Friday, August 7, 2020
Mumbai
27.5 C
घर फिचर्स गाइड सदोष पात्रांचे विश्व

गाइड सदोष पात्रांचे विश्व

Mumbai

लोकांकडून रोझी पायात घुंगरू घालून नाचणारी ‘तवायफ’ म्हणत केली जाणारी अवहेलना असो, किंवा खुद्द राजूच्या आईने तिच्या घरात येण्याने घातलेला गोंधळ असो, सगळ्याच गोष्टी समाजाच्या संकुचित मानसिकतेचं चित्रण करतात. या सगळ्या गुणदोषांचं समर्पक चित्रण कथेला अधिक परिपूर्ण बनवण्यात सहाय्यक ठरतं. राजूचा पापविमोचनाच्या दिशेने घडणारा प्रवास शेवटाकडे येतो, आणि सदोष पात्रांचं हे विश्व पूर्णत्वास येतं.

आपल्यात असलेले दोष आपल्याला अधिक समृद्ध, किंवा खरंतर समृद्ध म्हणण्यापेक्षा अधिक मानवी, अधिक अस्सल बनवतात याबाबत एकमत झाल्यास आपल्या लेखन, चित्रपट आणि इतर कलाकृतींमधील पात्रांचं दोषपूर्ण असणं, त्यांचं अज्ञात वाटेवरून प्रवास करत असणं त्यांना अधिक रंजक का बनवतं, हे सहज लक्षात येऊ शकेल. ज्यामुळे अशा सदोष पात्रांच्या कथा एरवीच्या आदर्श आणि लार्जर दॅन लाइफ पात्रांनी गजबजलेल्या आपल्या चित्रपटांमध्ये वेगळ्या आणि आकर्षणाचं केंद्र का ठरतात हेही स्पष्ट होते. आर. के. नारायण यांच्या बर्‍याच अंगांनी प्रयोगशील असणार्‍या ‘द गाइड’ या कादंबरीचं अडाप्टेशन करायचा विचार देव आनंदने केला तेव्हा कादंबरीच्या प्रयोगशीलतेसोबत आनंदची आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकांसोबत पहिल्यांदा एकत्रित काम करण्याची वेळही तितकीच कारणीभूत होती. त्यामुळे ‘गाइड’ चित्रित करताना त्याची हिंदी आणि इंग्रजी अशी दोन रूपं बनवणं ते त्यात कादंबरी मांडू पाहत असलेल्या विषयांचं समर्पक चित्रण केलं जाणं अशा बर्‍याच एरवी भारतीय चित्रपटसृष्टीत न घडणार्‍या गोष्टी केल्या गेल्या. नाही म्हणायला त्याच्या कथानकातील सामाजिक मुद्यांचा, नायिकेच्या अधिक तीव्र कृतींचा अंतर्भाव टाळत या चित्राला अधिक रम्य, रोमँटिसाईज करणं घडलं असलं तरी ‘गाइड’च्या एकूण स्वरूपाकडे पाहता तो तत्कालीन चित्रपटांहून बराच वेगळा आणि उजवा ठरतो.

राजू (देव आनंद) हा राजस्थानमधील उदयपूरमध्ये राहतो. तिथल्या पर्यटन व्यवसायाच्या लोकप्रियतेची निर्मिती असलेल्या सभोवतालात वाढलेला राजू त्याच्या स्वभावातील गुणांमुळे गाइड बनलेला आहे. रेल्वे स्टेशनवरील नोकराच्या हवाली केलेलं एक दुकान आणि आपली गाइड म्हणून बहरलेली कारकीर्द यामुळे त्याच्या भौतिक गरजा भागत आहेत. शिवाय, स्टेशनवर येणार्‍या लोकांनी ‘राजू गाइड’ म्हणत केलेली विचारपूसही त्याला सुखावणारी असावी. मार्को (किशोर साहू) हा पुरातत्त्वशास्त्रज्ञ इथल्या काही गुहांच्या अभ्यासासाठी गावात आलेला आहे. मुळातच भौतिकवादी दृष्टिकोनातून विचार करत आलेल्या संधीचा फायदा घेणार्‍या राजूकडे मार्कोला गुहा दाखवत तो काम करत असताना दिवसभर बाहेर आरामात फिरून चांगली कमाई करणं त्याच्या दृष्टीने कधीही स्वागतार्ह असणारं आहे.

मार्कोसोबत त्याची पत्नी, रोझीदेखील (वहिदा रेहमान) त्याच्यासोबत आलेली आहे. एका देवदासीची मुलगी असलेल्या रोझीसोबत मार्कोने केलेला विवाह म्हणजे स्त्रीच्या भावना, इच्छा-आकांक्षांचं अस्तित्त्व नाकारत त्यांच्याकडे सुखवस्तू म्हणून पाहिलं जाण्याचं समर्पक उदाहरण आहे. रोझीने नृत्यकलेचं शिक्षण घेतलं आहे आणि तिला नृत्यांगना बनण्याची इच्छा आहे याची कल्पना असूनही मार्को तिच्याशी लग्न करतो, शिवाय त्यानंतर आपल्या प्रतिष्ठेखातर नृत्य न करण्याबाबत असं तिला बजावतो. आपल्या मनाची समजूत घालत असलेल्या, एकटेपणाने त्रासलेल्या तिला गावाची सफर घडवून आणत असताना राजूला नेमकं हेच जाणवू लागतं. पती-पत्नीमधील वाद, मार्कोची तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती या गोष्टी सदर प्रकाराकडे बोट दाखवत असतात. अशातच तिला मार्कोच्या बाहेरख्याली वृत्तीचं दर्शन होणं आणि राजूच्या रूपात स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणं चूक नाही हे सांगणारं कुणीतरी गवसणं तिच्या भावनिक-मानसिक स्फोटासाठीचं उत्प्रेरक ठरतं. आधीच राजूकडे आकर्षित होऊ लागलेली रोझी मार्कोला सोडते, आणि समोर काही पर्याय नसल्याने राजूच्या घरी राहू लागते.

रोझीचं भारतीय समाजात स्त्रियांनी करू नयेत अशा अपेक्षा असलेल्या गोष्टी करणं तिला एक बंडखोर, खंबीर रूपात रेखाटतं. मात्र, तिचं वेळोवेळी तिच्या आयुष्यातील पुरुषांवर अवलंबून असणं किंवा त्यांच्या दडपणाखाली असणं तिच्या पात्राला सदोष बनवतं. ज्यामुळे तिला मार्कोपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी राजूकडून मिळणार्‍या मानसिक पातळीवरील पाठिंब्याची गरज भासते, तर पुढे जाऊन ती नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध झाल्यावर राजूच्या कारभारामुळे ती त्याच्यापासून दुरावत असली तरी एका विशिष्ट ठिकाणापुढे त्याचा विरोध करणं तिला शक्य होत नाही. मॅनेजर म्हणून राजू तिचे सगळे व्यवहार पाहतो. त्यातूनच शेवटी तो जेव्हा ती मार्कोच्या संभाव्य जाळ्यात अडकू नये म्हणून तिच्या खोट्या सह्या करतो, तेव्हा कुठे ती राजूपासून दूर होण्याची शक्यता निर्माण होते. या दोन्ही गोष्टी तिच्या स्वतःच्या आयुष्यात असलेल्या तिच्या मानसिक स्वास्थ्याच्यादृष्टीने हानिकारक पुरुषांपासून दूर जाण्याची अक्षमता दर्शवतात.

राजूदेखील याहून निराळा नाही. त्याच्या कृती त्याच्या बर्‍याच अंशी अँटी-हिरो असण्याचं तथ्य अधोरेखित करतात. ज्यामुळे ‘गाइड’मधील मध्यवर्ती पात्रांपासून ते ती ज्या सभोवतालाचं प्रॉडक्ट आहे त्या समाजातील व्यक्तींचं दोषपूर्ण असणं त्यातील सामाजिकदृष्ठ्या महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकतं. लोकांकडून रोझी पायात घुंगरू घालून नाचणारी ‘तवायफ’ म्हणत केली जाणारी अवहेलना असो, किंवा खुद्द राजूच्या आईने तिच्या घरात येण्याने घातलेला गोंधळ असो, सगळ्याच गोष्टी समाजाच्या संकुचित मानसिकतेचं चित्रण करतात. या सगळ्या गुणदोषांचं समर्पक चित्रण कथेला अधिक परिपूर्ण बनवण्यात सहाय्यक ठरतं. खोट्या सहीच्या प्रकरणानंतर जेलमध्ये जाऊन आल्यानंतर स्वामी म्हणून प्राप्त झालेल्या ओळखीच्या निमित्ताने राजूचा पापविमोचनाच्या दिशेने घडणारा प्रवास शेवटाकडे येतो, आणि सदोष पात्रांचं हे विश्व पूर्णत्वास येतं.

‘गाइड’मधील गाणी त्याला एक प्रगल्भ अभिव्यक्ती प्राप्त करून देतात. चित्रपटातील पात्रांची सद्य मनःस्थिती मांडण्यासोबतच चित्रपटातील मानसिक, वैचारिक मुद्यांवर बोलक्या ठरणार्‍या संकल्पना अधिक समर्पकरीत्या स्पष्ट केल्या जातात. रोझीचं राजूसोबत असताना ‘आज फिर जीने की तमन्ना हैं’ म्हणत व्यक्त होणं तिला त्याचा सहवास अधिक मोकळीक देणारा, अधिक प्रफुल्लित करणारा का वाटतो हे दाखवण्यासोबतच तिची मार्कोसोबत असताना होणारी घुसमटदेखील दर्शवतं. तर ‘गाता रहे मेरा दिल’, ‘ढल जाए दिन’ आणि ‘वहाँ कौन हैं तेरा’ अशी निरनिराळ्या बाजाची, निरनिराळ्या संवेदना बाळगून असलेली गाणी एकाच साऊंडट्रॅकमध्ये असणं त्याची विस्तृत पोहोच दर्शवण्यासोबतच त्याला एक प्रकारची विलक्षण परिपूर्णता बहाल करतं. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग हैं’ हे रोझी आणि राजूच्या एक होऊ पाहणार्‍या विश्वाकडे बोट करतं, तर एस. डी. बर्मन यांचं अफाट कम्पोजिशन असलेल्या ‘पिया तोसे नैना लागे रे’ रोझीचा घडून येणारा प्रवास आणि तिचा राजूकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन्ही गोष्टी साध्य केल्या जातात. एकापाठोपाठ येणारी ‘सैय्या बेईमान’ आणि ‘क्या से क्या हो गया’ ही गीतंदेखील सदर दोन्ही पात्रांचा काळासोबत बदलत गेलेला दृष्टिकोन आणि मानसिकता दर्शवतात. या विस्तृत साऊंडट्रॅकमध्ये बर्मन यांनी केलेला वाद्यांचा वापर ते त्या त्या गाण्यांसाठी निवडलेले गायक, आणि सोबत करणारे शैलेंद्रचे शब्द या सर्वच गोष्टी इतक्या अचूक आहेत की त्या चित्रपटाच्या प्रभावात अधिक भर घालत त्याला एक परिपूर्ण सांगीतिका बनवतात.