घरफिचर्समहिला मेळावा !

महिला मेळावा !

Subscribe

माझं अपराधीपण मलाच खायला येतंय. जीवनाच्या रणांगणात अनेक आघाड्यांवर लढत लढत कणखर बनलेल्या या महिलांना मी सांगितलेल्या पुस्तकी गोष्टी क्षणभर आकर्षित करीतही असतील. पण खरंच का माझ्या पुस्तकी शब्दांनी, माझ्या मनोरंजक कथांनी त्यांची जीवने उजळणार आहेत. खरंच का त्यांच्या हृदयीचा जाळ शमणार आहे. त्यांच्या कष्टांची ओझी हलकी होणार आहेत? महिला मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर हे प्रश्न मला अस्वस्थ करत राहिले.

ग्रामीण महिलांचा भरलेला प्रचंड मेळावा. कोणी मैत्रिणीबरोबर आलेल्या. कोणी बचतगटातून आलेल्या. कोणी महिला मंडळातून आलेल्या. ट्रकमधून किंवा मिळेल त्या वाहनातून मेळाव्यासाठी आलेल्या महिला. प्रमुख पाहुणी म्हणून मी केलेल्या भाषणाने प्रभावित झालेल्या त्या महिला. त्यांचे चेहरे मला वाचता येत होते. मी बोलत असताना हजारो औत्सुक्यभर्‍या नजरा माझ्यावर खिळलेल्या. आत्मगौरवाने सुखावलेली मी अनेक बोधकथांमधून त्यांना आवश्यक असलेली तत्वे सांगत होते. माझ्या मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कथांनी प्रभावित झालेल्या महिलांचे आदरस्थान झालेली मी. शिक्षण, अंधश्रध्दा निर्मूलन, वैज्ञाानिक दृष्टीकोन अशा अनेक मुद्यांवर माझे प्रभावी भाषण.

मेळाव्याचे पहिले सत्र संपून आता जेवण व विश्रांतीची सुटी आहे. मी आता जाण्यासाठी बाहेर पडतेय. मला गेटपर्यंत सोडण्यासाठी आलेल्या आयोजक महिलांबरोबर मी संथपणे पावले टाकीत चालले आहे. माझे लक्ष जातेय. कॅम्पसमध्ये म्हिलांचे विखुरलेले घोळके आहेत. कोणी झाडाखाली बसल्या आहेत. कोणी पाय सैल सोडून सावलीला बसल्या आहेत. कोणी झाडाच्या बुंध्यावर डोके ठेऊन विश्रांती घेताहेत. चिमण्यांसारखा चिवचिवाट चालला आहे. त्यांच्या चेहर्‍यावर आज कोठेही थकवा नाही. कसल्यातरी आनंदाने त्यांचे चहरे उजळलेले.

- Advertisement -

मी विचार करीत होते. आज गप्पांमध्ये कसले विषय असतील त्यांचे. आज त्यांना व्यक्त व्हायला विश्वासाच्या जागा मिळाल्या आहेत. निवांत क्षणही मिळाले आहेत. आज त्या आपल्या मनाच्या तळघराची दारे मोकळी करून आतील विविध गोष्टी, विविध नाती, नात्यांचे पापुद्रे, काटेरी नात्यांचे टोचणे, आठवणींचे अवशेष आणि असेच काही काही सगळे बाहेर फेकणं जमतंय त्यांना. आज त्या नेहमीच्या काळोख्या स्वयंपाकघराच्या चौकटीतून बाहेर आल्यात. बाहेरच्या मोकळ्या प्रकाशात आल्यात. हा मुक्त आनंदाचा लाभ किती घेऊ असं त्यांना झालंय. तहानलेल्या मनाने त्या हा आनंद घटाघटा घेताहेत. काय सांगत असतील त्या अंतरीच्या बोचणार्‍या वेदना.

बाबा आजारी होता. नवर्‍याने जाऊ दिले नाही. शेवटची भेटही झाली नाही. दारू पिऊन नवरा मारतो. शिव्या घालतो. हे सांगत असतील की, शेतात कामाला गेल्यावर अंग मोडून येते. पण घरात येऊन सगळे बघावेच लागते. त्याबद्दल घरात कोणालाच किंमत नाही. वाडवडिलांची जमीन सांभाळण्यासाठी रक्ताचे पाणी केले आणि आता मुंबर्इचे वारसदार हक्क सांगायला वाटा घ्यायला येतात. अशा कोणत्या कहाण्या असतील की, मुलगा कॉलेजात जातो. त्याने शिकावे म्हणून कर्ज काढून पैसे दिले. तर मोबाईल घेऊन फिरतो. मार्कही कमी पडतात. हे शल्य सांगितले जात असेल. आपली मुलगी अगदी टीव्हीवरच्या मुलींसारखी दिसते. पॅन्ट घालते, कॉलेजात जाते; पण मार्क नाहीत. हे शल्य असेल. आपली पोरगी परप्रांतियांबरोबर पळून गेली याची कहाणी असेल. अशा कितीतरी काळ्या कहाण्या मनात घुसमटत असलेल्या मोकळ्या केल्या गेल्या असतील. रस्ता रूंदीकरणात जुने घर गेले. आता नवीन घरात जुळवून घेताना जुन्या घराच्या आठवणींनी सद्गदीत होणारी माऊली असेल.

- Advertisement -

असा विचार करीत मी संथपणे एक एक पाऊल टाकीत चाललेय. मी सोबतच्या महिलांसोबत बोलतेय, पण मन मात्र त्या घरट्याबाहेर पडलेल्या, चिवचिवाट करणार्‍या पक्षिणींमध्येच आहे. मी कॅम्पसमध्ये दूरवर नजर टाकतेय. आम्हाला पाहून महिला सावरून बसतात. कोणी उभ्या राहून हात जोडतात. कोणी उठून धावत आमच्या दिशेने येतात. बसलेल्या बायकांचे काळे काटकुळे पाय माझ्या नजरेतून सुटत नाहीत. काही महिला धावत आमच्यापाशी येतात. जोडलेल्या हातांवरच्या फुगलेल्या शिरा मला स्प्ष्ट दिसतात. मॅडम मी बचत गटाची प्रमुख आहे. तुम्ही गोष्टी छान सांगितल्या. आमच्या गावात याल तुम्ही. गावातल्या बायकांच्या कानावरून जाऊदे चांगलं.

मी हसून म्हणते, हो येईन ना कधी ते ठरवा आणि सांगा, आपण काहीतरी साहस केले असल्याचे आनंदी भाव त्यांच्या चेहर्‍यावर मला वाचायला मिळतात. अशाच अर्थाचे संवाद आणखीही काही गावातील महिलांबरोबर होतात. मी झपाझप पावले टाकीत गेटच्या दिशेने जात असताना मात्र मला दिसत असते, या सर्व म्हिलांच्या हृदयीचा पारंपरिक जाळ. रूढी परंपरांचा, अंधश्रध्दांचा, अज्ञानाचा त्यांच्या जीवनाला असलेला अजगरी वेढा.

माझं अपराधीपण मलाच खायला येतंय. जीवनाच्या रणांगणात अनेक आघाड्यांवर लढत लढत कणखर बनलेल्या या महिलांना मी सांगितलेल्या पुस्तकी गोष्टी क्षणभर आकर्षित करीतही असतील. पण खरेच का माझ्या पुस्तकी शब्दांनी माझ्या मनोरंजक कथांनी त्यांची जीवने उजळणार आहेत. खरंच का त्यांच्या हृदयीचा जाळ शमणार आहे. त्यांच्या कष्टांची ओझी हलकी होणार आहेत. त्यांना घट्ट बांधून ठेवणारा पुरूषप्रधान संस्कृतीचा पाश थोडातरी सैलावणार आहे. माझ्यातल्या मर्यादा मलाच भेडसावू लागल्या. माझ्या कथांनी त्यांचे मनोरंजन आणि क्षणभर प्रबोध30न होर्इल. पण त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. माझ्या भाषणाने त्यांच्या आयुष्याला लपेटून राहिलेला काळा पडदा दूर होऊ शकणार नाही.

या साध्याभोळ्या महिलांच्या जीवनात बदल घडवून आणायचा असेल तर नुसत्या भाषणांनी काही होणार नाही. या ग्रामीण महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी संघटित व सातत्यपूर्ण असे प्रयत्न व्हायला हवेत. हे प्रयत्न केवळ एकानेच करून भागणार नाही. सर्व स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. सर्व स्तरावर एकमेकांशी संयोजन पाहिजे. असे नियोजनबध्द प्रयत्न झाल्यास या महिलांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश एका दिवसासाठीच नव्हे तर कायमचा पसरू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -