माही मार रहा है आणि…

माही तू खूप काही दिलंस, खूप काही शिकवलंस...आपल्या ध्येयांवर तू प्रेम करायला शिकवलंस..मुलगी जन्मली, पण तू ऑस्ट्रेलियात, तिला तू चक्क 40 दिवसांनी पाहिलंस.. तेव्हा पत्रकारांनी विचारले होते, असं का केलंस ?.. तुझं उत्तर होतं..आधी देश, इथं भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या... विराट, जाडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे ही तुझी गुंतवणूक... आणीबाणीच्या क्षणी तू चक्क सीनियर्सना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. किती टीका सहन केलीस. पण, गुंतवणूक देशाला फायदेशीर ठरली म्हणून त्याचे श्रेय तू घेतले नाहीस. संघ हरला की तू संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतोस; पण जिंकल्यावर मात्र कॉर्नरला दिसतोयस... कसं शक्य होतं रे तुला हे..?

धोनी

क्रिकेटवेड्या भारतात विराट कोहलीची टीम इंडिया हरली, यावर बुधवारी न्यूझीलंडकडून पराभव झाला त्या दिवशी आणि आताही चार दिवसांनी विश्वास बसत नाही. वर्ल्ड कप कोणी जिंकला याला 132 कोटी भारतीयांच्या मते किंमत नाही. आपल्याला 2015 प्रमाणे 2019 लाही तो जिंकता आला नाही, याचे दुःख आहे. सर्वच बेभरवशासारखे. इंग्लंडमधील पावसासारखे आणि भारतीय हवामान खात्यासारखे. काहीच भरवसा नाही. धो धो कोसळणार म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचे तर झक मारली आणि छत्री घेतली, अशी कपाळावर हात मारण्याची वेळ. तर, हवामान खात्याच्या नावाने शिमगा करून छत्रीविना बाहेर पडायचे तर पाऊस मुद्दामहून येऊन तुमची जिरवणार… सर्वच अनपेक्षित.

लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 प्लस जागा मिळवणे हे जेवढे आजही धक्कादायक वाटते, तेवढेच भारतीय संघाचा सेमी फायनलमधील पराभव. विश्वास बसत नाही. नोटाबंदी, बेरोजगारी, तोट्यात गेलेली शेती, व्यवसायांना लागलेली घरघर, अदृष्य हुकूमशाही आणि बरेच काही… असे असतानाही मोदी दुसर्‍यांदा सत्तेवर येतात, तसेच विराट, रोहित, धोनी, हार्दिक, बुमराह, शमी, भुवनेश्वर यांचा भारतीय संघ हरतो कसा हे पचनी पडत नाही. यातील एक नाव शांत होताना पाहून काळजात दुःखाचा अग्नी पेटल्यासारखे झाले आहे… माही मार रहा है… हे अजूनही भारतीय विसरू शकत नाही आणि आता जगातला हा सर्वोत्तम फिनिशर आपले क्रिकेट फिनिश होत चालले आहे, असे सांगतोय की काय… हे चित्र बघवत नाही.

मी जेव्हा मरणाला टेकेन तेव्हा मला फुल आवाजात रवी शास्त्रीच्या समालोचनासोबत धोनीचा वर्ल्डकप विजयी षटकार दाखवा.. हे चक्क सुनील गावसकरचे बोल. तोच माही सेमी-फायनलला फिनिशर ठरला नाही. 4 बाद 24 अशी हालत असताना पंत आणि हार्दिकने किल्ला लढवला खरा; पण त्यात विजयाची आस नव्हती. ती नसल्याने दोघेही बेजबाबदारपणे बाद झाले. जाडेजा मात्र खेळपट्टीवर आला आणि त्याने जिगर काय आहे ते दाखवून दिले. आधी त्याने आपल्या आत घुसणार्‍या चेंडूने निकोल्सच्या दांड्या गुल गेल्या. जागेवर थांबवत त्याला दांडिया खेळायला लावल्या… आणि नंतर किवी कर्णधार विल्यम्सनचा झेल पकडला. आणि कळस चढवला तो टेलरला रनआऊट करत. अर्जुनाने पाण्यात बघून पोपटाच्या डोळ्याचा वेध घेतला तसा फक्त एक स्टम्प दिसत असताना जाडेजाने टेलरला किवींचे आणखी कपडे शिवू दिले नाही… आणि वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 41 धावा वाचवून सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून नाव कमावले. केवळ दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळूनही ‘सर’ जाडेजाने हा पराक्रम केला हे विशेष! पण, या सार्‍याला त्याने चार चांद लावले ते आपल्या जिगरी 77 धावांच्या खेळीने. तो पानिपतची लढाई खेळला. विश्वासराव भाऊसारखी. अब्दालीचे सैन्य चारी बाजूंनी तुटून पडले असताना भाऊंनी निकराच्या लढाईने दोन हात केले तसेच हवेत बॅट गरागरा फिरवत त्याने भारतीयांच्या मनात विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. तो लढत असताना सेनापती माही शांत होता. त्याची ही शांतता इंग्लंडच्या पावसाप्रमाणे टोचत होती… आधी पावसाने याच किवींविरोधातील सामना होऊ दिला नव्हता आणि सेमी-फायनल वन डे नाही तर दोन दिवसांची केली… बेभरवशाची केली.

जाडेजा धावफलक हलता ठेवत असताना माहीने त्याला फक्त कंपनी देण्याचे काम करावे हे रुचत नव्हते. लढाईची जबाबदारी जाडेजावर टाकत तो एक बाजू लावून धरत होता. शांतचित्त धोनीला कदाचित शेवटच्या काही चेंडूवर विजय खेचून आणू, असा विश्वास वाटत असावा, पण ते तर पानिपतच्या युद्धात मारले गेले होते. जाडेजा खेळपट्टीवर असताना आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने आपल्या माहीवे स्टाईलने मारायला सुरुवात केली असती तर कदाचित हा सामना भारताने काही चेंडू राखून जिंकला असता. कूल माहीला शेवटी आपण मॅच खेचून आणू हा आत्मविश्वास आता त्याच्या हातात राहिला नव्हता आणि कदाचित त्याला नशिबाची साथही नसावी. असती तर गप्टिलला फक्त एक यष्टी दिसत असताना तो रनआऊट झाला नसता…

ही तीच व्यक्ती आहे ज्याने जिंकण्याचं व्यसन लावलं… ही तीच व्यक्ती आहे ज्याने सर्वच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केलाय..ही तीच व्यक्ती आहे ज्याने शेवटच्या 2 चेंडूंवर 12 धावा हव्या असताना पण जिंकू शकतोच हा विश्वास दिला.. थोडेच दिवस शिल्लक आहेत, द्या त्याला मान-सन्मान, खेळू द्या त्याला हवं तसं..

नंतर तर असा दुसरा फिनिशर होणे नाही हे बोलण्यात आयुष्य घालवायचे आहे, असे या सामन्यापूर्वी आम्ही छातीठोकपणे सांगत होतो, पुढेही सांगू. पण, किवींच्या या सामन्याची दुःखद किनार त्याला असेल. टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जोगिंदरला शेवटचे षटक देण्याचा निर्णय माही आम्ही विसरू शकत नाही. 2011 च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फॉर्मात असलेल्या युवराजऐवजी स्वतःला बढती घेऊन सामन्यावर कंट्रोल आणि वर हेलिकॉप्टर फिनिश हे माही तुझे पराक्रम आम्ही विसरू शकत नाही. म्हणून आमचा शांत होत गेलेला माही आम्ही शांतपणे पचवत होतो…रेल्वे टीमसाठी खेळताना पहिली बॅटही मित्राने स्वत:च्या पैशातून विकत घेत तुला दिली होती… आणि एक जगज्जेते पर्व सुरू झाले होते… पण, खरे आभार तर आपण त्या बॅनर्जी सरांचे मानायला हवेत. जाळीच्या पुढे चड्डी घालून उभे राहणार्‍या पोराला त्याने तीन लाकडामागे उभे केले आणि त्याने तिरंगा अख्या जगात डौलाने फडकवला…पाकिस्तान-पेशावर..148 धावा.. अर्रर् ! त्या राणा नावेदला 3 लागोपाठ षटकार ठोकून त्याची केस आणि करिअर दोन्ही बरबाद केलीस… आणि तिथून परवेज मुशर्रफ तुझे दिवाने झाले. इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे 138 धावा फटकवताना तुझ्याकडून वाचावं म्हणून तो अँडरसन पायावर यॉर्कर मारू लागला; पण तू त्याला विनातिकीट हेलिकॉप्टरमध्ये बसवून थेट बर्मिंगहॅमला सोडून आलास..

तू खूप काही दिलंस, खूप काही शिकवलंस…आपल्या ध्येयांवर तू प्रेम करायला शिकवलंस..मुलगी जन्मली; पण तू ऑस्ट्रेलियात, तिला तू चक्क 40 दिवसांनी पाहिलंस.. तेव्हा पत्रकारांनी विचारले होते, असं का केलंस ?.. तुझं उत्तर होतं..आधी देश, इथं भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून यायच्या… विराट, जाडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे ही तुझी गुंतवणूक.. आणीबाणीच्या क्षणी तू चक्क सीनियर्सना डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होतास.. किती टीका सहन केलीस. पण, गुंतवणूक देशाला फायदेशीर ठरली म्हणून त्याचे श्रेय तू घेतले नाहीस. संघ हरला की तू संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतोस; पण जिंकल्यावर मात्र कॉर्नरला दिसतोयस… कसं शक्य होतं रे तुला हे..? आज तिसर्‍या नंबरवर येऊन अधिराज्य गाजवणारा कोहली, ओपनिंगची सुरुवात करायला तू संधी दिल्याने ३ द्विशतकं झळकवणारा रोहित शर्मा, 6 षटकार ठोकणारा युवी, रैना-पांड्यासारखे फिनिशर. पूर्वी 10 धावा म्हटलं तरी तंतरणारी आपली बॉलिंग. आणि आज बुमराह, शमी, भुवनेश्वर हे दादा गोलंदाज. नुसत्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामना फिरवणारा सर जाडेजा.. या पोरांच्या डोक्यावर तुझा परिसरूपी हात पडला आणि पोरांनी अख्ख्या जगाचे सोनंच लुटलं… आज हे सारे तुझ्यासोबत होते; पण शेवटी तू त्यांना घेऊन आणखी एका विजयाचा आनंद देऊ शकला नाहीस…

कसोटी निवृत्ती जाहीर करण्याआधी रात्री 1 वाजता तू रैनाला हॉटेलच्या रूममध्ये बोलावून घेऊन त्या सफेद जर्सीवर सेल्फी घ्यायला लावलंस. रैनाला काही समजायच्या आत तू म्हटलास, इथून पुढं मी कसोटी क्रिकेट खेळणार नाही.. आणि तशीच ती जर्सी घालून तू झोपलास… हरल्यावर इतरांसारख्या बॅटी, ग्लोव्हज् तू फेकल्या नाहीस.. शांतच राहिलास. एक झेल टाकला तर आमचा कोहली केवढा वैतागतो. तू एवढा कसा रे कूल… तू ज्या दिवशी क्रिकेट खेळणं बंद करशील त्या दिवशी तुझ्या घराबाहेर तुझ्या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणारा मी पहिला असेन… खुद्द दादा गांगुली म्हणतो, ज्याने माहीआधी भारताला विजयाची सवय लावली होती. तू दुसरा गिलख्रिस्ट नाही होऊ शकत, कारण तू पहिला महेंद्रसिंग धोनी झालायस.. चक्क यष्टिमागच्या तुफानाचं म्हणजे गिलख्रिस्टचं हे वक्तव्य…

माही, तुझ्याकडून भारत शिकतोय, ज्याला जिंकायचं आहे त्याला हे माहीत हवे कधी लढायचं आहे आणि कधी शांत रहायचंय… पण किंवीविरोधात खेळताना हे सारे डावपेच फसले. हे तुझ्या निवृत्तीचे संकेत आहेत का हे आम्हाला माहीत नाही. तू या पराभवानंतर निवृत्त झाला पाहिजेस, असे कोणीही म्हणणार नाही. कारण तू आम्हाला आयुष्यभर पुरतील एवढे विजय दिलेस… पण, का कोण जाणे 1983 चा वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव शेवटच्या दिवसात दोन टप्पी चेंडू टाकायला लागला तेव्हा पाजी आता बस्स… असे मन सांगत होते आणि आपल्या एका बॅटने सार्‍या दुनियेला नाचवणारा सचिन त्याच दुनियेतील लिंबू टिंबू गोलंदाजांना खेळताना खाली बसत होता, ते पाहवत नव्हते…जगज्जेत्यांना सांगावे लागत नाही, तलवार कधी म्यान करायची… माही, तुला तर नाहीच नाही. तू जाणता राजा आहेस. जसे राज्य केलेस तसेच शांतपणे तू मैदान सोडशील… तोपर्यंत आम्ही माही मार रहा है… या भारतीयांच्या जगण्याला नवीन आयाम देणार्‍या आशेवर जगत राहू!
.