घरफिचर्सडॉ. भारती पवारांचे काय चुकले?

डॉ. भारती पवारांचे काय चुकले?

Subscribe

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या पवार घराण्यातील व्यक्तीचा भाजप प्रवेश म्हणजे चर्चा तर होणारच. तथापि, ज्या तकलादू कारणापोटी त्यांचे तिकीट कापण्याचे कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिजले, ते पाहता पक्षहिताऐवजी वैयक्तिक भयगंड प्रधानस्थानी राहिल्याचे म्हणता येईल. शिवाय, डॉ. पवारांनी राजकारणातील डावपेचाला अनुसरून भाजपेयी होण्याचा निर्णय घेतला.

कळवणच्या पवार घराण्यातील डॉ. भारती पवार यांनी हो-नाही करत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस दाखवले. मुख्यमंत्र्यांसह प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्या कमळावर स्वार झाल्या आणि त्यादेखील लोकसभेचे तिकीट घेऊन. डॉ. पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा होती. गेल्या लोकसभा निवडणूकीत अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव दिंडोरी मतदारसंघात त्या राष्ट्रवादीकडून लढल्या. मात्र, मोदी लाटेत त्यांची उमेदवारी पालापाचोळ्याप्रमाणे उडून अदृश्य झाली होती. यावेळी त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणे अपेक्षित असताना ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना ती बहाल करण्यात आली. स्वाभाविकपणे डॉ. भारती पवार अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी अपेक्षेनुरूप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या पवार घराण्यातील व्यक्तीचा भाजप प्रवेश म्हणजे चर्चा तर होणारच. तथापि, ज्या तकलादू कारणापोटी त्यांचे तिकीट कापण्याचे कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिजले, ते पाहता पक्षहिताऐवजी वैयक्तिक भयगंड प्रधानस्थानी राहिल्याचे म्हणता येईल. शिवाय, डॉ. पवारांनी राजकारणातील डावपेचाला अनुसरून भाजपेयी होण्याचा निर्णय घेतला.

 

- Advertisement -

भाजपला निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘अच्छे दिन’ आलेय. नगरचे विखे, सोलापूरचे मोहिते आणि आता कळवणचे पवार या घराण्यांना भगदाड पाडल्याने किमान फडणवीस-दानवे जोडगळीला हायसे वाटले असणार. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता चांदवड-देवळा वगळता उर्वरित पाच विधानसभा क्षेत्रांत भाजपचे आमदार नाहीत. पक्षाची ताकदही जेमतेम आहे. तथापि पक्षाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी विजयाची ‘हॅट्ट्रीक’ साधण्याचा चमत्कार घडवला आहेत. असे असले तरी पक्षनेतृत्व यंदा त्यांच्यावर मेहरबान दिसत नाही. पक्षांतर्गत सर्वेक्षणातही चव्हाणांचे प्रगतीपुस्तक ‘फेल’ राहिल्याचे सांगण्यात येते. मग कोरा करकरीत व जनाधार असलेल्या चेहर्‍याच्या शोधात भाजपेयी होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज डॉ. भारती पवार यांनाही राजकीय पुनर्वसन होणे आवश्यक होते. मुंबापुरीत घडून आलेल्या या प्रवेशसोहळ्याने काही प्रश्न नक्कीच निर्माण केले आहेत. हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट नाही तर मग त्यांचे काय करायचे? ज्या कौटुंबिक वादाचे कारण देऊन डॉ. भारती पवारांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले, त्या वादाच्या परिणामाची भाजपला चिंता नाही काय? चव्हाण यांनी विविध पक्षीयांचा गोतावळा जवळ करत नोंदवलेले तीन विजय पाहता डॉ. पवार यांचा तेवढा आवाका आहे का? यंदा कोणतीही लाट नसताना कोणत्या ‘मेरीट’च्या आधारे डॉ. पवार दिंडोरीत कमळ फुलवतील?

- Advertisement -

डॉ. पवार यांचे श्वसूर ए. टी. पवार हे सातत्याने जिल्हा राजकारणात चर्चेत राहिले. साधी राहणी असलेल्या पवार यांची जिल्ह्यातील आदिवासींसोबत घट्ट नाळ जुळली होती. १९८५ ची ‘पुलोद’ लाट आणि गतवेळच्या मतविभाजनाच्या फटक्यामुळे पवारांची आमदारकी खंडीत झाली. त्यांच्या ज्येष्ठ स्नुषा जयश्री पवार जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, तर पुत्र नितीन व डॉ. भारती पवार विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादीने डॉ. पवार यांना तिकीट देताना वैयक्तिक कामगिरीऐवजी घराण्याचे महात्म्य जाणूनच मैदानात उतरवले होते. तेव्हा पवार घराण्यातील यादवीचा मुद्दा पक्षाला दिसला नव्हता का? बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय शत-प्रतिशत कळवणच्या पवार घराण्यावर ठरतो, असा भुजबळांसह सर्वांचाच झालेला ग्रह कसा ग्राह्य मानायचा? मग अचानक घराण्यातील यादवीच्या मुद्द्यावर डॉ. भारती पवारांना अव्हेरून दोन पक्ष बदललेल्या धनराज महालेंना कवेत घेत थेट उमेदवारी बहाल करण्याची पक्षाने मर्दमुकी दाखवली. त्याची प्रतिक्रिया म्हणून डॉ. पवार भाजपमध्ये गेल्यात तर त्यांचे चुकले काय? राजकारणात कोणाला प्रतिक्षा यादीत बसायला आवडत नाही. त्यापोटीच मिळेल त्या पक्षाशी घरोबा करण्याची आगतिकता आज सर्वत्र प्रत्ययास येते. डॉ. पवार तर चालत्या गाडीत बसल्या आहेत. उद्याच्या निकालात त्यांच्यापुढे खासदारकीचे बिरूद लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. निकाल वेगळाही लागू शकतो; मात्र त्यांची पक्षनिष्ठा व कर्तृत्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पक्षाचे पालकत्व निमावणार्‍या भुजबळ यांना लक्षात येऊ नये, हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी आश्चर्याची बाब ठरेल. पक्षाने मनगटावर घड्याळ बांधलेल्या महाले यांच्यातील ‘इलेक्टिव मेरीट’ काय यावर निवडणूकीची जबाबदारी असलेल्या नेत्यांपैकी कोणी धाडसाने भाष्य करू शकेल काय, हादेखील प्रश्न निश्चितच अनुत्तरित राहणार आहे.

वस्तुत:, ‘भुजबळ फॅक्टर’ मुळे लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाची चर्चा होणे अपेक्षित असताना दिंडोरीने त्यामध्ये आघाडी घेतली. विद्यमान खासदाराचे तिकीट कापले जाण्याची शक्यता, पराभवानंतरही सतत पाच वर्षे मतदारसंघात संपर्क ठेवलेल्या उमेदवाराचा पत्ता कापून ऐनवेळी आलेल्या आयारामाला उमेदवारीच्या बोहल्यावर चढवण्याची राष्ट्रवादीची आगतिकता, पक्षाच्या पहिल्या यादीत उमेदवार जाहीर न करण्याची भाजपने घेतलेली दक्षता आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या. दिंडोरीचा निकाल लागायचा तो लागेल, तथापि, लागणारा निकाल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुढ्ढाचार्यांना आत्मपरिक्षण करायला लावणारा असेल, हे मात्र निश्चित!

दोघा ‘बड्यां’नी कापले चव्हाणांचे तिकीट?

दिंडोरीत सलग तीन विजय मिळवून भाजपचा झेंडा दिमाखदारपणे फडकावत ठेवण्याचे श्रेय पक्षापेक्षा हरिश्चंद्र चव्हाण यांना जाते, यावर दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी अपेक्षित कामे केली नाहीत, ही आधीच्या दोन निवडणूकांतही बोंब होती. आता मात्र त्यांच्या अकार्यक्षमतेचा मुद्दा अधिक प्रमाणात उफाळून आलाय. त्यामागे वेगळेच कारण सांगण्यात येते. चव्हाण सलग चौथ्यांदा निवडून आल्यास केंद्रात मंत्रीपदाचे ते दावेदार होऊ शकतात. पक्षनिष्ठा व अनुसूचित जमातीचे नेतृत्व ही त्यांची इतर बलस्थाने आहेत. या बाबी खटकलेल्या दोन बड्या नेत्यांनी चव्हाणांचा पत्ता कापून डॉ. भारती पवारांचे पक्षात ‘प्रोजेक्शन’ केल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी एकाला केंद्रातील मंत्रीपदाची तर दुसर्‍याला जिल्ह्यात निर्माण झालेल्या स्वत:च्या वर्चस्वाची चिंता सतावत होती. या आसुयेतूनच चव्हाणांचे चौथ्यांदा दिल्लीचे तिकीट कापल्याची चर्चा आहे.

डॉ. भारती पवारांचे काय चुकले?
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -