Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर फिचर्स गावपळण

गावपळण

गावपळण म्हणजे नक्की काय? गावपळण ही मालवण तालुक्यातील आचरे, चिंदर या गावांची सांस्कृतिक परंपरा आहे. जी दर तीन वर्षांनी साजरी केली जाते. दर तीन वर्षांनी तीन रात्रींसाठी संपूर्ण गाव घरातल्या कोंबडी-कुत्री, गुराढोरांसह गावच्या वेशीवर येऊन राहतो. संपूर्ण गाव निर्मनुष्य करतात. यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्या परंपरेचा सामाजिक, धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ठ्या विचार करता ही गावपळण एक प्रकारे वरदानच ठरते.

Mumbai

तळकोकणातल्या अनेक गावात विविध प्रथा प्रचलित आहेत. मागे एकदा जयवंत दळवींचं गाव बघावं म्हणून आरवलीला गेलो होतो. तिथे वेतोबाच्या देवळात दर्शनाला गेलो तेव्हा तिथल्या पुजार्‍यांनी सांगितलं की, उत्सवाच्या वेळी या वेतोबाला हातभर लांबीचे पायताण चढवतात आणि रसबाळी केळ्याचा प्रसाद देतात. एखाद्या देवालयात जाताना पायातली पायताण देवालयाच्या आवारातदेखील न घेऊन जाणारे इथे प्रत्यक्ष वेतोबाला त्या ग्रामदेवतेला पायताण चढवतात? अशी ही विचित्र पद्धत ऐकून मला आश्चर्य वाटले. त्यावेळी तिथे उपस्थित असणार्‍या गावकर्‍यांनी या गोष्टीचा खुलासा केला. वेतोबाला अर्पण केलेले पायताण घालून वेतोबा त्या आरवली गावाचं रक्षण करतो अशी त्या लोकांची धारणा आहे. अशा अनेक आख्यायिका आपणास ऐकावयास मिळतात. त्या समजून घ्यायला विचित्र वाटतात. पण त्यांच्यामागे मूळ शास्त्रीय कारणेदेखील लपलेली असावीत.

काही शास्त्रीय कारणे त्या समाजजीवनाला सहजासहजी मान्य होत नसतात म्हणून कदाचित त्याला धार्मिकतेचा लेप लावला असावा असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. एखादी परंपरा जेव्हा चालू होते त्यामागे पूर्वजांचा काहीतरी सामाजिक आणि त्याचबरोबर वैश्विक हेतू जाणून घ्यायचा विचार केला तर आपले पूर्वज हे काळाच्या फार पुढचा विचार करत होते ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. हा सर्व लेखनप्रपंच मांडण्याचे कारण सातआठ वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातल्या आचरा गावतल्या अशाच एका परंपरेबद्दल ऐकायला मिळालं. आचरा, चिंदर ही गावं गावपळण या परंपरेशी निगडित आहेत.

ही गावपळण म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी कणकवलीला साहित्यप्रेमी जेष्ठ मित्र डॉ. विद्याधर करंदीकर यांना भेटलो. त्यांनी जी माहिती दिली आणि गेल्यावेळेला गावपळण बघितल्यामुळे ही परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नसून त्याकडे शास्त्रीय दृष्टीने बघितलं तर त्या परंपरेचे महत्व आपणास समजून येईल. त्या काळात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हा विषय उचलून धरल्याने गावपळण या विषय अजून प्रकाशझोतात आला. एकंदरीत गावपाळणीचे स्वरूप बघितले तर त्यावर थेट ही अंधश्रद्धा आहे असं लेबल लावणं चुकीचं आहे. उद्या कोणी म्हणाले की, मी उपवास करतो तर लगेच ती अंधश्रद्धा आहे किंवा तो खूप श्रद्धाळू आहे हे म्हणणे जसं चुकीचे ठरतं त्याचप्रमाणे या गावपळणीबद्दल म्हणता येईल. कोण म्हणतं उपवास आम्ही शारीरिक स्वास्थासाठी करतो, कोण म्हणतं की, सामाजिक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात म्हणून आम्ही उपवास करतो त्याप्रमाणे प्रत्येक परंपरेचं एक वेगळं महत्व अधोरेखित करता येऊ शकतं.

गावपळण म्हणजे नक्की काय? गावपळण ही मालवण तालुक्यातील आचरे, चिंदर या गावांची सांस्कृतिक परंपरा आहे. जी दर तीन वर्षांनी साजरी केली जाते. दर तीन वर्षांनी तीन रात्रींसाठी संपूर्ण गाव घरातल्या कोंबडी-कुत्री, गुराढोरांसह गावच्या वेशीवर येऊन राहतो. संपूर्ण गाव निर्मनुष्य करतात. यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्या परंपरेचा सामाजिक, धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ठ्या विचार करता ही गावपळण एक प्रकारे वरदानच ठरते. आचरे हे गाव जवळपास सात-आठ हजार वस्तीचे गाव. गावात बारा वाड्या आहेत. त्यात अनेक उपवाड्या. रामेश्वर हे या गावचं दैवत. आचरा येथील रामेश्वराची गादी ही मुख्य समजली जाते. गावपळणीसाठी तारीख ठरवताना देवाचा कौलप्रसाद घेतला जातो. एकदा देवाचा हुकूम मिळाला आणि तारीख निश्चित झाली की, गावपळणीच्या दिवशी पहाटे संपूर्ण गाव जागे होते.

प्रत्येक वाडीने तीन दिवस एकत्र राहण्याची व्यवस्था कुठेतरी केलेली असते. तीन दिवस लागणार्‍या कपडे-लत्त्यासह गाव भल्या पहाटे तयार होते. दुपारचा प्रहर उतरला की, रामेश्वराच्या देवळातील मानकरी पुन्हा देवळात एकत्र येतात. देवाच्या पुढे गार्‍हाणे घालतात. बा देवा, रामेश्वरा, हाती घेतलेल्या कामात यश दी. रायरयत सुखी ठेव, असं म्हटल्यावर गावकरी ‘व्हय म्हाराजा’चा गजर करतात. गावपळणीची घोषणा झाल्यापासून आचरा गाव दुमदुमून जातो, जो तो गावकरी नदीच्या दिशेने पळतो आणि गावपळनीच्या दिवसात राहण्यासाठी झोपड्या बांधतात. तळकोकणात त्यांना कावण म्हणतात. ही कावणं साधारणपणे नारळाच्या झावळ्याचा वापर करून तयार केलेली असतात. रामेश्वराच्या देवळातील गार्‍हाणी झाली की, रामेश्वर संस्थानातील तोफा धडाडू लागतात आणि गावकरी देवळाच्या नगार्‍याच्या आणि नौबतीच्या तालावर नदीपलीकडची वाट चालू लागतात. त्यावेळी आचरा-मालवण रस्ता संपूर्ण माणसांनी भरला जातो.

त्या काही मिनिटात गाव संपूर्ण निर्मनुष्य होते. गावात फक्त वारा वाहतो. यावेळी गावच्या दिशेने कोणी ओरडलं तर तो आवाज परावर्तीत होत असावा. संपूर्ण गावात औषधालादेखील माणूस राहिला नसल्याने प्रकाशाला अडथळा होत नसावा ना ध्वनी परावर्तीत करण्यासाठी अडथळा होत असावा. या संपूर्ण तीन दिवसात ध्वनी आणि प्रकाशाची कंपने किती वेग घेत असतील. निर्वाती वातावरणात जसा स्वच्छ प्रकाश परावर्तीत होत असावा तेवढ्याच क्षमतेने या तीन दिवसात गावातील घरात हवा आणि प्रकाश खेळता राहतो या गोष्टीचा विचार केला तर आपल्या पूर्वजांना विज्ञान आपल्यापेक्षा जास्त कळत होतं, हे कळतं. त्यांना माहीत असलेले शास्त्र ते आत्मसात करत होते, हे दिसतं. भौतिकशास्त्रातील या घटना गावपळणीनंतर अनुभवता येत असाव्यात.

रस्त्यावरुन मजलदरमजल करत सर्व गावकरी नदीपलीकडे आचरे गावची सीमा ओलांडून येतात. आपापल्या कावणात वस्ती करतात. खाली धरती आणि वरती आकाश, आजूबाजूला नारळाच्या झावळ्या. अशा या वातावरणात गावकरी का राहत असतील…..? . याला शास्त्रीयदृष्ठ्या आधार नाही, पण या तीन दिवसात गावकरी बाहेर का राहतात याची रंजक कथा सांगितली जाते ती अशी-फार वर्षापूर्वी आचरे गावात भुतांनी धुमाकूळ घातला होता. या भुतांच्या छळनुकीला लोक कंटाळून गेले होते म्हणून शेवटचा पर्याय म्हणून सर्व लोक रामेश्वराला शरण गेले. कौलप्रसाद झाला. रामेश्वराने कौल दिला-मला तीन दिवस गाव मोकळा करून द्या. मी भूतांचा बंदोबस्त करतो. देवाला गाव मोकळा करून दिला. तीन दिवसात भूतांचा बंदोबस्त झाला. गाव पुन्हा गुण्यागोविंदाने नांदू लागला. तेव्हापासून दर तीनवर्षांनी ही प्रथा पाळली जाते. अर्थात हा युक्तिवाद किती खरा आहे हे तो रामेश्वर जाणो. पण अणू हा विश्वातला सर्वात लहान घटक मानला तर त्यात ऋणभार असणारा इलेक्ट्रॉन आणि धनभार असणारा प्रोटॉन आहे आणि विशेष म्हणजे दोघांचा भार समसमान आहे. याचाच अर्थ जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे तेवढीच सकारात्मक ऊर्जा या विश्वाच्या वातावरणात आहे. ही सकारात्मक ऊर्जा या माध्यमातून स्वत:मध्ये बाणवली जाते.

मानव शरीरशास्त्र अभ्यासले तर माणसाच्या सुदृढ शरीरासाठी स्वच्छ हवा, पाणी याचबरोबर सामाजिक वाढीसाठी सहजीवन महत्वाचे आहे. या सर्व गोष्टी गावपळणीतून नकळत साध्य होतात.

गावपळण ही साधारण कार्तिक-मार्गशीर्ष महिन्यात येते. त्यावेळी तळकोकणात हिव भरेल एवढी थंडी पडलेली असते. अशा वातावरणात गावाबाहेर राहणे तसे कठीणच. पण समाजजीवनाची सुरुवात आणि समाजजीवनाची कल्पना यातूनच वाढीस लागते. आलेल्या कठीण परिस्थितीत कसे राहावे याचे शिक्षण गावपळणीतून नकळत मिळत असते. कावणाच्या त्या तात्पुरत्या घरात अनेक माणसं एकत्र राहत असतात. आजकाल लोप होत चाललेली एकत्र कुटुंबपद्धती या निमित्ताने पुन्हा बघायला मिळते. एकत्र जेवण होते. आजकाल शंभर -सव्वाशे चॅनेल असणार्‍या टीव्हीच्या समोरून लोक उठत नाहीत. अशावेळी गावगजाली ( गॉसिप नव्हे ), त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांची उकल या गोष्टी आजकाल गावातदेखील घडत नाहीत. पण या गावपळणीच्या निमित्ताने या सर्व गोष्टी घडतात. एकमेकांशी संवाद होतो. एकत्र सांघिक खेळ होतात. स्त्रियांना चुलीपासून तीन दिवस का होईना पण सुटका मिळते.

गावपळणीकडे पूर्वापार चालत आलेली एक अंधश्रद्धा म्हणून न बघता समाजजीवन रुळावर आणणारे एक साधन म्हणून बघितले तर ते समाजस्वास्थाच्यादृष्टीने हितकारक आहे. आचरे गावाचे वर्णन करताना डॉ. विद्याधर करंदीकर यांनी म्हटले आहे की, श्रीरामेश्वर कृपा ज्यावरी शतधारांनी झरे. कलासक्त हे गुणीजनमंडित पुण्यग्राम आचरे. त्याप्रमाणे या गावातून भार्गवराम आचरेकर यांच्यासारखे रंगकर्मी, वसंतराव आचरेकरांसारखे तबलावादक, सुरेश ठाकूरसरांसारखे लेखक या भूमीने दिले. या भूमीने गावपळणीसारखी परंपरा जोपासली आणि वाढवली. इथला शेतकरीदेखील या गावपळणीचं कौतुक आपल्या गावरान, पण प्रासादिक वाणीने करताना म्हणतो,

अशी आमची गावपळाण
र्‍हवाक झापाचा कावान
भुकेक माशाचा जेवान
तानेक पेजेचा धुवान
मजेक एस्पिकाचा कुटान
थंड्येक इडयेचा खुटान
निजेक गोणपाटाचा किंतान
तीन दिवस भायेर र्‍हवान
घराक जावचा नदित्सून पेवान …