पण…शरद पवारांवर विश्वास ठेवणार कोण?

Mumbai
सर्व विरोधकांना एकत्र घेऊन हात उंचावणे दिसते मनोहर!

आजच्या घडीला कोकणापासून – विदर्भापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून – पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, खेड्यातील पारापासून – मुंबईतील मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळापर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेले राजकीय नेतृत्व म्हणजे शरद पवार होय. जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे पवार आता पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. नरेंद्र मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांची मोट बांधून ते लोकसभा निवडणुकीत सत्तांतर करण्यासाठी सरसावले आहेत. ‘मी आणि फक्त मी’ अशा हुकूमशाही मोदी राजवटीला सत्तेवरून खाली खेचण्याचे पवारांचे हे पाऊल या घडीला आश्वासक वाटत असले तरी लाखमोलाचा एक सवाल आहे- पवारांवर विश्वास ठेवणार कोण?

पवारांच्या नावाला आज एक मोठे वजन आहे, त्यामागे वयाच्या 78 व्या वर्षीही ते करत असलेले प्रचंड कष्ट तर आहेतच; पण कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, त्यातील कमालीचे सातत्य, शांतपणा, विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी ते पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा आणि दूरदृष्टी असे असंख्य गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. याशिवाय प्रशासकीय कौशल्ये, कार्यकर्ते-नेते शोधण्याची नेमकी दृष्टी, प्रचंड जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ही गुण-कौशल्येही जोडीला आहेतच. स्थानिक कार्यकर्ते-नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे. आताही राज्य किंवा केंद्रीय स्तरावरील कोणतीही निवडणूक असल्यास प्रचार सभांची सर्वांत जास्त संख्या शरद पवार यांची असते. त्यांचा एकूणच वेग व झपाटा अविश्वसनीय आहे. ‘शरदराव राज्यात एवढे फिरले आहेत (फिरतात) की त्यांना कोणत्याही एखाद्या वाहनचालकापेक्षाही अधिक नेमके रस्ते माहिती आहेत’, असे म्हटले जाते. ही तर अगदी तांत्रिक (पण विशेष) बाब झाली, पण त्याचबरोबर ते रस्ते जिथे पोहोचतात, त्या गल्ली-बोळातील, वाडी-वस्तीवरील माणसाच्या ‘मनापर्यंत जाणारे रस्ते’ हे शरदरावांना अगदी नेमके माहिती आहेत हे निश्चित!

खरे तर असा हा सर्वगुण संपन्न नेता आज दिल्लीच्या तख्तावर म्हणजे पंतप्रधानपदी असायला हवा होता; पण, त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांना प्रचंड गुणवत्ता असून देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होता आले नाही. तसेच पवारांचे झाले. चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, विश्वनाथ प्रताप सिंह, देवेगौडा आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होऊ शकतात, पण पवार नाही. का? या सर्वांच्या तुलनेत पवार कुठेही कमी नव्हते. उलट काकणभर सरसच आहेत… पण, जेव्हा विश्वासाचा सवाल येतो तेव्हा बिगरकाँग्रेस फ्रंटला देवेगौडाही पंतप्रधानपदी चालतात आणि काँग्रेसला तर मनमोहन हे मिठाची गुळणी तोंडात ठेवून बसणारेही दहा वर्षे चालतात. कारण येथे विश्वासाचा प्रश्न येतो. एकवेळ तुम्ही कमी हुशार असलात तरी चालेल; पण पक्ष आणि नेतृत्वाशी प्रामाणिक पाहिजे. राजकारणात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. दगाफटका करून अचानक आपली वेगळी चूल मांडली तर नेतृत्व आणि पक्षालाही बसणारा फटका कोण निस्तरणार? यापेक्षा आपल्या सहमतीचा पंतप्रधान हवा, असे इंदिरा गांधी आणि जनता पक्षाच्या राजवटीत पवारांबद्दल बोलले जायचे.

तसेच सोनिया गांधींनी हातात काँग्रेसची सूत्रे घेतल्यानंतर पवार यांच्याविषयीची मते तशीच आहेत. आताही लोकसभा निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नाही तरी विरोधकांना पंतप्रधानपदी एकवेळ अननुभवी राहुल गांधी चालतील; पण पवार चालणार नाहीत. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव, शरद यादव, फारुख अब्दुल्ला, मायावती, मुलायमसिंह यादव, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा, सीताराम येचुरी यांना एकत्र आणण्यासाठी पवार हवेत. पण, या सर्वांना पंतप्रधान म्हणून पवार का नकोत? वेगवेगळ्या दिशेला असलेली तोंडे पवारांनी एका दिशेला आणायची, मात्र ती आल्यानंतर याच तोंडांनी पंतप्रधानपदाचा विषय आला की पवार यांच्याकडे मात्र तोंड फिरवायचे. आताही लोकसभा निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला तर हीच परिस्थिती येणार आहे. पवार यांच्याऐवजी तिसर्‍याच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडेल आणि हिमालयाच्या मदतीला धावणार्‍या सह्याद्रीवर, ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा…’ असे मग्न तळ्याकाठी बसून युगेयुगांत गुणगुणत राहावे लागणार आहे.

याच अनुषंगाने गेल्या काही महिन्यातील पवारांच्या हालचालींवर एक नजर टाकू. संविधान रॅलीनिमित्त पवारांनी देशातील प्रमुख नेत्यांना जमवले होते. रॅली हे एक कारण होते, पण हा धागा जोडून भाजपविरोधी आघाडी एकत्र आणण्याचा पवारांनी प्रयत्न केला. त्याआधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पवार तातडीने कामाला लागले होते. मायावती यांच्याप्रमाणे कुमारस्वामी देवेगौडा आणि काँग्रेसला एकत्र आणण्यात पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. विरोधी पक्षांना एकत्र आणायचे असेल तर राहुल आणि सोनिया गांधींना दुखवून चालणार नाही, याचे नेमके भान पवारांना आहे. यामुळे संविधान रॅलीनंतर त्यांनी ट्विट केलं की याबाबतची पुढची बोलणी राहुल यांच्या सल्ल्याने होतील.

मग दिल्लीत विरोधकांच्या आणखी दोन बैठका झाल्या- एक पवारांच्या आणि दुसरी सोनियांच्या घरी. पवारांची आखणी किती चोख असते याचं हे उदाहरण आहे. देशातल्या झपाट्याने बदलणार्‍या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे हे प्रयत्न तपासले पाहिजेत. अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखण्यासाठी पवार प्रसिध्द आहेत.

कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला बसलेला फटका देशात मोदी लाटेचा प्रभाव कमी होतोय, हे दाखवणारा आहे. भाजपचा घटत चाललेला जनाधार पाहता लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा बिगर-भाजप किंवा बिगर-काँग्रेस पक्षांना होऊ शकतो. कारण भाजप 225 आणि काँग्रेस 125 च्या घरात राहिली, तर उरलेल्या 193 जागा या पक्षांकडे राहतील. अशा वेळी या पक्षांची मोट बांधू शकणार्‍या शरद पवारांसारख्या नेत्याला महत्त्व येऊ शकते. पवारांचे विरोधकांसोबत एनडीएमधल्या अनेक घटक पक्षांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज शिवसेना, तेलुगू देसम, अकाली दल नरेंद्र मोदींवर नाराज आहेत. त्याचा फायदा पवार उठवू शकतात. शिवाय भाजपचे 100हून अधिक खासदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले आहेत. त्यांचाही जुगाड करण्यात पवारांचा हात कुणी धरणार नाही.

एवढी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची चाहूल लागल्यामुळेच पवारांचे पंतप्रधानपदाचे जुने स्वप्न जागे झाले असल्यास नवल नाही. राजीव गांधींच्या निधनानंतर पवारांनी सातत्याने या पदासाठी प्रयत्न केले आहेत. पण त्यांचे गणित कधीच न जुळल्यामुळे 2014 ला त्यांनी आशा सोडून दिली होती. पण आता त्यांचे निकटवर्तीय पुन्हा कामाला लागलेले दिसतात. अर्थात, पवारांना विचारलं तर ते याचा साफ इन्कार करतील!

पण पवारांच्या या मार्गात अडथळेही असंख्य आहेत. सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्यांची रसातळाला गेलेली विश्वासार्हता. पवारांवर विश्वास नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी संविधान रॅलीत सामील व्हायला नकार दिला. केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही पवारांची विश्वासार्हता चिंताजनक आहे. पवार कधी दगा देतील हे सांगता येत नाही, हे त्यांच्याभोवती जमा झालेले विरोधी नेतेही मान्य करतात. महाराष्ट्रातल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस सरकारला पहिला टेकू पवारांच्या पक्षाने अप्रत्यक्षपणे दिला होता, ही आठवण ताजी आहे. त्याआधी महाराष्ट्रात 80 च्या दशकात बिगरकाँग्रेस सरकारचे गठबंधन करताना पुलोद सरकारचा प्रयोग करत पवार मुख्यमंत्री झाले. पण नंतर आपल्या समाजवादी साथींच्या पाठीत खंजीर खुपसून पवारांनीच पुन्हा काँग्रेसचा टिळा लावून नवीन सरकार स्थापन केले. पवार काय करतील, याचा भरवसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित पवार यांना देता येणार नाही. राहुल गांधी तर खूप दूर राहिले!

पवारांचे राहुल यांच्याशी संबंध अलिकडे सुधारले तरी ते पवारांवर कितपत विश्वास टाकतील याची खात्री नाही. कालपर्यंत राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास नसणारे पवार आज अचानक राहुल यांचे गुणगान का गात आहेत, अशी शंका मनात आली तर त्याचे निरसन करण्यासाठी पवारांचा राजकीय इतिहास तपासला असता उत्तर अविश्वास असेच येते…

आणि एक पवार-मोदी दोस्तीचे काय करायचे? या दोस्तीकडे कोणी संशयाने बघत असेल तर त्यालाही खोडून काढता येत नाही. भले पवार आज म्हणत असतील की पूर्वीसारखे मोदी आता माझ्याशी काही बोलत नाहीत. विषयांवर चर्चा करत नाहीत. पण, आता करत नसले तरी दोघांना खरेच एकमेकांची गरज लागल्यास आधीची दोस्ती विसरली जात नाही.. प्रेमाला जशी उपमा नाही, तशीच दोस्तीलाही तोड नाही!

पवार भाजपविरोधी मोट बांधत असले तरी विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांच्या अहंकाराचा मोठा अडसर त्यात येण्याची अधिक शक्यता आहे. याची मोठी झलक उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला बाजूला ठेवून एकत्र आलेली मुलायम यांची समाजवादी पार्टी आणि मायावतींची बसपा. या दोन्ही पक्षांना उत्तर प्रदेशमधील आपला जनाधार गमावू द्यायचा नाही आणि मोदीविरोधी लाटेवर बसून देशात सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून आपल्या पदरात अधिकाधिक जागा पाडायच्या आहेत. तसे कदाचित झाले तर पंतप्रधान शर्यतीत आपला शब्द प्रमाण तर असेलच; पण केंद्रात बिगर भाजप सरकारात महत्त्वाची खातीही मिळवता येतील, हा सपा आणि बसपाचा डाव आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मातीत राजकारण आणि घरात एक नेता आहे, हे समजायला पुरोगामी महाराष्ट्र तेव्हाही कमी पडला आणि आताही कमी पडतो… भले पवार आता या सार्‍या अहंकारी आणि सत्तापिपासू नेत्यांचे हात हातात घेऊन सार्‍या भारताला भाजपविरोधी लाट आल्याचे दाखवून देतील, पण जेव्हा पंतप्रधानपदाचा किंवा मलईदार खात्यांवर निर्णायक बोलणी होतील तेव्हा पवारांचा हात झटकून हे सारे कधीच सत्तेच्या खुर्चीच्या दिशेने सुसाट पळत जातील…पवारांवर त्यांचा कालही भरवसा नव्हता आणि आजही विश्वास नाही. पवारांनी आपल्याला चर्चेत झुलवत ठेवून काँग्रेसशी संधान साधले तर हात चोळत बसावे लागेल. त्यापेक्षा सुरुवातीला नमन म्हणून हातात हात घ्यायचा, पण फायदा झाला की पवारांना त्यांचाच आवडता कात्रजच्या घाटाचा खेळ दाखवायचा… अविश्वासाच्या झाडाला विश्वासाची फळे थोडीच लागणार आहेत!

सध्या लोकसभेतील क्रमांक तीनचा पक्ष तृणमूल काँग्रेस आहे. पश्चिम बंगालवर ममता बॅनर्जी यांची पकड मजबूत आहे. त्यांनी आपला प्रतिनिधी मुंबईतल्या रॅलीला पाठवला, पण नंतर हा सगळा नेहमीचा ‘उपचार’आहे असं म्हटलं. ज्यांच्याकडे मोजून 10 खासदारही नाहीत, अशा पवारांचं नेतृत्व ममतादीदी काय म्हणून मान्य करतील? दक्षिणेतल्या नेत्यांच्या तर्‍हा तर वेगळ्याच! विरोधी पक्षांच्या अहंकारांची ही टक्कर ऐतिहासिक आहे. तिचा अनुभव जनतेने 1977, 1989 किंवा 1996 असा वारंवार घेतला आहे. आणखी एक शक्यता दृष्टिआड करता येणार नाही. समजा मोदींच्या जागा मोठ्या संख्येने कमी झाल्या, तर एनडीएमधूनच पंतप्रधानपदासाठी नितीशकुमार यांचं नाव पुढे येऊ शकतं. तशी शक्यता एनडीएचा घटक असलेल्या पी.ए. संगमा यांच्या मुलाने बोलून दाखवली आहे.

लोकसभा निवडणुकीला अजून पाच एक महिने बाकी आहेत. मोदी हे परदेश दौरे सोडून आता मुख्य प्रवाहात आले आहेत. मुलाखतींचा सपाटा, मीडियावर पकड हा त्यांचा हातखंडा खेळ तर खेळतील, पण देशभर प्रचार सभांचा धडाका लावून संमोहनाचे मायाजाल पसरवतील. मोदींच्या या जुमलेगिरी खेळाला आता शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासह विरोधक कसे उत्तर देतात, यावर निकराची लढाई ठरेल… राहता राहिला शरद पवार यांच्यावरील विश्वास तो कालही नव्हता आणि उद्याही नसेल!