घरफिचर्सजगण्याच्या वेगाबरोबर गाण्याचा वेग कशाला?

जगण्याच्या वेगाबरोबर गाण्याचा वेग कशाला?

Subscribe

आज जीवनाचा वेग वाढलेला आहे. अशा वेळी आजची गाणीसुध्दा वेगवान हवीत, ती कमी वेगाची असून कशी चालतील? असं काहीसं वेगवान तत्वज्ञान तो कुणी निर्माता की दिग्दर्शक कुठल्याशा चॅनेलवर फारच वेगवान पध्दतीने मांडत होता आणि ते बघून हसावं की रडावं ते कळतच नव्हतं. मनात विचार आला की शांत आणि संथ गाण्यांनी यांचं असं काय घोडं मारलं आहे की तशा प्रकारची गाणी करण्यावर ह्यांनी संक्रांत आणावी!

‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्ही सांजा’ हे ‘जिव्हाळा’ चित्रपटातलं संगीतकार श्रीनिवास खळेंचं गाणं. अतिशय म्हणजे अतिशय शांत आणि संथ सुरावटीतलं गाणं. आजही कधीमधी रेडिओ-टीव्हीवर वाजतं तेव्हा पावलं जागच्या जागी थांबतात. ‘कसमे, वादे, प्यार वफा सब बाते हैं बातों का क्या?’ हे ‘उपकार’मधलं गाणं. अत्यंत संथ पावलांनी पुढे सरकणारं. पण ऐकताना आपल्याला ते पुढे जाऊ देत नाही. तिथल्या तिथे थांबवून ठेवतं. मन्ना डेंचं ‘तू प्यार का सागर हैं’ हे गाणं घ्या. अत्यंत शांत, संथ गतीतलं हळवंदिवं गाणं, त्याच्या अंतर्‍यातले ‘घायल मन का पागल पंछी उडने को हैं बेकरार’ हे शब्द तर आतल्या आत पाणी पाणी करणारे.

आज कुणी एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ते गातं तेव्हा आजुबाजूच्या धडाम धडाम गाण्यांमध्ये सगळ्यात जास्त उठून दिसतं, सगळ्यात जास्त भाव खाऊन जातं. संगीतकार दत्ता डावजेकरांचं ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे गाणं घ्या. गाण्यात आलेल्या पहिल्या ‘संथ’ ह्या शब्दापासून गाणं खूपच संथ पाण्यासारखं संथ वाहतं, गाण्यात वर्णन केलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचं ते संथ वाहणं तर गाणं ऐकताना स्पष्ट दिसतं, पण गाणं इतकं अप्रतिम की ते संपूच नये, ते संथ वाहणं तसंच चालू राहावं असं वाटत राहतं.

- Advertisement -

हिंदीतल्या ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’, ‘ओ बसंती पवन पागल, ना जा रे ना जा, रोको कोई’, ‘अंखियो के झरोकों से’, ‘सांझ ढले, गगन तले’, ‘शाम ढले जमुना किनारे’, ‘सुहानी रात ढल चुकी’, ‘मेरे नैना सावन भादो’, ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’, ‘ऐसे तो ना देखो’ अशा किती शांत आणि संथ, पण कानामनाला मोहवून टाकणार्‍या गाण्यांची यादी द्यायची!

मराठीतसुध्दा ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘भावभोळ्या भक्तीची ही एकतारी’,‘पाहिले न मी तुला’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘स्वर आले दुरूनी’, ‘दयाघना, का तुटले चिमणे घरटे’, ‘माझिया मना, जरा थांब ना’, ‘श्रावणात घननिळा बरसला’ अशा कितीतरी शांत, संथ, पण मन नादावून टाकणार्‍या गाण्यांची भलीमोठी यादी देता येईल! आजही ही गाणी अंतर्मुख करतात, आतल्या आत कालवाकालव करून टाकतात. त्यामुळे आजच्या वेगावर स्वार झालेल्या जगात शांत-संथ गाणी चालत नाहीत हा मुद्दा साफ गैरलागू ठरतो, पार निकालात निघतो.

- Advertisement -

या ठिकाणी एक गंमतीदार किस्सा सांगता येईल. ‘अलबेला’ ह्या सिनेमासाठी संगीतकार सी.रामचंद्रंपुढे ‘शोला जो भडके, दिल मेरा धडके, दर्द जवानी का सताए बढ बढ के’ असे शब्द आले तेव्हा त्यांना सुचवण्यात आलं की शोला, भडके, धडके असे शब्द या गाण्यासाठी लिहिण्यात आले आहेत तेव्हा तसंच धडकतं, फडकतं, वेगवान गाणं करा. पण सी.रामचंद्र त्यांच्याकडे आलेल्या ह्या सुचनेला मुळीच बधले नाहीत. त्यांनी त्या फडफडत्या शब्दांवर पाय थिरकवायला लावणारं, पण शांत, संथ गाणं केलं ते त्याच काळात काय, आजही ऐकल्यावर मनातल्या मनात गुपचूप फेर धरायला लावतं.

साहजिकच, आज जीवनाचा वेग वाढला आहे म्हणून गाणंही वेगवान असायला हवं असं जे कुणी म्हणतं आहे त्याच्या चुकांचा वेग वाढला आहे, असाच आणि इतकाच निष्कर्ष काढता येईल!

-सुशील सुर्वे
(लेखक संगीत विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -