घरफिचर्सनावात काय आहे?

नावात काय आहे?

Subscribe

आता दलित शब्दाचा वापर बंद होईल, असे वाटत असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदासजी आठवले म्हणाले की ते या सूचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून दलित शब्दच वापरला जावा, अशी विनंती करणार आहेत. त्यांच्या मते ‘दलित’ या शब्दामागे भावना गुंतल्या आहेत. 1970 च्या दशकात महाराष्ट्रात उसळून आलेल्या दलित पँथरच्या चळवळीने ‘दलित’ या शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपीयर याच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ या नाटकात एक गाजलेले वाक्य आहे. What is in name? That which call a rose. By any other name would smell as sweet.”तेव्हापासून मराठीतसुद्धा ‘नावात काय आहे?’ असा प्रश्न उपस्थित करण्याची प्रथा पडलेली आहे. हे आज आठवण्याचे कारण म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक सूचना जारी केली. ज्यानुसार खासगी वाहिन्यांनी ‘दलित’ हा शब्द वापरू नये व त्याऐवजी ‘अनुसुचित जाती’ हा शब्द वापरावा असे म्हटले आहे. त्यानंतर देेशात याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाच्या या सूचनेमागे मुंबई उच्च न्यायालयाची एक सूचना आहे, जी मुळात श्री. पंकज मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर दिलेला आदेश आहे. यानुसार आता ‘दलित’ शब्द न वापरता ‘अनुसुचित जाती’ हा शब्द वापरला जाईल. जवळपास असाच प्रकार ‘हरिजन’ या शब्दाबद्दलही झालेला दिसून येर्इल. 1982 साली सरकारने एक पत्रक काढून ‘हरिजन’ हा शब्द वापरू नये असे जाहीर केले होते. बाबासाहेबांना ‘हरिजन’ या शब्दाचा तिटकारा होता.

- Advertisement -

आता दलित शब्दाचा वापर बंद होईल, असे वाटत असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदासजी आठवले म्हणाले की, ते या सूचनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालायात दाद मागणार असून दलित शब्दच वापरला जावा अशी विनंती करणार आहेत. त्यांच्या मते ‘दलित’ या शब्दामागे भावना गुंतल्या आहेत. 1970 च्या दशकात महाराष्ट्रात उसळून आलेल्या दलित पँथरच्या चळवळीने ‘दलित’ या शब्दाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

सामाजिक व राजकीय चळवळींचे अभ्यासक सतत ‘भारतातील दलित’ व ‘अमेरिकेतील निग्रो समाज’ यांच्या लढ्याची तुलना करत असतात. अमेरिकतील निग्रो समाजाच्या नावात कालानुरूप अनेक बदल झालेले दिसून येतील. सुरूवातीला या समाजाला ‘ब्लॅक’ म्हणत असत, नंतर ‘निग्रो’ म्हणत असत, त्या नंतर ‘कलर्ड पिपल’ म्हणायला लागले व आता ‘आफ्रिकनअमेेरिकन’ म्हणतात. तसेच आपल्याकडे दलित समाजाबद्दल झाल्याचे दाखवता येते. सुरूवातीला ‘अस्पृश्य’ म्हणत, महात्मा गांधी या समाजाला ‘हरिजन’ म्हणत असत, नंतर ‘डिप्रेस्ड क्लासेस’ म्हणायला लागले. इंग्रज सरकारने तर नेहमी ‘शेडयुल्ड कास्ट’ असा शब्द वापरलेला दिसून येईल. त्यानंतर ‘अनुसुचित जाती’ म्हणायला लागले व त्यानंतर रामदासजी आठवले म्हणतात तसं 1970 च्या दशकानंतर ‘दलित’ म्हणायला लागले. त्यातूनच दलित साहित्याची रसरशित चळवळ उभी राहिली होती. आता पुन्हा ‘अनुसुचित जाती’ म्हणा, असा केंद्र सरकारचा फतवा आला आहे.

- Advertisement -

दलित शब्दचा वापर कधीपासून सुरू झाला याबद्दल ठाम विधान करता येत नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते डी.राजा यांनी ‘हिंदू’ या इंग्रजी दैनिकात दहा सप्टेंबर 2018 रोजी लिहलेल्या लेखात हा शब्द महात्मा फुले यांनी वापरला असे नमूद केले आहे. महात्मा गांधींनी लिहिलेल्या एका लेखात अशी माहिती दिली आहे की हा शब्द स्वामी श्रद्धानंद यांनी वापरला. आंबेडकरी साहित्याच्या अभ्यासकांच्या मते खुद्द बाबासाहेबांनी हा शब्द कधीही वापरला नाही. बाबासाहेबांनी इंग्रजीतून केलेल्या भाषणांचे मराठी भाषांतर केले जात असे, तेव्हापासून हा शब्द वापरात आला. बाबासाहेब नोव्हेंबर 1930 मध्ये लंडनवरून परतल्यानंतर डिसेंबर महिन्यांत त्यांनी सर्वत्री देवराव नार्इक व बी.आर. कद्रेकर यांच्या मदतीने ‘जनता’ हे पाक्षिक (जे पुढे साप्ताहिक झाले) मुंबर्इहून प्रकाशित करायला सुरूवात केली. या पाक्षिकात बाबासाहेबांच्या इंग्रजी भाषणांची भाषांतरे प्रसिद्ध होत असत. बाबासाहेब इंग्रजीत केलेल्या भाषणांत ‘डिप्रेस्ड क्सासेस’ किंवा ‘शेडयुलड कास्ट’ हे शब्द वापरत असत. त्याला पर्यायी शब्द म्हणून ‘दलित’ हा शब्द वापरला जाऊ लागला. मात्र, दलित साहित्याच्या चळवळीने या शब्द व्यापक लोकप्रियता मिळवून दिली. आता तोच शब्द वापरू नये असा आदेश आला आहे.

याचा अर्थ सर्व दलित समाजाला हा शब्द मान्य आहे असा नाही. अगदी 1931 सालीसुद्धा काही मंडळी या शब्दाला आक्षेप घेत होती. आजही काही दलित संघटना हा शब्द न वापरता त्याऐवजी ‘बुद्धीस्ट’ हा शब्द वापरावा, अशी सूचना करतात. येथे वेगळीच अडचण निर्माण होते. सर्व दलित समाजाने धर्मांतर केलेले नाही. याचाच अर्थ असा की ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला नाही त्यांची ओळख ‘बुद्धीस्ट’ अशी होऊ शकत नाही.

इंग्रजांच्या राजवटीने मात्र या वादात न पडता सर्व अस्पृश्य जातींची एक यादी केली व त्या यादीला ‘शेडयुल्ड कास्ट’ असे म्हटले. हाच प्रकार इंग्रजांनी आदिवासी जमातींबद्दलही केला. सर्व आदिवासी जमातींची यादी केली व त्याला ‘शेडयुल्ड ट्राईब’ असे म्हटले. आजही सरकारी दरबारी ‘अनुसुचित जाती’ व ‘अनुसुचित जमाती’ हेच शब्द वापरले जातात.

प्रत्यक्ष समाजजीवनात मात्र ‘दलित’ या शब्दामागे रोमहर्षक इतिहास आहे हे नाकारता येत नाही. म्हणूनच रामदासजी आठवले म्हणतात त्यात तथ्य आहे. ‘अनुसुचित जाती’ या शब्दांत राजकीयसामाजिकसाहित्यिकसांस्कृतिक लढ्याचा काही अर्थ व्यक्त होत नाही. ती एक साधी यादी वाटते जी कसलीही असू शकते. दलित शब्द म्हणजे अंगार, विद्रोह, व्यवस्थेला आव्हान देणारी मानसिकता, समताधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न असे अनेक अर्थ दलित या एका शब्दातून व्यक्त होतात. थोडक्यात काय तर शेक्सपीयरच्या प्रतिभेला लाख लाख सलाम, पण ‘नावांत काय आहे?’ या त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल जोरदार मतभेद आहेत. ‘दलित’ या शब्दात जो जोश आहे तो ‘अनुसुचित जाती’ या शब्दात नाही.

लेखक प्राध्यापक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -