प्रयोग चांगलेच, पण …

पूर्ण वेळ राजकारणाचे काय करणार?

Mumbai

चौदा वर्षांपूर्वी धडाकेबाज सुरुवात करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता एकच आमदार शिल्लक राहिला आहे. जी गोष्ट धरसोड भूमिकांची तीच आंदोलनांची. लोक तुमच्या आंदोलनांबाबत शंका घेत असतील तर कुठेतरी गडबड आहे. ही काय गडबड आहे ते शोधून काढत अशी गडबड होणार नाही, याची काळजी घेताना मनसे कधी दिसला नाही. मराठी हृदयसम्राट ते आता नवा भगवा झेंडा हाती घेत हिंदू हृदयसम्राट होण्याचा प्रवास करताना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे एका भूमिकेवर ठाम असताना दिसत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासासारखे त्यांनी नक्की पुढे जावे. पण प्रयोग करून आणि ते आधी आपल्यात झिरपून त्यातून काही उगवले तर पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही, हाच मनसेच्या विचारधारेतील मोठा दोष आहे.

मनसेच्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण झाली. एक तपाहून अधिक काळ लोटला. पण, अजूनही मनसेच्या इंजिनाला दिशा सापडत नाही. राज ठाकरे यांच्यासारखा आजच्या घडीला देशातील सर्वोत्तम वक्ता असलेला नेता मिळूनही त्यांना काही दिशा सापडत नाही, असे का व्हावे, याचे चिंतन करत शेवटी कधी नव्हे ते या पक्षाने राजकीय अधिवेशन घेत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. याआधी पक्षाची निशाणी असलेल्या इंजिनाची दिशा बदलून बघितली. पक्षापेक्षा मोठे होऊ पाहणार्‍या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवत नवीन नेतृत्वाला संधी दिली. शेवटी आता झेंडा बदलून बघत प्रखर हिंदुत्वाची डरकाळी फोडली. प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. पण, यश काही मिळत नाही. असे का व्हावे? प्रयोग करून बघत राहणे हे चांगल्या माणसाचं लक्षण असते. त्यातच वाढीच्या शक्यता असतात. आयुष्याच्या सगळ्या क्षेत्रांना हे लागू आहे. राजकारणालाही. चांगला नेता प्रयोग करण्याची हिंमत दाखवतोच. राज ठाकरे यांनी ती दाखवली आहे म्हणून कौतुक. पण, एवढे करून एक प्रश्न उरतोच : प्रयोग चांगले, पण मनसे पूर्ण वेळ राजकारणाचे काय करणार?

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना बांधली तो काळही प्रतिकूल होता. त्यांनाही अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून जावे लागले. पण, बाळासाहेबांकडे खंबीर नेत्यांची आणि स्वतःला वाहून घेणार्‍या निस्वार्थी शिवसैनिकांची फळी होती. बाळासाहेबांचे राजकारण पाहत स्वतः राज मोठे झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज यांच्यावर बाळासाहेब यांचा अधिक प्रभाव आहे. मुख्य म्हणजे लाखोंची गर्दी जमा करणारे अमोघ असे वक्तृत्व आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि राज ठाकरे… असे हे मोहिनी अस्त्र लोकांच्या तनामनावर गारुड घालणारे असून ते यशस्वी का होत नाही? असा जेव्हा विचार येतो तेव्हा फक्त निवडणूक म्हणजे राजकारण नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

निवडणुकीच्या प्रचाराला राज उभे राहिले तर आजही त्यांच्यासमोर ब्रेथलेस भाषण करणारे देवेंद्र फडणवीस फिके पडतात. ब्रेथलेस सिंगर शंकर महादेवन आपण सर्वांनी बघितले आहेत. गेली पाच वर्षे फडणवीस यांच्या रूपाने ब्रेथलेस वक्ता बघता आला. आता पुढेही बघायचा आहेच. पण, नुसत्या भाषणांनी निवडणुका जिंकता येत नाहीत. तसे झाले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार वक्तृत्व कलेच्या निकषावर कधीच निवडणुका जिंकू शकले नसते. पण, त्यापलीकडे जाऊन त्यांनी आधी पूर्ण वेळ राजकारण केले. अर्धवेळ राजकारण कधीच असू शकत नाही. सकाळी लवकर उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जो माणूस राजकारणाचा विचार करतो, तोच यशस्वी होतो, असे पवार आपल्या जवळच्या माणसांना नेहमी सांगत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा वेग पाहता तेसुद्धा बारा चौदा तास काम करताना बघायला मिळतात.

बाळासाहेब यांनी आपल्याभोवती सुरुवातीच्या काळात जी माणसे जमवली ती समाजकारणाने प्रेरीत अशी होती. खरेतर तो काळ महाराष्ट्राला दिशा दाखवणार्‍या समाजकारणाचा होता. कार्यकर्ते एक वडापाव आणि चहावर दिवसरात्र राबण्यास तयार होते. निष्ठा महत्वाची होती. यातून शिवसेनेने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत संघटना बांधली. स्वतः बाळासाहेब, दत्ताजी साळवी अशा मुलुखमैदानी तोफा गर्जत असताना आनंद दिघे, सुधीर जोशी, गजानन कीर्तिकर, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, मनोहर जोशी, लीलाधर डाके, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, नारायण राणे, दिवाकर रावते, सुभास देसाई, रामदास कदम असे मोहरे शिवसेनेचा गाडा पुढे नेत होते. स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी तरुणांच्या नोकर्‍यांचा मार्ग सोपा होत होता. सत्तर, ऐशी, नव्वदीच्या दशकात अशा आर्थिकदृष्ठ्या स्थिरावलेल्या हजारो तरुणांची कुटुंबे कायमची शिवसेनेची होऊन गेली. दुसरीकडे भारतीय कामगार सेना राज्यात पाय रोवत होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कामगार असा संघटनेचा पाया व्यापक होत असताना शिवसेनेला त्या काळात छगन भुजबळ यांच्यासारखा फक्त एक आमदार निवडून आणता आला होता.

पण, पाया भक्कम झाला होता आणि शेवटी 1995 मध्ये शिवसेनेची सत्ता आली. 1962 ते 1995 हा खूप मोठा काळ झाला. पण, बाळासाहेब डगमगले नाहीत, ना त्यांचे शिवसैनिक. मुंबई आणि या शहरात पोटापाण्यासाठी धडपडणार्‍या कोकणी बांधवांनी बाळासाहेबांना सुरुवातीच्या धडपडीच्या काळात मोलाची साथ दिली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. याच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी राज्यात सर्वदूर सेनेचा प्रचार प्रसार केला. शिवसैनिकांनी घरादारावर तुळशीपत्रे ठेऊन, नोकर्‍यांच्या ठिकाणी रजा टाकून, प्रसंगी खाडे करून पक्षासाठी खस्ता खाल्या. कारण त्यांच्यासमोर बाळासाहेब यांचा पाठीवर हात ठेऊन लढ म्हणणारा आणि आपल्या माणसांसाठी सदैव उपलब्ध असणारा मोठ्या मनाचा नेता होता… दरम्यानच्या काळात बाळासाहेब आणि शिवसेनेवर खूप टीका झाली. त्यांच्या भूमिकेवर प्रसार माध्यमांनी एकच राळ उठवली. पण, ही टीका पचवण्याची क्षमता बाळासाहेबांकडे होती. टीका करणार्‍या लोकांसाठी बाळासाहेबांनी मनाचे दरवाजे कधी बंद केले नाहीत. त्यांचे कट्टर विरोधकही हे मान्य करतील.

हे सारे येथे सांगण्याचे कारण म्हणजे राज ठाकरे हे बाळासाहेब यांना राजकारणातील आपला गुरु मानत असतील तर त्यांचे एक मोठा वक्ता असण्यापेक्षा आणखी बरेच गुण आत्मसात करावे लागणार आहेत. संघटना बांधायची असेल तर आधी माणसे जोडावी लागतील आणि जोडलेली माणसे कायम ठेवावी लागतील. आज राज यांच्याकडे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे. नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अभिजित पानसे, अनिल शिदोरे, अभिजित अभ्यंकर, यशवंत शिलेदार, शिरीष सावंत असे काही नेते आहेत. पण, नेत्यांची फळी आणखी मजबूत झाली पाहिजे. कारण सध्या असलेल्या नेत्यांपेक्षा प्रवीण दरेकर, राजन राजे यांच्यासारखे बरेच नेते, माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी अशा मनसेला सोडून जाणार्‍या लोकांची संख्या खूप आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणतात त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी मोठे केलेले नेते बेईमान होऊन गेले. फितुरीचा शाप कुणाला चुकलेला नाही. शरद पवार यांनाही लोक सोडून गेले होते. पण, ऐशीच्या घरात असलेला हा नेता डगमगला नाही. त्याने पुन्हा पाय रोवले. पण, आज राज यांच्याकडे आकर्षित असलेला राज्यातील सर्वात मोठा तरुण वर्ग मनसेतून बाहेर पडणार्‍या लोकांकडे बघतो तेव्हा त्याच्या मनात शंकेची पाल तर चुकचुकणार!

गेल्या 14 वर्षांत अनेक माणसे जशी सोडून गेली तसेच भूमिकांच्या बाबतीत धरसोडपणाही मनसेचा आलेख उतरता करणारा ठरला आहे. पहिल्या प्रयत्नात 13 आमदार निवडून आणणारा पक्ष म्हणून मनसेकडे लोक भविष्यातील राज्यकर्ता पक्ष म्हणून बघत होते. पण 2009 पासून आमदारांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत गेली. आता तर पक्षाचा एकाच आमदार शिल्लक राहिला आहे. जी गोष्ट धरसोड भूमिकांची तीच आंदोलनांची. लोक तुमच्या आंदोलनांबाबत शंका घेत असतील तर कुठेतरी गडबड आहे. ही काय गडबड आहे ते शोधून काढत अशी गडबड होणार नाही, याची काळजी घेताना पक्ष कधी दिसला नाही. मराठी हृदयसम्राट ते आता नवा भगवा झेंडा हाती घेत हिंदू हृदयसम्राट होण्याचा प्रवास करताना राज ठाकरे हे एका भूमिकेवर ठाम असताना दिसत नाहीत.

बाळासाहेब यांच्या प्रवासासारखे त्यांनी नक्की पुढे जावे. पण प्रयोग करून आणि ते आधी आपल्यात झिरपून त्यातून काही उगवले तर पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही, हाच मनसेच्या विचारधारेतील मोठा दोष आहे. शिवसेनेने आज सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हात मिळवणी केली असली तरी ते पुरोगामी नाहीत आणि त्यांचा तसा दावाही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या देशात आता फक्त भाजपच आणि बाकी सारे पक्ष मुक्त असा जो काही भाजपचा अहंकार होता तो उद्धव यांनी उतरवल्यामुळे राज्यातील जनतेला या क्षणाला तरी शिवसेनेची भूमिका काही चूक आहे असे वाटत नाही.

शिवसेना हिंदुत्ववादी आहे, हे ते नाकारत नसताना आणि लवकरच ते जय श्रीराम करत आणि विटा घेऊन धावत अयोध्येला जात असताना मनसेने मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे जाण्यात काहीच अर्थ नाही. भाजपच्या गाजराला भुलून ते शिवसेनेने न सोडलेल्या हिंदुत्वाला जवळ करून मतांची बेगमी करत असतील तर त्यांनी यातून त्यांच्या हाती काही लागेल, याची आशा न केलेली बरी! भाजपला महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेनेची मदत हवी होती. यातून तब्बल पंचवीस वर्षं मान अपमान गिळून भाजप ‘धाकटी’ होऊन राहिली. 2014 ला संधी मिळाली तशी ‘थोरली’ झाली. आणि आता या जुन्या नातेसंबंधातली नवी पोझिशन म्हणजे आपलं थोरलेपण टिकावं म्हणून राज्याच्या सत्तेवर पाणी सोडती झाली! बाळासाहेबांना भाजपच्या या धूर्तपणाचा पुरता अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी भाजप-सेना संबंधात कधी आपला ‘अप्पर हॅन्ड’ सोडला नाही. उद्धव यांची 2014 ला मजबुरी होती, पण संधी मिळताच भाजपची खोड त्यांनी 2019 ला मोडली. भाजपचा हाच वेग कायम राहिला तरी एकहाती महाराष्ट्र जिंकायला अजून काही काळ जावा लागेल. तोवर त्यांना राज्यात एका सशक्त ‘धाकल्या’ची गरज आहे. राज यांना ही स्पेस खुणावत आहे का? हा मनसेच्या अधिवेशनातील अन्वयार्थ आहे.

या चुकचुक करण्याला भुलून पक्ष बांधण्यापेक्षा मनसे भाजपच्या मागे फरफटत गेली तर त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. भाजपने शिवसेनेसह इतर प्रादेशिक पक्षांची जी अवस्था केली तशीच ती मनसेची करून टाकतील. इतर प्रादेशिक पक्षांत भाजपचा विश्वासघात सहन करण्याची थोडी तरी ताकद होती. सध्याची मनसेची अवस्था पाहता भक्कम पाया नसलेला हा पक्ष आहे. भाजपच्या नादाला लागून त्याची इमारत कोसळायला फार वेळ लागणार नाही. उलट, मनसेने राज्यभर पक्ष बांधण्याच्या आपल्या निर्णयाला चिकटून तेच काम पुढील काही वर्षे सातत्याने केल्यास त्याचा त्यांना नक्की फायदा होईल.