घरफिचर्ससंपादकीय : आम्ही सावित्रीच्या लेकी!

संपादकीय : आम्ही सावित्रीच्या लेकी!

Subscribe

आम्ही सावित्रीच्या लेकी!
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ॥

एक आई सार्‍या कुटुंबाला विद्या देईल, असं म्हटलं जातं. विद्येच्या क्षेत्रात मुलींचा टक्का वाढतो, हा या राज्याचा सर्वार्थाने सुधारणेचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रात होणार्‍या सर्वच परीक्षांमधला विद्यार्थीनींचा उत्तीर्णतेचा टक्का वाढतो आहे, ही सुखद घटना होय. विद्येविना अनर्थ घडणार नाही, अशी सुखद परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते आहे. स्त्री शिक्षणाची कवाडं महात्मा फुलेंनी उघडी केल्यापासून स्त्रीशिक्षणाला सर्वार्थाने महत्व दिलं जात आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्यातल्या समाजसुधारकाने घेतलेल्या पुढाकाराने स्त्रियांसाठी शिक्षणाची गंगा वाहते आहे. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी पकडून ज्योतिरावांनी पुरोगामी विचारांची माडणी केली. पुरोगामीत्वाला समाजाचा एक घटक कितीही शिव्याशाप देत असला तरी हे विचार देशहित आणि मानवी कल्याणाचीच री ओढतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. १९४८मध्ये ज्योतिरावांनी पुण्यातल्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा निर्माण केली तिची जबाबदारी सावित्री फुलेंकडे दिली. तेव्हापासूनच स्वत:ला हितकारी म्हणणार्‍यांनी सावित्रीबाईंची यथेच्छ टिंगलटवाळी केली. सनातन्यांकडून होणार्‍या अश्लाघ्य विरोधानंतरही ज्योतिरावांनी हार मानली नाही.

- Advertisement -

आज महिलांसाठी शिक्षण, ही संकल्पना पुढे येण्याला ज्योतिरावांचा हाच कणखरपणा कारणी लागला. महिला वर्गाला एका जोखडाखाली ठेवणार्‍या सनातन्यांपुढे टिकाव धरणं अवघडत असतानाच्या काळात स्त्रीशिक्षणाचा रेटा लावण्यासारखं मुष्किल ध्येय उराशी बाळगणं हेच राष्ट्रीयत्व समजून ज्योतिरावांनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली नसती तर आज स्त्री शिक्षणाचं काय झालं असतं, याचा विचारच करता येणार नाही. पेरावं तसं उगवतं, या म्हणीला साजेसं कार्य विविध क्षेत्रात होत असलं तरी शिक्षण क्षेत्रातील मक्ता मोडून तिथे अगदी स्त्रियांसाठी पुढाकार घेणं हे अशक्यप्रायच होतं. त्यात स्त्रियांना संकुचित मानणार्‍यांच्या जगात हे साध्य करणं हा केवळ दायित्वाचाच भाग म्हणता येईल. पेरण्याची क्रिया ज्यांच्याकडून होते त्यापैकी काही सजीव व्यक्ती असतात. शिक्षक, पालक, मित्र, नातेवाईक अशा या सजीव व्यक्ती मुलांच्या मनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काही पेरीत असतात. चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रदर्शने, वस्तूसंग्रहालये अशा माध्यमातून मुलांच्या मनात काहीबाही पेरलं जातं. सजीव व्यक्तीकडून होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचा मुलांना घडविण्यात फार मोठा वाटा असतो.

एकविसाव्या शतकात स्त्री मुक्ती चळवळीच्या झोतात वावरणार्‍या आजच्या शिक्षकांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कोणता आहे, यावर आज प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणार्‍या मुलींचं म्हणजे उद्याच्या स्त्रियांचं विकसन अवलंबून आहे. आजच्या शिक्षकांनी कुटुंब जीवनातील स्त्रीचं स्थान, तिच्या जबाबदार्‍या, पात्रता अशा अनेक बाबीसंबंधी काय वाटतं हे समूजन घेऊन दृष्टिकोनात कालसुसंगतता आणणं महत्त्वाचं आहे. मुली विनयशील, लाजाळू, निटनेटक्या व अभ्यासू असतात. असं मानून आपण त्यांच्यावर अनेक गोष्टी लादतो की काय हा विचार मनात येतो. मुली अधिक विनयशील असतात, असे म्हणणार्‍या लोकांच्या मनात मुलींनी विनयशील असलंच पाहिजे, असा विचार असण्याचा संभव आहे. मुलीच्या जातीने निटनेटकं असलं पाहिजे, अशा विचारांमुळे पुरुषवर्गाकडून मुलींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुचना होत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, मुली अभ्यासू असल्या तरी अभ्यासात काही अंशी कमी असतात, अशीही एक समजूत शिक्षकात रूढ होती. या समजुतीला संशोधनाचं पाठबळ मात्र मिळत नाही. आजच्या माध्यमिक शाळांतील मुलींना शिक्षण देणार्‍या शिक्षकांची ही अभिमतं भावी काळाच्या दृष्टीने सुयोग्य आहेत, असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

- Advertisement -

स्त्री म्हणजे फेअर सेक्स, नाजूक उन्हाने कोमेजणारी, गजगामिनी अशा रूढ कल्पनांचा पगडा अजूनही आमच्या शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. शक्ती लागणारी, शारीरिक श्रम ज्यात आहेत असा पुरुषीपणा निर्माण करणारी कामं स्त्रियांनी अजिबात करू नयेत असं आमचे पुरुष आजही मानतात. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी, माता ही आहेच, पण या व्यतिरिक्त तिला काय व्हावंसं वाटतं याला फारसं महत्त्व दिलंच जात नाही. निसर्गानुसार मुली वयात येतात, प्रेमात पडतात आणि आपला जीवनसाथी निवडतात, अथवा वडील मंडळी त्यांचा जीवनसाथी शोधतात. परंतु हे जे घडतं या बरोबरच अन्य काही आपण घडवावं असंही प्रत्येक मुलीला वाटतं. मुलींना काय व्हावंसं वाटतं, याचा शोध घेताना सामाजिक संस्कारांचा त्या इच्छेला बसणारा पायबंद आमच्या शिक्षकांच्या उत्तरात प्रतिबिंबित झाला आहे. चाळीस-पन्नास वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगणार्‍या या देशातील शिक्षकास स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, पत्नी व माता यापेक्षा अधिक आहे, नव्हे ती असलीच पाहिजे याची जाणीव नसेल तर, आजच्या माध्यमिक शाळेत शिकणार्‍या बहुसंख्य मुली आपल्या गळ्यात फक्त मंगळसूत्र पडण्याचीच वाट पाहत बसतील.

जे सुप्त आहे त्याला अंकुरित करणं, जे अंकुरित आहे त्याला विस्तारित करणं जे विस्तारित आहे त्याला खोली प्राप्त करून देणं हे शिक्षकाचं काम आहे. आजच्या माध्यमिक शाळांतील अनेक मुलींच्या मनात आपण कोणीतरी व्हावं याबाबतचं एक स्वप्न सुप्तावस्थेत आहे. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका केवळ गृहिणी, पत्नी, माता नसून ती यापेक्षा अधिक जबाबदारीची असल्याची जाण शिक्षकात नसेल तर आमच्या अनेक मुलींची ‘काहीतरी’, ‘कोणीतरी’ होण्याची स्वप्नं अंकुरित होणं कठीण होईल. विकसनाच्या खूप उंच झोक्यावर चढून खुली हवा चाखलेल्या स्त्रीला गुंजेएवढ्या घरात स्वत:ला दडपून राहणं कसं आवडेल? आणि ते आवडत नाही म्हणून ते गुंजेएवढं घर थोडं विस्कळीत होणारच, या भयाने स्त्रीला परंपरागत साच्यात कोंबण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न फार काळ यशस्वी होणार नाही. आज शिक्षणात मुलींचा वाढता टक्का या सगळ्या गोष्टींची जाणीव समाजाला करून देतो आहे. एकंदरीत उत्तीर्णचा टक्का घसरत असताना मुलींचा टक्का वाढतो, हा आशेचा किरण असाच टिकून राहिला तर समाजाचं भलं होईल आणि त्यामुळे देश पुढे जायला मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -