घरफिचर्सविलोभनीय ‘पँगाँग सरोवर’

विलोभनीय ‘पँगाँग सरोवर’

Subscribe

‘पँगाँग त्सो’ या तिबेटी भाषेतल्या नावाचा अर्थ ‘लांब, चिंचोळा, जादुई तलाव’ असा आहे. या सरोवराची खासियत अशी की सुर्यप्रकाश पडल्यावर या सरोवराच्या पाण्याचे हिरवा आणि निळा असे रंग बदलतात.

पँगाँग सरोवराचे खूप वर्णन ऐकल्याने लेहला पोहोचल्यावर लवकरात लवकर पँगाँग सरोवराचे दर्शन घेण्याची उत्सुकता होती. लेहलडाख सहलीत पँगाँग सरोवर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण.लडाखला गेल्यावर पँगाँग सरोवराला भेट दिली नाही तर ती सफर पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. लडाखहून हे सरोवर १६० कि.मी. अंतरावर असून वाटेत ‘छांगला पास’ लागतो. येथे तापमान खाली असल्याने बर्फाने आच्छादित झालेली पर्वतशिखरे गाडीतून पाहावी लागतात. मात्र, बर्फ हाताळण्यासाठी गाडीतून खाली उतरण्याची हिंमत करावी लागते.

लेहहून साधारणपणे ७ ते ८ तासांचा खडतर पण सृष्टिसौंदर्य अवर्णनीय असलेल्या भागातून प्रवास करीत आपण चौदा हजार फुटांवरच्या सुंदर पँगाँग सरोवर येथे पोहचतो.अत्यंत पारदर्शी, नितळ पाणी आणि लुभावणारे निसर्गसौंदर्य येथे पाहायला मिळते. अथांग पसरलेला तो जलाशय चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. एवढ्या उंचीवरील हे सरोवर खार्‍या पाण्याचे असूनही हिवाळ्यात संपूर्णपणे गोठते.

- Advertisement -

पँगाँग सरोवर हे अतिशय रमणीय ठिकाण आहे. पँगाँग म्हणजे स्वर्ग, दुसरे काही नाही त्याच्या काठावर एक रात्र मुक्काम म्हणजे साक्षात स्वर्गात असल्याचा अनुभव आहे. ह्याचे सौंदर्य हे स्वर्गिय आणि कल्पनातीत आहे. ह्या सरोवराची खासियत अशी की सुर्यप्रकाश पडल्यावर ह्या सरोवराच्या पाण्याचे हिरवा आणि निळा असे रंग बदलतात.‘पँगाँग त्सो’ या तिबेटी भाषेतल्या नावाचा अर्थ ‘लांब, चिंचोळा, जादुई तलाव’ असा आहे. या तलावाची जादू त्याच्या काठावर उभे राहिल्यावर प्रत्येकाच्या मनावर अंमल करते.या पँगाँग लेकच्या क्षणाक्षणाला बदलणार्‍या निळाईच्या छटा, एकीकडे माथ्यावर बर्फाचे मुकूट मिरवणारे आणि पायथ्याशी वाळूचे डोंगर सांभाळणारे उंच उंच पहाड, वळणावळणावर रंग बदलणारे कधी जांभळी तर कधी सोनेरी कधी हिरवी तर कधी तपकिरी रंगछटा उधळणारे डोंगर असे सौंदर्य पाहता व अनुभवता येते.दूरवर तलावाच्या पलीकडे असणार्‍या भागावर सूर्य किरणांचा झोत पडलेला असेल तर तो तेवढाच भाग सोनेरी दिसत असतो. या सरोवरात वेगवेगळे पक्षी विहार करताना दिसतात. तसेच निरनिराळी फुलेही मन वेधून घेतात.

सरोवराशेजारीच तंबू असल्याने आम्हाला तलावाची सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, सकाळी अशी विविध रुप पाहता आली. तो केवळ स्वर्गीय अनुभव होता.पण येथे रात्री कडक्याची थंडी व जोराचा वारा वाहत असल्याने तंबूमध्ये झोप येणे कठीण जाते. तरुणाई लेह ते पँगाँग सरोवर असा खडतर प्रवास ‘बुलेट’ या दुचाकीवर करताना दिसते.लडाखमधील पँगाँग सरोवराचा एक तृतीयांश म्हणजे ४५ कि.मी. लांबीचा भाग भारताच्या ताब्यात तर दोन तृतीयांश म्हणजे ९० कि.मी. लांबीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. खर्‍या फोटोग्राफरला पँगाँग सरोवर परिसर म्हणजे फोटोसाठी पर्वणीच आहे. सरोवराला कितीही वेळा जा तिथला नित्य बदलत असणारा निसर्ग छायाचित्रकारासाठी नवनवीन संधी सतत देतच आला आहे. हे सरोवर कितीदा पाहिले तरी ते नवीन अनुभत देत राहत असल्याने ते अजूनही मला साद घालत आहे.

- Advertisement -

-विवेक तवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -