घरफिचर्सगुढीपाडव्याला मुहूर्त करा,शेअरबाजाराची कास धरा

गुढीपाडव्याला मुहूर्त करा,शेअरबाजाराची कास धरा

Subscribe

मराठी माणसाने शेअरबाजार, रिअल-इस्टेट, आयटी, कंत्राटदारी, स्वयं-रोजगार अशा अनेकविध क्षेत्रात त्याने यशस्वी पाऊल टाकलेले आहे. गुढीपाडव्याला आपण हिंदू नववर्षाचे स्वागत करुयाच, पण त्याचसोबत सांस्कृतिक-सामाजिक -पारंपरिक संपन्नता जोपासत असताना ‘आर्थिक समृद्धीचा’ वसा जोपासुया. विशेषत: शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी जाणून घेऊया.

आपण जानेवारीला इंग्लिश नवीन वर्ष साजरे करतो आणि गुढीपाडव्याला ‘शोभा-यात्रेत’ सामील होतो. असे दोन्ही करण्याने आपल्याला एकाचवेळी ‘ग्लोबल’ आणि ‘लोकल’ झाल्याचे अतीव समाधान मिळते. आपण धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्य जपण्याबाबत अधिक जागरुक किंवा आग्रही असतो. बाकी पैसा कमावणे -धन-वृद्धी करणे तितके महत्त्वाचे मानत नाही. कारण नोकरी आहे-‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ असे पूर्वापार धोरण असल्याप्रमाणे अधिक पैसा का कमवायचा? उगाच कोणाच्या नजरेत येईल, अशीच अनेक पिढ्यांची मानसिकता असायची, पण हळुहळू मराठी मानसिकता बदलू लागली.

- Advertisement -

आजुबाजूचा समाज अधिक पैसा कमावतो आहे. (व्यवस्थित हात-पाय पसरतो आहे) आणि आपल्याकडे फक्त ‘गिर्‍हाईक’ म्हणून बघितले जाते हे लक्षात आले. तरुण पिढीने पैसा आणि संपत्ती निर्माणाची गरज ओळखली आणि त्यादृष्टीने शैक्षणिकपात्रता वाढवून, प्रोफेशनल शिक्षण घेऊन चांगल्या नोकर्‍या मिळवण्याची अक्कल-हुशारी दाखवली. इतकेच नव्हे तर व्यापार- उद्योग-व्यवसायात अनेक घराण्यांनी आपली मुद्रा निर्माण केली. मराठी माणूस म्हणजे केवळ नाटक आणि राजकारण नव्हे तर चांगले जॉब्ज आणि बिझनेस ह्यातही अग्रेसर आहे. इतकेच नव्हे तर शेअरबाजार, रिअल-इस्टेट, आयटी, कंत्राटदारी, स्वयं-रोजगार अशा अनेकविध क्षेत्रात त्याने यशस्वी पाऊल टाकलेले आहे. त्यामुळे आपण हिंदू नववर्षाचे स्वागत करत असताना सांस्कृतिक-सामाजिक -पारंपरिक संपन्नता जोपासत असताना ‘आर्थिक समृद्धीचा’ वसा जोपासुया आणि हे का आणि कसे करायला पाहिजे हेदेखील जाणून घेऊया.

पार्श्वभूमी-सण खर्चाचे आणि कमाईचे. दिवाळीमध्ये येणार्‍या सर्वात मोठ्या अमावस्येला म्हणजेच लक्ष्मी-पूजनाच्या दिवशी (म्हणजे दिवाळी पाडव्याच्या आदल्या दिवशी) उद्योग आणि व्यापारी समाजातील मंडळी उत्साहाने मुहूर्ताचे सौदे करून शेअरची खरेदी-विक्री करतात आणि सण साजरे करताना आपल्या घरात-व्यापारात लक्ष्मीचा सदैव वावर कसा राहील ह्याचा डोळसपणे विचार करतात. सणात पैसा कमावणे आणि उडवणे असा समतोल विचार करतात आणि आपण मात्र आज ऋण काढून सण साजरा करायला निघालेलो असतो. हाच तर मुख्य फरक आहे, पण एक लक्षात घेतले पाहिजे की, मुळात पैसा कमावणे हे काही गैर नव्हे. अर्थात सर्वांनाच तसे कौशल्य असते किंवा पोषक परिस्थिती असतेच असे नाही. म्हणून कोणी प्रयत्नच करू नये, असे थोडेच आहे? आपण केवळ नोकरी आणि चाकोरीतले उत्पन्न कमाईचे मार्ग ह्यावरच अधिक विसंबून न राहता आपली मिळकत कशी वाढेल आणि संपत्ती निर्माण होईल ह्याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे.

- Advertisement -

उदाहरणार्थ – तुमच्या लक्षात आले की, बँकांचे ठेवींवरील व्याजदर गेले काही महिने ठप्प आहेत आणि नजीकच्या काळात वाढतील अशी शक्यता नसेल तर तिथे पैसे का अडकवून ठेवायचे? जेव्हा वाढतील,तेव्हा होईल फायदा, असे रामभरोसे धोरण आजच्या काळात कामाचे नाही. ते पैसे लागलीच फिरवून म्युचुअल फंड किंवा थेटपणे गुंतवण्यात आपले व्यवहारीक शहाणपण आहे. इतर अनेक जण असे व्यवहार्य निर्णय घेतात, मग आपल्याला कोणी रोखले आहे? आपसूक काही होईल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल, अशा भाबड्या विचाराने जगण्याचे दिवस नाही राहिलेत ना बाप्पा.

शेअरबाजार गुंतवणूक – शेअर्स-व्यवहार जाणून घेऊया – पब्लिक लिमिटेड कंपन्या, सरकारी कंपन्या आणि बँका आपल्याला भांडवल उभारायचे म्हणून बाजारात शेअर्स विकायला आणतात. पब्लिक इश्यू वगैरे तपशील आपण आतातरी पाहणार नाही. शेअर्सची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर शेअरबाजार (मुंबई व राष्ट्रीय) याठिकाणी चालते आणि त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते हे तर आपल्याला सर्वसाधारणपणे ठावूक असते.

शेअर्सची खरेदी-मुळात एखाद्या कंपनीचे शेअर्स हे गुंतवणूकदारांना का घ्यावेसे वाटतात, त्याची काही ठळक कारणे असू शकतात, हे आपण पाहणार आहोत.

१) कंपनी चांगली आहे की नाही? – असे जर लोकांना समजले की, त्यात गुंतवणूक करण्याचे म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स घेण्याचे प्रमाण वाढते. चांगली कंपनी म्हणजे काय? मोठे आलिशान ऑफिस आहे, त्यांची फॅक्टरी फारच मोठी आहे किंवा त्यांचे संचालक हे मोठे राजकारणी किंवा बडे-प्रस्थ आहेत. छे छे अशा दिखावू किंवा चमकदार कारणांनी कोणी एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत नाही. ठोस कारणे लागतात, ती पुढीलप्रमाणे-
१) कंपनीची कामगिरी कशी आहे? म्हणजे सातत्याने नफा कमावते आहे की नाही? लाभांश म्हणून शेअरहोल्डर्सना देते आहे की नाही? कधी तोटा आला असल्यास त्याची काय कारणे असू शकतात? हे जाणून घेणे महत्वाचे असते. केवळ पूर्वीची दमदार कामगिरी पाहून पैसे टाकण्याची चूक करू नका. कारण आजची स्थिती आणि प्रगतीदेखील तितकीच मोलाची असते.
२) कंपनी कोणत्या उद्योग-व्यवसायात आहे? त्याची आजची स्थिती कशी आहे? देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि जीडीपी निर्मितीत कितीसा वाटा आहे? सरकारचे उद्योग धोरण आणि कंपनीचे उत्पादन दोन्ही सुसंगत आहे की, नाही? निर्यात करीत असल्यास कोणते देश आहेत? आणि तेथील निर्यात धोरण पोषक आहे ना ? हे पडताळून पाहणे जरुरीचे असते. कारण कमाई आणि उत्पादन ह्यांचा परस्परांशी जवळचा संबंध असतो. उत्पादन जसे निर्धोक व्हावे लागते तसेच विक्री-वितरण ह्याबाबत असते. देशांतर्गत विक्री असो की, परराष्ट्रातील असो -असंख्य घटक, धोरणे सकारात्मक असतील तर ठरवलेली उद्दिष्ठ्ये गाठता येतात, अन्यथा विपरीत परिणाम होऊ शकतो.
३) एखाद्या कंपनीची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी डोळसपणे पाहिली तरी उद्योगातील चढ-उतार ध्यानात येऊ शकतात. तसे होण्याची कारणे योग्य असतील आणि त्याबाबत कंपनी व्यवस्थापनाने (संचालक मंडळाने) योग्य निर्णय-तजवीज आणि उपाययोजना केली आहे की नाही? हे पाहणे जरुरीचे असते. ह्यातून कळू शकते की, कंपनीचे व्यवस्थापन किती कुशल आणि व्यावसायिक आहे की नाही?
४) कंपनी सेवा-क्षेत्रातील असल्यास त्यांचे नियमित ग्राहक कोण? कोणत्या प्रकारची सेवा कंपनीमार्फत पुरवली जाते? हे लक्षात घेतले पाहिजे.

उदाहरणार्थ – हॉटेल-उद्योगात असल्यास कशाप्रकारचे आहे? ग्राहक कोण? देशी की पर्यटक? अशी माहिती मिळाल्यावर योग्य माहिती आणि पृथक्करण करणे गरजेचे असते.
सेवा-क्षेत्रासाठी कोणते कर आहेत? सध्या कोण स्पर्धक आहेत? त्यांच्याकडे ग्राहक का जातात? त्यांच्या सेवेची वैशिष्ठ्ये कोणती? हे काही निकष पाहिले तर एखादी कंपनी अधिक नफा कसा कमावते किंवा शेअर्सची किंमत सतत चढत्या भावानेच का असते? अशा कारणांची उत्तरे मिळू शकतात.

शेअरची किंमत कशी कमी-जास्त होते आणि त्याचे परिणाम –
आपण अनेकदा ऐकतो की, अमुक कंपनीचा शेअरचा भाव कोसळला किंवा भलताच चढला. हे नेमके कशामुळे होते? नेमकी कारणे काय ? ते आपण पाहणार आहोत. शेअरबाजार हा अतिशय नाजूक म्हणजेच संवेदनशील असा असतो. लोकांच्या-गुंतवणूकदारांच्या भावनांच्या लाटेवर चालतो असेही म्हणता येईल. आपण काही नित्य कारणे पाहूया-ज्यामुळे मार्केटमध्ये मोठे बदल होत असतात.

१) जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम -विदेशी बाजारातील पडझडीचे परिणाम
२) देशातील राजकीय उलथापालथीचे पडसाद
३) आर्थिक घडामोडी वा केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाची बाजार-प्रतिक्रिया
४) एखाद्या उद्योगाबाबत किंवा कंपनीबद्दल बातमी किंवा अफवा पसरल्याने होणारे चढ-उतार
५) सामाजिक परिस्थिती -म्हणजेच दंगा, नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना
६) गुंतवणूकदारांची बदलती मानसिकता-जे काही बदल घडताहेत त्यावरची जणू प्रतिक्षिप्त-क्रिया म्हणून बाजार उसळणे किंवा आकस्मिकपणे कोसळणे
७) एखाद्या कंपनीबाबत कृत्रिम हवा निर्माण करणे किंवा आवई उठवून गैरफायदा उठवण्याचा काही बाजार-म्होरक्यांचा प्रयत्न
८) सार्वत्रिक निवडणुकांचे जाहीर झालेले निकाल -त्यावरची तात्कालिक प्रतिक्रिया
९) अर्थ-व्यवस्थेतील होणारी महत्त्वाची स्थित्यंतरे
१०) परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर केलेली खरेदी किंवा विक्री

मागणी आणि पुरवठ्याचे गणित-आपण खरेदी-विक्री करू पाहतो, अशावेळी आपण शेअरबाजार निर्देशांकाकडे लक्ष ठेवायचे आणि दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून काही नामांकित कंपन्यांचे शेअर्स योग्य भावात खरेदी करायचे. मात्र, उतावळेपणाने झटपट पैसा कमावण्यासाठी खरेदी-विक्रीच्या मोहात पडायचे नाही. जेव्हा बाजार कोसळतो, तेव्हा बरेचजण असलेले शेअर्स काढून टाकण्याची घाई करत असतात, मिळेल तो भाव आला तरी चालेल, अशी अपेक्षा असते. मार्केट पडलेले असते तेव्हा खरेदी करणे चांगले आणि जेव्हा मार्केट निर्देशांक वर जात असतो तेव्हा काही कंपन्यांचे शेअर्सचे भाव चढलेले असतात. तेव्हा महागड्या किमतीला घेणे चुकीचे आहे. एखाद्या कंपनीच्या शेअर्सला जास्त मागणी आली, खरेदी करणारे वाढू लागले की, किमती वाढू लागतात, तेव्हा खरेदी करण्याची चढाओढ सुरू झाली तरी आपण सावध राहून खरेदी टाळायची असते आणि जेव्हा मागणी कमी झाली (अनेकजण शेअर्स विकू लागले) पुरवठा वाढला की, भाव खाली येतात,अशावेळी आपण कमी किमतीचा लाभ घेऊन खरेदी करायची असते. हे तत्व लक्षात ठेवले पाहिजे आणि विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. ऐकीव माहिती किंवा प्रासंगिक लाट-बाजार-अफवा ह्यावर अजिबात विसंबून राहू नये.

ज्याला नीट विचार करून चांगल्या कंपनीचे शेअर्स हे गुंतवणूक म्हणून घ्यायचे आहेत त्यांनी त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीचा थोडा बारकाईने अभ्यास करावा. आपल्याला एखाद्या कंपनीचे गेल्या ५२ आठवड्यातील उच्चांक आणि नीचांक किमतीचे आकडे कळू शकतात. त्यावरून सध्या चालू असलेला भाव योग्य आणि रास्त आहे का? आपल्याला कल कळू शकतो आणि त्यानुसार आपण खरेदीचा, विक्रीचा निर्णय घेऊ शकतो. एखाद्या कंपनीच्या शेअरच्या भावाची हालचाल आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते.

उदाहरणार्थ – अमुक कंपनीच्या शेअरचे ५२ आठवड्यातील भाव खालीलप्रमाणे असतील –
सर्वोच्च किंमत- रु ९७५/-खाली आलेला भाव – रु ५६०/-
आणि सध्याचा भाव समजा रु ७००/- असेल तर खरेदीस योग्य आणि सर्वोच्च किंमतीच्या जवळ असेल म्हणजे रु ९००/- तर भाव जास्त म्हणून घेऊ नये. आपल्याला खरेदी असो वा विक्री ह्याबाबत निर्णय घेणे सोपे ठरू शकते. म्हणजे खरेदी करायची असेल तर भाव अजून खाली जाईल म्हणून वाट बघणे किंवा विकताना अधिक उच्चांक गाठेल तोवर वाट बघायची का ? हे ठरवता येते.

आज शेअरबाजार,अनेक कंपन्या आणि त्यांची कामगिरी आणि शेअर्सच्या किमतीचे आकडे सहजपणे उपलब्ध होत असतात. आपण त्यांचा अभ्यास केलात, तुलनात्मक आढावा घेतलात आणि माहिती देणारे लेख वाचत राहिलात, तर तुमचे बाजार-ज्ञान वाढेल किंवा किमान माहिती तुम्हाला कळू शकेल. तुम्ही स्वतः काही कंपन्यांच्या शेअरचे भाव लिहून ठेवू लागलात तर तुम्हाला होणारे बदल जाणवतील. त्याची कारणे काय असू शकतात? हा तज्ज्ञांच्या अभ्यासाचा भाग असू शकतो, पण किमान माहिती घेणे हेही जरुरीचे आहे. उच्चांक किंमत आणि खाली असलेली ह्या तुलनेत सध्या काय भाव चालू आहे हे जाणून घेणे अवघड नाही. बरोबर ना? शेअरबाजार अवघड नाही, पण बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि घाई न करता खरेदी-विक्री केलीत आणि मुळात शॉर्टकट टाळू शकलात तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून नक्कीच योग्य पर्याय आहे. आपण यापुढेही अशी माहिती घेत राहू. आर्थिक वर्ष आणि नवीन वर्ष सुरू होते आहे. आपण गुंतवणुकीसाठी सज्ज राहूया.

-राजीव जोशी- बँकिंग आणि अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -