कागदाला कल्पकतेचे पंख!

कागदाला पण रंग, रूप आणि गंध असतो. आजचे वर्तमानपत्र कोणी टाकून देत नाही, पण उद्या मात्र त्याची रद्दी होत असते आणि किंमत फक्त रद्दीची किंवा कचरा म्हणून शिल्लक राहत असते. याच रद्दीचे असंख्य उपयोग करून तिचा पुनर्वापर करण्याच्या कल्पना पर्यावरणपूरक आहेत. छोट्या पिशव्या, बुकमार्क, भेटकार्ड, शुभेच्छा पाकिटे इत्यादी बर्‍याच वस्तू आपण या पुन्हा वापरलेल्या कागदाच्या बनवू शकतो. कागदाला घड्या घालून त्याचे लिफाफे, खेळणी आदी वस्तू बनतात. रंगीत कागदांचे पतंग, पताका, झिरमिळ्या, भिरभिरे आदी वस्तू होतात.

Mumbai

आपण नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हल्ली सगळ्या गोष्टी भराभर उरकत असतो. नकळत आपण रोबो बनत चाललो आहोत. आपल्याला वाटते की रोबो बनवला की तो सगळी कामे करेल, पण नकळत आपण त्याच्या हातातील बाहुले बनत जाणार. मोबाईल हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. आपण हळूहळू आभासी जगात जगायला लागलो आहोत. वाढदिवसाचे केक खोटे, हसणे, रूसणे, लाजणे अगदी प्रेम करणे हे ईमोजी करतात. आजकाल आपण बोलत पण नाही, फक्त व्हॉट्सअ‍ॅप. लिहिणे नाही बोलणे नाही हसणे नाही, मग यंत्रमानवासारखी अवस्था कोणाची झाली आहे? हात लावशील त्याचे सोने होईल असा वर मिळालेल्या राजाची गोष्ट आठवते? प्रत्येक गोष्ट आपल्याला चटकन हवी असते. शुद्ध धिरापोटी फळे रसाळ गोमटी हे आपण विसरून गेलो आहोत. या शर्यतीत भाग घेणारे स्वतःला त्रास करून घेतातच, पण गमावतात तो अमूल्य वेळ. जगात आई आणि वेळ एकदाच मिळते. गेली की गेली. पुन्हा कितीही पैसे खर्च केले तरी परत मिळत नाही. आयुष्य भरभरून जगायला शिका.. श्वास घ्या खोल खोल आणि…चित्त स्थिर करा. स्थिर मन ही आजच्या काळाची गरज आहे.

आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जायचं की त्यालाच आपल्या रथाला जुंपायचं हे ज्याचं त्याने ठरवलच पाहिजे. सोशल नेटवर्कचा उपयोग आपण काही नवीन केले तर लगेच जगापुढे आणण्यासाठी नक्कीच करता येतो. काय बरं करता येईल चित्तवेधक आणि मनमोहक? चित्रकला, हस्तकला आपल्याला मिळालेली फक्त देणगी नसून तिच्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला व्यायाम मिळतो. मोबाईल वरून गुगलीला करण्यात वेळ न घालवता आपले निसर्गदत्त क्षमता असलेले डोके नावाचा पीसी वापरून तर बघा. जगातले अनेक शोध या मेंदूनेच तर लावले आहेत की नाही. तुम्हाला शाब्बासकी तर मिळतेच पण अभिमानाने दाखवता येईल, अशी एक छान भेटवस्तू तुम्हाला आणि तुम्ही ज्यांना देता त्या प्रत्येकाला आनंद देते. आनंद ही अशी गोष्ट आहे जी देण्यासाठी आपल्याला पैसे खर्च नाही करावे लागत. आपल्या चांगल्या वागण्यातून किंवा आपण केलेल्या कलाकृतीतून तो आपणच दरवळतो.

दररोज आपला थोडावेळ या हस्तकलेसाठी राखून ठेवायचा आणि आपणच बनवलेल्या वस्तू भेट म्हणून द्यायच्या. आहे की नाही गंमत. घरातले पण खूश होतील. पैसे तर वाचतीलच पण तुम्ही स्वतः बनवलेली हस्तकला तुम्ही मित्रमैत्रीणींना बनवायला पण शिकवू शकाल. सगळ्यांनाच शिकता येईल असे नाही, पण प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते काय उगाच? आपण एखादी नवीन गोष्ट शिकत असतो म्हणजेच नकळत स्वतःमधील सृजनशीलता वापरायला सुरुवात करत असतो. यातूनच तर आपला सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग सापडत असतो. तुमची कल्पनाशक्ती फुलवायला प्रेरक अशा कलाकृती करताना तुमचा वेळ नक्कीच आनंदात जाईल.

कागदाचा पहिला उपयोग लहानपणीच कसा सुरू होतो हे आपण सगळेच जाणतो, यात हल्लीच्या काळात नक्कीच बदल झालेला आहे. कागदाची खरी गंमत पाऊस सुरू झाला की होड्या बनवून पाण्यात सोडताना येत असते. विमान आणि ओरीगामी असे कलात्मकतेने केलेले कागदाचे उपयोग थक्क करून सोडतात. सकाळी वर्तमानपत्र हातात आले नाही की अस्वस्थ होणारे अनेकजण आहेत. पत्रिकेचा कागद, मैत्रिणीला लिहिलेल्या मजकुराचा कागद, कोर्ट कचेर्‍यांतील हिरवट कागद, स्टॅम्प पेपरचा कागद, नव्या कोर्‍या पुस्तकाचा कागद त्याला तर छान सुवास पण येतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा कागद नानाविध रूपातून समोर येत असतो. चणे शेंगदाण्याची पुडी जाऊन प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकने केलेला शिरकाव नकळत आपलेच नुकसान करीत आहे. दस्तऐवजाच्या रूपाने असंख्य वर्षापूर्वीचे कागद पण संग्रहालयात जपून ठेवलेले असतात. कागदाला पण रंग, रूप आणि गंध असतो. आजचे वर्तमानपत्र कोणी टाकून देत नाही, पण उद्या मात्र त्याची रद्दी होत असते आणि किंमत फक्त रद्दीची किंवा कचरा म्हणून शिल्लक राहत असते. याच रद्दीचे असंख्य उपयोग करून तिचा पुनर्वापर करण्याच्या कल्पना पर्यावरणपूरक आहेत. छोट्या पिशव्या, बुकमार्क, भेटकार्ड, शुभेच्छा पाकिटे इत्यादी बर्‍याच वस्तू आपण या पुन्हा वापरलेल्या कागदाच्या बनवू शकतो. कागदाला घड्या घालून त्याचे लिफाफे, खेळणी आदी वस्तू बनतात. रंगीत कागदांचे पतंग, पताका, झिरमिळ्या, भिरभिरे आदी वस्तू होतात.

हात, पाय, तोंड, फर्निचर वगैरे पुसून कोरडे करण्यासाठी कागद उपयोगी पडतो. अनेक औद्योगिक तसेच बांधकाम क्रियांमध्येही याचा वापर होत असतो. क्वचितच खाद्य कागद म्हणूनही तो बनवला जातो. कागदाचा उपयोग आणि उपयुक्तता याचा विचार करून एक नवीन व अधिक पर्यावरणपूरक असा कागद, प्लास्टिक पॅकेजिंगला पर्याय म्हणून बनवणे तसेच वापरात आणणे याची सुरुवात झाली आहे. त्याला पेपरफोम असे म्हणतात. या प्रकारच्या कागदाला प्लास्टिक पॅकेजिंगसारखेच गुणधर्म असतात, पण त्याचे जैव-विघटन करता येते व त्याचे साध्या कागदासमवेत पुनश्चक्रीकरण करता येते. नॉन टेरेबल कागद, बटर पेपर, ब्राऊन पेपर, आर्ट पेपर, टीप कागद, घोटीव कागद, कार्ड बोर्ड, रंगीत कागद, लिटमस पेपर, क्रेप पेपर असे विविध प्रकार कागदामध्ये बनवले जातात. कागदा इतका सहज अनेक प्रकारे वापरता येणारा दुसरा प्रकार क्वचितच आढळेल.

हायड्रोकार्बनवर आधारित पेट्रोकेमिकल्सच्या वाढणार्‍या किमती आणि सिंथेटिक कोटिंग बाबतच्या वापराची पर्यावरणाबद्दल जागरूकता लक्षात घेऊन, झिन (एक प्रकारचे मक्याचे प्रोटीन) याचा वापर करून कागदाची निर्मिती करण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी सहभागी झालेच पाहिजे. कचर्‍यातून कलेची निर्मिती ही बौद्धिक तसेच क्रियाशील राहण्यासाठीही उपयोगी आहे. कागदाचा कचरा होऊ न देता त्यापासून विविध शोभेच्या तसेच उपयोगाच्या वस्तू बनवता येतात.चला तर कागदाचा पुनःपुन्हा उपयोग करू व पर्यावरण वाचवू.

– अर्चना देशपांडे-जोशी