घरफिचर्सवर्क फ्रॉम होम ते सुसाईड बॉम्बर

वर्क फ्रॉम होम ते सुसाईड बॉम्बर

Subscribe

युद्ध सुरू झालंय. धोक्याची घंटा वाजली आहे. करोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. असे कळकळीचे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी व सरकारी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम बरोबरच टप्प्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत. आपण करोनाच्या प्रादुवाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत यामुळे तिसऱ्या टप्यात पोहचण्याआधी ही चेन तोडणं गरजेचे आहे. यासाठी  घरातच राहा असेही मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला पोटतिडकीने सांगितले. पण हे आपल्यापैकी कितीजणांनी सिरियसली घेतलंय. असा प्रश्न मुंबई व देशात करोना रुग्णांचा वाढता आकडा बघून पडतोच.

कारण आम्हांला करोनाच्या प्रादुर्भावाच्या विचारापेक्षा वर्क फ्रॉम होम हा आदेशच जाम आवडलाय. कारण आम्ही भारतीय सुट्ट्यांसाठी खूपच हावरट आहोत. त्यातच वर्क फ्रॉम होम सारख्या पाश्चिमात्य राष्ट्रात राबवली जाणारी संकल्पना करोनाच्या निमित्ताने का होईना आता इथेही काही दिवसांसाठी का होईना राबवली जाणार असल्याने आम्हाला काय करू आणि काय नको असं झालयं. वर्क फ्रॉम होम स्टेटसमध्ये जरी आम्ही काम करणार असलो तरी त्यानंतरचा किंवा मधल्या ब्रेकमधला वेळ आम्ही कुटुंब आणि मित्रांबरोबर कधी त्यांच्या घरी तर कधी आमच्या घरी चकाट्या पिटवण्यात नाहीतर संध्याकाळी चकना खात बसण्यात घालवत आहोत आणि घालवणार आहोत. त्यातच जर घरात बसून बोर झालोच तर पाय मोकळे करायला म्हणून रस्त्यावर नाहीतर बिल्डींगच्या कट्ट्यावर, नाहीतर गच्चीवर जाणारच आहोत . अथवा मोकळ्या मैदानावर  क्रिकेट, फुटबॉल  खेळायला आम्ही मोकळेच आहोत.

कारण करोना काही हवेतून पसरत नाही असं डॉक्टरांनीच सांगितलय.  त्यातच आता शाळांच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत. सुट्टयाही बाकी आहेतच म्हणून मार्च महिन्यातच काही जणांनी उन्हाळी सुट्ट्याच सुरू झाल्याच्या थाटात बायकापोराटोरांसह गावाची वाट धरलीय. यामुळे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी होत आहे. पण आम्हाला काय त्या गर्दीचं. कारण त्या गर्दीत करोनाची लागण होण्याच्या टेन्शनपेक्षा गाडीत बसायला जागा मिळवण्याची आमची धडपड आहे. कारण गावातील शुद्ध व मोकळ्या हवेत करोना काय त्याचा बाप पण फिरुकू शकणार नाही असा आम्हाला विश्वास नाही महाविश्वास आहे. त्यातच जर सरकारने यावर उतारा म्हणून ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलाच तरी त्याने काय आम्ही थांबणार आहोत? आम्ही खासगी गाड्यातून गुराढोराप्रमाणे दाटीवाटीने जाऊ. पण जाणार हे नक्की. कारण येथे करोना आहे. जो गावात येण्याची सुतराम शक्यता नाही. यावर आम्हाला विश्वास आहे.

काय म्हणावं या मानसिकतेला. नको तेवढा आत्मविश्वास की मूर्खपणा.  लोकांना गर्दी टाळा. घरातच बसा सांगून आता शासनाचाही घसा बसलाय. काय झालंय हो आपल्याला जरा विचार करा शांतपणे. तेही जमत नसेल तर जरा व्हिडीओ बघा चीन आणि इराण व इटलीने जे यूट्यूबवर टाकलेत. करोनाबाबतचा अतिआत्मविश्वास कसा नडला त्यांना. याची त्यांच्या सरकारनेच या व्हिडीओच्या माध्यमाने कबुली दिली आहे. रोज प्रेतांचे खच पडत आहेत तिथे. पण करोनाची लागण होईल या भीतिने त्यांच्यावर दफनविधी करण्यासाठी कुटुंबीयही पुढे येत नाहीयेत आणि इटलीत तेवढी मोकळी जागाही आता उरली नाहीये. त्यामुळे काही प्रेतांची व्हिल्हेवाट लावण्याची जबाबदारी तेथील लष्कराला देण्यात आली आहे. करोनाच्या याचपार्श्वभूमीवर चीनमध्ये काही दिवसांपूर्वी निर्जनस्थळी प्रेतांचा खच जाळण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. तो बघूनही जर आम्हांला करोनाचे गांभीर्य कळत नसेल तर जगात भारतीयांसारखे मूर्ख कोणीही नाही असे बोलावेच लागेल.

- Advertisement -

याचा कळस म्हणजे परदेशातून आलेले व सध्या क्वारनटाईनचा स्टॅप हातावर असूनही सार्वजनिक स्थळी बिनधास्तपणे वावरणारे दीडशहाणे फॉरेन रिर्टनर.  स्वत: बरोबरच इतरांनाही आपण करोनाच्या दाढेत लोटत आहोत. याची पुसटशी जाणीवही नसेल का त्यांना की जाणीवपूर्वक ते असले कृत्य करत आहेत. याचाही सरकारने विचार करणे आवश्यक झाले आहे. अशा महाभागांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे. याची अंमलबाजवणी झाल्याचे गायिका कनिका कपूरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर समजले. अभिनंदन आणि विशेष आभार सरकारचे. कारण आम्हा बेशिस्त भारतीयांना गर्दी नेहमीच आकर्षित करते. मग ती लग्नाची असो, अंत्यसंस्कारांची असो व आंदोलानची.

कारण नसताना तर कधी कधी  त्या प्रसंगाशी घटनेशी काडीचाही संबंध नसताना फक्त गर्दी दिसली की डोकवण्याची सवय असल्याने कुठल्याही गर्दीत भारतीय शिरतात. पण आतापर्यंत आपण ज्या गर्दीत टाईमपास म्हणून घुसत होतो आज त्याच गर्दीत करोनावाहक असू शकतो जो तुम्हा आम्हांला थेट मृत्यूच्या दारात नेऊ शकतो हे वेळीच ओळखा. जर क्वारनटाईन असाल तर  दुसऱ्याच्या जीवावर उठल्यासारखे गावभर हिंडणे टाळा. गप घरात बसा. स्वत:ही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. दुसऱ्याच्या मृत्यूचे कारण बनू नका. यासाठी सरकारला एकच नम्र विनंती भारताचं वुहान, इटली व इराण होऊ द्यायचं नसेल तर अशा बेजबाबदार करोनावाहकांना सुसाईड बॉम्बर म्हणून घोषित करा. तरच करोनाच्या तिसऱ्या स्टेजपासून देशवासियांना वाचवता येईल. रविवारचा जनता कर्फ्यू ही त्याचीच सुरुवात आहे. यात भारतीय आणि समाजाचे देणे लागतो म्हणून सगळ्यांनीच आवूर्जून सहभागी व्हायला हवं. तरच देश वाचेल आणि तुम्ही आम्हीही.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -