना कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. त्यामुळे बालगणेश आनंदी असून अनेक ठिकाणच्या मोदकांचा गोडवा अनुभवत आहेत.
महादेव- नारायणा त्याचीच तर चिंता आहे…मोदक पाहिल्यावर बालगणेशाला कुठलंही भान राहत नाही, आणि भक्तांनी प्रेमाने दिलेली भेट नाकारायचा स्वभाव त्याचा मुळी नाहीच. गेल्या वर्षात काही ठिकाणी च्युइंगमसारखे मोदक गणेशानं प्राशन केले आहे त्यानंतर इथं येऊन मोठालं पोट आणखीनच मोठं झालं. त्यावेळी माता पार्वतीनं कैलासावरील पानांचा अर्क बालगणेशाच्या मुखात घातला तेव्हा कुठं त्याला बरं वाटलं. आणि मोदकाशिवाय काहीही न खाणार्‍या माझ्या बाळाला तिथं सोन्याची बिस्कीटं, मोदक चारले जाताहेत म्हणे, काय हे खरं आहे नारदा? आणि शिवाय त्याच्या मोठाल्या कानांचीही काळजीच वाटते रे नारदा, वसुंंधरा मुक्कामी डिजे नावाचं नवं दणदणाटी यंत्र माणसांनी विकसित केलंय म्हणे. कुठं तो टाळ मृदुंगाचा कानांत मधाचे थेंब थोडावेत असा गोडवा…सारंच काळाच्या ओघात हरपलं रे नारदा…
नारद- चिंता नसावी, महादेवा गणेशबाळ हुशार आहेत. ते वसुंधरानिवास्यांना या आणि अशा इतर विघ्नातून बाहेर पडण्याची सुबुद्धी नक्कीच देतील…त्याचसाठीतर त्यांच पृथ्वीतलावर जाणं जास्तच गरजेचं झालं आहे.
मला चिंता आहे ती दुसर्‍याच कारणाची…?
महादेव- नारदा…थांबलात का? बोलावे आमची हूरहूर वाढवू नये…तिथं सर्व कुशल मंगल आहे ना?
नारद- नाही…नाही, चिंता नसावी, महादेवा..तसं विशेष कारण नाही, पण महाराष्ट्र नगरीत येत्या काळात विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. लवकरच त्यांची आचारसंहिता लागणार आहे.
महादेव- आचारसंहिता…हे काय आहे नारदा?
नारद- महादेवा…आपणांस आचारसंहिता माहीत नाही, (मिस्कील हसतात) तिन्ही लोकांची खबरबात ठेवणारे आपण देवादिदेव महादेव आचारसंहिता म्हणजे निवडणूककाळात नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी कसं वागावं, म्हणजे काय करावं, काय करू नये? याची नियमावली आहे.
महादेव- अशी नियमावलीतर धर्माने मानवाला साडेपाच हजार वर्षापासूनच घालून दिलेली आहे. त्यात नवं काय? सत्याचं आचरण करावं, सत्य बोलावं आणि सत्याचीच बाजू घ्यावी, हा संदेश देवलोकांमधून पृथ्वीतलावर सातत्याने पोहचवण्यात आला आहे.
नारद- महादेवा…आपण खरोखरंच भोळे आहात. पृथ्वीतलावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी…म्हणजे थोडक्यात राजा निवडण्याच्या आधी या स्पर्धेत असलेल्या उमेदवारांसाठी काही नियम इलेक्शन कमिशनमधील सदस्यांनी, सॉरी, क्षमा असावी, इंटरनेट युगाचा परिणाम माझ्यावरही झाल्यानं अशी इंग्रजी शब्द मध्येच येतात, तर असे नियम निवडणूक आयोगानं तयार केलेले आहेत. टी.एन. शेषन नावाच्या एका मानवी सदगृहस्थाने त्यात मोठं योगदान दिलं होतं.
महादेव- पण अधूनमधून आम्हाला पृथ्वीतलावर नेते असलेल्यांच्या नावांचा डीजेच्या दणदणाट जयघोष ऐकू येतो. त्यावर या कमिनशनने काही उपाय केलेले आहेत की नाही?
नारद- केले आहेतच…पण मानव मोठा धूर्त आहे…त्याने त्यातूनही आपली सुटका करून घेतली आहे.
महादेव- ते कसं?
नारद- जी मंडळी आज सत्तेवर आहेत म्हणजे निवडणुकीतून जिंकून सत्तेच्या खुर्चीवर बसलेली आहेत. पराभूतांनी त्यांच्याच रांगेत जाऊन बसल्यावर त्यांना कुठलीही भीती नसतेे.
महादेव- भीती कसली भीती?
नारद- सीबीआय आणि इडीची
महादेव- इडा पिडा आम्ही ऐकली होती, ही इडी काय आहे. इडाची एखादी धाकटी बहीण तर नाही ?
नारद- अरेरे महादेवा…काय हे तुमचे अज्ञान? ईडी ही एक स्वायत्त यंत्रणा असते. त्यांना प्रत्यक्ष राजाची आणि दरबारातील प्रत्येकाची चौकशी करण्याचा अधिकार असतो?
महादेव- कुणाची चौकशी करते ही ईडी?
नारद- ज्यांच्यावर द्रव्यरुपी गैरव्यवहाराचा आरोप असतो, त्यांची…पण माणूस मोठा हुशार यातून सुटकेचा मार्गही त्यानं शोधला आहे.
महादेव- तो कसा काय?
नारद- थेट पक्षांतरच करायचं…म्हणजे गुन्हेगारीचे आरोप झाले…की जे आरोप करणारे आहेत थेट त्यांच्यातच जाऊन बसायचं. त्यांच्याच रंगात स्वतःला रंगवायचं मग आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप केले जातात त्यांच्यातला फरक नाहीसा होतो…
महादेव- अरे पण हा तर अधर्म झाला ? कुरुक्षेत्रात अधर्माचा पराभव झाला होता. हे मानव विसरला काय?
नारद- छे…छे…काहीही काय महादेवा…याला अधर्म नाही राजकारण म्हणतात आणि जनतेला सांगायला याला लोकशाही असंही गोंडस नाव माणसानं दिलं आहे. त्यामुळेच तर आरोप झालेले बाहेरचे आणि आरोप करणार्‍यांमध्ये सामील होण्यासाठी राजांच्या दरबारी रांगा लावून थांबलेले आहेत.
महादेव- अरे पण सर्प आणि मुंगूस यांनी एकमेकांना विरोध करण्याचं त्यांचं काम सोडलं तर निसर्गाचा तोल ढासळेल ना? हे खचितच योग्य नाही.
नारद- महादेवा…कुठल्या काळातली गोष्ट आपण करत आहात…? लोकशाहीत सर्प आणि मुंगूस असलं काही नसतं..ज्यावेळी सर्पाला मुंगूस व्हायचं असतं तो होऊ शकतो आणि ज्यावेळी मुंगूसाला सर्परुप धारण करायचं असतं तो तेही करू शकतो.
महादेव- मगतर चिंता आणखीनच वाढली की रे नारदा…माझा बाळगणेश या अशा लोकांमध्ये सापडण्याआधी त्याला ताबडतोब कैलासावर बोलवून घेतो…आम्ही त्याला बोलावले असल्याचा तेवढा त्याला संदेश द्यावा…नारदा
नारद- होय महादेवा बाप्पा आता तुम्हाला तिथून प्रस्थान करायला हवं..आत्ताच व्हॉट्सअ‍ॅप केलाय…बालगणेश निघण्याच्या तयारीतच आहेत..पण त्यातही काही खरेखुरे, निष्पाप भक्तांची ओढ त्याला सोडवत नाही…हे दरवर्षी असतं…पण राजदरबार्‍यांना सुबुद्धी देण्यासाठी ते थांबले आहेत. तेवढी बुद्धी वाटून झाल्यावर आणि पूरग्रस्तांना धीर दिल्यावर ते पुढच्या गाडीने निघणारच आहेत म्हणाले…तेव्हा चिंता नसावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here