घरफिचर्सगाणं करताना,मनं जुळताना!

गाणं करताना,मनं जुळताना!

Subscribe

गीतकार-संगीतकार-गायक यांचं एकमेकांशी जमणं महत्वाचं असतं. त्यामुळे ते एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतात. एकमेकांना नक्की काय हवं याचा नक्की अंदाज घेऊ शकतात. संगीतकार सलील चौधरींच्या संगीताची शैली लता मंगेशकरांना व्यवस्थित माहीत होती म्हणूनच त्या सलीलदांना जसे अभिप्रेत होते तसे गाऊ शकल्या. अनेक संगीतकार आणि गायकांच्या बाबातीत असेच दिसून येते.

गाण्याची निर्मिती ही मुळातच सूर जुळण्यातून होत असते. या सुरांची जुळणी गायक-वादकांपुरतीच मर्यादित नसते. हे सूर गायक-संगीतकार, संगीतकार-गीतकार यांच्यामध्येही जुळत असतात. आजच्या काळात या सूर जुळण्याला केमिस्ट्री जुळणं असा नवा शब्दप्रकार रूढ झालेला असला तरी हा शेवटी कुणाचा तरी कुणाशी मन जुळण्याचा प्रकार असतो हे नक्की!
मागच्या काळात पाहिलं तर कविवर्य ग. दि. माडगुळकरांशी संगीतकार म्हणून सुधीर फडकेंचे सूर जुळले होते. त्यातूनच तर गीतरामायण जन्माला आलं. माडगुळकरांच्या शब्दांमध्ये कोणती चाल लपलेली आहे हे सुधीर फडके अचूक हुडकून काढत ते एकमेकांशी जुळलेल्या या सुरांमुळेच.

- Advertisement -

गीतकार-संगीतकार-गायक यांचं एकमेकांशी जमणं हे तसं महत्वाचंही असतं. त्यामुळे ते एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतात. एकमेकांना नक्की काय हवं त्याचा नक्की अंदाज करू शकतात. संगीतकार सलील चौधरींच्या संगीताची शैली लता मंगेशकरांना व्यवस्थित माहीत होती म्हणून तर ‘माया’मधल्या ‘तस्वीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी हैं’ या गाण्यातली ‘माथे की बिंदिया तू हैं सनम’ ही ओळ लतादीदी सलीलदांना जशी अभिप्रेत होती तशी गाऊ शकल्या. कारण कविमनाच्या सलीलदांना त्यांचं गाणं गाताना गायकाकडून काय हवं असतं हे लता मंगेशकरांना कळलं होतं…आणि आपल्या चालीला लतादीदी परिपूर्ण न्याय कशा देणार, आपल्या गाण्याच्या कोणत्या वळणावर गाण्यातल्या एखाद्या ठिकाणी कोणतं वळण देणार, याचा सलीलदांना अंदाज असायचा, म्हणूनच तर सलीलदांनी ‘केनो किचू कॉथा बॉलो ना’, ‘सातभाई चंपा जागो रे जागो रे’, ‘ओमॉर मॉयना गो कार कारोने तुमी अ‍ॅकेला’ यासारखी बंगाली गाणी फक्त लतादीदी आणि लतादीदींकडून गाऊन घेतली. लतादीदींसाठी एखाद्या आरक्षणासारखी राखून ठेवली. खरंतर त्या एका काळात लतादीदींचं वेळापत्रक कमालीचं व्यस्त असायचं, पण तरीही लतादीदींनी आपलं गाणं गावं म्हणून सलीलदा त्यांची वाट पहात राहायचे.

संगीतकार शंकर-जयकिशनचं कवी शैलेंद्रंशी ऐसपैस जमायचं. आपण लिहिलेल्या शब्दांशी टोकाचे आग्रही असणार्‍या शैलेंद्रंसोबत कधी कधी शंकर-जयकिशनची खडाजंगीही व्हायची, पण तरीही शैलेंद्रंच्या शब्दांचं आणि कल्पनांचं जग शंकर-जयकिशनना माहीत असल्यामुळे आपल्या गाण्याचे शब्द लिहिताना त्यांची पहिली पसंती शैलेंद्रंच्याच नावाला असायची. ‘श्री 420’ मधलं ‘प्यार हुवा, इकरार हुवा है’ हे गाणं करतानाही ‘राते दसो दिशाओं से कहेंगी अपनी कहानियां’ या ओळीत ‘दसो दिशा ओं से’ असा शब्दप्रयोग शंकर-जयकिशनना मंजूर नव्हता. पण शैलेंद्रंनी मात्र आपण लिहिलेल्या त्या शब्दांत बदल करायला साफ नकार दिला. त्यावरून शंकर-जयकिशनशी शैलेंद्रंचं जोरदार भांडण झालं. शेवटी शैलेंद्रंनी लिहिलेले शब्द गाण्यात तसेच ठेवायचं ठरलं आणि गाणं रेकॉर्ड झालं. त्यांच्यातल्या भांडणाचीही तिथल्या तिथे सांगता झाली. पुढे त्या तिघांनी मिळून कितीतरी गाणी केली. याचं कारण संगीतकार म्हणून शंकर-जयकिशन आणि गीतकार म्हणून शैलेंद्रंचे सूर एकमेकांशी मनापासून जुळले होते.

- Advertisement -

आज तसे सूर जुळलेले दिसतात ते संगीतकार सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांच्यात. ‘आयुष्यावर बोलू काही’ हा त्यांचा सांगितिक कार्यक्रम तर त्या दोन कलावंतांची मन किती जुळली आहेत याचा प्रत्यय देतो. संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी सौमित्र यांच्यातलं कलावंत मनही असंच जुळून आल्याचं कित्येक गाण्यातून दिसून आलं आहे. ‘गारवा’ हे गाणं त्याचाच पुरावा. हे गाणं करताना मिलिंद इंगळेंनी त्यातला ‘प्रिये’ हा शब्द गाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कायम ठेवावा अशी अट कवी सौमित्रना घातली होती आणि कवी सौमित्रनींही त्या अटीबरहुकूम अतिशय तरल गाणं लिहून दिलं. ते तसं लिहून देण्यामागचं एकमेव कारण होतं ते म्हणजे आपल्या संगीतकार मित्राच्या सुराला नेमका कोणता शब्द हवा आहे हे कवीने जाणण्याचं कसब.

गायिका सुमन कल्याणपुरांचे सूर असेच जुळले होते ते मराठीतल्या दोन आघाडीच्या संगीतकारांशी. त्यापैकी एक होते दशरथ पुजारी आणि दुसरे अशोक पत्की.

‘आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात’, ‘रे क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले, नकळत सारे घडले’, ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’, ‘एकतारी सूर जाणे श्रीहरी जय श्रीहरी’ अशी कित्येक गाणी दशरथ पुजारींकडे सुमन कल्याणपूर गायल्या आहेत. दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर या दोन कलावंतांनी एकत्र येऊन सादर केलेली ही गाणी आज कितीतरी काळ मराठी मनांना रिझवत आहेत. मराठी मनांसाठी ती गोड गाण्यांचा खजिना ठरली आहेत.

सुमन कल्याणपूर नावाच्या गायिकेला दशरथ पुजारी नावाच्या संगीतकाराच्या संगीतातली सौंदर्यस्थळं ओळखीची झाली होती आणि दशरथ पुजारींनी सुमन कल्याणपुरांच्या आवाजातली नैसर्गिक नजाकत ओळखली होती. या दोघांच्या अनोख्या ओळखीतूनच दोघांची एकाहून एक सरस गाणी त्या काळात जन्माला आली होती.

सुमनताईंच्या आवाजातली अशीच खासियत ओळखली होती ती संगीतकार अशोक पत्कींनी. दशरथ पुजारींप्रमाणेच अशोक पत्कींच्याही संगीतात सुमनताईंचा सूर जुळला होता. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजणा’, ‘दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, ‘वाट इथे स्वप्नांतील संपली जणू’ अशी अशोक पत्कींच्या संगीतातली सुमनताईंनी गायलेली किती गाणी सांगायची! सुमनताई नंतर नंतर गाण्यापासून काहीशा दुरावलेल्या असल्यातरी अशोक पत्कींची त्यांच्यासाठी गाणं करण्याची तयारी होती. सुमनताईंच्या आत्मचरित्रांच्या प्रकाशन समारंभाला अशोक पत्कींनी तसं म्हणूनच बोलून दाखवलं होतं. कारण सुमनताईंच्या आवाजातला गोडवा अशोक पत्कींनी आपल्या चालींतून वेगळ्याच पध्दतीने सादर केला होता.

शेवटी काय तर गाण्यातल्या दोन कलावंताचे एकमेकांशी सूर जुळणं यातून सुरीलं गाणं निर्माण होणं म्हणजे काय असतं ते मागच्या काळातल्या कलाकारांनीही दाखवून दिलं आहे आणि तीच परंपरा आजही दिसते आहे, पुढेही दिसत राहणार आहे! फक्त त्यासाठी दोन कलावंत मनांना एकमेकांची ओळख पटण्याची गरज असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -