कोण करोना? पचकन थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे!

Mumbai

करोनाने चीनसह सार्‍या जगाला हादरवल्यानंतर शिस्त आणि बेशिस्तीचा रंग पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतीयांना तर हा रंग लावून स्वतःला आरशासमोर उभे करायला हवे. मग त्यांना आपले खरे रूप कळेल. आपण लोकशाहीचे नको तितके स्वातंत्र्य घेऊन स्वयंशिस्तीचा विचका केला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना लोकांना शिस्तीचे महत्व नव्याने सांगावे लागते यापेक्षा या देशाचे दुर्देव ते काय? असे अतिशय निराश होऊन म्हणावे लागते. सध्या करोना दुसर्‍या टप्प्यात असताना प्रत्येक नागरिकाने काळजी घ्या, असे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असताना आपण साधे मास्क तोंडावर लावू शकत नाही, अनावश्यक प्रवास टाळू शकत नाही, येथे तेथे थुंकण्यापासून स्वतःला आवरू शकत नाही, शिंकताना नाकातून दुसर्‍यांच्या अंगावर बिनधास्त फवारे उडत असताना साधा रुमाल तोंडावर ठेवण्याची जनाची नाही, पण मनाची लाज बाळगत नाही, लोकल, बस, ट्रेनमधून प्रवास करताना स्वतःच्या घरात बसल्यासारखे आपल्या समोरच्या जागेवर पाय पसरून बसायला शरम वाटत नाही…कसली म्हणजे कसली म्हणून शिस्त आपण बाळगायची नाही.

म्हणूनच 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला ‘मेरा देश महान’ म्हणून घसा साफ करण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. साधा अभिमानाने जो झेंडा आपण छातीवर मिरवतो, तो सकाळी मिरवून झाल्यानंतर खाली पडल्यास एक भारतीय म्हणून तो उचलून नीट ठेवावा, एवढेही साधे भान आपल्यात शिल्लक राहिलेले नाही. प्रवासात, फिरायला गेल्यावर सार्वजनिक ठिकाणी पचापच थुंकताना आपल्याला थोडी लाज शरम उरलेली नाही… कोण करोना? पचकन थुंकणे, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.

हे नव्याने सांगण्याची गरज म्हणजे करोना आपल्याकडे हाहा:कार उडवण्यासाठी आ वासून उभा असताना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना मला जे काही अनुभव आले ते येथे सांगायला हवेत, असे मला वाटते. दुपारची वेळ. दादर ते ठाणे लोकल ट्रेन प्रथम वर्गातील प्रवास. फार प्रवासी नव्हते. होते त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये डोकावून बसले होते. खिडकीजवळचा एक माणूस झोपला होता आणि अचानक त्याला जाग आली आणि तोंड वर करून तो खिडकीतून पचकन थुंकला. अर्धी थुंकी बाहेर गेली आणि अर्धी खिडकीवरून जणू संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही… (गदिमांची माफी मागून) हळूच खिडकीवरच्या गजांवरून खाली येऊन खिडकी जेथे संपते म्हणजे समुदाला नदी मिळते तसे येऊन थांबली… त्या थुंकणार्‍या माणसाला थोडीही शरम वाटली नाही. तोंडावर मास्क सोडाच या परिस्थितीत फर्स्ट क्लासमधील तो माणूस थुंकतो, म्हटल्यावर समोरच्या सीटवर बसलेला एक माणूस आणि मी त्याला खडसावले तर लाज गुंडाळून घरी ठेवून आल्यासारखा : सॉरी म्हणून गप्प बसला. अरे आजूबाजूला काय चालले आहे.

तुला काही लाज आहे की, नाही असे बोलल्यावर तो थोडा शरमल्यासारखा झाला आणि त्याने आपल्या खिशातून रुमाल काढून आपली थुंकी साफ करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याच खिडकीवर हात ठेवून त्याने डोळे झाकले आणि आजूबाजूच्या प्रवाशांवर डोळे मिटायची वेळ आली. तो जर करोनाग्रस्त असता तर आम्हाला देवही वाचवू शकला नसता. पण, नशिबाने तो जरी नसला तरी त्याला बिनधास्त थुंकण्याचे अधिकार दिले कुणी? कोणी थुंकलेले दिसल्यास 1 हजारच्या दंडाची शिक्षा आपण जाहीर करू, पण स्वयंशिस्तीचे काय? ती दंड भरून थोडीच येणार आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने स्वच्छतादूत व्हायला हवे. मी परिसर अस्वच्छ करणार नाही आणि समोरच्यालाही करू देणार नाही! हे आपल्याला आणि समोरच्याला खडसावून सांगायला हवे.

लोकल ट्रेनमधील दुसरी एक घटना आहे. दुपारचीच वेळ. बदलापूर गाडीत फारशी गर्दी नव्हती. एक प्रवासी आरामात समोरच्या सीटवर पाय पसरून बसला होता. दादरला प्रवासी चढल्यानंतर तो पाय खाली घेऊन बसला. गर्दी नाही म्हटल्यावर त्याने पुन्हा पाय पसरले आणि गाणी ऐकत थंडगार हवेची झुळूक घेत झोपी गेला… मी त्याची झोपमोड केली…‘दादा, ही बसण्याची जागा आहे, पाय ठेवण्याची नाही.’ त्याने पाय खाली घेतले, पण लाज सोडली नसल्यासारखे म्हणाला, काय झाले? माझ्या पायात सॉक्स आहेत. सीट खराब होणार नाही. ‘अहो, जागा खराब होण्याचा प्रश्न नसून रिकामी असली तरी ती पाय ठेवण्याची जागा नाही’. त्यावर तो काही बोलला नाही. पण, आजूबाजूचे सहप्रवासीही शांत बसल्यासारखे दिसले. कोणीच काही बोलले नाही. आधीच्या घटनेतील त्या थुंकणार्‍या माणसाने आपल्या रुमालाने थुंकी साफ केली होती. आजूबाजूचे सहप्रवासी यांनी त्या पाय पसरणार्‍या माणसाला दोन सुनावले असते तर त्यानेही रुमाल काढून सीट साफ केली असती.

पण एकूणच अशा बेशिस्त लोकांची चार माणसे चारचौघात लाज काढत नाही तोपर्यंत याला काही आळा बसेल असे दिसत नाही. मला काय करायचे? ही वृत्ती अशा अस्वच्छतेला कारणीभूत ठरत आहे. स्टेशन आणि बस स्थानक परिसरात थुंकणार्‍यांवर जोरदार कारवाई सुरू आहे, त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो, पण थुंकणारे काही कमी होत नाही. करोनासारखे एखादे संकट आले की, तेवढ्यापुरते जागे व्हायचे, पण नंतर येरे माझ्या मागल्या करत सतत थुंकणे हा आपला जनसिद्ध अधिकार आहे. चकचकीत गाडीचा दरवाजा उघडून भर रस्त्यात पान खाऊन थुंकणार्‍याने तर गळ्यात मडके अडकवून फिरायला हवे. किंवा तसा कोणी भेटला तर त्याला पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावायला हवी. आपल्या घरातील कचरा रस्त्यावर पडतोय की, गटारे तुंबवतोय, याचा विचार जसा करायाला हवा, तसाच आपण पचकन थुंकून मोकळे होऊ… पण त्या थुंकीबरोबर शेकडो लोकांना त्यांची काही चूक नसताना आजार देऊन जाऊ, याचा आधी विचार व्हायला हवा.

सिक्कीम हे देशातील एकमेव राज्य आहे की, तेथे थुंकण्यावर कायमची बंदी आहे. आता हा कायदा सर्व देशात करण्याची गरज आहे. आता करोना आला आहे म्हणून आपण सावध होऊन थोडे दिवस लोक आजूबाजूला थुंकणार नाहीत. पण नंतर पुन्हा हा प्रकार टाळायचा असेल आणि आपला देश ‘रामभरोसे हिंदू हॉटेल’ करायचा नसेल तर आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून बदलायला हवे. चला आजपासून नव्हे तर आतापासून याची सुरुवात आपण आधी आपल्यापासून करू. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही!