घरफिचर्सआज नवाझ, उद्या पाक गुडघे टेकणार !

आज नवाझ, उद्या पाक गुडघे टेकणार !

Subscribe

जयवंत राणे –

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला करून १६६ जणांचा बळी घेणारे दहशतवादी हे पाकिस्तानीच होते, यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शिक्कामोर्तब करून आजवर दडपून ठेवलेले सत्य उघड केले आहे. पाकिस्तानमध्ये तीन समांतर सरकारे चालत आहेत, त्यामुळे घटनात्मक मार्गाने निवडून आलेले सरकार चालवणे कठीण होऊन बसते. पाकिस्तानमध्ये काय चालले आहे, हे तसे सगळ्या जगाला माहीत आहे, फक्त ते कबूल करत नव्हते. आता पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानानेच त्याची कबुली देऊन शरणागती पत्करली आहे. आज नवाझ शरीफ तर उद्या पाकिस्तान भारतासमोर गुडघे टेकणार आहे, याचीच ही नांदी आहे.

- Advertisement -

मुंबईवर हल्ला पाकिस्ताननेच केला

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानीच होते, यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शिक्कामोर्तब केले आहे. पाकिस्तानने ही जबाबदारी झटकण्याचा कायम प्रयत्न केला, अशी जाहीर कबुली शरीफ यांनी दिली. असे बोलून त्यांनी उभ्या जगात पाकिस्तानची भलतीच पंचाईत करून टाकली आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या आजवरच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीत भारताविरुद्ध आग ओकणारा आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये नेहमीच काश्मीरचा राग आळवणारा माजी पंतप्रधानच असे बोलत असेल तर पाकिस्तानने कुणाच्या तोंडाकडे पाहावे, अशी त्यांची गोची झाली आहे.

- Advertisement -

शरीफ असे बोललेच नाही

शरीफ यांच्या या कबुलीनंतर पाकिस्तानात एकच हाहाकार उडाला आहे. त्यांनी जगाच्या बाजारात आपल्याच देशाच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश केला आहे. यांनी अशी कबुली देऊन स्वत:च्या हातानेच पाकिस्तानमध्येच बनवलेल्या अण्वस्त्रांनी पाकिस्तानवरच हल्ला केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शरीफ यांच्या पक्षाने, यावर शरीफ असे काही बोललेच नाहीत. भारतातील प्रसारमाध्यमांनी शरीफ यांची बदनामी चालवलेली आहे. त्यांच्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावला आहे, असे दावे करून बाजू मारून नेण्याचा आटापिटा चालवलेला आहे. पण शरीफ यांच्या समर्थकांनी पाकिस्तानातूनच प्रसिद्ध होणारे ‘डॉन’ हे वृत्तपत्र वाचले तर त्यांना वास्तव कळू शकेल. कारण याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी ही कबुली दिली आहे.

शरीफ बोलतात त्यात मोठे रहस्य नाही

शरीफ यांच्या या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तानची बेअब्रू होत असल्याचे लक्षात आल्यावर तेथील काही मंडळींनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या माध्यमातून शरीफ यांनी तोंड बंद ठेवावे, यासाठी दबाव आणण्यात येत आहे. पाकिस्तानात तीन समांतर सरकारे चालत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांना मुंबईत जाऊन हल्ला करण्यासाठी कुणी परवानगी देण्याची गरज नाही. अशा स्थितीत घटनात्मक मार्गाने निवडून आलेल्या सरकारला काम करणे कठीण होऊन बसते. शरीफ हे जे काही बोलत आहेत, हे काही फार मोठे रहस्य आहे, अशातला भाग नाही. ते सगळ्या जगाला माहीत आहे. फक्त मुद्दा इतकाच होता की, पाकिस्तानकडून ते मान्य केले जात नव्हते.

पाकिस्तानमध्ये तीन सरकार

मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबच्या नऊ साथीदारांना मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कमांडोंनी ठार केल्यानंतर पाकिस्तानने ती आमची माणसे नाहीत, म्हणून त्यांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांचे दफन भारतालाच करावे लागले होते. पण आता खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी दीर्घ काळ राहिलेल्या आणि भारताच्या विरोधात कडवी भूमिका घेतलेल्या व्यक्तीनेच हे दहशतवादी पाकिस्तानी होते, असे कबूल केले आहे. यापूर्वी भारत आमच्यावर खोटे आरोप करत आहे, असे आजवर पाकिस्तान म्हणत आला. पण आता गुन्हा कबूल आहे, असे त्यांच्या माजी पंतप्रधानांनीच सांगितले आहे. त्यामुळे अधिक काही पुराव्यांची गरज आहे, असे वाटत नाही. थोडक्यात, काय तर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाने आपण हरलो, असे मान्य केले आहे. पाकिस्तानात तीन समांतर सरकारे चालतात. त्यामुळे कुणीच कुणाचे ऐकत नाही. तीन सरकारे म्हणजे पाकिस्तानी लष्कर, तेथील दहशतवादी संघटना आणि धार्मिक संघटना आहेत. या तीन समांतर घटकांच्या कचाट्यात पाकिस्तान भरडला जात आहे. राज्य घटना नावापुरती आहे. त्यानुसार निवडून आलेल्या सरकारला तिथे काही किंमत नाही, असेच शरीफ यांनी सांगून टाकले आहे.

दहशतवाद्यांचे एकेकाळचे म्होरके हे आमचे हिरो होते

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानी होते, अशी कबुली शरीफ यांनी आता दिली असली तरी यापूर्वी पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्याच्या माजी प्रमुखांनीही अशीच कबुली दिली होती. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे एकेकाळचे म्होरके हे आमचे हिरो होते. पण तेच आता आमचे दुश्मन होऊन आमच्यावर उलटले आहेत आणि पाकिस्तानातच घातपाती कारवाया घडवत आहेत, असे मान्य केले होते.

पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागतील

पाकिस्तानची अवस्था सध्या अस्थिर आणि विचित्र झालेली आहे. पाकव्याप्त काश्मीर, सिंध, बलुचिस्थान, पुश्तूनी प्रांत येथून पाकिस्तानी सरकारच्या विरोधात असंतोष भडकत आहे. त्यांना पाकिस्तानच्या जाचातून मुक्त व्हायचे आहे. दुसऱ्या बाजूला भारताशी लढण्यासाठी पाकिस्तानने ज्या चीन या बलाढ्य देशाशी जवळीक साधली आहे, तो पाकिस्तानात इतका आरपार घुसला आहे, की त्याने पाकिस्तानला अक्षरश: पंगू करून टाकले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली चीनने पाकिस्तानवर प्रचंड दडपशाही चालवली आहे. चीनने तिबेटमधील विरोध करणाऱ्या लोकांच्या चिंधड्या उडवल्या. त्यानंतर तिबेटींना भारतात आश्रयासाठी यावे लागले. पाकिस्तानातील ढासळलेली व्यवस्था आणि चीनची दडपशाही यातून वाचण्यासाठी पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावे लागतील, असेच संकेत मिळत आहेत. पाकिस्तानने कायम भारताविषयी द्वेष भावना जोपासली. त्या आधारावरच तेथील राजकीय नेत्यांचे राजकारण चालत राहिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरून बड्या देशांकडून पाकिस्तानचा ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ म्हणून वापर करण्यात आला. त्यासाठी पाकला आर्थिक मदत आणि शस्त्रसामुग्री मिळत गेली. पण हा देश आतून पोखरत आणि ढासळत गेला. त्याची कबुलीच नवाज शरीफ यांनी दिली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -