घरफिचर्सआम्ही बदलणार नाहीच...

आम्ही बदलणार नाहीच…

Subscribe

मार्चच्या मध्यावर कोरोना नवा होता. आता नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्याने कोरोनाचे गांभीर्य पुरते कमी झाले आहे. कोरोना नावाचा विषाणू चीनमधून देशभर पसरतोय, तो येणार आहे या चर्चेत कमालीची भीती होती. केरळमध्ये पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर ती ऐतिहासिक अशी ब्रेकींग न्यूज होती. त्यानंतर पुण्यामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला, पुढे मुंबई आणि हळूहळू देशात अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागल्यावर कोविड १९ ची भीतीही पसरू लागली. बंद पुकारण्यात आला. थाळ्या, टाळ्या वाजवण्यात आल्या, दिवे लावले गेले. हे सर्व भावनिक सोपस्कार झाल्यानंतर कोरोनाबाबत ज्या गांभीर्याने आणि जबाबदारीने पावले उचलण्याची गरज होती. ती जबाबदारी पुरेशी पार पाडली गेली नाही. थाळ्या वाजवल्याने कोरोनाविरोधात लढणार्‍यांचे मनोबल उंचावेल त्यांच्या कोरोनाविरोधातील लढाईत त्यांच्या पाठिशी जनता आहे. हे दर्शवण्यासाठी हा थाळी इव्हेंट केला गेला होता. यामुळे कोरोनाविरोधात लढणार्‍यांचे मनोबल किती वाढले आणि त्याचा नक्की कोरोनाविरोधातील लढाईत किती उपयोग झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा.

कोरोनाविरोधाच्या लढाईत संपूर्ण देश लॉकडाऊन होईल, कोरोनामुळे जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या आपल्या देशात कोरोनाचा दूरगामी परिणामच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात येण्याइतका गडद परिणाम होईल. हा धोका माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी ओळखला होता. त्यांनी याबाबत वेळोवेळी सरकारला सूचितही केले होते. मात्र, धोरणात्मक प्रयत्नांपेक्षा भावनिक मुद्यांना महत्त्व देणार्‍या सरकारला हे पटणे दुरापास्त होते. भावनिक मुद्दे पालिका किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही निषेधार्हच असतात. कायदा भावनेवर चालत नसतो आणि कायदेमंडळ तर भावनेवर बिलकूलच चालता कामा नयेत. भावनेवर आधारित सत्ता लोकशाहीत स्थापन झाल्यास त्याचा परिणाम सद्य स्थितीत देशात कोरोनावरून जो काही गोंधळ सुरू आहे त्यावरून येऊ शकतो. हा गोंधळ आजचा नाही. अगदी पहिल्या दिवशी थाळ्या बडवण्यापासून ते येत्या १५ ऑगस्ट रोजी कोरोनाची लस येणार इथपर्यंत या गोंधळाची आणि फसलेल्या नियोजनेची मालिका आहे. कोरोनावरून केंद्र आणि राज्यातील संघर्ष हा पुन्हा त्यातला वेगळा मुद्दा आहे.

- Advertisement -

कायदा, धोरणात्मक नियोजनापेक्षा इव्हेंटपूर्ण भावनेला महत्व दिल्याने कोरोना जाणार नव्हता. परंतु, देशातील नागरिकांना भावनिक राजकारणाची सवय आहे. भावनेवर राजकारण खेळले जाऊ शकते, सत्ता मिळवलीही जाऊ शकते. परंतु, भावनेच्या बळावर राज्य, देशकारभार चालवणे धोक्याचे असते. धोरणात्मक अपयशाबाबत लोकशाहीत लोक प्रश्न विचारतातच…मात्र अशा वेळी लोकांना भावनेची गोळी देऊन प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रकार लोकांच्या उशिरा का होईना लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळेच जीएसटी, नोटबंदी, डिजिटल इंडियाच्या धोरणात्मक अपयशाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नांना जसे टाळले गेले तसे कोरोनाबाबतच्या अपयशला टाळता येणार नाही. येत्या स्वातंत्र्यदिनी कोरोनावरील लस देशात दाखल होणार ही टूम कोणी, का काढली याचा शोध घेतल्यास त्यामागील कारणेही लक्षात येतील.

वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात तपासणी, चाचणी आणि खात्रीला महत्त्व असते. त्यासाठी काळाला पर्याय नसतो. या चाचण्या आणि तपासणीअंतीच संबंधित शोधाची खात्री देता येते. अशी खात्री करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हा वेळ शारीरिक क्षमतांच्या अभ्यासासाठी असतो. शरीरावरील घटकांच्या परिणामांसाठी द्यावाच लागतो. वैद्यकीय क्षेत्रातील शोध किंवा तपासाबाबतच्या कसोट्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्देशांना अधीन असतात. त्यात एकाधिकारशाहीतून बदल केला जात नसतो. कोविड १९ वर लस शोधण्याची घाई करून १५ ऑगस्टची तारीख जाहीर करणार्‍यांना कदाचित हे माहीत नसावे, त्यामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले. आपल्याकडे याबाबत असले दर्जाहीन राजकारण सुरू असताना कुठल्याही बातमीचा विषय नसलेल्या रशियाने जागतिक महासत्ता आणि युरोपातल्या देशांच्याही पुढे जाऊन ही लस बनवली त्याची चाचणी यशस्वी झाल्याचे जगाला योग्य वेळी सांगितले. कोरोनाचाही राजकीय फायदा कसा करता येईल, यासाठी वस्तुपाठ आपल्या देशातील काही मोठ्या राजकारण्यांनी घालून दिला आहे. मोठमोठे निर्णय हे लोकांना दिलासा देण्यासाठी घ्यायचे की राजकीय उद्दीष्ट साध्य करण्यासाठी हा प्रश्न आहे.

- Advertisement -

कोरोनाविरोधात लढ्यासाठी ४० हजार कोटींच्या पॅकेजबाबतही असेच ढोल पिटण्यात आले. त्याआधी नोटबंदीपासून ते डिजिटल इंडियापर्यंतचे असे ढोल आपण ऐकले होते. हे ढोल किती पोकळ होते, ते बडवून फुटल्यावर स्पष्ट झाले. थाळीनाद, दिवे आणि हे ढोल बडवणे अजूनही सुरूच आहे. कोरोनाच्या विषाणूला हे पुरते कळून चुकले आहे की ढोल बडवण्याशिवाय ठोस धोरणात्मक उपाय करणारे इथे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे आपण आणखी काही दिवस इथे आरामात मुक्काम करू शकतो. इथल्या राजकारण्यांना आपला संसर्ग होणार्‍यांना बेड्स मिळतात की नाही, या चिंतेपेक्षा सत्तेच्या खुर्चीची चिंताच जास्त असल्याने आपल्याला इथे काहीही धोका नाही, हे कोविड 19 च्या विषाणूला समजले आहे. ही उदासीनता केवळ धोकादायकच नाही तर जीवघेणीही आहे. ही उदासीनता जशी वाढत आहे तशी कोरोनाची नागरिकांच्या मनातील भीतीही कमी होत आहे. भीती कमी होण्यापेक्षा नागरिक आता हतबल झाले आहेत. मागील तीन महिने कसे तरी काढले, मात्र, यापुढे घर चालवणे कठीण होणार असल्याचे सामान्य नागरिकांनी ओळखले आहे. त्यामुळे धोका पत्करून नागरिक काम, व्यवसायावर निघाले आहेत.

एकीकडे संसारगाडा चालवण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या बातम्याही येत आहेत. या दुहेरी कात्रित सामान्य माणूस सापडला असताना सरकारी यंत्रणा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील काही संधीसाधूंनी कोरोनातही आपला भीतीचा धंदा सुरू केला आहे. यातून कोरोनाला घाबरलेल्या गोरगरीब नागरिकांची लुबाडणूक होत आहे. साधा ताप असलेल्या आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाही केवळ आर्थिक फायद्यासाठी खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणीचे सल्ले दिल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय एका लॅबमध्ये कोरोना पॉझिटिव्ह तर दुसर्‍या लॅबमध्ये त्याच पेशंट्सचे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट्सही आले असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एका कोरोना वॉर्डमध्ये साधारण दहा ते पंधरा पेशंट्स असल्यास त्यांची तपासणी करणारा एकच डॉक्टर एका वेळी राऊंडला आल्यास त्याने एकच पीपीई किट परिधान केलेला असतो. या एकाच किटवर तो राऊंडमध्ये इतर सर्व रुग्णांची तपासणी करतो. परंतु, कोरोनाचे बिल लावले जात असताना प्रत्येक पेशंटकडून पीपीई किटची रक्कम बिलातून वसूल केली जाते. हे एक उदाहरण झाले. मात्र, अशाच पद्धतीने अव्वाच्या सव्वा बिल वसुली केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

सरकारकडून चालवल्या जाणार्‍या कोरोना केंद्रातून पेशन्ट्स पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिकांच्या कमतरतेचा प्रश्न आहे. अनलॉक झाल्यावर पुन्हा लॉकडाऊन वाढण्याचे निर्णय घेतले जात आहेत. हे सरकारी यंत्रणांचे धोरणात्मक अपयशच आहे. पोलीस, डॉक्टर्स आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना कोरोनामुक्त झालेल्या विभागांचे श्रेय कसे आपलेच होते, हे सांगण्यासाठी खोटेपणाचे कळस गाठले जात आहेत. सर्वसामान्यांना होणारा कोरोना किंवा वाढलेली संख्या आता बातमीचा विषय राहिलेला नाही. त्यासाठी सेलिब्रिटींच्या कोरोनाच्या बातम्यांनी माध्यमांचे पडदे भरले जात आहेत. कोरोनामुळे जग बदलेल किंवा नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, आपल्या राजकारण्यांची सत्तेची लालसा, नागरिकांप्रती असलेली उदासीनता, दांभिकता, नागरिकांची मूर्ख भावनिकता आणि सुरक्षा व्यवस्थेची हतबलता कधीही बदलणार नाही, हे कोरोनानंतरच्या या चार महिन्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -