घरफिचर्सदेशाचा कौल कोणाच्या बाजूने !

देशाचा कौल कोणाच्या बाजूने !

Subscribe

लोकांनी कोणाला मतदान केले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण लोक कसे मतदान करू शकतात, याचे आराखडे मात्र मांडता येतात. गेल्या पाच वर्षांत केंद्रातील विद्यमान भाजप सरकारने काय केले, यापेक्षा गेली पाच वर्षे कोणताही भ्रष्टाचार, अनागोंदी शिवाय हे सरकार चालले. त्यातून लोकांचा विश्वास संपादित झाला हे सत्य आहे. भारतीय म्हणून असलेला स्वाभिमान केवळ पुन्हा वाढीस लागला हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यातून देशातील लोकांची सांपत्तिक स्थिती सुधारली का? देशातील दारिद्य्र गेले का? सर्वांना नोकर्‍या मिळाल्या का? तर त्याचे उत्तर नाही हेच आहे. मात्र लोकांची असलेली सांपत्तिक स्थिती बिघडली नाही हे वास्तव आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाच फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत आणि रविवारी सहावी ़फेरी व्हायची आहे. आतापर्यंत 425 जागांचे मतदान संपलेले आहे. त्यामुळे जवळपास 80 टक्के जागांचे भवितव्य यंत्रामध्ये बंदिस्त झालेले आहे. अशावेळी प्रत्येक पक्ष व प्रामुख्याने त्याचे नेतृत्व यांची देहबोली अधिक बोलकी झालेली आहे. उत्तर प्रदेश आणि बंगाल या राज्यात अजून दोन फेर्‍या व्हायच्या आहेत आणि त्या दोन्ही ठिकाणचे कडवे मोदी विरोधक रडकुंडीला आलेले आहेत. उलट तिथून अधिक जागा मिळवायला उत्सुक असलेले नरेंद्र मोदी व त्यांचे पक्षाध्यक्ष अमित शहा अधिकच उत्साहित होऊन विरोधकांवर शाब्दिक हल्ले चढवित आहेत. तितकेच मोदी विरोधातले बेछूट बेताल आरोप अधिकच टोकदार होत चालले आहेत. जिथे मतदान संपलेले आहे, अशा राज्यातील मोदी विरोधक अस्वस्थ होऊन कडेलोटावर उभे असल्यासारखे वागत सुटले आहेत. त्यात प्रामुख्याने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश करता येईल.

- Advertisement -

जसजसे मतदान संपत आलेले आहे, तसतशी यांची बेचैनी वाढत गेलेली आहे आणि त्यांनी अधिकाधिक शिवराळ भाषेत मोदींवर हल्ले चढवले आहेत. आरोप चालविले आहेत आणि मतदान यंत्रावरही निकाला पूर्वीच शंका जाहीर केल्या आहेत. मोठ्या अपेक्षेने चंद्राबाबू सुप्रीम कोर्टात गेले होते. पण तिथूनही फटकारून लावल्यावर त्यांनी विविध विरोधी व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम आरंभला आहे. लढण्यापूर्वी ज्यांना समान तत्वावर एकजूट करता आली नाही, किंवा आघाडी करता आली नाही त्यांची निकालानंतरच्या परिस्थितीशी जुळते घेण्यासाठीची धावपळ नवलाची नाही. बहुधा त्यांना एक्झिट पोलचे आकडे मिळालेले असावेत. जसजसे मतदान संपलेले आहे, तसतसे तिथल्या जागांचे आकडे तयार झालेले आहेत. ते जाहीर करण्याला प्रतिबंध असला तरी राजकीय पक्षांना मोबदला देऊन एक्झिट पोल मिळू शकतात. त्याचे प्रतिबिंब या लोकांच्या वागण्यावर पडलेले असावे. विजयाची मस्ती मोदी वा अमित शहांच्या वागण्यातून दिसू शकते आणि नैराश्य व पराभवाने येणारी अस्वस्थता ममता, शरद पवार, चंद्राबाबू इत्यादींच्या वागण्यात दिसू लागलेली आहे. हे आकडे मोदींच्या पराभवाचे असते, तर यंत्रावर याचिका करायला सगळ्या पक्षाचे नेते एकजुटीने जाताना दिसले नसते. त्सुनामी आली, तेव्हा आधी त्याचा सुगावा लागलेली प्रतिक्रिया पाळीव जनावरांमध्ये उमटली होती, काही तास आधीच ही गुरे दावी तोडून पळायला धडपडत होती. तर गाफील मानुष्यप्राणी बेसावध झोपलेला होता. अशा बातम्या आलेल्या होत्या. आताही मोदींना हरवण्याच्या वल्गना करणार्‍यांना एक्झिट पोलने येऊ घातलेल्या त्सुनामीची चाहुल लागलेली असावी काय?
कालपरवा बारामतीच्या निकालाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, तिथे भाजपाचा उमेदवार जिंकला तर लोकांचा निवडणुका व लोकशाहीवरचा विश्वासच उडून जाईल. वरकरणी पवारांचे विधान हास्यास्पद वाटेल. पण वेगळ्या अर्थाने त्यांच्याही वाक्यामध्ये आशय आहे आणि तो समजून घ्यावा लागेल. त्यांच्यासह विविध 21 राजकीय पक्षांनी मतदान यंत्रावर शंका घेऊन सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. वास्तविक यापूर्वीच त्याविषयी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि मतदान यंत्राला पर्याय नसल्याचा निर्वाळा आधीच्याच निकालातून दिलेला आहे. पण तरीही कुठल्याही निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी याचिका करणे, हा आता एक खेळ होऊन बसला आहे. त्यातून असे पुरोगामी किंवा बुद्धीजीवी म्हणवून घेणारे लोक काय साध्य करीत असतात? तर कुठलाही निकाल अंतिम नाही आणि त्याविषयी शंका घेण्याचीच प्रवृत्ती जनमानसात रुजवित असतात.

आधीच्या दहा वर्षात शहाण्या लोकांनी देशातल्या भ्रष्टाचार व अनागोंदीला वेळच्या वेळी रोखण्यासाठी हालचाली केल्या असत्या, तर नरेंद्र मोदी हा पर्याय लोकांना शोधावा लागला नसता, की स्वीकारावा लागला नसता. तो मतदाराने दिलेला धडा होता. तर त्यातून शिकून शहाणे होऊन आपल्या चुका सुधारण्याचा उपाय विरोधकांनी व बुद्धीजीवींनी चोखाळायला हवा होता. उलट त्यांनी अधिकच खोटेपणा आरंभला व मोदींना नुसते बदनाम करून संपवण्याचे फसलेले डावच पुढे रेटल्याने लोकांचा आता मोदींवर अधिक विश्वास बसलेला आहे. तर पवारांसह तमाम पुरोगाम्यांवरचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळेच असे नेते मतदान यंत्र, निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टावरही अविश्वास दाखवू लागले आहेत. पवार साहेब, लोकांचा मतदानावरचा विश्वास उडालेला नसून तुमच्यासारख्या नेते पुढारी पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे. किंबहुना तुमच्यासारखे नेते, पक्षांचाच जनतेवरचा विश्वास उडालेला आहे.

- Advertisement -

मागल्या पाच वर्षात मोदींनी लोकांना काय दिले? खोटी आश्वासने? निदान विरोधक व बुद्धीजिवींचा तसा आरोप आहे. पण मुळातच 2014 सालात लोकांनी मोदींकडून कुठली आश्वासने मागितली नव्हती की, त्या आश्वासनांसाठी लोकांनी मोदींच्या हाती सत्ता सोपवलेली नव्हती. लोकांना सोनिया, राहुल, मनमोहन यांच्या अराजकातून मुक्ती हवी होती आणि मागल्या पाच वर्षात मोदींनी लोकांची ती अपेक्षा पूर्ण केलेली आहे. लोकांचा ढासळणारा विश्वास पुन्हा प्रस्थापित करायचे कर्तव्य शहाणे बुद्धीजीवी, पुरोगामी नेते पक्ष यांनी पार पाडले असते, तर लोकांना मोदी किंवा भाजपा हा पर्याय शोधावा किंवा स्वीकारावा लागला नसता. तेव्हा भाजपाचे नेतृत्व अडवाणी व गडकरी असे लोक करीत होते आणि त्यांच्याही बाबतीत लोकांचा विश्वास शून्य होता. हे सगळेच काँग्रेसप्रणित नेहरू प्रणालीचेच पाईक असल्याची लोकांची खातरजमा झालेली होती. म्हणूनच लोकांना पर्याय शोधायचा होता. पण मुख्यमंत्री होताच लोकांच्या लक्षात त्याचा पोकळ वासा आला आणि सगळ्या जनतेच्या नजरा मोदींकडे वळल्या. आठदहा महिने आधी लोक मोदींकडे बघू लागले होते आणि केजरीवाल यांचा उडाणटप्पूपणा मोदींना आकर्षक बनवणारा ठरला. लोकांना तेव्हा किंवा आज पुन्हा, राहुल सोनियांची सत्ता व त्यातून येणारे अराजक नको आहे. पण पुन्हा तोच पर्याय घेऊन विरोधक व बुद्धिजीवी मतदारासमोर आले, तर मोदींना पर्याय उरतोच कुठे?

लोकांनी कोणाला मतदान केले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण लोक कसे मतदान करू शकतात, याचे आराखडे मात्र मांडता येतात. गेल्या पाच वर्षांत केंद्रातील विद्यमान भाजप सरकारने काय केले, यापेक्षा गेली पाच वर्षे कोणताही भ्रष्टाचार, अनागोंदी शिवाय हे सरकार चालले. त्यातून लोकांचा विश्वास संपादित झाला हे सत्य आहे. भारतीय म्हणून असलेला स्वाभिमान केवळ पुन्हा वाढीस लागला हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यातून देशातील लोकांची सांपत्तिक स्थिती सुधारली का? देशातील दारिद्य्र गेले का? सर्वांना नोकर्‍या मिळाल्या का? तर त्याचे उत्तर नाही हेच आहे. मात्र लोकांची असलेली सांपत्तिक स्थिती बिघडली नाही. देशातील दारिद्य्र अधिक वाढले नाही. नोकर्‍या मिळाल्या नसल्या तरी रोजगार उपलब्ध झाले. जनतेचे हाल संपलेले नसले तरी कमी झाले. भाजप सरकार चांगले नसेल तरी काँग्रेसच्या सरकारपेक्षा बरे ठरले. त्यातून देशात मतदान झालेले आहे आणि उरलेल्या दोन टप्प्यात होणार आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -