घरफिचर्स‘कोण मेले कुणासाठी रक्त ओकून...’

‘कोण मेले कुणासाठी रक्त ओकून…’

Subscribe

आम्हालाही प्रगती करायची आहे. सुखीसमाधानी आयुष्य जगायचे आहे. गोळ्यांचे आवाज, स्फोटांच्या चिंधड्या, वातावरणात दाटून राहिलेली हिंसा ही काश्मिरी जनतेची प्राथमिकता असू शकत नाही. म्हणूनच जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणार्‍या आदिल अहमद दार या तरुणाच्या वडिलांनी अतिशय दु:ख व्यक्त केले. ‘‘कोणाचाही मृत्यू माझ्यासाठी वेदनादायी आहे. जे झाले ते अतिशय अयोग्य होते,’’ ही त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे. संपूर्ण काश्मीरची भावना हीच आहे. दहशतवादाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. काश्मीरचा प्रश्न हिंसाचाराने सुटणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसा असू शकत नाही.

पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सध्या युद्धज्वराची साथ पसरली आहे. जो तो उठतो तो लढाईची आक्रमक भाषा बोलतोय…ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी, मासळी बाजार, भाजी मंडई आणि नाक्यानाक्यावर एकच आवाज : पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. दोन अणुबॉम्ब टाकून बेचिराख करून टाकला पाहिजे. आता खूप झाले. आता माज उतरवायला हवा. खायला नाही दोन आणे आणि मस्ती आलीय चार आणे…एकदाचे ठोकून काढा. कायमची कटकट मिटेल! हे सारे वातावरण दारातले आणि घराघरातही तेच. साधा घरात उंदीर घुसला तर पळापळ होणार्‍या आणि पाल दिसली तर ई… करून पळणार्‍या ताई, माई आणि भाऊ, दादा यांना जणू हातात स्टेनगन घेऊन आणि मिराजवर बसून पाकिस्तानशी युद्ध खेळायला चाललेत अशी धुंदी चढलीय… जेवणावर ताव मारत मारत आणि टीव्ही बघत बघत या सर्वांचा लढाई ताप वाढत चालला आहे. अपघातात जखमी होऊन कोणी पडला असेल तर मदत सोडा, न बघता पुढे जाणारा आणि रात्री- अपरात्री कोणाला मदत लागली तर चार हात दूर राहणारा हा नव मध्यमवर्ग जेव्हा युद्धाची भाषा बोलतो तेव्हा त्यांचे हसायला येत नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव येते…

- Advertisement -

या सार्‍याचा विचार करत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून दोनदा बचावलेले पुलवामाचे माजी आमदार मोहम्मद युसूफ तरीगामी यांनी केलेले हे विश्लेषण हे युद्ध तापाची साथ चढलेल्यांना थोडे जाग्यावर आणू शकेल, अशी आशा वाटते. कारण तरीगामी यांच्यासह काश्मीर आणि तेथील जनतेने दररोज ते भोगले आहे. रक्तामांसाचा सड्याने त्यांच्या डोळ्यांची खाचरे झालीत… सुप्रसिद्ध कवी आरती प्रभू यांच्या कवितेतील दोन ओळी या निमित्ताने समोर येतात :
‘दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा… प्रश्न येतो कुठे येथे आसवांचा…’
म्हणूनच रोज मरण बघितलेले
तरीगामी म्हणतात तेच विश्व सत्य आहे. ते सांगतात :
‘गुस्से से हालात को संभाला नही जाता.’
तोंडाने आणि शब्दांनी युद्ध खेळण्यापेक्षा तरीगामी या सार्‍याकडे कसे पाहतात ते आधी पाहू…

पुलवामा येथील दहशतवादी हल्ला अतिशय दुर्दैवी आहे. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच एवढी तीव्र घटना घडली. या आधीही अनेक दहशतवादी हल्ले काश्मिरात झाले. पण यावेळच्या हल्ल्याची पद्धत अधिक भीषण असल्याने खूप मनुष्यहानी झाली. अशा हिंसाचाराच्या घटनांमुळे काश्मिरी जनतेच्या प्रश्नांचा गुंता आणखी वाढतो. हिंसाचारामुळे कुठलेच प्रश्न सुटलेले नाहीत, हा जगाचा अनुभव आहे. हिंसेने काश्मिरी जनतेचे आजवर नुकसानच केले आहे. काश्मीर खोर्‍यात हिंसाचार झाला, की त्यामध्ये येथील सामान्य नागरिक पहिल्यांदा भरडला जातो. काश्मिरची बाजू घेऊन दहशतवाद घडवणारे काश्मीर प्रश्नाचा गुंता सोडवत नाहीत तर अधिक वाढवतात. पुलवामा परिसरातले बहुतांश नागरिक शेतकरी आहेत. भात आणि सफरचंदाची शेती ते करतात. भगव्या केशराचे गंधीत मळे जिथे फुलतात ते जगप्रसिद्ध पम्पोर आमच्याच भागात आहे. या सगळ्या वैभवाला न जाणो कोणाची दृष्ट लागली. ‘सारा खुशहाल इलाका तबाही मे बदल गया !’

- Advertisement -

हे आज घडलेले नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून १९४७ पासून घडत आले आहे. खरे म्हणजे मुस्लीमबहुल असूनदेखील काश्मीर खोर्‍याने बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला. पाकिस्तानशी नाते जोडण्याचे नाकारून काश्मिरी जनता राजा हरिसिंगांच्या सोबत राहिली. पंजाब, बंगाल फाळणीच्या जखमांनी भळभळत होता तेव्हा काश्मीर खोर्‍यात रक्ताचा एक थेंबही वाहिला नव्हता. महात्मा गांधीदेखील म्हणाले होते, ‘उमेदीचे किरण जर मला कुठे दिसत असतील तर ते काश्मिरातूनच.’

राजा हरिसिंगांनी काश्मिरी जनतेच्या हितासाठी कायदा केला. काश्मीरमध्ये फक्त स्थानिकांनाच नोकर्‍या करता येतील, जमिनी घेता येतील अशा तरतुदी केल्या. पुढे भारतीय राज्यघटनेनेही या कायद्यास बळ दिले. पण स्वातंत्र्यानंतरच्या केंद्र सरकारांनी सातत्याने कलम ३७० ला धक्के दिले. अनेक सुधारणा करून काश्मिरी जनतेचे नुकसान केले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये तर हे कलमच हटवून टाकण्याची भाषा बोलली जात आहे. काश्मिरी युवकांच्या आशा-आकांक्षांची पूर्ती करण्याला कोणत्याच सरकारांनी प्राधान्य दिले नाही. त्यामुळे काश्मिरी तरुणांची नाराजी वाढत गेली. हाताला काम नसल्याने हे तरुण कशाच्याही बहकाव्यात येऊ लागले. सन २०१४ नंतर काश्मिरी तरुणांची नाराजी वाढली. त्याचे मुख्य कारण ठरले मेहबूबा सईद आणि त्यांची ‘पीडीपी’. भाजपाची साथ न करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी निवडणूक जिंकली. पण सत्ता मिळवण्यासाठी भाजपाशीच हातमिळवणी केली. मेहबूबांच्या विश्वासघातामुळे काश्मिरी जनतेत संताप निर्माण झाला.

राजकीय अस्वस्थतेमुळे येथील जनतेला भडकावण्याच्या दहशतवाद्यांच्या इराद्यांना बळ मिळते. याचा अर्थ काश्मिरी जनता दहशतवादी कृत्यांना साथ देते असा मात्र कोणी घेऊ नये. संपूर्ण काश्मीर खोरे दहशतवादाच्या गडद छायेखाली कापते ही वस्तुस्थिती आहे. काश्मिरी तरुणांचा अत्यल्प हिस्सा दहशतवादाच्या मार्गाकडे ओढला गेला हे खरेच; पण सर्वसाधारणत: काश्मिरी जनतेला शांतता हवी आहे.

आम्हालाही प्रगती करायची आहे. सुखीसमाधानी आयुष्य जगायचे आहे. गोळ्यांचे आवाज, स्फोटांच्या चिंधड्या, वातावरणात दाटून राहिलेली हिंसा ही काश्मिरी जनतेची प्राथमिकता असू शकत नाही. म्हणूनच जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणार्‍या आदिल अहमद दार या तरुणाच्या वडिलांनी अतिशय दु:ख व्यक्त केले. ‘‘कोणाचाही मृत्यू माझ्यासाठी वेदनादायी आहे. जे झाले ते अतिशय अयोग्य होते,’’ ही त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे. संपूर्ण काश्मीरची भावना हीच आहे. दहशतवादाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. काश्मीरचा प्रश्न हिंसाचाराने सुटणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसा असू शकत नाही. दहशतवादी हल्ला अतिशय लाजिरवाणा आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. परंतु, पाकिस्तानप्रमाणेच आपणही व्यक्त झालो तर त्यातून विनाशाशिवाय काहीच हाती लागणार नाही. आजपर्यंत किती युद्धे, चकमकी झाल्या. ‘सर्जिकल स्ट्राईक’ही झाले. त्यातून हाती काय लागले? दहशतवाद्यांची पैदास थांबलेली नाही. ‘गुस्से से हालात को संभाला नही जाता.’ त्याऐवजी काश्मिरी जनता दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. काश्मिरी लोकांची मने जिंकण्याची कामगिरी आजवरच्या सरकारांना करता आलेली नाही. काश्मीर समस्येचे खरे मूळ हेच आहे.

तरीगामी यांच्यानंतर जग युद्धाकडे कसे बघते ते पाहू….युद्ध कोणालाच नको आहे. अमेरिकेलाही ते नकोसे झाले आहे. मग भारताच्या लोकांना का इतकी फुरफुरी यावी, हेच कळत नाही. न्यूयॉर्क शहरात दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही इमारती पाडल्यानंतर मानवी हक्क कार्यकर्ते आणि प्रख्यात दिग्दर्शक मायकल मूर यांनी ‘फॅरनहीट ९/११’ हा प्रसिद्ध माहितीपट बनवला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवसायाची पाळंमुळं या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांशी कशी जोडली गेलेली आहेत हे मूर यांनी या माहितीपटात साधार मांडलं. युद्धज्वराची लागण झालेले अनेक अमेरिकन नागरिक त्यामुळे ताळ्यावर आले. जॉर्ज बुश यांची धोरणं, त्यांचा मूर्खपणा आणि त्यांचे संशयास्पद व्यावसायिक संबंध हे सारं अमेरिकन जनतेसमोर उघड झालं. परिणामी पुढच्या निवडणुकीनंतर बुश राजकीय विजनवासात गेले ते कायमचेच. आज अमेरिकेत त्यांचा उल्लेख सुद्धा कोणी करत नाही. अमेरिकेतली लोकशाही अतिशय भक्कम आणि परिपक्व असल्यामुळे मायकल मूर यांचा मुडदा पडला नाही.

मायकल मूरच्या माहितीपटात दिसतं की सैन्यात भरती होणारी मुलं ही अमेरिकेच्या अत्यंत दरिद्री कुटुंबातून आलेली असतात. १९६०-७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धात विमानांच्या विमानं भरून येणार्‍या तरुण सैनिकांच्या शवपेट्यांमुळे अमेरिकन समाजात संतापाचा आगडोंब उसळला होता. आजही मध्य पूर्व आणि अफगाणिस्तान इथून अमेरिकेला आपले सैनिक माघारी बोलवायला तिथल्या समंजस आणि विचारी समाजाने भाग पाडलं आहे. दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेल्या युरोप खंडाला त्यातून पुन्हा उभं राहण्यासाठी कित्येक दशकं गेली. आज ‘युद्ध’ हा शब्द जरी उच्चारला तरी युरोप खंडातील लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो.

आधुनिक पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आणि जगभरात सर्वत्र हा युद्धज्वर हळूहळू संपुष्टात येत असताना भारतात त्याची लागण होते ही चिंताजनक गोष्ट आहे. ‘युद्ध हे हितसंबंधितांचं राज्यशास्त्र, व्यावसायिकांचं अर्थशास्त्र आणि सामान्य सैनिकाचं अटळ मरण असतं’, हे दुसर्‍या महायुद्धानंतर झालेले, मजूर पक्षाचे इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. तर आरती प्रभू यांची आणखी एक आणि मानवी जीवनाचे नागडे सत्य मांडणारी कविता बोलते, ‘कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून. जगतात येथे कोणी मनात कुढून…’

आणि या लेखाच्या तिसर्‍या आणि शेवटच्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना जशाच तसे उत्तर दिल्यानंतर मोदी भक्तांना आणि भाजपच्या नेत्यांना जो काही ज्वर चढला आहे तो तपासू….
मोदींचा जन्म व्हायच्या आधी १९४७ ला पाकिस्तानी घुसखोरांविरोधातील काश्मिरातील लढाईत भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढून यश मिळवले होते. म्हणून आज काश्मीर भारतात आहे.
मोदी १५ वर्षांचे असताना १९६५ साली पाकिस्तानच्या आक्रमणाचा प्रतिकार करताना भारतीय सैन्य थेट लाहोरपर्यंत घुसले होते…
१९७१ साली मोदींना थोडीफार समज येत असताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचे तुकडे केले होते.

१९९८ साली मोदींचा राजकीय उदय होण्याआधी भारतीय सैन्याने कारगील विजय पदरी पाडला होता. याव्यतिरिक्त १९४७ ते २०१४ या कालावधीत सर्जिकल स्ट्राईकही अनेकदा झाले. परंतु त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी किंवा चित्रपट बनवण्यासाठी केला गेला नाही.

आजच्या पिढीसमोर भक्त जे मांडताहेत की आज जे घडलं ते फक्त मोदींमुळेच घडलं, तर असं काही नाहीय..फक्त तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचा राजकीय वापर केला नाही..आत्ताचे करताहेत. कारण समोर निवडणुका आहेत. भाजपच्या जे मनी आहे तेच तोंडी दिसते. अन्यथा भाजपचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा असे बरळले नसते. भारतीय हवाई दलाच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होईल. सध्या मोदी समर्थनाची देशात लाट असून राजकीय हवा भाजपच्या बाजूने वाहत आहे… येडीयुरप्पा आणि तमाम मोदी भक्तांनो जनाची नाही मनाची लाज बाळगा!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -