घरक्रीडामहाराष्ट्राचं घोडं अडतयं कुठं ?

महाराष्ट्राचं घोडं अडतयं कुठं ?

Subscribe

लिलावावर प्रभाव पाडण्यात महाराष्ट्र अपयशी

प्रो-कबड्डीच्या ८व्या हंगामाचा लिलाव नुकताच मुंबई येथे पार पडला. या लिलावात फक्त दोन खेळाडूच करोडपती झाले. अन्य खेळाडूंना मात्र म्हणावी तशी बोली लागली नाही. महाराष्ट्राच्या श्रीकांत जाधव (६८ लाख) आणि रिशांक देवाडीगा (६१ लाख) वगळता अन्य खेळाडूंना चांगली किंमत मिळाली नाही. त्यामुळे या लिलावात महाराष्ट्राचा डंका वाजलाच नाही, अशी ओरड महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात होणे यात वावगे काहीच नाही. महाराष्ट्राच्या कबड्डीकरिता एक सुखद गोष्ट म्हणजे या हंगामातील सर्वाधिक बोली ही महाराष्ट्राच्याच खेळाडूवर लागली. तो खेळाडू म्हणजे सिद्धार्थ देसाई. हे म्हणजे जणू मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात वार्‍याची सुखद झुळूक येऊन मन उल्हासित व्हावे असेच होते. ही एक गोष्ट वगळता महाराष्ट्राच्या खेळाडूंचा प्रभाव या लिलावावर पडलाच नाही, पण असे का घडले याचा अभ्यासपूर्वक शोध घेणे महत्त्वाचे वाटले आणि म्हणून या ठिकाणी या लिखाणाच्या माध्यमातून केलेला एक प्रयत्न.

प्रो-कबड्डीचे आतापर्यंत ७ हंगाम झाले आहेत. त्यामुळे संघ मालकांनी हा खेळ आणि खेळाडू यांचा योग्य तो अभ्यास केला असावा. गत हंगामाच्या लिलावात मोनू गोयत, नितीन तोमर, रिशांक देवाडीगा या खेळाडूंना संघ मालकांनी मोठ्या रकमेची बोली लावत खरेदी केले, पण हे खेळाडू आपल्या संघाकरिता चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे हंगामाच्या शेवटी श्रीराम(राजू) भावसार म्हणाले होते की, पुढील वर्षी संघ मालक आपला संघ निवडताना या गोष्टीचा निश्चितच विचार करतील. त्याची प्रचिती या हंगामाच्या बोलीत दिसून आली. यावेळी संघ मालकांनी गेल्या दोन-तीन हंगामातील खेळाचा विचार करून काही निवडक खेळाडूंना चांगली बोली लावली.

- Advertisement -

या हंगामाकरिता संघ मालक युवा आणि होतकरू खेळाडूंना पसंती देताना दिसले. त्यांनी निश्चितच असा विचार केला असेल की, जर मला कमी किमतीत तरुण आणि होतकरू खेळाडू उपलब्ध होत असेल, तर मी या जुन्या खेळाडूंवर अधिक बोली का लावू? मॅटवर खेळण्याकरिता स्टॅमिना आणि फिटनेस जास्त लागतो. या गोष्टी २५ वर्षांखालील खेळाडूंकडे मिळू शकतात. तसेच खेळाडू नवोदित असल्यास त्यांच्या खेळाचा अंदाज प्रतिस्पर्धी संघाला नसतो आणि याचा फायदा संघाला होतो. खेळाडूचे जसे वय वाढत जाते, तसा त्याच्याकडे अनुभव तर येतो. मात्र, त्याची शारीरिक क्षमता कमी होत जाते. या खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे हे खेळाडू आपल्या खेळाला पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत. या सर्वाचा अभ्यास करूनच यंदाचे संघ निवडले गेले आहेत. नव्या-जुन्या खेळाडूंचा योग्य मिलाफ करून आपला संघ समतोल राखण्यावर यंदा भर देण्यात आला.

महाराष्ट्राच्या खेळाडूंबाबत विचार करायचे तर कृष्णा मदने तसेच तरुण खेळाडू म्हणून अजिंक्य पवार, रवी कुमावत असे महाराष्ट्राचे तीन खेळाडू या हंगामात रिटेन झाले. हे युवा खेळाडू रिटेन होण्याचे कारण संघ मालकांची बदललेली मानसिकता आणि अनुभवी खेळाडूंना आपल्याला अधिक बोली लागेल अशी अपेक्षा असू शकते. गतवर्षी अधिक बोली लावून खरेदी केलेल्या खेळाडूंना आणि रिटेन केलेल्या खेळाडूंना म्हणावा तसा आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे यंदा संघ मालकांनी असा विचार केला असेल की, खेळाडूंना रिटेन करून अधिक रक्कम मोजण्यापेक्षा कमी किमतीत तो किंवा एखादा तरुण खेळाडू संघात घेतला, तर माझा आर्थिक लाभ होईल. गतवर्षी संघांनी रिलीज केलेल्या खेळाडूंना अधिक बोली लागल्यामुळे यंदा खेळाडूंनी असा विचार केला असेल की, मी लिलावात उतरलो तर मला अधिक रक्कम मिळू शकेल. आपल्या खेळावर विश्वास दाखवून अधिक रम मिळावी अशी अपेक्षा करण्यात वावगे काहीच नाही, पण खेळाडूंचा हा अंदाज चुकलाच.

- Advertisement -

या हंगामातील लिलावाकडे पाहिले असता यात हरियाणाच्या खेळाडूंनी बाजी मारलेली दिसते. या हंगामात हरियाणाचे ६०च्या जवळपास खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळताना दिसणार आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्राचे २०च्या जवळपास खेळाडू यंदाच्या हंगामात खेळताना दिसणार आहेत. ही तफावत जरी मोठी असली, तरी अगदीच निराशजनक नाही, पण यावर विचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राने हा खेळ जगाला दिला म्हणून महाराष्ट्राच्या खेळाडूंचा यात सहभाग हवाच असा कबड्डीप्रेमींचा अट्टाहास असतो. मात्र, आता इतर राज्यातील खेळाडूदेखील या खेळाचे तंत्र आणि मंत्र अवगत करावयास लागले आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. त्याचबरोबर इतर राज्यात स्पर्धात्मक कबड्डी कमी खेळली जाते, म्हणजेच स्पर्धा कमी होतात. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता अधिक असते. याउलट महाराष्ट्रात स्पर्धात्मक कबड्डी अधिक प्रमाणात खेळली जाते. त्यामुळे खेळाडूंना दुखापतींना सामोरी जावे लागते.

याचा फटका महाराष्ट्राच्या खेळाडूंना बसतो. शिवाय महाराष्ट्राचा ‘मराठी बाणा’देखील या निवडीच्या आड येत असेल. ‘मोडेन पण वाकणार नाही’ या म्हणीप्रमाणे एखाद्या खेळाडूचा अपमान झाला, तर तो त्या अपमानाने पेटून उठून अधिक जोमाने खेळ करून आपली उपयुक्तता सिद्ध करण्याऐवजी अपमान करणार्‍या व्यक्तीला चार गोष्टी सुनवून आपला मार्ग बदलेल. त्याउलट हरियाणाचे खेळाडू. ते अतिशय नम्र व आज्ञाधारक असतात. त्यांच्याकडे पेशन्स भरपूर असतात. ते कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतात. हरियाणाचाच एखादा खेळाडू सेलिब्रेटी झाला की, तो आपल्या अन्य खेळाडूंची शिफारस करतो. एवढ्यावरच तो थांबत नाही, तर तो त्यांना सर्वोतोपरी मदतदेखील करतो. या उलट महाराष्ट्राच्या खेळाडूंची अवस्था आहे. त्यांना अशी भीती वाटते की, मी एखाद्या खेळाडूंच्या नावाची शिफारस केली, तर मला तो डोईजड ठरेल. माझे स्थान तो डळमळीत करेल. याचीच त्यांना भीती वाटत असते. याचाही परिणाम संघ निवडीवर होतो.

या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, खेळात प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात. पूर्वी महाराष्ट्राचा या खेळात सुवर्ण काळ होता. आज हरियाणाचा आहे. उद्या आणखी कोण यात अग्रेसर असेल. आज अशी परिस्थिती आहे की ज्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो संघ जिंकेल. मी या ठिकाणी एक उदाहरण देतो. क्रिकेट या खेळात पूर्वी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज हे संघ आघाडीवर होते. आज वेगळी परिस्थिती आहे. या खेळात आज भारतानेही लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अधिकाधिक मेहनत घेऊन आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविले पाहिजे. जी संधी मिळेल त्या संधीचे सोने कसे करता येईल याकडे लक्ष द्यावयास हवे. कौशल्य आणि चापल्यात महाराष्ट्राचे खेळाडू कोठेही कमी नाहीत, पण शारीरिक क्षमतेत ते थोडे कमी पडतात. मात्र, मला पूर्ण खात्री आहे की या अपयशावर मात करत पुन्हा एकदा महाराष्ट्र सुवर्ण काळाकडे झेप घेईल.

-शशिकांत राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -