घरफिचर्समाधुरी आणि आम्ही एकत्र रडलो !

माधुरी आणि आम्ही एकत्र रडलो !

Subscribe

माधुरी दीक्षितला चित्रपट क्षेत्रात पुढे आणण्यात ख्यातनाम सिनेछायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनाचा तो कार्यक्रम होता. माधुरी व्यासपीठावरील माईकजवळ बोलायला आली. पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. ती हमसून हमसून रडत होती. कसं बसं बोलत होती. ते पाहिल्यावर सभागृहातील आम्हा चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

आपल्या आयुष्यात कुठला योग कधी येईल ते काही सांगता येत नाही. कुणासोबत हसणे तर कुणासोबत रडणे कधी होईल याची कल्पनाही आपल्याला नसते. आपलं जीवन हे अनेक अनपेक्षित आणि अचंबित करणार्‍या विविध घटनांनी भरलेले असते. अशी काही लोकप्रिय माणसं असतात की, त्यांचे हसरे चेहरेच आपल्यासमोर असतात. त्यांचा तो हसरा चेहरा अनेकांना प्रेरणा देत असतो. मनात नवचैतन्य निर्माण करत राहतो.

आकाशातला पौर्णिमेचा चंद्रच जणूकाही पृथ्वीवर मानव रूप घेऊन वावरत आहे,असे या माणसांकडे पाहिल्यावर वाटत असते. धकधक गर्ल म्हणून जगभरातील करोडो चाहत्यांच्या हृदयात स्थानापन्न झालेली माधुरी दीक्षित हिचा हसरा चेहराच आपल्या समोर असतो. चित्रपटांमधील तिचं खळाळतं हास्य मनाला भुरळ पाडतं. चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या मनमोहक नृत्याभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकणार्‍या माधुरीला कधी तरी प्रत्यक्ष पाहता यावं, असं तिच्या चाहत्यांंना मनोमन वाटत असतं, माधुरीचा निस्सीम चाहता म्हणून मलाही असेच वाटत होते. माधुरीला याची डोळा पाहण्याचा योग्य यावा, याची मी वाटत पाहत असताना तसा योग आला. ख्यातनाम सिनेछायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा प्रथम स्मृतीदिन होता. हा कार्यक्रम प्रभादेवी येथील रवींद्रनाट्य मंदिरात होता. माधुरीला चित्रपट क्षेत्रात आणण्यामागे गौतम राजाध्यक्ष यांचे मोठे योगदान होते. कारण माधुरी जेव्हा स्ट्रग्लर होती, तेव्हा त्यांनी तिला मौलिक मदत केली होती.

- Advertisement -

त्यावेळी माधुरीचे आकर्षक फोटो काढून ते चित्रपट निर्मात्यांकडे पाठवण्यात गौतम यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या ‘बाप माणसा’बद्दल माधुरीला अपार आत्मियता आणि आदर होता. तिच्या हस्ते गौतम राजाध्यक्ष यांच्या प्रथमस्मृतीदिनी त्यांच्या सिनेछायाचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. कार्यक्रम सुरु झाला. निवेदिकेने एकएका सिलिब्रिटींची नावे घेऊन त्यांना व्यासपीठावर निमंत्रित केले. जेव्हा माधुरी दीक्षित हिचे नाव उच्चारले गेले, तेव्हा मी सगळा जीव डोळ्यात आणून माधुरीच्या प्रथम प्रत्यक्ष दर्शनासाठी श्वास रोखून बसलो होतो. तेवढ्यात तिचा व्यासपीठावर प्रवेश झाला. स्वर्गातून जणूकाही अप्सरा उतरावी, असेच भासले. ती व्यासपीठावरील निवडक सेलिब्रिटींच्या मध्ये बसली. एक एक सेलिब्रिटी गौतम राजाध्यक्ष यांच्या कलागुणांविषयी बोलत होता. त्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गौतम यांच्या विविध आठवणी सांगितल्या. शेवटी माधुरी बोलायला उभी राहिली.

माधुरी उभी राहिल्यावर सगळे सभागृह खुलले. पण जेव्हा माधुरी बोलायला माईकजवळ आली, तेव्हा मात्र सभागृहातील वातावरण बदलले. कारण तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. कारण गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवणींनी तिचा कंठ दाटून आला होता. त्यांच्याविषयी ती एक एक आठवण सांगू लागली. त्यांच्या मृत्यूची बातमी तिला अमेरिकेत कळली. पण सुरुवातीला त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. गौतम यांच्या अशा अचानक जाण्याने ती खूप दु:खी झालेली होती. त्यांच्या आठवणी सांगताना ती हमसून हमसून रडत होती. तिला बोलणेच अवघड होऊन बसले होते. बोलता बोलता ती रडत होती. ते पाहून सभागृहात बसलेल्या आम्हा चाहत्यांची मने माधुरीच्या दु:खात बुडून गेली होती. माधुरीच्या दर्शनाने प्रसन्न झालेल्या सभागृहात आता प्रचंड खिन्नता पसरली होती. सभागृहात बसलेले आम्ही सगळे माधुरीमय होऊन अक्षरश: तिच्यासोबत रडत होतो.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -